तिळगुळ घ्या आणि गोड बोला

आज महाराष्ट्र मंडळाची पन्नासावी संक्रांत. किती मोठा भाग्याचा दिवस. पन्नास वर्षांपूर्वी मंडळ स्थापन करताना, ज्या दहा कुटुंबांनी पुढाकार घेतला होता त्यातील बरेच जण अजून आपल्यात आहेत. माझा त्या सर्वांना आदराचा नमस्कार. १९६८ साली श्री. शरद गोडबोले हे शिकागोमध्ये पीस कॉर्पच्या मधून भारतात काम करायला जाणाऱ्या काही अमेरिकन लोकांना मराठी शिकवत होते. ह्या कामात त्यांना अनिता गोडबोले, सरोज ओक, व अलका लागवणकर यांनी मदत केली. अशी एका मराठी शाळेची सुरुवात शिकागोत झाली. हळू हळू मराठी बांधव एकमेकांच्या ओळखीने जवळ आले आणि दहा कुटुंबांनी पहिली दिवाळी साजरी केली आणि या मंडळींनी एक महाराष्ट्र मंडळ सुरु करण्याचे ठरवले.

पहिली संक्रांत हाईड पार्क ह्या भागात असलेल्या विवेकानंद सोसायटी मध्ये १९६९ ला झाली. तेथील स्वामी मराठीच होते त्यामुळे त्यांचा पूर्ण पाठींबा मिळाला. घरी बनवलेले तिळगुळ, गुळपोळी, वांग्याची भाजी आणि मसालेभात असा बेत होता. मराठी कालनिर्णय हे कॅलेंडर वाण म्हणून देण्यात आलं. भारतातून मागवलेले वाण तेही कुठल्या काळात? जेंव्हा साधा फोन सुद्धा अनेकांकडे नसायचा. म्हणजे कवतुकच करायला हवे. शंभर माणसांची हजेरी होती. तिकिटाचा दर १ डॉलर होता. पहिले अध्यक्ष श्री. दत्तात्रय मणेरीकर होते. कार्यक्रम होता उपस्थितांचे विविध गुणदर्शन. सगळ्यांनी उत्साहाने त्यात भाग घेतला. ही प्रथा खूप वर्षे तशीच चालू राहिली. दर संक्रांतीला स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम जोरदार रित्या होत राहिले.

जसं मंडळ वाढत गेलं तसं नवीन नवीन जागा भाड्याने घेण्यात आल्या. खूप चांगले चांगले कार्यक्रम
भारतातून किंवा अमेरिकेतल्या इतर मंडळांकडून मिळत गेले व आज त्या शंभर माणसांच्या जागी सातशे पेक्षा जास्त लोक कार्यक्रमांना हजार असतात.

मकर संक्रांतीच्या संक्रमणासारखं मंडळाचंही संक्रमण आता पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतंय. मी सर्व मराठी बंधू भगिनींना आग्रहाचं आमंत्रण देते आहे की, या वर्षी जास्तीतजास्त कार्यक्रमांना हजर राहून हे ५०वं वर्ष दणदणीत रित्या साजरं करूया.

तिळगुळ घ्या आणि गोड बोला !!!!!!!!!!!!!

मंगला गडकरी (जुन्या आठवणींच सहकार्य जयाताई हुपरीकर)