क्रोशेचे विश्व

इतिहास:

क्रोशे ह्या शब्दाची व्युत्पत्ती क्रॉक / क्रोशे (फ्रेंच : हुक ) / krokr (आकड्यासाठी जुना शब्द: ‘नॉर्स’) ह्या शब्दापासून  झाली. क्रोशेसाठी वापरली जाणारी सुई ही एका आकड्यासारखी (आकृती २) दिसते. त्यामुळे विणकामाच्या ह्या तंत्राला क्रोशे असे म्हंटले जाते. भारतीय, अमेरिकन, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, बेल्जियन, इटालियन ह्याला Crochet (क्रोशे) म्हणतात तर हॉलंड मध्ये haken, डेन्मार्क मध्ये haekling, नॉर्वे मध्ये hekling आणि स्वीडन मध्ये virking म्हणून ओळखले जाते (१). क्रोशे ह्या विणकामाची उत्पत्ती कुठे झाली ह्या बद्दल खूप सिद्धांत मांडले गेले आहेत. इतिहासकार आणि शास्त्रज्ञ असे म्हणतात की, विणण्याची ही पद्धत चिनी सुई काम ह्या प्राचीन विणकामाचा एक प्रकार आहे. ह्यापुढे इतिहासात झालेल्या नोंदींप्रमाणे क्रोशे असे प्रचलित झाले असावे. (आकृती १)

३०० ईसपू – ४०० ईस १८ वे शतक १९ वे शतक २० वे शतक २१ वे शतक
पेरू देशामध्ये “Naal Binding” ही पद्धत वापरून एका सुईने अंगठ्याभोवती गुंडाळलेल्या दोऱ्याचे loops बनवून त्यातून आणखीन loops खेचले जायचे. ही पद्धत क्रोशेमध्ये बदलली ह्याचा कुठलाही पुरावा अस्तित्वात नाही. तुर्की, भारत, पर्शिया, उत्तर आफ्रिका, मध्ये ‘Tambouring (कापडावर केले जाणारे क्रोशे)’ चा प्रसार   Tambouring चा विकास झाला, आता कापडावर करणे बंद झाले आणि Crochet in Air असे ओळखले जाऊ लागले.       जाड दोरा आणि मोठी सुई वापरून करण्यात येणारे ‘Shepherd‘s knitting’ अस्तित्त्वात आले. क्रोशे ‘Slip Stitch Crochet’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पनेलोपी (Penelope) नावाच्या मासिकाने पहिल्या क्रोशेचा नमुना प्रकाशित  केला. आयरिश क्रोशे प्रसिद्ध झाले व शाळांची स्थापना झाली. अमेरिकेतील स्त्रियांवर आयरिश क्रोशेच्या नाजुक डिझाईन्सचा प्रभाव पडू लागला.   क्रोशेकडे कपडे बनवायची पद्धत म्हणून बघितले जाऊ लागले. अमेरिका आणि ब्रिटनमधील लढायांमध्ये सैनिकांसाठी क्रोशेनी बनवलेल्या गोष्टी पाठवल्या गेल्या. घरगुती वापरासाठी सुद्धा क्रोशे मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. शतकाच्या अखेरीस हस्तकल्पित वस्तूंची चलती कमी झाली त्यात क्रोशेसुद्धा होते. हस्तकलेच्या पुनरुत्थाना बरोबर क्रोशेला सुद्धा चांगले दिवस आले आहेत.   आज क्रोशे फॅशनच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे. इथेच नाही तर लेस, कपडे,स्वेटर्स, शाली, मोजे, हातमोजे, टेबलक्लॉथ असे बऱ्याच प्रकारचे वापरता येण्यासारखे आणि सजावटीसाठी म्हणून क्रोशेचा वापर केला जात आहे. 

आकृती १: क्रोशेच्या इतिहासाचा तक्ता

आकृती १ स्रोत: Ruthie Marks 1997, Posted on CGOA Web site with permission 2009 Julia Wiatr, Editor, https://www.allfreecrochet.com , The History of Crochet: From Tambour through Irish Crochet
https://www.woolandthegang.com/blog/2015/05/a-brief-history-of-crochet
https://blog.lovecrochet.com/the-history-of-crochet-is-it-as-old-as-the-hills/
https://www.fibre2fashion.com/industry-article/2777/crocheting-and-its-origin?page=1

क्रोशे सुई/हुक:
क्रोशे विणकाम करताना जी सर्वात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे “सुई” ज्याला इंग्लिश मध्ये हुक म्हणतात. कालपरत्वे सुई बनवण्याचे साहित्यांत बदल होत गेले. पूर्वीच्या काळी हस्तिदंतांत बनणारी सुई आता स्टेनलेस स्टील, अल्युमिनियम, प्लॅस्टिक, बांबू मध्ये बनते (आकृती २अ ).

आकृती २: (अ) वेगवेगळ्या साहित्यांमध्ये बनवल्या गेलेल्या क्रोशेचा सुया  

आकृती २: (ब) क्रोशेचा सुईची सामान्यतः रचना.

आकृती २ (अ) आणि २(ब) स्रोत: Anatomy of Crochet Hook, S. Brittain K. Manthey; www.pinterest.com

सुई बनवण्याचे साहित्य जरी बदलले तरी सुईची रचना बदलली नाही, ती एकसारखीच आहे आकृती २ब मध्ये ‘हॅन्डल’ सुई हातात धरण्यासाठी, ‘थंब रेस्ट’ अंगठा ठेवण्यासाठी, ‘पॉईंट’ लोकर, धागा किंवा विणायला वापरले जाणारे साहित्य ओढून घेऊन विणण्यासाठी आणि ‘थ्रोट आणि शाफ्ट’ टाके धरून ठेवण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक ओढलेल्या धाग्याला ‘टाका’ असे म्हंटले जाते. विणण्याच्या मापाप्रमाणे टाक्यांची संख्या बदलते. स्टील पासून बनवलेल्या सुया ह्या ०.६ मि.मी. पासून ३.७५ मि.मी. पर्यंत असतात. ह्या साधारणपणे लेस किंवा दोऱ्यांनी विणायला वापरल्या जातात. तसेच अल्युमिनियम आणि प्लॅस्टिक सुया २ मि.मी. ते १९ मी.मी पर्यंत असतात. आपल्याला काय वस्तू बनवायची आहे आणि त्याला किती ताठपणा हवा आहे त्यावर सुई कुठली वापरायची ते ठरते.

वीण:
क्रोशे विणण्यासाठी जे मूलभूत टाके यावे लागतात ते दोनच आहेत – साखळी आणि खांब. खांबाचे खूप प्रकार आहेत जसे मुका खांब, अर्धा खांब, छोटा खांब, दोन वेढ्यांचा खांब, तीन वेढ्यांचा खांब इत्यादी. ह्या दोन मूलभूत टाक्यांच्या क्रमवारी संयोजनlने  वेगवेगळ्या विणीचे नमुने बनतात (आकृती ३).

आकृती ३: क्रमवारी संयोजनाने बनवलेल्या वेगवेगळ्या विणी. आकृती ३ स्रोत: www.pinterest.com

क्रोशेचे नमुने वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित करता येतात. स्कर्ट्स, टॉप्स, ड्रेसेस ह्यांचे नमुने शाब्दिक आणि आकृती साहाय्याने तर लेस, टेबल क्लॉथ, रुमाल, डोईली (ताटावर टाकायचे रुमाल किंवा फुलदाणी खाली घालायचे रुमाल)  ह्याचे नमुने तक्त्याच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात. जगभरात असे तक्ते आणि नमुने वेगवेगळ्या पद्धतीने होतात, त्यामुळे एकच रचना परत होऊ नाही आणि गोंधळ होऊ नये म्हणून क्राफ्ट यार्न कॉउंसिल, टेक्सस ह्यांनी काही चिन्हं ठरवून दिलेली आहेत तसेच त्यांनी त्याच्या वेबसाइट वर वेगवेगळ्या देशात वापरल्या जाणाऱ्या शब्दावली सुद्धा प्रदर्शित केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही देशातील डिझाइनरचा तक्ता किंवा कपड्याची योजना वाचलीत आणि त्याचे अनुसरण करण्याचे ठरवले तरी अडचण येत नाही. मराठीत क्रोशेवर तसे कमी साहित्य उपलब्ध आहे त्यात मला काही आवडलेली पुस्तके म्हणजे सुलभा कुलकर्णी लिखित क्रोशाकाम, प्रभावती पुरम लिखित लोकरीचे मोहक विणकाम, प्रतिभा काळे लिखित क्रोशे विणकाम भाग १, २ आणि अजून काही. सगळ्या पुस्तकांबद्दल लिहिणे इथे शक्य नाही. ह्या सर्व पुस्तकांमध्ये खांब साखळ्या कशा घालाव्यात आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रोशे कपडे कसे बनवावे हे उत्तम पद्धतीने सांगितले आणि समजावले गेले आहे.

विणण्यासाठी वापरले जाणारे साहित्य:
क्रोशेच्या विविध वस्तू विणण्यासाठी लोकर, कॉटन आणि सिल्कचा धागा, सुतळी, सूत, तार (चांदी किंवा रंगीत सिन्थेटिक) असे विविध साहित्य वापरता येते. हे सर्व साहित्य वापरून वेगवेगळ्या गोष्टी विणता येतात. लोकरी पासून स्वेटर, मफलर, जॅकेट, स्कार्फ, बाबीसेट, फ्रॉक्स इत्यादी गोष्टी बनवता येतात. कॉटनच्या धाग्यापासून लेस, खेळणी, फुलं, रुमाल, तोरण, जॅकेट्स, स्कार्फ, दागिने, सोफा कव्हर्स, टेबल मॅट्स असे बरेच काही बनवता येते, सुतळी पासून वॉल पीस, टी  कोस्टर्स अश्या सजावटीच्या वस्तू बनवता येतात. गेल्या काही वर्षांमध्ये आणखीन एक उपयुक्त प्रकार म्हणजे दागिने, तांब्याची किंवा चांदीची तार आणि मणी, मोती वापरून करण्याची सुरुवात झाली आहे. ह्या प्रकारामध्ये क्रोशेची सुई वापरून २०-२५ मि.मी. गेजची तार वापरून गळ्यातले कानातले असे दागिने बनवता येतात. क्रोशेनी बनवलेल्या सर्व वस्तूंची मूल्य श्रेणी ही त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्य आणि लागणाऱ्या मेहेनतीवर निर्धारित केली जाते. जितकी कल्पकता, कलाकुसर जास्ती तितकीच किंमत पण जास्ती. साधारणपणे क्रोशेची मूल्य श्रेणी १०० ते १०००० रुपये एवढी असू शकते.
क्रोशे प्रशिक्षण:
भारतामध्ये आपण आपल्या आजी, आत्या, मावशी ह्या लोकांकडून क्रोशेकाम करायला शिकतो व बऱ्याच प्रमाणात आपल्याला ते यायला पण लागते. ह्याचाच अर्थ पिढी दर पिढी ही कला पुढे शिकवली जाते. परंतु कुठल्याही कलेचे प्रशिक्षण जर व्यवस्थित मिळाले तर तीच कला अर्थार्जनासाठीसुद्धा उपयोगी पडते. हेच काम क्रोशे यार्न कॉउंसिल (३) आणि क्रोशे गिल्ड ऑफ अमेरिका (४) ह्या दोन्ही संस्था करत आहेत. ह्या दोन्हीही संस्था शास्त्रोक्त पद्धतीने क्रोशे शिकवण्यासाठी गेली कित्येक वर्षे कार्यरत आहेत. भारतामध्ये ह्यांची शाखा अजून कुठे सुरु झालेली ऐकीवात नाही. भारतामध्ये सध्या एक्स्पोर्ट प्रमोशन कॉउंसिल फॉर हँडिक्राफ्ट्सने (EPCH) आणि नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्सच्या (NOS) अंतर्गत, नवीन आणि जुने क्रोशेकाम करत असलेल्या व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देऊन लेवल १ प्रमाणपत्र जारी करण्याची सुरुवात केली आहे (५), पण अजूनही बरेच काही करण्यासारखे आहे.

भारतीय क्रोशे व्यवसाय:
क्रोशे व एम्ब्रॉयडरी ह्याचे भारताच्या हस्तकलेच्या निर्यातीमध्ये एक चतुर्थांश वाटा आहे (६). भारतामधून ऑस्ट्रेलिया (२.३५ %), जर्मनी (४.९४%), कॅनडा (१.७०%), फ्रांस (३.४१%), इटली (२.१४%), जपान (०.६४%), नेदरलंड (३.४२%), UAE (९.९४%), स्वित्झरलंड (०.३६%), अमेरिका (३४.३५%), युनाइटेड किंग्डम (७.६४%), लॅटिन अमेरिका देश (१.६९%) इत्यादी देशांमध्ये निर्यात केले जातात (६). एक्स्पोर्ट प्रोमोशन कॉउंसिल ऑफ इंडियानी प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१८ – नोव्हेंबर २०१८ मध्ये क्रोशे व भरतकाम ह्यांची निर्यात ₹२४१६.५२ कोटी($३४७.१८ दशलक्ष) एवढी आहे जी मागच्या वर्षी पेक्षा ३.५४% ने जास्ती आहे (७) . एवढे निर्यात होऊनसुद्धा “मेड इन इंडिया” चा टॅग लावलेल्या क्रोशेच्या वस्तू अजूनही बाजारामध्ये फारश्या दिसत नाहीत. भारतामध्ये प्रामुख्याने जिथे क्रोशेकाम केले जाते ते म्हणजे गोवा व आंध्रप्रदेश येथे. गोव्यामध्ये घरोघरी क्रोशेनी केलेले रुमाल पडदे आणि बरेच काही आढळून येते. आंध्रप्रदेश मध्ये गोदावरीकाठी वसलेल्या नरसापुर येथे ५००० हुन अधिक महिला ह्या नाजूक सुंदर कामामध्ये पारंगत आहेत. त्यांच्याकडे कामाचा अभाव नाही परंतु मिळणारे मानधन कमी असल्यामुळे पूर्ण वेळ ह्या कामाकडे वळण्या विरुद्ध आहेत. काहीजणी तर आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा शिकवण्याच्या विरुद्ध आहेत (५).

क्रोशे ही अशी कला आहे जिने आपली बाजारपेठ आधीच बनवून ठेवली आहे. गेल्या काही वर्षात ती वाढली आहे पण अजून वाढायची गरज आहे. एकंदरीत क्रोशे आणि त्याची दिवसागणिक होणारी समकालीन फॅशन जगतातील प्रगती, माझे, क्रोशे कपडे डिसाईन करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल असे दिसते. त्या दृष्टीने सध्या मी ‘पलाश वर्ल्ड ऑफ क्रोशे’ हा माझा स्वत:चा ब्रँड प्रसिद्धी झोतात आणायच्या मार्गावर कार्यरत आहे. पलाश मध्ये आम्ही फक्त पारंपरिक डिसाईनच नाही तर कॉम्पुटर ग्राफिक्स वापरून सुद्धा क्रोशेचं वेगवेगळे प्रकार बनवतो. हे काम एकट्या दुकट्याचे नाही, माझ्या बरोबर काही गरजू बायका पण काम करतात आणि पैसे मिळवतात ज्यामुळे त्या आज स्वावलंबी बनल्या आहेत.

संदर्भ:

  1. A Living Mystery, the International Art & History of Crochet,” Annie Louise Potter, A.J. Publishing International, 1990.
  2. https://www.crochet.org/page/CGOAHistory
  3. https://www.craftyarncouncil.com/
  4. https://www.crochet.org/
  5. https://www.thehansindia.com/posts/index/Sunday-Hans/2016-02-07/Made-in-Narsapur/205331
  6. https://www.epch.in/policies/exportsofhandicrafts.htm
  7. https://www.epch.in/policies/exportdata.pdf
डॉ. शर्वरी गायधनी, पुणे