श्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २

(मागील भागात आपण इतिहास संशोधनातील घटक, आणि त्यासोबतच संभाजीराजांच्या युवराजपदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या पाहिल्या. या दुसऱ्या भागात संभाजीराजांचे राज्यारोहण, त्यांना झालेला विरोध, रायगडावरील अंतर्गत राजकारणं आणि अखेरीस त्यांचा राज्याभिषेक या साऱ्या घटना पाहणार आहोत. पूर्वार्धाकरिता पहा – ‘रचना -२०१९-०२ गुढीपाडवा विशेषांक’)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी त्यांच्या जवळ रायगडावर मोरोपंतांचे पुत्र निळोपंत, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी न्यायाधीश, राहुजी सोमनाथ पत्की, बाळाजी आवजी चिटणीस, हिरोजी फर्जंद, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ वगैरे अनेक जुनी जाणती आणि मुत्सद्दी मंडळी होती. त्याशिवाय राणीवशातील काही राण्याही होत्या. स्वतः महाराणी सोयराबाई आणि लहानगे राजाराम सुद्धा होते. शिवाजी महाराज मृत्यूसमयी काय म्हणाले हे सांगण्यासाठी ठोस पुरावे असे काही नाहीत. एक कृष्णाजी अनंत लिखित सभासद बखर काय ती महाराजांच्या तोंडची वाक्ये सांगते. पण जर पुराव्यांचा नीट अभ्यास केला तर स्पष्ट दिसून येतं की भविष्यात पुढे जे काही झालं ते सभासदांनी शिवाजी महाराजांच्या मुखी ‘भविष्य’ म्हणून घातलं आहे, अर्थात महाराज प्रत्यक्ष असं म्हणाले असण्याची शक्यता कमी आहे. चिटणीसांच्या बखरीतला मजकूर विश्वास ठेवण्याजोगा नाही कारण जरी त्यांनी जुनी कागदपत्रे पाहिली असं ते स्वतः म्हणत असले तरी त्यांच्या वंशजांना संभाजीराजांनी मारल्यामुळे मल्हार रामरावांनी मनात कटुता धरून लिहिण्याचीच शक्यता जास्त आहे.

प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी पन्हाळगडावर संभाजीराजांची भेट घेतली तेव्हा राज्यविभाजनाचा प्रस्ताव ठेवलेला, परंतु संभाजीराजांच्या नकारानंतर महाराजांना समाधान वाटलं. पण तरीही, सोयराबाई आणि इतर सरकारकूनांशी संभाजीराजांचं फारसं पटत नसल्याने महाराजांनी हा विचार केला की, संभाजीराजांना तूर्त पन्हाळगडावरच राहू द्यावं. याकरिताच राजारामांच्या मुंजीला व लग्नाला संभाजीराजे रायगडावर उपस्थित नव्हते, कदाचित त्यांना बोलावणं नसावं किंवा शिवाजी महाराजांनीच वाद नकोत म्हणून त्यांना दूर थांबायला सांगितलं असावं. पण अखेरच्या क्षणीदेखील शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना बोलावणे पाठवल्याचे दिसत नाही, कारण तसं असतं तर प्रत्यक्ष महाराजांचा आदेश सरकारकूनही धुडकावू शकले नसते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सरकारकूनांपैकी अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सोयराबाईंच्या संमतीने अथवा कदाचित त्यांच्याच आज्ञेने राजारामांना उत्तराधिकारी घोषित करायचे ठरवले. बाकीच्या सरकारकुनांनाही महाराणींचा आदेश आणि अण्णाजी दत्तोंचं म्हणणं पटलं. संभाजीराजे हे अभिषिक्त युवराज होते, परंतु शिवाजी महाराजांच्या हयातीतच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले, किंबहुना त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते कवी कलशाच्या कह्यात गेले असल्याने पुढे काय करतील हा विचार सरकारकुनांनी केलेला दिसतो.

कवी कलश हे एक नवीनच प्रकरण शिवाजी महाराजांच्या उत्तरायुष्यात आणि संभाजी महाराजांच्या युवराजाभिषेकानंतर अवतरलं मूळचा हा कनोजी कवी बहुदा शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीत त्यांना भेटला असावा आणि नंतर महाराष्ट्रात येऊन त्याची संभाजीराजांशी जवळीक वाढली. वास्तविक पाहता कलश हा शाक्तपंथीय होता. बंगाली शाक्तांचं मूळ तसं कोकणातही फोफावत होतं. अनेक कऱ्हाडे ब्राह्मण हे शाक्तपंथीय झाले होते. कवी कलशाची महत्त्वाकांक्षा ही जणू काही संभाजी महाराजांच्या छत्रछायेखाली आपण एकमेव मुख्यमंत्री बनावं अशी स्पष्ट दिसून येते. त्याला किंबहुना अनेक गोष्टींचा गर्वही असल्याचं दिसून येतं. उदाहरणादाखल सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या जाणत्या अष्टप्रधान आणि इतर सरकारकुनांची पत्रे पाहिली असता त्यात केवळ त्यांचं जे अधिकृत पद आहे तेच लिहिलेलं आढळतं, उदाहरणार्थ- मोरोपंत पेशवे हे लिहिताना “आज्ञापत्र राजेश्री मोरोपंत प्रधान” वगैरे अशा मायन्याची पत्रं लिहीत असत. आता कलशाच्या पत्राचा मायना पहायचाय? “धर्माभिमान, कर्मकांडपरायण, दैवलोकनिष्ठाग्रहीताभिमान, सत्यसंध, समस्त राजकार्यधुरंधर, विसश्वासनिधी छंदोगामात्य“. अर्थात हे पत्रं खूप नंतरचं जरी असलं तरी त्याची ही स्वमखलाशी करण्याची वृत्ती सरकारकूनांपासून लपली नसणार हे उघड आहे. पुढे कुलएखत्यार पदाची कलशाची जी मुद्रा पत्रांवर आढळते त्यात तो म्हणतो की, “सर्व याचकांची इच्छापूर्ती करणारी व राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असलेली ही मुद्रा कलशाचे हातात आहे“. यावरूनच त्याला स्वतः एकट्याने कारभार करायची हाव आधीपासूनच असणार हे उघड आहे. पुढेही अनेक प्रकरणात सरदार जेध्यांच्या शकावली-करिन्यातही “कवी कलशाच्या बोले मागुती” म्हणजे केवळ कवी कलशाच्या सांगण्यावरून संभाजीराजांनी अनेक गोष्टी केल्याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. राज्यारोहणानंतर संभाजीराजांनी बाकरेशास्त्रींना जे संस्कृत दानपत्रं दिलं आहे त्यात ते म्हणतात की, “कवी कलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यांना लाली आली आहे असा (जो मी) …” व म्हणूनच, राजकारणतंत्र अवगत नसलेल्या केवळ स्वार्थी कलशाच्या तंत्राने संभाजीराजे चालणार असतील अश्या भीतीपोटीं, त्यापेक्षा राजाराम छत्रपती बनावेत असा डाव सरकारकुनांनी आखला.

छत्रपती राजाराम महाराज यांचे चित्र न्यू पॅलेस म्युझिअम कोल्हापूर

दि. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचे दिवस पूर्ण झाल्यानंतर दि. २१ एप्रिल १६८० रोजी मोरोपंत पेशवे आणि अण्णाजी दत्तो यांनी सोयराबाईंच्या उपस्थितीत राजारामांना मंचकावर बसवलं. 

यानंतर लगेच हे दोन्ही सरकारकून पन्हाळ्यावर संभाजीराजांकडे जायला निघाले. त्यापूर्वी सरकारकुनांनी पन्हाळगडावर हवालदार बहिर्जी नाईक इंगळे, सोमाजी नाईक बंकी वगैरे लोकांना पत्रं पाठवून संभाजीराजांना कैद करून ठेवण्यास सांगितलं, आणि शिवाय संभाजीराजांच्या नावे वेगळं पत्रं लिहून शिवाजी महाराज परलोकी गेल्याची वार्ता लिहिली. पण ही पत्रे घेऊन जाणारी गणोजी कावळा वगैरे लोकं पन्हाळ्यावर गेली तेव्हा संभाजीराजांनी त्यांना तडक समोर बोलावलं त्यामुळे त्यांच्याकडून काही वेळातच बातमी फुटली आणि संभाजीराजे सावध झाले.

छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र स्थळ: औरंगाबाद वस्तुसंग्रहालय

राजाराम महाराजांच्या मंचकारोहणानंतर अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी पन्हाळ्याला जाताना  कऱ्हाडजवळ तळबीडला असणाऱ्या सेनापती हंबीरराव मोहित्यांची भेट घ्यावी असं ठरवलं. पण हंबीररावांना या दोघांचाही हेतू पटला नाही आणि ज्येष्ठता नजरेत आणून संभाजीराजेंच खरे वारसदार असल्याने त्यांना सिंहासन मिळायला हवं असं हंबीररावांनी ठरवलं आणि पेशवे तसेच सचिव या दोघांनाही कैद केलं. पन्हाळ्याचा किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, मुरारबाजी देशपांड्यांच्या नातू, यालाही कैद करण्यात आले. हंबीरराव पाच हजार फौजेनिशी दोन्ही मंत्र्यांना कैद करून घेऊन आल्यावर संभाजीराजांनी फौजेचा दोन महिन्यांचा पगार आगाऊ दिला आणि जनार्दनपंत हणमंते वगैरे इतर लोकांनाही अटक करून संभाजीराजे सनापतींसह रायगडावर यायला निघाले.

 दि. ३ जून १६८० रोजी संभाजीराजे रायगडच्या वाटेवर असताना प्रतापगडावर जाऊन भवानीचं दर्शन घेऊन, पूजा करून मग पुढे रायगडावर आले. संभाजीराजांचे पाय जवळपास तीन वर्षांनी रायगडला लागत होते. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाताना त्यांनी संभाजीराजांना कोकणात शृंगारपूरला पाठवलं होतं त्या साऱ्या आणि दिलेरखानाच्या प्रकरणानंतर तीन वर्षांनी संभाजीराजे रायगडावर येत होते. रायगडचा हवालदार कान्होजी भांडवलकर याला संभाजी महाराजांनी कैद केलं, खेमसावंत वगैरे इतर अनेक लोकांचा कडेलोट केला, आणि रायगड संभाजीराजांच्या ताब्यात आला. राजाराम महाराजांवर नजरकैद बसली. ही नजरकैद बहुदा गैर माणसांची संगत त्यांच्या भवताली नसावी म्हणूनच दिसते. जेधे शकावली राजाराम महाराजांना अदबखान्यात म्हणजे तुरुंगात टाकलं असं म्हणते ते शब्दशः नसावं. येसाजी कंकांच्या मदतीने रायगडची व्यवस्था लावण्यात आली. यानंतर दि. २७ जून १६८० रोजी शिवाजी महाराजांच्या एक पत्नी महाराणी पुतळाबाई या सती गेल्या. यानंतर संभाजीराजांनी आपलं मंचकारोहण करायचं ठरवलं. हे सगळं ठरत असताना जवळच्या अनेक लोकांनी जुन्या सरकारकुनांना अटकेत ठेवणं योग्य नाही असं समजावल्यावरून संभाजीराजांच्या आज्ञेने मोरोपंत, अण्णाजी वगैरे लोकांच्या बेड्या काढून त्यांच्या घरभवतालच्या चौक्याही उठवण्यात आल्या.

दि. २० जुलै १६८० या दिवशी संभाजीराजांनी मंचकारोहण केलं. मंचकारोहण म्हणजे केवळ सिंहासनावर बसणे, हा राज्यभिषेक नव्हता. संभाजीराजांनी स्वतःला अधिकृतरीत्या शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी आणि मराठ्यांचा ‘राजा’ म्हणून घोषित केलं. दरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये मोरोपंत वारल्यामुळे संभाजीराजांनी त्यांचे पुत्र निळोपंत यांना पेशवाई दिली आणि अण्णाजी दत्तो यांना सुरनिशीऐवजी मुजुमदारी बहाल केली. बाळाजी आवजींची चिटणिशीही कायम केली. इ.स. १६८० मध्ये अखेरपर्यंत संभाजीराजांनी प्रथम मुंबईकर आणि सुरतकर इंग्रजांचा समाचार घेतला आणि सोलापूरच्या किल्ल्यावर हल्ला चढवून लुटालूट केली आणि मोंगलांना त्रस्त करून सोडलं.

माहाराज संभाजिराजे – स्वराज्याचे दुसरे छत्रपती

चित्रकार: अज्ञात. दख्खनी चित्रशैली, जलरंग – सुवर्णकाम, १७ वे शतक उत्तरार्ध
स्थळ : ब्रिटीश लायब्ररी (मराठा व दख्खनी चित्र संग्रह). 

दि. १६ जानेवारी १६८१ या दिवशी संभाजीराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला. ते आता अधिकृतरीत्या छत्रपती झाले. यानंतर लगेच म्हणजे दि. ३० जानेवारी १६८१ रोजी सेनापती हंबीरराव मोहित्यांनी मोंगलांचे प्रमुख ठाणे बुऱ्हाणपुरावर अचानक हल्ला चढवला. जवळपास तीन दिवस बुऱ्हाणपूर लुटत होते. अगणित संपत्ती घेऊन मराठी फौज चोपड्याच्या मार्गाने साल्हेरला येऊन पोहोचली. फेब्रुवारीत मराठ्यांच्या फौजांनी औरंगाबादेवर हल्ला चढला पण लूटीला सुरुवात होताच बहादूरखान येण्यास निघाला असल्याने मराठे माघारी फिरले. एप्रिलमध्ये नळदुर्गभवतालीही मराठी फौजांनी लुटालूट केली.

या दरम्यानच शाहजादा अकबराचं प्रकरण उद्भवलं. उदयपूरच्या राजपुतांच्या झगड्यात औरंगजेबाने उदयपूर जप्त करण्याचा डाव आखला आणि दि. १६ जानेवारी १६८१ ला बादशाह औरंगजेबाच्या पाच पुत्रांपैकी एक – शाहजादा मोहंमद अकबर हा फौजेसह चितोडवर चालून गेला. पण उदयपूरची महाराणी आणि दुर्गादास राठोडने अकबरालाच त्याच्या मनाच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन, त्याला दिल्लीचा बादशाह करण्याचे आश्वासन देऊन, बापाविरुद्ध फितवून राजपुतांच्या बाजूला आणलं. अकबराने बापालाच आव्हान दिलं तेव्हा औरंगजेबाने केवळ एका पत्राच्या आधारावर अकबराच्या मागचा साऱ्या राजपुतांचा आधार काढून घेतला आणि अकबर एकटा पडला. तो थेट दक्षिणेकडे संभाजीराजांच्या आश्रयाला आला. दि. ११ मे १६८१ रोजी अकबराने संभाजीराजांना पत्रं पाठवून औरंगाजेबाविरुद्ध साहाय्य मागितलं, आणि या पत्राचं उत्तर यायच्या आत दि. २० मे रोजी दुसरं पत्रंही पाठवलं. या सगळ्यामुळे अखेरीस संभाजीराजांनी अकबराला आश्रय देऊन सुधागड किल्ल्याच्या खाली असलेल्या धोंडसे या गावात त्याची व्यवस्था केली. त्याच्या बंदोबस्तासाठी नेतोजी पालकर यांना ठेवलं.

ऑगस्ट १६८१ मध्ये पन्हाळ्यावर असताना संभाजीराजांच्या विरोधात दुसरा एक कट उघड झाला. त्यांना मत्स्य भोजनातून विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात आहे. एका मुलाने संभाजीराजांना आधीच सावध केल्याने शेवटी एका नोकराला आणि कुत्र्याला ते जेवण देण्यात आलं व काही तासांतच ते मृत्यू पावले. अण्णाजी दत्तो व केशव पंडित पुरोहित यांचा यामागे हात असल्याचं इंग्रज म्हणतात. या कटात पन्हाळ्यावरच असलेल्या सोमाजी नाईक बंकी, सूर्या निकम, बापू माळी वगैरे कटातील संशयित लोकांना तिथेच ठार मारण्यात आलं. पण मुंबईकर इंग्रजांच्या सुरतकर इंग्रजांना लिहिलेल्या एका पत्रानुसार यानंतर लगेच आणखी एक कट झाला तो म्हणजे अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद व राजमाता सोयराबाईंनी अकबराची मागितलेली कथित मदत. या तिघांनीही अकबराची मदत घेऊन संभाजीराजांना पकडण्याचा डाव आखला पण अकबराने हे संभाजीराजांना कळवले, ज्या बदल्यात त्याला संभाजीराजांकडून बुऱ्हाणपुरावर हल्ला करण्यासाठी तीस हजार स्वार मिळणार होते. अकबराने ही पत्रे थेट संभाजीराजांना दाखवल्याने लगेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी वगैरे लोकांना पकडलं.

या दुसऱ्या कटाविषयी वास्तविक पाहता अनेक मुद्दे संशय घेण्याजोगे आहेत. म्हणजे खरंच हा कट झाला होता का इथपासून शंकेला वाव आहे. कारण अण्णाजी दत्तो वगैरे मंडळींनी आधीच संभाजीराजांच्या विरोधात जाऊन पकडले गेले असल्याने पुन्हा ते हे धाडस करतील का, शिवाय जर धाडस करायचेच तर मुळात स्वतः पळून आलेल्या राज्यहीन अकबराशी ते संधान साधतील का थेट औरंगजेबाशी गुप्त मसलती करतील इत्यादी अनेक गोष्टी आहेत. शिवाय, जेधे शकावली “कवी कलशाच्या बोले मागुती” असं म्हणते, त्यावरून हा सगळा बनाव कलशाने घडवून आणला असावा असं स्पष्ट ध्वनित होतं. यात कलशाचा एक हेतू साध्य झाला तो म्हणजे पंतप्रधानादि मुख्य मुख्य सरकारकून अनायसे त्याच्या मार्गातून नाहीसे झाले आणि त्याला ‘कुलएखत्यार’ म्हणजे सगळ्या कामकाजाची अखत्यारी मिळाली. पण या सगळ्या गोष्टीत राजद्रोहाचा ठपका ठेऊन अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी चिटणीस वगैरे लोकांना सुधागडपलीकडील परळीजवळ औंढा गावानजीक दि. १६ सप्टेंबर १६८१ रोजी हत्तीच्या पायी देऊन ठार मारण्यात आले. यात एकंदर वीस असामी मृत्यू पावल्या. हे जेव्हा संभाजीराजांच्या पत्नी, महाराणी येसूबाईंना समजलं तेव्हा येसूबाईंनी, “बाळाजी प्रभु मारिले हे उचित न केले. बहुतां दिवसांचे इतबारी व पोख्त. थोरले महाराज कृपाळू (त्यांचे) सर्व अंतरंग त्यांचेपाशी होते. … त्यांनी काही अपराध केला नाही लहानाचे (कलशाच्या) सांगण्यावरून ही गोष्ट केली …” असे सांगून  संभाजीराजांची चांगलीच कानउघाडणी केल्याचं मल्हार रामरावांनी त्यांच्या बखरीत लिहिलं आहे. अखेरीस बाळाजी आवजींच्या पुत्रांना संभाजीराजांनी पुन्हा कारभारात दाखल करून त्या घराण्याकडे चिटणिशी कायम ठेवली. या नंतर जवळपास दिड महिन्यात, दि. २७ ऑक्टोबर १६८१ रोजी महाराणी सोयराबाईंनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. एकंदरच, कवी कलशाच्या आत्यंतिक महत्त्वाकांक्षेमुळे अनेक गोष्टी घडत होत्या.

हे सर्व घडत असताना सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींना दिसत नव्हतं असं नाही. पण वैराग्य पत्करल्याने प्रत्यक्ष कोणत्याही गोष्टीत सहभागी होणे त्यांना शक्य नव्हतं. तरी शिवाजी महाराजांच्या या पुत्राला उपदेश करण्याकरिता डिसेंबर १६८१ समर्थांनी मध्ये संभाजीराजांना त्यांनी एक पत्रं लिहिलं.

सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी |

नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचे तिरीं |

साकेताधिपती, कपी, भगवती हे देव ज्याचे शिरीं |

तेथे जागृत रामदास विलसे, जो या जनां उद्धरी ||

या सुप्रसिद्ध अशा ह्या संपूर्ण पत्रात समर्थांनी राज्यकारभाराची दिशा वगैरे कशी ठेवावी, लोकांना राजी कसं ठेवावं, उगाच राग आला तरी कोणालाही दुखावू नये आणि मार्गी लावावं वगैरे अनेक उपदेश आहेत, पण मुख्य उपदेश म्हणजे “शिवाजी महाराजांकडे पहा, त्यांना आठवा. त्यांचा साक्षेप कसा होता, प्रताप कसा होता, त्यांचं बोलणं-चालणं कसं होतं, लोकांना सलगी देऊन ते त्यांना जवळ कसं करत” इत्यादी सांगून “शिवाजी महाराजांनी जे केलं त्याहूनही आणखी काही करून दाखवावं, मगच पुरुष म्हणवावं” असं समर्थ म्हणतात. हे पत्र म्हणजे अक्षरशः संभाजी महाराजांसाठी नंदादीपच होता. आपल्या सर्वांच्या दृष्टीने देखील हे संपूर्ण पत्र मार्गदर्शक आहे. एकूणच, संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जी काही अंतर्गत राजकारणं सुरु होती त्यांचा शेवट हा असा झाला, आपल्या आबासाहेबांप्रमाणेच, संभाजीराजांनीही पुढे समर्थांचा आणि संप्रदायाचा योग्य प्रकारे परामर्श घेतला. महाबळेश्वरकरांना दिलेल्या एका सनदेत तर प्रत्यक्ष संभाजी महाराजांचे वाक्य आहे, “राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हांस अगत्य”. … आणि संभाजीराजे पुढील बाहेरच्या राजकारणात गुंतले.

समर्थ श्रीरामदासस्वामींनी श्रीशंभूराजांना पत्र पाठवून “शिवरायांना आठवावे, त्यांच्याप्रमाणे वागावे” असा उपदेश केला:

अखंड सावधान असावें | दुश्चित्त कदापि नसावें |
तजविजा करीत बसावें | एकांत स्थळी ||१||

कांहीं उग्र स्थिती सांडावी | कांहीं सौम्यता धरावी |
चिंता लागावी परावी | अंतर्यामी ||२||

मागील अपराध क्षमावे | कारभारी हातीं धरावे |
सुखी करुनि सोडावे | कामाकडे ||३||

पाटवणी तुंब निघेना | तरी मग पाणी चालेना |
तैसें सज्जनांच्या मना | कळलें पाहिजे ||४||

जनांचा प्रवाह चालिला | म्हणजे कार्यभाग आटोपला |
जन ठायीं ठायीं तुंबला | म्हाणिजे खोटां ||५||

श्रेष्ठींजें जें मिळविलें | त्यासाठीं भांडत बैसलें |
मग जाणावें फावलें | गलीमांसी ||६||

ऐसें सहसा करूं नये | दोघे भांडतां तिसऱ्यासी जय |
धीर धरूनी महत्कार्य | समजोनी करावें ||७||

आधींच पडला धास्ती | म्हणजे कार्यभाग होय नास्ती |
याकारणें समस्तीं | बुद्धि शोधावी ||८||

राजी राखीतां जग | मग कार्यभागाची लगबग |
ऐसे जाणोनियां सांग  | समाधान राखावें ||९||

सकळ लोक एक करावें | गलीम निपटुन काढावें |
ऐसें करितां कीर्ति धावे | दिगंतरी ||१०||

आधी गाजवावे तडाके | मग भूमंडळ धाके |
ऐसे न होता धक्के | राज्यास होती ||११||

समय प्रसंग वोळखावा | राग निपटून काढावा |
आला तरी कळो नेदावा | जनांमध्ये ||१२||

राज्यामध्ये सकळ लोक | सलगी देवून करावें सेवक |
लोकांचे मनामध्ये धाक | उपजोंचि नये ||१३||

बहुत लोक मेळवावें | एक विचारे भरावें |
कष्टे करोनी घसरावें | म्लेंच्छांवरी ||१४||

आहे तितुके जतन करावें | पुढे आणिक मेळवावें |
महाराष्ट्रराज्य करावें | जिकडे तिकडे ||१५||

लोकी हिंमत धरावी | शर्तीची तरवार करावी |
चढ़ती वाढती पदवी | पावाल येणें ||१६||

शिवराजांस आठवावें | जीवित्व तृणवत मानावें |
इहलोकी परलोकी राहावें | कीर्तिरूपें ||१७||

शिवरायांचे आठवावें स्वरूप | शिवरायांचा आठवावा साक्षेप |
शिवरायांचा आठवावा प्रताप | भुमंडळी ||१८||

शिवरायांचे कैसे चालणें | शिवरायांचे कैसें बोलणें |
शिवरायांची सलगी देणें | कैसें असे ||१९||

सकळ सुखांचा त्याग | करुनी साधिजे तो योग |
राज्यसाधनाची लगबग | कैसीं असे ||२०||

त्याहुनि करावें विशेष | तरीच म्हणावें पुरूष |
याउपरी आतां विशेष | काय लिहावें ||२१||

स्रोत:

केशवपंडित लिखित राजारामचारितम्
संभाजी महाराजांचं बाकरेशास्त्रींना दिलेलं दानपत्र
भीमसेन सक्सेना कृत तारिखे दिलकुशा  
बुसातीनुस्सलातीन अथवा विजापूरची आदिलशाही
संभाजीकालीन पत्रसारसंग्रह
सभासद बखर
चिटणीस बखर
परमानंदकाव्यम्
जेधे शकावली
९१ कलमी बखर

(समाप्त) 

श्री. कौस्तुभ कस्तुरे

www.kaustubhkasture.in

(प्रस्तुत लेखक हे कौस्तुभ कस्तुरे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून गेल्या काही वर्षांत त्यांनी महत्त्वाचे संशोधन करून महाराष्ट्राच्या सत्य आणि सप्रमाण इतिहासावरील साहित्य संपदेत मोलाची भर घातली आहे आणि पुढेही घालत राहणार आहेत. राफ्टर पब्लिकेशन्स द्वारे प्रकाशित झालेली त्यांची अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा: ‘पेशवाई’, ‘इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ व २’, ‘पुरंदरे’, सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ’ आणि ‘समर्थ’. वरील लेखातील चित्रे ही विषयानुरूप विकिपीडिया व गुगल वरून साभार संकलित केली आहेत – संपादक)

श्रीसमर्थांनी श्रीशंभूराजांना पाठवलेल्या पत्राचे हस्तलिखीत