वडा-पाव

आम्ही मित्रमंडळी एकदा असेच जमलो होतो आणि मेनू होता महाराष्ट्राचा नव्हे नव्हे …भारतातील सुप्रसिद्ध बर्गर … अर्थातच वडा-पाव! आमचा दादरचा एक मित्र स्टेशन समोरच्या टपरीवरच्या वडा-पाववाल्याचे भरभरून कौतुक करत होता. ते ऐकताना वडापावच्याच प्रेरणेने म्हणा हवं तर माझ्यातील साहित्यिक जागा झाला. मनात म्हटले – “दादर स्टेशनसमोरच्या टपरीवर त्याने वडा-पाव खाल्ला” – ही गोष्ट मराठीतील विविध साहित्यिक प्रकारांद्वारें आपल्याला कशी सांगता येईल?

चित्रकार: सौ. प्राची कुलकर्णी

नवकाव्य

दादर स्टेशनसमोरची
ती रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या
म्हातारी सारखी
अंग चोरून पडलेली
टपरीत वडे तळणाऱ्या
माणसाच्या कपाळावर
तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुरर्र
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात उगाचच
एक विचार येऊन गेला
हीच ती खरी
घामाची कमाई

ललित लेखन

दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं गाडीतून निघून चहूदिशांना पांगली. पुलाखाली कधीकाळी पिवळा रंग दिलेली वडा-पावची लाकडी टपरी. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी आणि त्या मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड खूपच उठून दिसत होते. अगदी व्हान गॉगच्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे खेचलो गेलो आणि तोंडातून आपसूकच शब्द बाहेर आले: ‘वडा-पाव द्या हो एक’.

‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि माझ्या पुढ्यात बशी सरकवली. वडा-पाव खाता खाता एकदम लक्षात आले.. सेंट्रलवरून ४:१० ची कसारा लोकल पकडायची होती ती गेली.. आता बोंबला!

पु. लं. च्या शब्दात

तुम्हाला दादरकर व्हायचे आहे का? मार्ग अगदी सोपा आहे – दादर स्थानका समोरच्या टपरीवर वडा-पाव खा आणि त्याचे जळी-स्थळी गुणगान करा. अहो मीही दादरकरच.. आणि म्हणूनच हे छातीठोकपणे सांगू शकतो! काय तो छान गोल गरगरीत वडा, सोबत ती चटकदार लाल चटणी आणि बाजूला हिरवीगार मिरची.. अहाहा! टपरी लहान पण वडा-पाव महान ही म्हण इथेच जन्माला आली असणार! अर्थात त्याची प्रचिती घ्यायला भरपूर संयम हवा.. आणि इथेच तुमच्या दादरकर असण्याची खूण सापडते. चाळीस बिऱ्हाडांच्या चाळीतील एका संडासासमोर शांतपणे उभे राहण्याच्या योगसाधनेतून कमावलेला संयम ह्या वडेवाल्याच्या टपरीसमोर रांगेत उभे राहताना नक्कीच कामी येतो. मग उभ्यानेच वडा-पाव खाताना शेजारी उभे असलेल्यांच्या बरोबर कालच्या क्रिकेट म्याच बद्दल संभाषण साधू शकलात की तुम्ही दादरकर झालात बघा!

जी ए कुलकर्णी व्हर्जन 

दादर स्टेशनसमोर कडेमनी हाटेल. काळ्याकुट्ट कढईच्या काजळमायेखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभांनी वेढलेल्या कढईच्या डोहकाळिम्यात उकळणारा तेलाचा समुद्र. एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. निळासावळा मळकट शर्ट घातलेले. वातीसारखे किडकिडीत, कपाळावर रक्तचंदन, डोक्यावर केसांचे शिप्तर व डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. सांज शकुनाच्या पिंगळ्यावेळी तो माणूस दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली! एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने हिरव्या मिर्चीसोबत बशीतला वडा-पाव बकाबक खाऊन टाकला. 

वडेसम्राट आवृत्ती

कुणी एक टपरी देता का टपरी? …

अरे बाळांनो आता हे तेल थकलंय.. वडे तळून तळून..एकेकाळी दादरच्या फलाटांवर गर्जणारा तो आवाज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गोंगाटात आताशा हरवतो.. या तूफानाला हॉटेल नको, निऑन दिव्यांची झगमगती पाटी नको, इंटरनेटवरची वेबसाईटही नको.. बस एक छोटीशी टपरी पुरे आहे.. कारण हा गणपतराव बेलवलकर वडेवाला खुरडत खुरडत जळक्या कढईतून तुटक्या झाऱ्याने अजूनही चवदार वडे काढतोय.. पण आता या गर्दीतले तुझ्यासारखे मोजकेच जे प्रवासी इकडे येतात.. त्यांच्यासाठी तरी मी म्हणेन.. या वड्याला, या झाऱ्याला, या कढईला आणि कढईतल्या या तूफानाला.. कुणी टपरी देता का टपरी? 

श्यामची आई व्हर्जन 

‘श्याम, बाळ खा हो दादरचा छान वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ हा पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!’

ग्रेस आवृत्ती

विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला व एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर व तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा व तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!      

गो. नि. दांडेकर व्हर्जन 

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल? 

अभिजात काव्य

वडा वडा ही गर्मस्य तळूनी भरती जे पावात या ।
अद्भुत स्थानं दादरस्य देती चटणी लावूनिया ॥
परी त्राणाम् हे बनवायचे विनाशाय च दुष्क्रृत्या ।
गर्म संगतीच्या चहापानाने समाधानी युगे युगे ॥

नवकथा 

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्टा सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया असतात, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा-बाय-सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचे त्राण त्याला नव्हते म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला व चार घासात संपवून टाकला.

श्री. अभिजित रायरीकर