सुवर्णमहोत्सवी वर्ष

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी एखादं मंडळ किंवा संस्था स्थापन करतोच. यात आपल्या बांधवाना एकत्र आणणे हा मूळ उद्देश असतोच तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ त्या मागे असते. हाच विचार मनात बाळगून काही मराठी बांधवांनी १९६९ साली शिकागो येथे उत्तर अमेरिकेतील पाहिले महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. त्या काळी मुळातच मोजकिच भारतीय कुटुंबे अमेरिकेत राहावयास आली होती आणि त्यात मराठी तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके, पण तरीही केवळ १० कुटुंबांनी दिवाळीतील स्नेहसम्मेलनात एकत्र येऊन या मंडळाचे रोपटे लावले आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.

शिकागो मराठी मंडळाने १९७० साली आपला पहिलावहिला गुढी पाडव्याचा कार्यक्रम साजरा केला. शिकागो मंडळ हे नाट्यप्रेमी मंडळ म्हणून ओळखले जाते. अर्थात त्याचे श्रेय हे इथे राहणाऱ्या नाट्यवेड्या मंडळींना जाते.  त्यांनी १९७०-७१ सालापासून, स्थानिक कलाकारांना घेऊन नाटक सादर करण्याची परंपरा सुरु केली ती आजतागायत चालू आहे. आपण सादर केलेली नाटके आणि एकांकिका दुसऱ्या मंडळांना सुद्धा बघता याव्यात ह्या उद्देशाने १९७६ सालापासून आपण आपल्या नाटकांचे प्रयोग वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळामध्ये करू लागलो. केवळ शिकागो पुरते मर्यादित न राहता पुढे जाऊन सन १९८४ साली मंडळाने “बृहन्महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेची” स्थापना केली आणि पहिले अधिवेशनही शिकागोमध्ये भरवले.

कुठलेही मंडळ आणि कार्यक्रम यशस्वी होण्यामागे कार्यकर्त्यांचे निरपेक्ष भावनेने केलेले अथक परिश्रम असतातच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वेळोवेळी रसिकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद हि असतो. उत्तरोत्तर वाढलेल्या मंडळाच्या लोकप्रियतेमुळे, कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांची संख्या आता सहाशे सातशेच्या वर गेली आहे. तसेच मंडळाची सभासद संख्याही साडे तीनशेहून अधिक आहे. 

२०१९ हे मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षी आयोजित करण्यात येणारे सर्वच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आणि दिमाखात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी रसिकांना उत्तमोत्तम गाजलेली नाटके तसेच संगीताच्या, मनोरंजनाच्या दर्जेदार कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे मोठ्या जल्लोषाने स्वागत करूया.

Click here the Book the Golden Jubilee Celebration Tickets