यशस्वी संभाषणाचे रहस्य

॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥
– श्रीगणपति अथर्वशीर्ष

श्रीगणपति अथर्वशीर्ष या सुप्रसिद्ध उपनिषदांत गणक ऋषींनी गणपतीची स्तुती करताना “त्वं चत्वारि वाक्पदानि” असे म्हटले आहे! याचा भावार्थ “चारही प्रकारच्या ज्या वाणी आहेत, त्या तूच आहेस”. या चार प्रकारच्या वाणींमधून म्हणजे ‘परा’, ‘पश्यन्ती’, ‘मध्यमा’ आणि ‘वैखरी’ यांच्या मधून गणेश स्वतः अभिव्यक्त होतो असा ऋषींना त्यात अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात, एखादा विचार आपण शब्दांतून प्रकट करतो त्याचा प्रवास या चार प्रकारच्या वाणींतून होतो आणि इतरांना ऐकू येतो. ‘परा’ ही अत्युच्च, अंतरीं विचार प्रसवला ही जाणीव आहे, ‘पश्यन्ती’ म्हणजे मनःपटलावर दृष्यरूपांत ही वाणी पुढे विकसित होते, पुढे ‘मध्यमे’च्या रूपाने ती कंठापर्यंत येते आणि ‘वैखरी’ म्हणजे ह्या वाणीचे रूपांतर शब्दांमध्ये प्रकट होते, इतरांना ती ऐकू जाते. प्रत्यक्ष श्रीगणेशाशी एकरूपता दर्शवून वाणीचे असे महत्त्व इतक्या कमी शब्दांत, इतक्या समर्पक व अर्थगहन पद्धतीने ऋषींनी स्पष्ट केले आहे! संभाषण हा त्याच वैखरीचा सर्वात प्रभावी असा प्रकार आहे. आपले जीवन यशस्वी करण्याच्या दृष्टीनेही तो आपल्याला आवश्यक असणारा असा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. 

सारांश – जीवन यशस्वी करणारे हे संभाषण! “ते कसे यशस्वी करावे?” – यावर माझे काही मौलिक विचार मांडतो आहे. 

संभाषण साधारणपणे दोन किंवा अधिक लोकांमध्ये होत असते. संभाषणाची कारणे अनेक असू शकतात – विनोदी, हलक्या फुलक्या गप्पा-टप्पा, भांडण, वाद, सभा वगैरे. परंतु, महत्त्वपूर्ण संभाषण हे साधारणपणे गंभीर विषयावर असते. आता विषयच गंभीर असेल तर त्या संभाषणातील लोक स्वतःच्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. 

उदाहरणार्थ – उपहास करणे, रागावणे, भयभीत होणे, निराश होणे किंवा दुःखी होणे. अशी संभाषणे अत्यंत कुशलतेने करावी लागतात. अशा संभाषणांमध्ये एखाद्याने चुकीच्या पद्धतीने मत प्रदर्शन केल्याने, इतर लोकांचे मन दुखावले जाऊ शकते किंवा लोकांमुळे आपले मन देखील दुखावले जाऊ शकते. आपल्याला जेव्हा असे अवघड पण महत्त्वाचे संभाषण करायचे असते, तेव्हा साधारणपणे आपण पुढील गोष्टीं अनुभवतो:

१. पलायन – संभाषण अवघड वाटल्याने ते पूर्णपणे टाळतो. एकदम पळच काढतो! बरेचदा, रागाने आपण थेट बोलणेच संपवण्याचा प्रयत्न करतो, किंवा संभाषण तोडून निघून जातो.

२. मौन – संभाषणात भाग घेतो पण मौन बाळगतो कारण, बोलल्याने कुणी तरी दुखावले जाऊ शकते ही भीती असते. 

३. भय – संभाषण व्यवस्थितपणे होऊ शकत नाही, याची सतत भीती वाटून ‘ततपप’ करतो. 

४. कुतर्क – मतभेद असलेल्या इतर लोकांची तथ्यपूर्ण मते सरळ नाकारतो अथवा, स्वतःचं मत इतर लोकांना व्यवस्थितपणे पटवून देता न येतो. 

असे कशामुळे होते? नेहमी कठीण संभाषण करताना आपण असे का चुकतो, अथवा का असे चुकीचे निर्णय घेतो?  हे साधारणपणे सर्वांच्याच जीवनात अनेकदा घडत असते. त्याचा मानसिक त्रास देखील आपल्याला खूप होत असतो. याचा नीट विचार केल्यास दिसून येते की,  याची काही प्रमुख कारणे आहेत:

१. परिस्थितीचा दबाव – कठीण विषयावर चर्चा करावे लागणार असे समजताच, आपण स्वाभाविकपणे त्या गोष्टीचा प्रचंड मानसिक तणाव अनुभवतो. 

२. अनावश्यक बचावाचा पावित्रा – आवश्यकता नसली तरीही, स्वतःचा पावित्रा बदलून आपण स्वतःचा बचाव कसा करता येईल याचाच विचार सतत करू लागतो. 

३. हतबलता – पुष्कळदा आपल्याला आपली बाजू पूर्णपणे समोरच्या माणसाला समजवता येत नाही कारण, समोरच्या माणसाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे देऊ शकत नाही. नुसतीच निराशा पदरी पडते. 

४. अज्ञान व वेळेचा अभाव – विषयाचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे किंवा आपण वेळे अभावी संभाषणाची व्यवस्थित तयारी करू न शकल्यामुळे आपल्याला इतर सदस्यांना योग्य ते प्रश्न विचारता येत नाहीत किंबहुना, त्यांच्या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे देता येत नाहीत. आणि नंतर ती सुचल्याने नुसतीच जीवाची घालमेल होते, पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेकदा तर कठीण संभाषण व्यवस्थितपणे न करू शकल्याने आपल्या हातून एखादी महत्त्वपूर्ण संधी दवडली जाऊ शकते. किंबहुना, त्यामुळे नुसतीच चिडचिड करून आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रांची, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची मनेही दुखविण्याची शक्यता असते. तसेच, आपल्या ऑफिसमध्ये, किंवा एखादी महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी मिळण्यापासून आपण वंचित राहू शकतो. 

खरं तर हे सारे टाळणे आपल्याला फार काही अवघड नाही आहे, पण त्याकरिता आपल्याला संभाषण यशस्वी करण्याचे रहस्य जाणून घेणे अपरिहार्य ठरते. 

कठीण संभाषण व्यवस्थित व यशस्वीपणे हाताळायचे रहस्य:  

संभाषण किंवा संवाद म्हणजे काय? तर जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मुक्तपणे चर्चेच्या विषयावर त्यांची माहिती, मत, सिद्धांत यांची देवाण-घेवण करतात. ते यशस्वी करण्यासाठी पुढील गुण आपल्यांत असणे अत्यावश्यक आहे:

  • श्रवण – ‘ऐकणे’ हा संभाषणातील बोलण्याइतकाच एक महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा आपण कठीण विषयावर चर्चा करत असतो, तेव्हा आपल्याला आपल्या समोरील व्यक्तींचे विचार पूर्णपणे जाणून घ्यायला हवेत. परदृष्टिकोन-बहिरेपणा हा दोष जाणीवपूर्वक टाळावा. पुष्कळदा, जेव्हा इतर लोक आपल्या मनाविरुद्ध विचार प्रकट करू लागतात, तेव्हा आपण त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकूनही घेत नाही त्यामुळे त्यांची बाजूच आपल्याला व्यवस्थितपणे समजू शकत नाही.
  • मूळ हेतु व परिणाम – सर्वप्रथम विचार करावा की, तुम्हांला संभाषणातून साध्य काय करायचे आहे, अथवा भविष्यात या संभाषणाचे परिणाम काय होणार आहेत.  इतरांच्या आणि आपल्या नात्यांमध्ये काय फरक पडेल या गोष्टीचा विचार आधीच करणे महत्त्वाचे आहे. 
  • सत्य व सातत्य – यशस्वी संभाषणाच्या दृष्टीने सत्य आणि सातत्य यांना पर्याय नाही! स्वमत प्रदर्शित करण्याआधी आपण प्रथम स्वहृदयाशी संवाद साधून ते आपल्या खरोखर पटते आहे का हे विचारावे. जो मुद्दा आपण स्वतःलाच पटवून देऊ शकत नाही, तर तो मुद्दा आपण इतरांना कसा पटवून देणार? त्याचबरोबर आपले सिद्धांत, माहिती सर्वमान्य पुराव्यांसोबत सादर करावेत. पुरावे कुठे व कसे मिळवले व ते सर्वमान्य कसे आहेत, ही माहितीही द्यावी. 
  • स्वार्थत्याग, देहबोली व मर्यादा – नेहमी फक्त स्वतःचाच विचार करणे आणि इतरांना पराभूत करायचे आहे या निरर्थक भावनेवर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. समोरील सदस्याचा आत्मसन्मान दुखावेल असे कुठले वाक्य, मत वापरू नये. विचार व्यक्त करताना देहबोली संयमित राहील, ती आक्रमक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपली देहबोली जर आक्रमक झाली तर इतर सदस्य नैसर्गिकपणे त्यांना असुरक्षित वाटल्याने स्वतःचा बचाव करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे वातावरण एकदम गंभीर व कलुषित होते. देहबोलीतील आक्रमकतेचे दोष सामान्यतः पुढील प्रकारांत दिसून येतात –
  • परमतांचा अनादर – अत्यंत आक्रमक सदस्य नेहमीच इतरांना त्यांचे मत मांडू देत नाहीत, मध्येच त्यांची मते खोडतात, सतत उलट प्रश्न विचारतात, विषय भरकटवण्याचा प्रयत्न करतात. 
  • कुत्सितपणा – आक्रमक सदस्य इतरांच्या मतांचा अनादर करून अनेकदा त्यांना नावे ठेवतात, सभेत किंवा अपरोक्षपणे इतरांची तर उडवतात, हसे करतात, जेणेकरून पुढच्या वेळेस इतर सदस्य आपली मते मांडणार नाहीत. 
  • आपले तेच खरे – जिंकण्याच्या ईर्षेने आपलेच मत कसे खरे आहे हे आवाज चढवून इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करतात व इतरांची सगळी मते अरेरावीपणे धुडकावून लावतात. असे लोक सामान्यतः टीका ही ‘विषयाला’ केंद्रस्थानी धरून नव्हे तर ‘व्यक्तीला’ केंद्रस्थानी धरून करत असतात.
  • मोकळेपणा – आपले विचार मोकळेपणाने सांगायला हवेत. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर योग्य ते प्रश्न विचारून ती घेता यायला हवी. खरं तर आपण जाणीवपूर्वक संभाषणात असे वातावरण निर्माण करू शकतो की, संभाषणातील प्रत्येक सदस्य स्वतःचे मत, माहिती, अनुभव, सिद्धांत निर्भीडपणे लोकांसमोर मांडेल. यामुळे, आपल्यालाही इतरांचे मुद्दे व्यवस्थितपणे समजू शकतात. सर्वजण एकत्रपणे सामंजस्याने योग्य निर्णय घेऊ शकतात. याच्या उलट सदस्यांनी आपल्याजवळील माहिती व अनुभव सविस्तरपणे सांगितलेच नाहीत किंवा अंशतः माहिती आपल्यापासून लपवून ठेवली तर असे संभाषण पूर्णपणे यशस्वी म्हणता येत नाही. 
  • पूर्वग्रहनिवृत्ती – संवाद करत असताना आपण आपले अनुभव, विचार, पूर्वग्रह या सर्व बाजूंवर अति विसंबून राहतो आणि इतरांनी मांडलेले तथ्यपूर्ण मत देखील धुडकावून लावतो, यालाच ‘पूर्वग्रहदोष’ म्हणतात, बहुतांश संभाषणे केवळ या एका दोषामुळे फिस्कटतात. संभाषणातील प्रत्येक सदस्याच्या दृष्टीने त्याचे स्वतःचे मत हे बरोबरच असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वाभविकपणे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असल्याने, प्रत्येकाचे विचारही वेगळेच असणार. सर्वांचे विचार ऐकून मग प्रामाणिकपणे ज्यांत सर्वात अधिक तथ्य आहे याचा तुलनात्मक विचार करून कुठले ते मत ग्राह्य ठरवणे हेच श्रेयस्कर ठरते. हे रहस्य आपण जाणले तर आपण कुठलेही कठीण संभाषण यशस्वीपणे हाताळू शकतो.
  • उत्साह, प्रोत्साहन व पोषक वातावरणनिर्मिती – संभाषणातील इतर सदस्यांना त्यांचे मत मोकळेपणाने प्रदर्शित करता यावे आणि तसे करण्यास त्यांना सुरक्षित वाटावे यावर भर देणे किंवा तसे पोषक वातावरण निर्माण करणे खूपच महत्त्वाचे असते. आपण अतिआग्रही नाही आहोत, आवश्यक असल्यास आपले मत, विचार व निष्कर्ष बदलण्यास तयार आहोत असा संभाषणातील इतर सदस्यांना विश्वास येणे, जेणेकरून  इतर सदस्यही आपले विचार, सिद्धांत त्याच उत्साहात स्वीकारण्यास तयार होतील. संभाषणातील इतर सदस्य जेव्हा चांगली मते प्रदर्शित करतील तेव्हा त्यांना अनुमोदन अवश्य द्यावे, प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यांचा उत्साह वाढून ते आणखी अधिक माहिती पुरवू शकतील. आपले विचार प्रभावीपणे समजवण्यासाठी उदाहरणादाखल एखादी समर्पक गोष्ट सांगावी. गोष्टी ऐकणे सर्वांनाच आवडते त्यामुळे प्रत्येक जण लक्षपुर्वक गोष्ट ऐकतो व  गोष्टींत गुंफलेले आपले विचारही सहज त्यांच्यापर्यंत पोहोचतात.
  • जहाल की मवाळ – सत्याची कास न सोडता टीका करणे हे अत्यंत कठीण कार्य असते. केलेली टीका बहुतांश लोकांना पचत नसते. अश्या वेळी, आपली भाषा मवाळ किंवा शक्यतो मधुर असेल तर आपण केलेली टीका समोरच्या व्यक्तीच्या पचनी पडणे थोडे सोपे होते. संभाषणाचा हेतु जर एखाद्याचे दोषदिग्दर्शन असेल तर असे करणे उपयोगी ठरते.

मला खात्री आहे की, उपरोक्त ‘यशस्वी संभाषणाचे रहस्य’ आपण जाणीवपूर्वक आचरणात आणून कितीही कठीण संभाषण सहज हाताळून, त्यातून इप्सित ते परिणामही नक्कीच साधू शकाल. 

श्री. सुजीत कुळकर्णी