तस्मै श्री गुरवे नमः – “बाबा” – श्री. भालजी पेंढारकर

तो काळ होता ६०च्या दशकाच्या शेवटचा. १७ वर्षांच्या रेखा कुलकर्णीचा “अनुपमा” ह्या नावाने जन्म झाला होता. अनुपमा हे सुंदर नाव मला श्री. मधुसूदन कालेलकर या नावाजलेल्या कथा, पटकथा, संवाद, व नाट्यलेखक ह्या नावाने नावलौकिकाने प्रसिद्ध असलेल्या लेखकाने दिले व त्यांच्या स्वतःचे प्रॉडक्शन असलेल्या “आसावरी” ह्या नाटकाने. माझा रंगभूमीवरचा प्रवेश गाजला, ह्याचं सारं श्रेय माझे रंगभूमीवरचे गुरू श्री. मो. ग. रांगणेकर ह्या सुप्रसिद्ध व गुणांची जाण असणाऱ्या आणि दाद देणाऱ्या माझ्या माननीय गुरूंना आहे. असावारीच्या काही प्रयोगांनंतर त्याचा एक प्रयोग “अमर हिंद मंडळ” दादर ह्या ओपन एअर नाट्यगृहात झाला. मला ती रात्र अजूनही आठवते, त्या दिवशी अभिनयाच्या आणखी एका दालनाचं प्रवेशद्वार माझ्यापुढं आलं. नाटक संपलं आणि (सुलोचना) दीदींच्या ड्रॉयव्हरने मला दीदींचा निरोप दिला की, उद्या पहाटेच्या गाडीने मला व माझ्या बरोबर नाटकात माझ्या भावाचं काम केलेल्या श्री. राजा दाणी ह्यांना नवीन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी कोल्हापूरला बोलावलं आहे. ज्याचं दिग्दर्शन श्री. राजदत्त (दत्ता मायाळू) करणार आहेत.

मी व माझी आई स्तब्धच झालो. आनंद व्यक्त करायलापण भीती वाटत होती. बापरे! कोल्हापूर, जयप्रभा स्टुडिओ म्हणजे “The One and Only – भालजी पेंढारकर” ज्यांना पूर्ण मराठी चित्रपट सृष्टी “बाबा” म्हणून ओळखते. फार विचित्र आणि खडूस आहेत. भीतीचा प्रचंड गोळा पोटात उठला. आणि दुसरे अल्पकाळात नावाजलेले राजदत्त. मी आणि आई घरी आलो. आणि ही खळबळजनक गोष्ट घरात सांगितली. घरात काय झालं असेल ह्याची कल्पना तुम्हांला आता आलीच असेल. पण त्यावेळच्या परिस्थितीपुढे साऱ्यांना नमतं घ्यावंच लागलं.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आणि मनाच्या घालमेलीत आम्ही कोल्हापूरला निघालो … स्टेशनवर टॅक्सी आली होती. बाबांचा निरोप घेऊन त्यांचे असिस्टंट आले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जयप्रभास येण्यास सांगितलं होतं. साधना गेस्टहाऊसमध्ये आमची सोया केली होती. जेवून झोप कधी लागली ते कळलंच नाही.

सकाळी ८:३० वाजता टॅक्सी आली आणि आम्ही तिघं – मी, आई व राजा दाणी स्टुडिओत गेलो. टॅक्सी थांबली एका मोठ्या गेटपुढे. त्याच्या कमानीवर “जयप्रभा स्टुडिओ” असं मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं. आम्ही खाली उतरलो आणि कालच्याच गृहस्थांनी आम्हांला ऑफिसकडे नेलं. बाहेरची स्वच्छ दगडी फरशी पाहताच आम्हांला बरंच काही लक्षात आलं. चपला काढून आम्ही आत गेलो. स्वच्छ आणि अगरबत्तीचा सुगंध असं खूपच प्रसन्न होतं तिथलं वातावरण. इतर काही अवलोकन करण्याआधीच एक धीरगंभीर आणि जरबेचा स्वर कानीं आला,

“या. प्रवास ठिक झाला? सोय ठिक झालेय नं?”

प्रश्नांचं उत्तर द्यायच्या आत माझे सर्वांग भारावले. समोरच्या शिसवी नक्षीकाम केलेल्या प्रशस्त टेबलामागे आसनबद्ध झालेली एक मूर्ती. जाज्वल्य तेजस्वी डोळे व व्यक्तिमत्त्व, करारीपणाचे भाव, मी त्या डोळ्यांकडे पाहूच शकले नाही. जसे काही ते डोळे म्हणजे मला मायक्रोस्कोपचे लेन्सच वाटले. मी उत्तर द्यायला तोंड उघडणार तोच आवाज आला,

“हा प्रश्न तुम्हांला नाहीं, तुमच्या मातोश्रींना आहें.”

आईने नम्रपणे “हो” म्हटले.

आईला बसण्याची खूण केली. मी व राज दाणी दोघेही बाजूला उभे होतो. मध्येच फोन वाजला, अतिशय मार्दव भाषेत बाबांनी (सर्वजण तशीच हाक मारत होते त्यांना, आई सुद्धा) फोनवरच्या व्यक्तीला उत्तर दिले आणि बेल वाजवली. खणखणीत आवाजात आत आलेल्या गृहस्थांना ह्यापुढे फोन देऊ नका म्हणून बजावले. तेवढ्यात राजदत्त आले. आम्हीं तिघेही म्हणजे मी, दाणी व राजदत्त उभे होतो. आणि अनपेक्षितपणे सुरु झाला प्रश्नांचा भडिमार! बाबांनी पहिला प्रश्न दाणींना विचारला,

“इथं येण्याचं प्रयोजन काय?.”

त्यावर दाणींनी काहीतरी थातुर मातुर उत्तर दिलं, मग बाबांनी मान हलवली आणि डोळे माझ्याकडे वळवले. मी नर्व्हसनेस कसाबसा दडवत उत्तरले,

“मला काम करायचंय.”

त्यावर उपहासाने हसत बाबा म्हणाले,

“तुम्हांला कोणी सांगितलं की मी तुम्हांला काम देणार आहे? आणि ते तुम्हांला मिळेलंच म्हणून?”

आधीच प्रवासामुळे मी थकले होते. आदल्या नाटकाच्या प्रयोगाचा शीणही उतरला नव्हता. त्यात साडीचं ओझं आणि गेला अर्धा तास उभं राहिल्याने पायाला लागलेली कास. ह्या सगळ्याच्या एकत्रित प्रभावामुळे मी काहीसं कळवळून, पण उद्धटपणे वाटणार नाही अश्या स्वरांत म्हटलं,

“काम देणं न देणं तुमच्या हातांत, पण तुमच्याकडून शिकून तर नक्कीच जाईन.”

व्वा! – अश्या अर्थाचे भाव बाबांच्या चेहऱ्यावर आले. तरी कुठेतरी आणखी परीक्षा पाहावी म्हणून ते म्हणाले,

“इतकी जिद्द आहे तुमच्यात?”

श्री. भालजी पेंढारकरां बरोबर काम करणं म्हणजे काही खायचं काम नाही. अनेकांना घाम फुटलाय. मी म्हटलं,

“मी प्रयत्न करीन.”

बाबा व दत्ता एकमेकांकडे बघून हसले आणि माझी ऑडिशन सुरु झाली. मला व दाणींना एक सीन दिला गेला व तो आम्हांला आपआपल्या परीने करायला सांगितला. मी माझ्या आईकडे पाहिलं, त्यात एक प्रकारचा विश्वास होता. मी, आईला व बाबांना नमस्कार केला. राजदत्तांनी त्यांना करू दिला नाही. त्या वास्तूलाही मी नमस्कार केला. आणि प्रसंग अभिनयाद्वारे सुरु झाला. २ मिनिटांतच बाबा म्हणाले,

“थांबा! तुम्हीं नाटकी ओव्हर ऍक्टिंग करताय!”

मला कळत नव्हतं, “म्हणजे काय?”

बाबांनी एक फुल साईझ आरसा मागवला आणि म्हणाले,

“आता जसा तुम्हांला करायचाय तसा प्रसंग सादर करा.”

मी सुरूवात केली. एका ओळींनंतर ते म्हणाले,

“कट ”.

त्यांच्या त्या आवाजाने क्षणभर मी खूप भांबावले. पुढच्याच क्षणी बाबा म्हणाले,

“अहो! सिनेमा व नाटक ह्यच्या अभियानात जमीन-आस्मानाचा फरक आहे. रांगणेकरांनी तुम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय, पण ते रंगभूमीला अतिशय शोभून दिसतंय पण सिनेमाचं टेक्निक फार वेगळं आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे, तुम्ही नाटकवाले आधीच स्टार झालेले असता, पण मला स्टार नकोय! कलाकार हवाय, नट हवाय! ज्याला कुठल्याही रोलमध्ये ताकदीने उभं राहता आलं पाहिजे! प्रत्येक भूमिकेतलं आगळेपण, वेगळेपण, मग ते मेकअपपासून, गेटअपपर्यंत, आवाजापासून चेहऱ्याच्या हालचालींपर्यंत, देहाचा अणू आणि अणू बोलला पाहिजे. तुमच्याकडे पाहताना भूमिकेतली ती व्यक्ती अगदी अश्शीच असली पाहिजे, हा भास निर्माण झाला पाहिजे. तेंव्हाच दर्शकांकडून यशाची पावती मिळते. अभिनय हा भास व आभासावरतीच अवलंबून असतो. सुरवातीला हा प्रवास खडतर वाटतो, पण नंतर ह्या कलेच्या अथांग सागरात पोहोण्याचा आनंद फार वेगळा असतो. समुद्राच्या तळाशी जसा अनमोल, अमर्याद खजिना असतो, तसे एक-एक रत्नरूपी पैलू समोर येतात. हावभाव, शब्दांचा व आवाजांचा वापर, शरीराचे हावभाव, हालचाली, वेषभूषा, केशभूषा, मेकअप, चेहऱ्याचे परफेक्ट अँगल्स, लाइटिंग आपल्याला कुठलं सुटेबल आहे? कॅमेरा म्हणजे काय? कारण कॅमेरा म्हणजे तुमचा शत्रू व मित्र दोन्हीं असतो, कारण त्याद्वारे खेचलेली एक-एक फ्रेम तुम्हाला अक्षरशः ‘घडवत’ असते. दर्शकांना तुमच्या दिसण्यापासून ते अभिनयापर्यंत प्रस्तुत करण्याचा आविष्कार तो एखाद्या जादूगारासारखा निरंतर करत असतो. आणि दिग्दर्शक हा तर शिल्पकारच असतो. एखादा शिल्पकार जसा समोरील पाषाणातील त्याला नको असलेला दगडाचा भाग कुठला आणि घडवायच्या मूर्तीचा भाग कुठला हे आधीच ओळखून असतो त्याप्रमाणे दिग्दर्शकही कलाकारांच्या कुठल्या गुणांना वर्ज्य करायचं आणि कुठल्या गुणांना निर्मीती म्हणून सादर करायचं हे ठरवत असतो. सेटवरील प्रत्येक माणूस हा त्या निर्मितीमध्ये सहभागी असतो. अगदी सहकलाकार, संगीत दिग्दर्शक, टेक्निकल स्टाफ ते तुम्हाला सेटवर पाणी आणून देणाऱ्या व्यक्तींसकट त्या निर्मितीचा महत्त्वाचा भाग असतात. आणि ह्यांना जेंव्हा तुम्ही मान देता, प्रेम देता, तिथेच तुम्हीं तुमच्या यशाचा अर्धा टप्पा गाठता. उरलेले टप्पे मात्र देव, दैव व दर्शकांच्या ताब्यात असतात. ज्यावेळी तुम्हाला हे गमक पूर्णतः कळतं, त्यावेळी यशाची मोहोर तुम्हांवर लागते. And then after that the Sky is the Limit!”

बाबा हे सर्व इतक्या आस्थेने, व सच्चाईने बोलत होते की, माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी त्यांच्या पायांवर डोकं टेकलं आणि म्हणाले,

“बाबा कष्ट घेईन पण मला शिकवा.”

बाबांनी एक दृष्टिक्षेप माझ्याकडे, आईकडे व राजदत्त ह्यांच्याकडे टाकला आणि म्हणाले,

“ठिक आहे. ह्या आरश्यासमोर उभे राहा आणि मी जसं सांगतो तसं करा.”

मी मान हलवली. त्या क्षणी माझी भीती नाहीशी झाली. आता मी कलाकार म्हणून माझे अस्तित्त्वच विसरून गेले होते, आजूबाजूला कोण आहेत, काय चालले आहे ह्याचे भान सुद्धा मला राहिले नव्हते. आणि आता बाबांच्या समोर उभी होती ती फक्त त्यांची एक विद्यार्थिनी! बाबांनी जे जे मला सांगितलं ते ते मी समजून-उमजून तस्संच करत गेले. तो ३ पानांचा सीन कधी संपला ते कळलंच नाही. आणि संपला ते कळल्यावर, जाग आली … बाबा माझ्याकडे कौतुकाने बघत होते आणि मान न वळवताच माझ्या आईला म्हणाले,

“मिसेस कुलकर्णी, मला वाटतं तुमची मुलगी माझ्याबरोबर काम करू शकेल.”

‘घरची राणी’ – हे माझं चित्रपट सृष्टीतलं रुपेरी पडद्यावरचं पहिलं पाऊल बाबांच्या आशीर्वादाने मी टाकलं.

बाबांच्या अनेक पैलूंपैकी ही तर नुसती एक छोटीशी झलक होती. बाबांबद्दल किती सांगू? किती लिहू? ह्यासाठी ही दोन-तीन पानं खरंच अपूरी आहेत. ही माझ्या गुरूंना दिलेली मी गुरुदक्षिणेतली फुलाची पाकळी व कृतज्ञतेने, आस्थेची श्रद्धांजली.

सौ. अनुपमा धारकर
(प्रस्तुत लेखिका ह्या मराठी नाट्यसृष्टी, मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटसृष्टी मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत)