‘पुल’कित जिंदगानी

‘पु. ल. देशपांडे सर्वव्यापी आणि अमर आहेत’ असा माझा एक बालसुलभ समज होता अश्मयुगात. शनिवार संध्याकाळचे B&W पिच्चर, कॅसेटसवरची कथाकथने, दिवाळी अंकातले लेख, नवरात्रीतली व्याख्याने, दूरदर्शनवरचं “प्रतिभा आणि प्रतिमा”, बोरकर-मर्ढेकरांच्या कवितांची वाचने, कुमार गंधर्व-मन्सूरांच्या मुलाखती … जिथे पहावं तिथे मराठी मनात पु. लं. अगदी “छा गये” सारखे झाले होते त्यावेळी. मराठी साहित्याचा नव-वाचक असण्याच्या अवस्थेत तर “सब-कुछ पु. ल.” साहित्य अधाश्यासारखं संपवून टाकलं आणि नंतर आलेल्या उदासीनतेची जगबुडी थोपवण्यासाठी देशपांड्यांनाच परत पहिल्यापासून वाचायला घ्यावं लागलं. शिक्षक सांगायचे, “पु.लं.चं खळाळणारं पण खोल पाणी समजण्यासाठी २-३ वेळा तरी ते वाचावे लागतील”, आमच्यासारखे नव-साक्षर म्हणायचे, “वाचू की ३-४ वेळा, आहे काय त्यात”. शिक्षकांचे उत्तर यायचे “तसे नाही रे, पु.लं.चं साहित्य दर १०-१५ वर्षांनी वेगळे भावतं, तिशी-चाळीशीमध्ये परत वाचा”. पुढे कधी तरी जी.ए., खानोलकर, ग्रेस, दळवी, तेंडूलकर मंडळीनी झपाटून टाकलं, पण पु.लं.कडे मात्र मनातल्या निरागस नॉस्टाल्जियाच्या एका कोपरयाचं साम्राज्य तेवढं राहिलं. पोटाची खळगी भरताना पु. लं. नावाचं मनाचं माहेर अधून-मधून खुणावत राहिलं पण तिथे जाणे मात्र बंदच पडलं.… पण पु.लं. मात्र अनपेक्षितपणे भेटायला लागले !

शिकागो युनिव्हर्सिटीतला ९० वर्षाचा एक लिफ्टमन गोड आजोबा त्याच्या “गुड ओल्ड जाझ डेज्” च्या आठवणींनी ३० सेकंदात गहिवरून यायला लागला की पेस्तनकाका हंड्रेड पर्सेंट असेच असतील अशी खात्री पटायला लागली. मित्रांबरोबर “तुम्हाला न्यूयॉर्कर व्हायचंय, शिकागोकर की सान्फ्रान्सिस्कोकर ?” अश्या चायपे चर्चा व्हायच्या तेंव्हा तर एकदम ‘देजा-वू’ झाल्यासारखं वाटायचे. बायकोबरोबरची साप्ताहिक खडाजंगी “तुला शिकवीन चांगलाच धडा” च्या समेवर एकदा धडकली, की या गाण्याचं पुढचं कडवे ती बोलायच्या आधीच ऐकू यायला लागलं. एडिंबराच्या किल्ल्यात फिरत असताना तिथली गाईड म्हणून गेली, “स्कॉटिश क्वीन मेरीने याच ठिकाणी कालच्याच दिवशी सहाव्या जेम्सला जन्म दिला, पुराव्याने शाबित करून दाखवेन”, आणि साक्षात हरितात्याच समोर अवतरले. (ती गाईड यमीपेक्षा सहापट गोरी होती ही बात अलाहिदा !). आमचं मोठं कार्टे जेंव्हा प्रश्नांच्या माकडउड्या मारायला शिकलं, तेव्हा माझं खरं नाव धोंडोपंत आणि पोरट्याचं नाव शंकर्‍या असावे अशी दाट शंका मला बरेच महिने येत होती. नेपरव्हीलमधल्या मित्राने त्याचं नवीन बांधलेलं घर दाखवताना “…आणि इथे मी काय मजा केलीय माहिती आहे का ?” चं विंग्रेजी पालुपद सुरु केले, तेंव्हा थोड्या वेळातच हा “माणूस-कम-सैतान” बनणार अशी भविष्यवाणी करायला ज्योतिष्याची गरज नव्हती. 

केंव्हातरी हापिसातल्या माझ्या एका सहकार्‍याने भरपूर सोमरस प्राशनानंतर त्याच्या आयुष्याची जी काही चित्तरकथा सांगितली तेंव्हा त्याचं खरं नाव “नंदा प्रधान” आहे का असाही विचारायचा मोह होऊन गेला होता. आजकाल तर शिकागोच्या ‘-२०°फ’ थंडीत घराबाहेरचे ड्राईव्हवे ग्लेशियर साफ करायला जाताना मी हिमालयातल्या कडाक्याच्या थंडीने कुडकुडणार्‍या त्या मराठी सैनिकाचे शतशः आभार मानतो, ज्याने पु.लं.चा “माझे खाद्यजीवन” लेख वाचल्यावर ‘छे! छे! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे’ असा आपल्या मनाशी निर्धार केला, आणि आमच्यासारख्या खादाडांसाठी भीषण थंडीवरचा रामबाण उपाय सुचवला.

… तर पु. लं. असे अकल्पितपणे भेटायला लागले आणि माझ्या शिक्षकांची बत्तीशी वयाच्या तिशी-चाळीशीत खरी व्हायला लागली. लक्षात आलं की आपण पु.लं. च्या साहित्यापासून खूप वर्ष-मैलानी जरी दूर गेलो असलो तरी पिंडाचे हे मुळातूनच झपाटलेपण काही आपला पिच्छा सोडत नाहीए. पण त्याहूनही मोठी गोष्ट जाणवली ती म्हणजे पु.लं.च्या साहित्यातून जरी १९५०-८० च्या दशकांमधला मराठी माणूस भेटला तरी मुद्दलात ते भाष्य करत होते माणसाच्या मूलभूत स्वभाव प्रवृत्तींवर. आपण जगात कुठेही आणि कुठच्याही दशकात पोचलो तरी पु.लं.ची एखादी तरी वल्ली तिथे आपल्या आधीच पोचलेली दिसते व ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत” या केशवसुतांच्या ओळींसारखा अनुभव देत रहाते. पु.लं.चं साहित्य जेव्हढे जास्त वैयक्तिक-सामाजिक झाले, तेव्हढ्याच पटीत वैश्विक होत गेलं ते याचमुळे.

तरीसुद्धा साहित्यातली अभिजातता, विश्वात्मकता यासारख्या मोठ्या शब्दांच्या वार्‍यालाही उभे न राहता पु.लं.नी मराठी मनाला जागतिक विचारधारेच्या जवळ तर आणलेच, पण संस्कृतीसारख्या वाहत्या पाण्याला धरायचं तरी कसं हेही शेवटी त्यांनीच शिकवले. महाराष्ट्रातून आलेल्या कलमी रोपांना शिकागोच्या मातीमध्ये रुजवायचा प्रयत्न करताना एका नवीनच मरहठ्ठ्या अम्रिकी संस्कृतीची गोंडस फळे निर्माण करायची रेसिपी पु. लं. च्या भाषणां-लेखांमधून सापडत गेली. होळीची पुरणपोळी ही पीच कॉब्लर बरोबर खाण्यात व तुकोबांच्या गाथेला वॉल्ट व्हिटमनचं अस्तर लावण्यात काहीही चूक नाही याची खात्री पटली. आणि मग पंडित रविशंकरांची सीडी लुईस आर्मस्ट्रांगच्या सीडीला पाठ लावून बसायला लागली, व मिस्टी कोपलँडचा बॅले बिरजू महाराजांच्या कथ्थकच्या संगतीत धन्य झाला. कधीही न पाहिलेल्या बेब रुथ व योगी बेराची नावे जेंव्हा विजय मर्चंट-विजय हजारेंच्या पंक्तीत आनंदाने नांदायला लागली, तेंव्हा संस्कृतींच्या सरमिसळीचं एक वर्तुळ पूर्ण झालं … पु. लं. च्या कृपेने !

पु.लं.चा अमरत्वाचा पट्टा जून २००० मध्ये विधात्यानं परत मागून घेतला. पण आता लक्ष्यात येतंय की शेवटचा मराठी रसिक जिवंत असेपर्यंत ‘पु. लं.’ नावाची ‘प्रवृत्ती’ अमर राहणार आहे, अगदी त्या “कोको” चित्रपटातल्या हेक्टरच्या आठवणीसारखीच. पु.लं.चं जन्मशताब्दी वर्ष सुरु झालं म्हणून परवाच “बटाट्याची चाळ” १७६० व्यांदा परत उघडलं. पहिल्याच पानाच्या समेवर हसून हसून डोळ्यातून पाणी आलं, पण ते फक्त विनोदामुळेच आलं असं मी म्हणणार नाही.

श्री. प्रणिल वैद्य