President’s Corner
नमस्कार मंडळी,
“भूतां परस्परें पडो मैत्र जीवांचे ||”
या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील मंगल वचनाचा आदर्श घेत, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या या वर्षीच्या कार्यकर्त्यांच्या संघाच्या बोधचिन्हात हे सोनेरी शब्द अंकित करत आहोत.
तसेच, संत तुकाराम महाराजांच्या “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या सांगण्याला या वर्षीच्या ब्रीदवाक्याचे स्वरूप दिले आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर शिकागोतील सकल मराठी समाजासाठी एक आवाहन आहे.
या वर्षी महाराष्ट्र मंडळाची वाटचाल एका पंढरीच्या वारीसारखी असावी, हीच कार्यकारिणीची भावना आहे. वारीत जसे सारे एकत्र येतात, भेदभाव विसरतात आणि एकमेकांना आधार देतात, तसेच आपल्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपलेपणाचा अनुभव यावा. आपण सर्वांनी एकत्र यावे, सहभागी व्हावे आणि मंडळाच्या उपक्रमांना बळ द्यावे, हीच मनःपूर्वक विनंती. एकत्र येऊ, सहकार्य करू आणि संस्कृतीच्या सोनेरी मार्गावर पुढे जाऊ!
आपला विश्वास, आमची जबाबदारी!
महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण माझ्यावर आणि कार्यकारिणीवर विश्वासाने सोपवली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपला हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही संस्कृती, कला, भाषा आणि समाजबंध अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. तो सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेच!
महाराष्ट्र मंडळ ही शिकागोतील मराठी माणसांची कुटुंबवत संस्था आहे. येथे कोणीही परकं नाही. आपला इतिहास, आपले सण, आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपला अभिमान यांना एकत्र साजरं करण्यासाठी हे मंडळ सतत कार्यरत आहे. परंपरांचा सन्मान राखत, नव्या कल्पनांना सामावून घेण्याचा आमचा मानस आहे.
कार्यक्रमांची उत्सवमयी परंपरा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम
आपल्या मंडळाच्या पारंपरिक उत्सवांचे मोठे महत्त्व आहे. नुकतीच साजरी झालेली मकरसंक्रांत आपल्या कृपेने यशस्वी झाली, आणि तीच ऊर्जा पुढील कार्यक्रमांसाठी प्रेरणा देत आहे. त्याकरिता आपल्या सर्वांचे लक्ष लक्ष आभार! असाच लोभ असावा ही विनंती.
आपल्या गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळी महोत्सवासारख्या मोठ्या सणांना या वर्षीही अत्यंत उत्साहाने साजरे करू. त्याचबरोबर काही नवीन उपक्रम आणि विशेष कार्यक्रम देखील यावर्षी सादर करणार आहोत, ज्यांची माहिती लवकरच आपणांस पाठवू. एक झलक म्हणून –
ज्ञानेश्वर माऊलींची ७५० वी जयंती – विशेष महोत्सव
यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांच्या विचारांचा आणि पसायदानातील आशयाचा अधिक व्यापक अर्थ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबवणार आहोत.
याशिवाय, आपल्या मायभू भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव असल्याने त्या निमित्तानेही विशेष कार्यक्रम घेतले जातील.
त्याचबरोबर:
मराठी भाषा आणि सांस्कृतिक उपक्रम
आपल्या पुढच्या पिढीला मराठीशी अधिक घट्ट जोडण्यासाठी, विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणार आहोत.
बालगोपाळांसाठी कथा, कविता आणि गाणी यावर आधारित मराठी भाषा सत्र
मराठी नाटक, संगीत आणि चित्रपट महोत्सव
मराठी इतिहास आणि वारसा समजून घेण्यासाठी परिसंवाद आणि चर्चासत्रे
करिअर मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेशी जोडणारे कार्यक्रम
आपली संस्कृती – आपला अभिमान
महाराष्ट्र मंडळ हे फक्त कार्यक्रम आयोजित करणारे एक व्यासपीठ नाही, तर आपल्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारी आणि मराठी संस्कृती जपणारी कुटुंबसंस्था आहे. या भावनेने, आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळाची वाटचाल पुढे नेऊयात. आपल्या पैकी ज्यांना स्वयंसेवक म्हणून या वर्षीच्या कार्यक्रमांच्या आयोजनात मदत करायची इच्छा आहे त्यांनी कृपया कार्यकारिणीशी त्वरित संपर्क साधावा ही नम्र विनंती.
हे वर्ष आपल्यासाठी मैत्री, सहकार्य आणि आपलेपणाचा अनुभव देणारे ठरो!
“Together, We Can!”
लेखनसीमा.
आपली नम्र,
सौ. नमीता वेदक
अध्यक्षा, महाराष्ट्र मंडळ शिकागो
