संसार

बाई घरी येते धावत पळत.

पाठीवर वाहून आणलेले असते ओझे

जिवलगांसाठी पाय तुटेपर्यंत

हिंडून मिळवलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचे.

दारात भेटतात जिवलग.

ओळखीचं स्मितही करत नाहीत.

प्रवासाचा शीण आणि भुकेजलं मन घेऊन

बाई घरात शिरते.

जाणार्‍या कृतघ्न पाठींना पाठमोरं करून

हातात झाडू घेते.

तिच्याकडे आसासून पाहत असतात,

घराचे कानेकोपरे

उजळतं हसू तिने जीव लावून सजवलेल्या भिंतींवर

झाडं वाट पाहत असतात आतूरतेने

नव्या कळ्या दाखवायला.

खिडक्या वाट पाहत असतात,

स्वच्छ प्रकाश आत येईल म्हणून!

निगुतीने सांभाळलेल्या वस्तू

पुन्हा एकदा जाणीव करून देतात,

संसारच फक्त तिचा असतो,

माणसं तिची नसतात.

सौ. सुजाता महाजन