वैज्ञानिक वातावरण – निर्मितीची आवश्यकता

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? हा दृष्टिकोन व्यक्तीविशिष्ट असतो की समाज, संस्कृती यांचाही विशेष असतो? आज तो कितपत अस्तित्वात आहे? त्याच्या प्रसारासाठी काय करता येईल? थोडक्यात वैज्ञानिक वातावरण आपल्या देशात निर्माण करण्याची आत्यंतिक गरज का भासते? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

वैज्ञानिक पद्धत

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवताना सांगितले जाते की वैज्ञानिक परीक्षणाच्या तीन पायर्‍या आहेत:  प्रयोग (प्र),  निरीक्षण (नि) आणि तथ्य (त). परीक्षणाची ही पद्धत विज्ञानाच्या शेकडो वर्षांच्या वाटचालीतून निर्माण झाली आहे;  आणि मी ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलतो आहे, तोच या साऱ्याच्या मुळाशी आहे.  विज्ञानाची सुरुवात माणसाला निसर्गाविषयी वाटणार्‍या  कुतूहलातून झाली. त्याचे मूळ आहे ते प्रश्नांत ‘काय?’ ‘कसे?’ आणि ‘का?’ हे प्रश्न मानवाने स्वतःलाच विचारले आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक उत्तराने आणखी अनेक प्रश्नांना जन्म दिला. एका उत्तराने एक प्रश्न सोडवला, त्याच वेळी अनेक नव्या दिशा दिसू लागल्या. अलेक्झांडरने – तो ‘ग्रेट’ म्हणवला जाण्याआधी एकदा तक्रार केली होती की त्याच्या वडिलांनी एवढे विजय मिळवले होते की त्याला पादाक्रांत करायला जग शिल्लकच राहणार नाही. मला वाटते की निसर्गाची गूढे उकलण्याच्या शास्त्रज्ञांच्या लढाईत ही परिस्थिती कधीच येणार नाही.

विज्ञानात ‘प्र-नि-त’  प्रक्रिया कशी कार्य करते ते आपण बघू या. आधी सांगितल्याप्रमाणे मुळाशी निसर्गाबद्दलचा कोणतातरी प्रश्न असतो, जसे बहुतेक जगातली कोणती तरी घटना.  उदाहरणार्थ, विजेच्या तारेतून वाहणारा प्रवाह सभोवती चुंबक क्षेत्र निर्माण करतो.  यासंबंधीचे विधान घ्या. याची परीक्षा आपण कशी घेऊ? त्यासाठी ‘प्रयोग’ करावाच लागेल. विद्युत्प्रवाह वाहून नेणार्‍या एका तारेच्या जवळ ठेवलेल्या एका चुंबकसूचीत होणाऱ्या हालचालीचे निरीक्षण करण्याचा प्रयोग करावा लागेल. त्यातल्या प्रयोगाच्या मांडणीत किंवा प्रयोगातील घटकांमध्ये अनेक बदल करता येतील, जसे विद्युत्प्रवाहाची तीव्रता, तारेपासून चुंबकसूचीपर्यंतचे अंतर, वगैरे.  यातून वेगवेगळ्या परिस्थितींतील निष्कर्ष अभ्यासता येतील.  अशा प्रयोगांचे दुसरे उद्दिष्ट त्यातली व्यक्तिनिष्ठता शक्य तितकी कमी व्हावी व निष्कर्ष शक्य तितके वस्तुनिष्ठ असावेत, हे असते. म्हणजे प्रयोग कोण करतो याला महत्त्व राहत नाही. निष्कर्ष नेहमी तेच येतात.
पुढची निरीक्षणाची पायरी वाटते तेवढी सरळ नाही प्रयोगाचे निष्कर्ष कधी गुणात्मक असतात, कधी संख्यात्मक. संख्यात्मक निष्कर्षांत वैज्ञानिकाला आकड्यांनी संच मिळतात. उदाहरणार्थ, वर दिलेला प्रयोग आणि इथेच तथाकथित ‘संदेश’ आणि ‘गोंगाट’ गुणोत्तराचा विचार करावा लागतो. इथे संदेश म्हणजे आपण शोधत असतो तो आकृतीबंध त्याला पार्श्वभूमी असते संबंधित नसलेल्या माहितीच्या गुंतागुंतीची, ज्याला ‘गोंगाट’ म्हणतात. नेमका संदेशाचा आवाज आणि त्याला असणारी गोंगाटाची पार्श्वभूमी यातून ‘संदेश’ कसा लक्षात येतो? अनुभवी वैज्ञानिकाची नजर बहुधा तो नेमका शोधू शकते. पण कधीकधी गवताच्या गंजीत हरवलेल्या सुईप्रमाणे संदेश हरवून जातो. अशा वेळेला अनुभवी नजर पुरेशी नसते, आणि संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून माहितीचे पृथक्करण करावे लागते. संख्याशास्त्राचा अवलंब करणे वस्तुनिष्ठतेसाठीसुद्धा उपयुक्त आहे. दुर्दैवाने काही परिस्थिती संख्याशास्त्राच्या पद्धती ही नेमकी उत्तरे देऊ शकत नाहीत. वैज्ञानिकाला मग परत नव्या आणि अधिक चांगल्या प्रयोगाच्या आखणीचे काम सुरू करावे लागते.

यातली शेवटची, आणि तितकीच महत्त्वाची पायरी म्हणजे ‘तथ्य’ शोधण्याची – म्हणजेच प्रयोगांचे निष्कर्ष काढण्याची, अर्थातच, आपण नुकत्याच केलेल्या एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष काढण्याने शास्त्रज्ञाला समाधान मिळत नसते, तर त्या प्रयोगाच्या पलीकडे जाणाऱ्या परिस्थितीसाठी सुद्धा भाकिते वर्तवण्यात त्याला रस असतो. यातला हेतू इतकाच की त्यातून नंतर ही भाकिते पडताळून पाहण्यासाठीचे प्रयोग केले जावेत. यातूनच ज्ञानाचा विकास होत राहतो.

उपपत्ती (थिअरी) आणि निरीक्षणे यांच्या परस्परसंबंधातूनच विज्ञानाची वाढ होत राहते. उपपत्तीचे मार्गदर्शन नसेल, तर प्रयोगकर्त्याला नेमके कोणते निरीक्षण घ्यायचे ते कळणारच नाही. उपपत्तींचा विकास करणारा शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञाला आपली भाकिते सांगतो, तेव्हा प्रयोगकर्त्याला त्यांचा पडताळा घेण्याचे मार्ग ठरवता येतात. उपपत्तींचा विकास ही कायम स्वतंत्रपणे होत नसतो. प्रयोगांच्या साहाय्याने त्यांची तपासणी करता येते, असे निष्कर्ष हवेत.

विज्ञानाच्या इतिहासात निष्फळ किंवा शेवटी चुकीच्या ठरलेल्या अनेक उपपत्ती जागोजागी सापडतात. दोघांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. पहिल्या प्रकारची उपपत्ती पडताळा घेण्यासारखी भाकिते वर्तवत नाही. विज्ञानाच्या विकासाला तिचा कोणताही हातभार लागत नाही. दुसऱ्या प्रकारच्या उपपत्ती काही काळ खऱ्या समजल्या जातात. त्यातून प्रयोगांची आखणी करण्याला चालना मिळते आणि अखेरीस त्यातून त्या चुकीच्या ठरतात. पण त्यातून वैज्ञानिकांच्या ज्ञानात भरच पडते.

वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी असण्याची जरुरी नाही. अखेरीस त्याचा उगम माणसाच्या निसर्गाबद्दलच्या कुतूहलातून झाला आहे, त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच हा दृष्टिकोन असायला हवा. खरोखर ज्याप्रमाणे कठोर परंपरा वादावर जेव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनाने मात केली, तेव्हाच विज्ञानाची प्रगती झाली; त्याचप्रमाणे मानवी समाजातही हा दृष्टिकोन, पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा यांच्यावरचा उपाय आहे. निसर्गाच्या कार्याबद्दलच्या अज्ञानातून अंधश्रद्धा गवसतात. विज्ञान निसर्गाची गूढ उकलण्याचे कार्य करते. एक गूढ उकलले की त्यासंबंधीच्या अंधश्रद्धा दूर होतील अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात असे नेहमीच घडते असे नाही. कारण त्या माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो. एक उदाहरण देतो.

प्राचीन मानवी समाजाने ग्रहांना दैवी शक्ती बहाल केली.  ग्रह म्हणजे काय आणि ते कसे फिरतात याच्या अज्ञानातून ही कल्पना आली. आता खगोल विज्ञानाने ग्रहांसंबंधीच्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ही कल्पना लयाला जाईल अशी अपेक्षा साहजिकच निर्माण होते. पण असे घडले नाही. अगदी तांत्रिकदृष्ट्या प्रगत समाजातील सुशिक्षित वर्गातही हा विश्वास मूळ धरून आहे.  १९७०च्या सुमारास पाश्चात्य देशातल्या काही प्रमुख शास्त्रज्ञांनी एक पत्रक काढून या विश्वासाचा पायाच चुकीचा असल्याचे सांगितले.

‘ग्रहतार्‍यांचा माणसाच्या नियतीवर परिणाम होतो का’ या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ कसे शोधेल? एका कुंडलीवरून एका माणसाचे भविष्य सांगणे यासाठी पुरेसे नसेल. प्रथम त्याला असे भविष्य वर्तविण्यासाठीचे नेमके नियम लागतील. नियम निःसंदिग्ध असावे लागतील, त्यामुळे एका कुंडलीच्या आधाराने वेगवेगळे ज्योतिषी एकच भविष्य वर्तवतील. नंतर भाकिते योगायोगाने बरोबर येत नाहीत, अशी खात्री पटावी लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक मुद्दे तपासणीसाठी घ्यावे लागतील.

फलज्योतिषाची पडताळणी करण्यासाठी अमेरिकेत असे अनेक प्रयोग करण्यात आले, त्याची दोन उदाहरणे पाहू. –

बी. जे. सिल्व्हरमनने  लग्न आणि घटस्फोट यांच्या मिशिगनमधील १९६७-६८ मधील  नोंदींचा अभ्यास केला. त्याने २,९७८ विवाह आणि ४७८ घटस्फोट यां अभ्यास केला. त्यांच्या कुंडल्या ज्योतिषाकडे देऊन, त्यांना हे विवाह यशस्वी आणि टिकणारे असतील का, याबद्दल मत देण्यास सांगण्यात आले. ज्योतिषांनी (त्यांची पद्धत वापरून) दोन गट बनवले: जुळणाऱ्या  पत्रिकांचे आणि न जुळणाऱ्या पत्रिकांचे. त्यांचे भविष्य वस्तुस्थितीशी पडताळून पाहण्यात आले. संख्याशास्त्राच्या चाचण्या लावल्यावर असे लक्षात आले की, भविष्य-कथन आणि वस्तुस्थिती यांत परस्परसंबंध नाही.

फ्रेंच आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचे निष्कर्ष असेच होते, पण त्यातून फलज्योतिषाकडे आकर्षित होणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवरही प्रकाश पडतो. यालाच कधीकधी ‘बार्नम परिणाम’ म्हणतात. अमेरिकेतल्या ‘बार्नम आणि बेली सर्कस”च्या प्रसिद्ध ‘बार्नम’ वरून हे नाव पडले.  सर्कशीचा मालक असलेल्या बार्नमला एकदा त्याची सर्कस एवढी लोकप्रिय असण्याचे कारण विचारले. त्याने सांगितले की याच्या सर्कशीत विविध प्रकारचे खेळ होते. त्यातल्या प्रत्येकाला कोणता ना कोणता खेळ आवडत असे, आणि त्यामुळे प्रत्येक जण शेवटपर्यंत बसून राही. ज्योतिषी अशाच प्रकारे त्यांचे भविष्य संदिग्ध भाषेत अशा प्रकारे मांडतात, की त्यातील कोणतातरी भाग प्रत्येकाला पटतोच.

वरील प्रयोगात ५२ व्यक्तींच्या कुंडल्या प्रसिद्ध ज्योतिषांना देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे विश्लेषण करावयास सांगितले. प्रत्येक व्यक्तीला नंतर तीन विश्लेषणे देण्यात आली. एक त्याच्या कुंडलीच्या आधाराचे, दुसरे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे आणि तिसरे बार्नम पद्धतीचे. बार्नम विश्लेषण मोघम लिहिलेले असून ते सर्वांसाठी समान होते.  प्रत्येकाने या तीनही वर्णनांपैकी कोणते किती पटते ते ५ पैकी गुण देऊन सांगण्यास सांगितले. त्यापैकी बार्नम पद्धत बहुतेकांना पटली. त्यांचे सरासरी गुण होते ३.६९. अन्य दोन विश्लेषणांना सरासरीने जवळजवळ सारखे गुण मिळाले. ३.०८ आणि ३.०६.  याचा अर्थ सारे जण बार्नम परिणामाने वाहवून गेले. आणि ‘खऱ्या’ आणि ’चुकीच्या’ विश्लेषणात फरक जवळ जवळ नव्हताच.  

फलज्योतिषाची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यासाठीच्या प्रयोगाची अशीच अनेक उदाहरणे देऊ शकेन. नेहमीच फलज्योतिष फोल ठरले आहे. पण तरीही दुःखाची गोष्ट ही की आपण अशा देशात राहतो आहोत, जिथे समाजाला आधुनिक युगात घेऊन लोकच या अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडलेले नाहीत. सूर्यग्रहणाच्या वेळी अगदी आधुनिक शहरात शुकशुकाट असतो, तिथे काय बोलायचे? आमचे शास्त्रज्ञ सुद्धा निर्णय घेताना बुवा-महाराजांचा सल्ला घेतात, तिथे काय बोलायचे? व्यक्ती म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून माणूस नेहमीच परंपरा पाळत आला आहे. या परंपरा त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत. या परंपरेच्या विश्वासांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची चाचणी लावली जाते, तेव्हा अनिवार्यपणे संघर्ष उभा राहतो. काही संघर्षांचे मूळ यात असते की परंपरा किंवा रुढींमागे पूर्वी काही तार्किक विचार होता, जो आज शिल्लक नाही. काही रूढींना शतकांपूर्वीच्या समाजरचनेत प्रतीकात्मक अर्थ होता,  आज बदललेल्या काळात त्या निरर्थक ठरल्या आहेत.  प्रश्न असा पडतो की अशा संघर्षाच्या वेळी आपण काय करावे? परत येथे वैज्ञानिक वातावरण उपयोगी पडते. स्वतःलाच विचारा की या रुढीचे प्रयोजन का? तुमच्या आधीच्या पिढ्यांनी हे केले, तुम्ही करता आहात, आणि त्याच्या आधीच्या पिढ्यांनी केले म्हणून तुमच्या पूर्वजांनी ते केले, असे तर नाही ना?

विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या, की देवळासमोरच्या रांगा वाढू लागतात.  तुमचा नंबर लागेपर्यंत या रांगांमध्ये तासन्तास उभे राहण्यात काय फायदा आहे? हा वेळ अभ्यासासाठी अधिक उपयोगी लावता येणार नाही काय?  की तुमची अशी कल्पना आहे की तुम्ही अर्पण केलेल्या छोट्याशा भेटीने परमेश्वर संतुष्ट होईल  तुम्ही उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले नसतानाही तुम्हाला उत्तीर्ण करेल?  तसे असेल तर परमेश्वर आणि लाच घेऊन हेच काम करणारा एखादा भ्रष्ट परीक्षक यात फरक काय राहिला?

गणपतीच्या मूर्ती दूध प्यायल्या, तो दिवस आपल्या अजून स्मरणात आहे. किती झपाट्याने ही बातमी साऱ्या देशभर –  किंबहुना जगभर पसरली होती!  आणि गणपतीने (आणि अन्य देवांच्या मूर्तींनी) हजारो भक्तांसमोर कसे दुग्धप्राशन केले या दैवी चमत्काराला आपल्या अनेक नेत्यांनी शिफारस पत्र दिले. सुदैवाने वैज्ञानिक जगताने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आणि विज्ञानाच्या नियमांच्या आधारे स्पष्टीकरण दिले. खरा चमत्कार वेगळाच झाला. तो पुढे सांगतो आहे. आजही चमत्कार आणि बुवाबाजी यांची देशात चलती आहे. युरी गेलर प्रकरण डोळे उघडणारे आहे. दुरून मानसिक शक्ती ने आपण चमचे वाकवू शकतो असा त्याचा दावा होता. चमचे वाचवण्याच्या त्याच्या प्रयोगाने काही काळ शास्त्रज्ञही फसले. अखेर रँडी नावाच्या एका व्यावसायिक जादूगाराने हा चमत्कार म्हणजे निव्वळ हातचलाखी कशी आहे, हे दाखवले. अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍या संघटनांचे असे कार्यक्रम मी पाहिले आहेत.

मला वाटते अशा कार्यक्रमांचे लक्ष प्रामुख्याने लहान मुले असावीत. मोठ्यांचे पूर्वग्रह आता ठाम आहेत. ते बदलणे सोपे नाही. मुलांची मने मोकळी असतात. तिथे आपल्याला संधी आहे. त्यांना वैज्ञानिक वातावरणाचा अर्थ लवकर समजू शकेल. त्यांना खरे आणि भ्रामक यातला फरक तर कळला पाहिजेच, पण तो त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून त्यानी समजून घ्यावा.  याला आता फारच महत्त्व निर्माण झाले आहे, कारण – ऑल्विन टॉफलरच्या शब्दांत –  भविष्यकाळाचा धक्का. गेल्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाने झपाट्याने गोष्टी दिल्या – विशेषतः शेवटच्या काही दशकांत. ज्याचे परिणाम जगभरातल्या मानवी समाजावर झाले. या साऱ्या बदलांशी कसे जुळवून घ्यायचे? समाजाला अधिक फुरसत असती, तर त्यांनी कदाचित हे प्रश्न हाताळले असते, पण दुर्दैवाने तसे घडले नाही.  झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीत प्रतिक्रियाही ताबडतोब हवी. ‘परंपरे’ला धरून ठेवतांना ‘नव्या’शी कसे जुळवून घ्यायचे? ‘परंपरे’मध्ये पारंपारिक मूल्यें येतात, व्यक्तीच्या जबाबदाऱ्या येतात. समाजाने व्यक्तीला चांगल्या जीवनाचे दिलेले आश्वासन येते. आपल्या परिसराचे संरक्षण येते. या आधाराने माणूस विज्ञानाच्या देणगीचे मूल्यमापन करू शकेल.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनिर्बंध वाढीचे दुष्परिणाम पाश्चात्त्य देश अनुभवत आहेत. घातक शस्त्रांचे साठे, कारखानदारीचे प्रदूषण, लादलेले रिकामेपण, त्यातून येणारे मानसिक तणाव वगैरे गोष्टी दिसतात. म्हणून आपण वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती थांबवायची काय? प्रगत देशात हा विचारही मांडला जातो आहे. हे भयभीत झाल्याचे लक्षण आहे. पारंपारिक मूल्यांचा आदर्श स्वीकारला, तर वरील धोक्यांना टाळणारा मार्ग मिळू शकेल. खरोखर, प्रथम दर्शनी आपल्या समोरच्या समस्या अत्यंत कठीण वाटतात. पण गेल्या काही दशकांतली  विज्ञानाची लक्षणीय प्रगती पाहा.  योग्य मार्गाने असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हीच आपल्याला आशा आहे. परत एकदा मी गणपतीच्या आधीच्या उदाहरणातकडे येतो. त्यात एक चमत्कार होता. कोणता चमत्कार? ‘गणपती दूध पितो’ या बातमीचा झपाट्याने सर्वदूर प्रसार, हा तो चमत्कार. यासाठी संदेशवहनाची साधने नव्या तंत्रज्ञानाने पुरवली होती. दूरध्वनी, ई-मेल, रेडिओ, दूरदर्शन यांनी जग लहान केले आहे आणि पूर्वी कधीही नव्हते इतके लोक जवळ आले आहेत. विज्ञानाने आणखीही चमत्कार केले आहेत, जे खरे आहेत त्यात हातचलाखी नाही. अंतराळ-प्रवास, माणसाचे चंद्रावर पदार्पण, मंगळावर उतरलेले यान, ‘रिमोट सेन्सिंग’चे आपल्या देशाला असलेले फायदे, वैद्यक, जीवशास्त्र, शेती यातील प्रगती … हे सारे आपल्या डोळ्यांसमोर घडणारे चमत्कार नाहीत काय? एका पिढीच्या कालावधीत ते घडले आहेत. एखाद्या बुवामहाराजांच्या चमत्कारासारखे ते नाहीत. विज्ञानाचे चमत्कार एका व्यक्तीचे नव्हे,  तर साऱ्या मानवजातीचे भले करतात. गरिबांना आणि श्रीमंतांना त्याचा फायदा घेता येतो. वीज केवळ श्रीमंतांची यंत्रे चालवीत नाही, दुरच्या खेड्यातल्या झोपडीतला दिवाही पेटवते.


प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर

(प्रस्तुत िेखक हे जागनतक कीतीचे खगोििास्त्रज्ञ, जयेष्ट्ठ वैज्ञाननक,
सुप्रशसद्ध िेखक – पद्मिूर्ि, पद्मवविूर्ि, महाराष्ट्र िूर्ि, फाय
फौंडिे न तफे राष्ट्रिूर्ि, िटनागर, कशिगं ा, त्रबिा,म इंहदरा गांधी अमया
असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्माननत आहेत.
‘रचना’च्या दृष्ट्टीनेउतसाहवधकम गोष्ट्ट म्हिजेखास सुविमम होतसवी वर्ाम
ननशमत्त ‘रचना’ कररता प्रा. डॉ. जयंत ववष्ट्िु नारळीकर यानं ी
आिीवामदरूपी िेख पाठविे आहेत. तयांच्या प्रख्यात व प्रेरिादायी
कायामिा ‘रचना’ कडून ‘नमन’ – ‘रचना’ संपादक)