विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा

‘काय?’, ‘कसे?’ आणि ‘का?’ या प्रश्नांतून विज्ञान हा विषय जन्माला आला व या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्याचा नकळत विकास होत गेला. निसर्गाच्या व्यवहारांमागे काही सुसूत्रता आहे. ते व्यवहार कोणाच्या लहरींवर अवलंबून नसून काही ठराविक चाकोरीतून चालू असतात, याचा प्रत्यय मानवाला हळूहळू झाला व त्यामागचे रहस्य उकलताना त्याला विज्ञानाचा साक्षात्कार होत गेला. वर फेकलेली वस्तू खाली येते, पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते, समुद्रात ठराविक वेळी भरती येते या विविध स्वरूपाच्या घटनांमध्ये विज्ञानाचा एकच नियम आहे – तो आहे ‘गुरुत्वाकर्षणाचा’. आकाशात चमकणाऱ्या विजा, इंद्रधनुष्याचे सप्तरंग किंवा लोहचुंबकाचे आकर्षण हे सर्व ‘विद्युतचुंबकीय शास्त्र’ या एकाच नियमात बसतात. 

विज्ञानाची माहिती मिळवताना तिचा उपयोग आपल्या जीवनक्रमात करायला मानवाने सुरुवात केली व तेथूनच तंत्रज्ञानाचा प्रारंभ झाला. प्राथमिक तंत्रज्ञान अवतरले तेव्हा आदिमानवाने कृत्रिम मार्गांनी अग्नी निर्माण केला. ऊर्जानिर्मितीचा तो पाया समजला पाहिजे. आजच्या विज्ञान युगात अतिवेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानामागे तीच ऊर्जानिर्मिती आहे. विज्ञान हे जिज्ञासेतून विकसित होते, तर तंत्रज्ञान गरजेतून. प्रश्न विचारून, वाद घालून, प्रयोग करून, तपासणी करून विज्ञानाचा पाया घट्ट केला जातो. तसेच इहलोकात जगण्याची जिद्द असेल, आपले राहणीमान सुधारण्याची अहमहमिका असेल तर नवे तंत्रज्ञान निर्माण करायची क्षमता येते. आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानात नवनवीन शोध लागत आहेत व त्यांचे रूपांतर वेगाने उपयोजित तंत्रज्ञानात होत आहे. अशा वेगवान जीवनात विज्ञान व तंत्रज्ञानापासून अलिप्त राहणे कुठल्याही समाजाला परवडणारे नाही. अश्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे काय स्थान राहील? प्रथम विज्ञानाच्या संदर्भात पाहू.

विज्ञान हा पाठांतराचा विषय नव्हे, तो खरोखर समजला पाहिजे … म्हणजे त्यामागे मेंदूला विचार करण्याचे श्रम घ्यावे लागतात. मेंदूची दोन कामे असतात. एक म्हणजे माहिती साठवणे आणि तिचा हवा तो भाग जरूर असेल तेव्हा काढून देणे. दुसरे काम म्हणजे विचार करून त्या माहितीतून नवी कल्पना, नवे तर्क, नवे निष्कर्ष काढणे. पहिला भाग पाठांतराचा आहे, दुसरा सर्जनाचा. पाठांतराच्या बाबतीत संगणक मानवी मेंदूच्या पुढे गेला आहे, पण सर्जनक्षमतेबाबतीत मानव अजूनही संगणकाच्या पुढे आहे. विज्ञानाचा विकास करायला हवी असलेली सर्जनक्षमता यायला मेंदूत विचारमंथन होणे आवश्यक असते. सामान्यपणे हे विचारमंथन एखाद्या भाषेच्या माध्यमाने होते. ते ज्या भाषेत होत असेल त्या भाषेत मेंदू विज्ञान समजून घेत असतो आणि (शक्य झाल्यास) त्यात भर टाकतो. हे विचारमंथन मातृभाषेत होत असते असे मानले जाते. अनेक भाषा बोलणाऱ्या गृहस्थाची मातृभाषा शोधून काढण्याचे कसब नाना फडणवीस यांनी दाखविल्याची आख्यायिका आहे. प्रत्येक व्यक्तीची मनात विचार करण्याची जी एक निश्चित भाषा असते तीच भाषा विज्ञानासाठी स्वाभाविक समजली पाहिजे. या लेखासाठी मी त्या भाषेला ‘मातृभाषा’ म्हणेन. विशेषतः विज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणासाठी हीच भाषा सर्वथैव योग्य आहे.

सध्याचे विज्ञान यूरोपातून आले म्हणून त्याचे प्राथमिक शिक्षण यूरोपीय भाषेतून दिले पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. स्वतः विज्ञान हा विषय अमुक एका देशातला म्हणून त्या देशाची छाप घेऊन आलेला नसतो. पाण्याप्रमाणे विज्ञानदेखील निर्गुण आहे. टँकरमधले किंवा नळाचे पाणी आपण आपल्या सोयीने योग्य त्या भांड्यात साठवितो व पितो. न्यूटनने जुन्या इंग्रजीत मांडलेले नियम जर मराठी भाषिकाला मराठीत समजत असतील, तर ते त्या भाषेतच सांगितले पाहिजेत. त्यामुळे त्या नियमांची विश्वासार्हता नष्ट होत नाही व त्यांतील तथ्येही शाबूत राहतात. सामान्य अनुभव असे सांगतो, की कुठलीही प्राथमिक स्वरूपाची वैज्ञानिक माहिती मातृभाषेतून अधिक सहजगत्या कळते. इंग्रजीतून विज्ञान शिकणाऱ्या मराठी भाषिक मुलाला प्रथम इंग्रजी विधानाचे मराठीकरण मनातल्या मनात करून मग त्याचा अर्थ लावावा लागतो. पुढे त्या विधानाची छाननी करण्यासाठी लागणारे विचारमंथन मराठीतच केले जाते. ही प्रक्रिया मूळ विधान मराठीत असल्यास अधिक सोपी व सुटसुटीत होते. प्राथमिक शाळांत इंग्रजीतून शिकविल्या जाणाऱ्या वैज्ञानिक अभ्यासक्रमाकडे दृष्टी टाकल्यास, या वस्तुस्थितीची कल्पना येते. ‘Air is necessary for existence.’ या वाक्यात दोन मोठाले इंग्रजी शब्द आहेत. त्यांचे स्पेलिंग बरोबर करून अर्थ लावण्याच्या खटपटीत मूळ वैज्ञानिक तथ्य बाजूला पडते. या वाक्यातील तथ्य मराठी विद्यार्थ्याला ‘अस्तित्त्वासाठी हवेची जरूरी असते’ – अशा सोप्या शब्दांत सांगता येते आणि हाच मुद्दा सामान्य माणसाला विज्ञान समजावून सांगताना विचारात घेतला पाहिजे.

मराठीतून अथवा अन्य देशी भाषांतून विज्ञान सांगण्यासाठी पारिभाषिक शब्दांचा बागुलबुवा उपस्थित केला जातो. इथे चूक दोन्ही बाजूंकडून होते. देशी भाषांचे कट्टर समर्थक नवे पारिभाषिक शब्द वापरण्याचा हट्ट धरतात. कित्येक पारिभाषिक शब्द मूळ इंग्रजी शब्दांपेक्षा बोजड, क्लिष्ट आणि ओढूनताणून तयार केलेले वाटतात. पारिभाषिक शब्दांबद्दल माझे मत असे आहे की, सोपे प्रचारातले इंग्रजी पारिभाषिक शब्द जसेच्या तसे मराठीत घ्यायला हरकत नाही. कुठलीही भाषा नव्या शब्दांमुळे समृद्ध होते. इतर भाषांतून आलेले शब्द आत्मसात करूनच इंग्रजी भाषा समृद्ध झाली. हिंदी, मराठीसारख्या भाषांनाही काही प्रचलित इंग्रजी वैज्ञानिक शब्द आहेत. ते त्या रूपांत वापरणे वावगे वाटू नये. रेडिओ, टेलिफोन, पोस्ट ऑफिस यांसारखे इंग्रजी शब्द आता मराठीत रूढ झाले आहेत. रेडिओसाठी संस्कृतजनित एखादा क्लिष्ट शब्द तयार करण्यात अर्थ नाही. अनेकदा मराठीतून विज्ञान सांगताना ‘शुद्ध’ भाषेच्या आग्रहाखातर अनोळखी बोजड शब्दांचा भडिमार केला जातो आणि त्यामुळे वैज्ञानिक विधाने मातृभाषेतूनदेखील कळत नाहीत. समाज प्रबोधनासाठी विज्ञानाची माहिती देताना ‘इंग्लंडमधून आलेले विज्ञान त्याच देशाच्या भाषेतून कळेल’ असा आग्रह धरणे जितके चुकीचे आहे, तितकेच वरील शुद्ध संस्कृतजनित भाषेचा वापर करणेही सदोष आहे. मातृभाषेतून विज्ञान सांगण्याचे कसब या दृष्टिकोनाच्या दरम्यान सापडेल. 

स्वातंत्र्योत्तर काळात विविध भारतीय भाषांतून पारिभाषिक शब्द तयार करण्यावर पुष्कळ भर दिला गेला; पण एका महत्त्वाच्या गोष्टीचे भान राखले गेले नाही. एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट होईल. Atom आणि Molecule यांसाठी मराठी पारिभाषिक शब्द आहेत ‘अणू’ आणि ‘रेणू’. हिंदीत मात्र हे पारिभाषिक शब्द आहेत ‘परमाणु’ आणि ‘अणु’. गंमत म्हणजे हे सगळे शब्द संस्कृत भाषेतून तयार केले आहेत! ज्या भारतीय भाषा संस्कृतपासून जन्मल्या त्यांना हे वैज्ञानिक शब्द तेच ठेवता आले नसते का? प्राथमिक शिक्षणापासून, उच्चशिक्षण आणि संशोधन हे दुसरे टोक पाहिले तर मात्र असे वाटते की, इंग्रजीचा अव्हेर करुन चालणार नाही. वैज्ञानिक संशोधन, मग ते उच्च दर्जाचे असेल तर बऱ्याच वेळा देशांची, राष्ट्रांची मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. तेथे विचारांची देवाणघेवाण प्रांतिक भाषेतून न होता आंतरराष्ट्रीय भाषेतून होते आणि इथे इंग्रजी भाषाच योग्य ठरते. इथे इंग्रजीकडे गुलामगिरीची भाषा म्हणून न पाहता देशादेशांना जोडणारी भाषा म्हणून पाहिले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी देखील इंग्रजीतून प्रसिद्ध होणारा ग्रंथसमुदाय आणि नियतकालिकांचे जाळे उपयोगी पडते. इंग्रजीच्या अनाठायी द्वेषामुळे आपले विद्यार्थी आणि संशोधक या समृद्ध साधनाला मुकतील. या कारणांमुळेच रशिया, जपान, चीनसारख्या देशांमध्ये सुद्धा विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी इंग्रजीची निकड भासू लागली आहे. इंग्रजी आत्मसात करायला तेथील शास्त्रज्ञांना जेवढे कठीण जाते, तेवढे आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जात नाही. कारण इंग्रजीचा वारसा अद्याप या देशात टिकून आहे. तेव्हा विज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी इंग्रजीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. जरी ती भाषा इंग्रजांच्या वसाहतवादामुळे आपल्यावर लादली गेली असली तरी आजच्या विज्ञानयुगात देशादेशांतील संलग्न भाषा म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे. संकुचित दृष्टिकोनातून तिचा अवमान करणे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महागात पडेल. परंतु, प्राथमिक शिक्षणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी विज्ञान मातृभाषेतून सांगितले जावे. तेथे इंग्रजीचा आग्रह धरणे खुळेपणाचे  ठरेल.

आता तंत्रज्ञानाचा विचार करू. आधी सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा विकास व्हायला ‘गरज’ भासणे आवश्यक आहे. आपले तंत्रज्ञान अविकसित राहिले याचे कारण आम्हां भारतीयांची अल्पसंतुष्ट प्रवृत्ती. इहलोकात आपण भोगतो ते पूर्वजन्मीचे फळ व परलोकात सगळी सुखे आहेतच. अश्या भावनेने व त्यामुळे इथे राहणीमान सुधारण्यासाठी लागणारी जिद्द नसल्याने आपले तंत्रज्ञानही पुढे जाऊ शकले नाही. यूरोपातील गरिबी व निष्ठुर हवामान यांवर तोडगा काढता काढता तेथे तंत्रज्ञान आपोआप आले. कानेकोपरे गाठले. आपण मात्र ‘आपली भूमी सोडून परदेशी जाणे म्हणजे पाप’ असे मानून घरी बसून राहिलो. गरज भासणे ही पहिली पायरी! ती पूर्ण करणे ही दुसरी! ती सहजगत्या पूर्ण करणे म्हणजे दुसऱ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान विकत घेऊन वापरणे. ही सोपी पद्धत आपल्याला परावलंबी करते. त्या उलट, उशीर लागला तरी स्वबळावर आवश्यक तंत्रज्ञान निर्माण करणे हे केव्हाही अंततः श्रेयस्कर ठरते. भारताला अलीकडे सर्वाधिक उपभोक्ते असलेला देश म्हटले जाते. आपल्याला तंत्रज्ञान व त्यातून निर्माण झालेली सामग्री विकणाऱ्यांच्या दृष्टीने जरी आकर्षक बाब असली तरी आपल्या स्वावलंबनाच्या व आत्मविश्वासाच्या दृष्टीने खचितच ती उपयुक्त नाही आहे. 

तंत्रज्ञानाबद्दल ओढ निर्माण व्हायला, त्याचे आदान-प्रदान, त्याची माहिती, नव्याची निर्मिती आदींसाठी देशाची, प्रांताची भाषा महत्त्वाची असते. म्हणून मराठीचा वापर गरजेचा आहे. शहरी समाज सोडला तर महाराष्ट्रात अजूनही मराठीच सार्वजनिक भाषा आहे, पण ती टिकून राहील का? या प्रश्नाचे उत्तर भाषेच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. भाषेला या नव्या CD ROM च्या युगात संगणकाशी जोडून घ्यावे लागणार. भाषा लिहिण्याचे, संपादन करण्याचे संगणकीय मार्ग शक्य तितके उपयोगकर्त्याच्या सोईचे (User Freindly) असले पाहिजेत. त्याचप्रमाणे विज्ञान-तंत्रज्ञानातले नवनवे पारिभाषिक शब्द भाषेला खपवून घेता आले पाहिजेत. पण त्यातूनही महत्त्वाचे म्हणजे भाषेत सतत नवनिर्मिती होत राहिली पाहिजे. ही नवनिर्मिती झपाट्याने घडणाऱ्या स्थित्यंतराला सक्षमपणे प्रतिबिंबित करणारी असायला पाहिजे.

कदाचित एक काळ असा येईल जेव्हा सर्व राष्ट्रांचा सारखा विकास होऊन जीवनमानात सारखेपणा येईल. सगळीकडे समानता आली की, मग लक्षणीय असे काही घडणार नाही. भौतिकशास्त्रात अश्या स्थितीला ‘ऊष्मागतिकी समतोल’ (Thermodynamic Equilibrium) असे म्हणतात. त्या दशेत जीवन अतिशय कंटाळवाणे होईल. तशी स्थिती आज नाही व निकटच्या भविष्यात येणारही नाही. आपण आशा करूया की, तशी स्थिती पुष्कळ शतके उद्भवणार नाही व तोपर्यंत जीवनात विविधता आहे, हास्यरस आहे, तसा करुणरसही आहे. सामाजिक असमतोल आहेत, संघर्ष आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या गतिमानतेमुळे सभोवतालची एकंदर स्थिती बदलते आहे. या गतिमानतेचे चित्र समर्थपणे प्रतिबिंबित करणाऱ्या भाषाच जिवंत राहतील व समृद्ध होतील. मी आशा करतो, की मराठी भाषा अश्या भाषांत असेल आणि शंभर वर्षांनंतरदेखील आजच्याप्रमाणे काव्य-शास्त्र-विनोदाबरोबर विज्ञानाला घेऊन पुढे जात असेल.

प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर

(प्रस्तुत लेखक हे जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, ज्येष्ठ वैज्ञानिक, सुप्रसिद्ध लेखक – पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, फाय फौंडेशन तर्फे राष्ट्रभूषण, भटनागर, कलिंगा, बिर्ला, इंदिरा गांधी अशा असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ‘रचना’च्या दृष्टीने उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे खास सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त ‘रचना’ करिता प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांनी आशीर्वादरूपी लेख पाठवले आहेत. त्यांच्या प्रख्यात व प्रेरणादायी कार्याला ‘रचना’ कडून ‘नमन’ – ‘रचना’ संपादक – चेतन