गणेश अर्चना ते गणेशोत्सव

अर्थात: गणपती पूजेचा प्राचीन इतिहास आणि गणेशोत्सव

आजकाल आपण सर्वजण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहोत. गणेशोत्सव हा आपणां सर्वांचा एक प्रमुख सण झाला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. आपल्या आयुष्याचा खूप मोठा सामाजिक आणि धार्मिक भाग व्यापून टाकणाऱ्या या गणेशोत्सवाबद्दल थोडे अधिक जाणून घेऊयात.

१८९२ मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करून तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांविरोधात सामाजिक आणि धार्मिक सलोखा व एकसंधता आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला व तो अतिशय परिणामकारक व यशस्वी ठरला. या घटनेच्या आधीही गणपतीची पूजाअर्चा होत असे परंतु ती खाजगी-कौटुंबिक किंवा राजा-महाराजांच्या खाजगी समारंभांपुरती मर्यादित होती. गणेशपूजेची सुरुवात कशी झाली? – या विषयाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत.       

पुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी १९०५ साली (अश्विन माघ शके १८२७) सरस्वती मंदिर या त्रैमासिकात एक लेख लिहून गणपती हे दैवत शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकात अस्तित्वात होते असे प्रतिपादन केले आहे. सदर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ‘हाल सातवाहनांची गाथासप्तशती’ या मूळ प्राकृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथाचा संदर्भ घेतला आहे. या पुस्तकातील गाथेमध्ये सकल मनोकामना पुरविणाऱ्या देवतेचा म्हणजे गणपतीचा उल्लेख आढळतो. हाल या सातवाहन राजाने स्वतः लिहिलेले आणि संकलित केलेले हे प्राकृत भाषेतील पुस्तक आहे. याचा अर्थ गणपतीची पूजा ही अगदी पहिल्या शतकापासून किंवा त्याच्याही आधीपासून आपले पूर्वज करीत आले आहेत. या पहिल्या शतकातील संदर्भानंतर भारतामध्ये बरीच राजकीय आणि सामाजिक आक्रमणे तसेच स्थित्यंतरे झाली परंतु गणपतीची पूजा अखंडपणे चालूच राहिल्याचे दिसून येते. पहिल्या शतकापासून ते पुढील १०-१५ शतके भारतीय व्यापारी आणि प्रवासी रोम, इराण, पर्शिया पासून पूर्वेकडे चीन, इंडोनेशिया, सुमात्रा या देशांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारउदीम करीत होते. या व्यापारी मंडळींनी गणपतीला आपली आर्थिक प्रगती करणारा देव मानले असल्यामुळे, त्यांनीसुध्दा गणेशपूजेचा प्रचार आणि प्रसार खूप दूरपर्यंत केलेला आपल्याला दिसून येतो. जैन आणि बौद्ध धर्मांमध्येही गणपतीला विशेष स्थान देऊन त्याची विविध रूपात पूजा-अर्चना केली जाते. नेपाळी, तिबेटीयन आणि इतर पौर्वात्य धार्मिक ग्रंथांमध्ये गणपतीच्या विविध रूपांतील पूजनाचे भरपूर पुरावे आढळून येतात.

https://www.rarebooksocietyofindia.org/photo_archive/196174216674_10154345187426675

जपानच्या हिरोशिमा जवळील त्सुकुशिमा बेटावरील द्याश्यो-इन मंदिरामधील कांगी-तेनचे चित्र – (歓喜天 गॉड ऑफ ब्लिस).

जपानमधील वज्रयान बौद्ध धर्माच्या शिंगॉन पंथामध्ये गणपतीचे हे रूप ‘बोधिसत्त्व अवलोकितेश्वर’ या नावानेही ओळखले जाते. वज्रबोधी व अमोघवज्र या भारतीय प्रवासी धर्मप्रसारकांनी चीनमध्ये वज्रयान बौद्ध धर्माचा प्रसार केला. कुकाई (Kukai – 空海 इ.स. ७७४-८३५) या जपानी बौद्ध भिक्षूने चीनमध्ये जाऊन या पंथाचा अभ्यास व प्रसार केला. जपानमध्ये परत येऊन त्याने शिंगॉन (मंत्र) पंथाची स्थापना केली.

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/43/Ta-Prom_Frise-Ganesha.png

ता प्रोहम (उच्चार prasat taprohm),

अंगकोर वाट, कंबोडिया मधील गणेशशिल्प

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2c/Ganesha_statue_at_Sanggar_Agung_Temple%2C_Surabaya-Indonesia.jpg/800px-Ganesha_statue_at_Sanggar_Agung_Temple%2C_Surabaya-Indonesia.jpg

(वरील चित्र): इंडोनेशियातील सुराबया या जावा प्रांताच्या राजधानीमध्ये ‘क्लन्तेंग संगर आगुंग’च्या मंदिरातील गणेशमूर्ती. ह्या मंदिरात महायान बौद्ध, चीनी, ताओ हिंदू, ख्रिस्ती व मुस्लीम अश्या अनेक धार्मिक परंपरांचे लोक एकत्र येतात.

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ed/Ganesha_at_of_the_merumat_of_King_Bhumibol_Adulyadej.jpg/1024px-Ganesha_at_of_the_merumat_of_King_Bhumibol_Adulyadej.jpg

थायलंडचे महाराज भूमीबोल अदुल्यदेज (King Bhumibol Adulyadej) यांच्या अंत्येष्टीसाठी केलेल्या phra merumat वरील गणेशमूर्ती (खालील चित्र):

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/98/Manjangan.jpg/800px-Manjangan.jpg

बाली, इंडोनेशिया मधील मेंजांगन बेटावरील गणेश मंदिर

मुस्लीम आक्रमणांनंतर भारताची आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक बैठक खूप मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली दिसून येते. यादरम्यानच्या काही कालखंडामध्ये तर आपल्या देवांची पूजाअर्चा करणेही दुरापास्त झालेले दिसून येते. अशाप्रसंगी त्याकाळात राज्य करीत असलेल्या किंवा आपले राज्य टिकविण्यासाठी झुंज देत असलेल्या राजांनी आपल्या रयतेला धीर देण्यासाठी व त्यांना एकजुट करून एका छत्राखाली आणण्यासाठी देवदेवतांचा, प्रादेशिक अस्मितेचा तसेच समान भाषा/संस्कृतीचा योग्य रीतीने वापर केला आहे. या चाणाक्ष राजा-महाराजांनी समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी व रयतेचा आपापसातील सुसंवाद वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक संस्था उभ्या करण्याचा प्रामाणिक प्रयंत्न केला आहे. हे उद्दिष्ट्य साध्य करण्याच्या हेतुने सामान्य लोकांची आस्था व श्रध्दास्थाने असलेल्या विविध संत-महात्म्यांना आणि धार्मिक स्थळांना योग्य त्या स्वरूपाची आर्थिक, सुरक्षितता व इतर मदत केलेली आढळून येते. या संदर्भातील भरपूर दाखले इतिहासात उपलब्ध आहेत.   

गणपती हे समाजातील सर्व स्तरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. विविध गणपती मंदिरांना तत्कालीन राज्यकर्त्यांतर्फे भरपूर मदत मिळत असे. या धोरणाला अनुसरूनच पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराला राजमाता जिजाऊंनी भरीव मदत केल्याचे निदर्शनास येते. 

http://www.kasbaganpati.org/images/KG_About_Ganpati.png

श्री कसबा गणपती

सौजन्य: http://www.kasbaganpati.org

याच संदर्भातील एक अस्सल पुरावा आपणांस छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात १९ मार्च १६४७ रोजी मोडी भाषेत लिहिलेल्या पत्राच्या रूपात मिळतो.

D:\Writerly\Maharashtra Mandal\Chicago\Ganeshotsav\10396308_1505311586354066_6936770427957316188_n.png

हे अस्सल खुर्दखत द्वैभाषिक फर्मान असून त्यातील सुरुवातीचा मजकूर फारशीत आहे. हे पत्र आठ ओळींचे असून यावर “प्रतिपच्चंद्र” ही अष्टकोनी शिवमुद्रा अत्यंत सुस्पष्ट दिसून येते. पत्राची सुरुवात ‘श्री मोरया’ अशी असून अखेरीस “मर्यादेयं विराजते” ही मोर्तब आहे.    

पुणे परगण्याच्या कऱ्ह्यात मावळातील माणतर्फे गावातून रोज अर्धा शेर तेल वजनी हे नंदादीपास देण्यात यावे असा श्रीशिवाजी महाराजांनी मावळच्या कारकुनास काढलेला हा हुकुम आहे. कसबा गणपतीला निजामशाहीत दिल्या गेलेल्या सनदेचे पत्र आजही उपलब्ध आहे. निजामशाहीतील हे फर्मान असून हे फर्मान लढाई, आक्रमणे यांतदेखील कधीही मोडले गेले नाही व श्री मोरयास याची झळ कधीच पोचली नाही. हे शिक्क्याचे फर्मान याची मूळ प्रत असून, प्रत्येक वर्षी ते पुढे चालू करण्यास “दुमाला” सांगून फर्मान मागू नका, नकल “तालीक” करा असा आशय त्यात आहे. निजामशाहीतील हे अस्सल पत्र मुद्रांकित असून ही दुर्मीळ सनद, देवस्थानचे अस्तित्त्व किती जुने आहे ह्याचा एक भक्कम पुरावा आहे. (सौजन्य: सदर माहिती ग्रामदैवत कसबा गणपती देवस्थान यांच्या फेसबुक पेजवरून घेतलेली आहे.) या व्यतिरिक्त अशाच प्रकारचा आणखी एक संदर्भ आपल्याला आढळतो. १६ मे १६७५ रोजी शिवाजी महाराजांच्या सैन्याने गोव्यातील फोंडा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर फोंडा किल्ल्याची डागडुजी करुन किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर गणपतीची मूर्ती बसविण्यात आली असा उल्लेख डॉ. पिस्सूर्लेंकर यांच्या ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ या पुस्तकामध्ये (पृष्ठ क्रमांक ६५ वर) करण्यात आलेला आहे. ही काळ्या दगडात कोरलेली सुंदर अशी पट्टी डॉ. पिस्सूर्लेंकरांना फोंडा किल्ल्याच्या आसपास गाडलेल्या अवस्थेत मिळाली. सध्या ही दगडी पट्टी गोवा म्युजियममध्ये ठेवण्यात आलेली आहे.

हीच परंपरा पुढे पेशवाईच्या काळातही चालू राहिलेली आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे, श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतही या देवस्थानाचे महत्त्व अबाधित राहिले आहे. एका पत्रामध्ये देवाची पूजाअर्चा व इतर खर्चासाठी दरमहा ८ रुपये ५ आणे ३ पैसे याप्रमाणे दरसाल १०० रुपये देण्यात यावेत असे फर्मान आढळून येते. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यातर्फे भाद्रपद उत्सवाला मिळणारी रुपये १५६ ही मदत आजही पर्वती देवस्थान यांजकडून चालू आहे.

उत्तर पेशवाईत म्हणजे १७९२ साली, सवाई माधवराव पेशवे १८ वर्षांचे असताना, शनिवारवाड्यातल्या गणेश महालात खूपच भव्य असा गणेशोत्सव होत असे. उत्सवाच्या खर्चाच्या काही नोंदी पेशवे दप्तरात आहेत. दुर्दैवाने १८२८ साली लागलेल्या आगीत संपूर्ण शनिवार वाडा जाळून खाक झाला आणि गणेश महाल आणि त्यातला गणेशोत्सव नक्की कसा होता किंवा गणेश महाल कसा होता याची काही माहिती आपल्यापर्यंत आज पोचलेली नव्हती. परंतु, मध्यंतरी इतिहास अभ्यासक श्री. मनोज दाणी यांना शनिवार वाड्याच्या गणेशोत्सवावर प्रकाश टाकणारी काही नवीन कागदपत्रे अमेरिकेत येल विद्यापीठाच्या संग्रहालयात सापडली आहेत. त्यांच्या आधारे आपल्याला आता १७९२ साली शनिवार वाड्यात बसवलेल्या गणपतीचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आणि नकाशाचित्र उपलब्ध झाले आहेत. जेम्स वेल्स नावाच्या इंग्लिश चित्रकाराची भेट सर चार्ल्स मॅलेट या सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी असलेल्या इंग्रज वकिलाशी झाली आणि मॅलेटने वेल्सला पुण्याला यायचे आमंत्रण दिले. जेम्सने आपल्या डायरीत २४ ऑगस्ट १७९२ या दिवसाखाली नोंदवले आहे. त्यातूनच आपल्याला शनिवार वाडा आणि गणपती उत्सव याबाबत खालील नवी माहिती मिळते. जेम्स वेल्स आपल्या रोजनिशीत म्हणतो – “पुणे, २४ ऑगस्ट १७९२, आज आम्हाला गणेशोत्सवानिमित्त दरबारात येण्याचे आमंत्रण आले होते. आम्ही तिथे पोचल्यावर एका मोठ्या खोलीत आम्हाला घेऊन जाण्यात आले. त्या खोलीची एक बाजू एखाद्या देवळाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे सजवली होती. तिथे एक दारही होते आणि त्या दारातून आम्हाला दिव्यांच्या जळणाऱ्या ज्योती आणि पूजा करणारे ब्राह्मण दिसत होते. दाराबाहेर दोन सेवक तलम अश्या लाल रेशमी वस्त्राचे पंखे घेऊन उभे होते – वेल्सच्या मताप्रमाणे ते माश्या आत जाऊ नयेत म्हणून तिथे रेशमी वस्त्रे घेऊन उभे होते.” पूजा करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या पुष्कळ होती आणि त्यांचे कपडे आणि एकूण आविर्भाव भव्य व नीटनेटका असा कौतुक करण्याजोगा असा वेल्सला वाटला. तिथे असलेल्या इतर लोकांमध्ये वेल्सला अनेक पद्धतीचे भरजरी पोशाख दिसले. विशेषतः वेल्सला त्यांच्या शिरस्त्राण आणि पगड्यामध्ये इतका फरक पाहून खूप आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे वेल्सने त्याच्या चित्रात काही रेघांच्या साह्याने पेशव्याला मुजरा करण्याचा आणि गणेशाला वंदन करून विडे घेऊन बाहेर जाण्याचा क्रम मध्यभागी दाखवला आहे.

वेल्सच्या नकाशामध्ये खालील नावे लिहिली आहेत.

A. देवळाचा दरवाजा
B. लाल रेशमी वस्त्रे घेतलेले दोन सेवक
C. अनेक पुष्पगुच्छ, बागेत ठेवललेले, खालून काडयांनी तोलून धरलेले
D. (नाव लिहायचे विसरले आहे, बहुदा पूजेची निरांजने, समई इत्यादी)
E. गणेश
F. पेशवा
G. मंत्री (म्हणजे बहुदा नाना फडणीस)
H. सर चार्ल्स मॅलेट
I. मिस्टर लॉकहार्ट
J. पानाच्या विड्यांचे तबक
K. वेल्स (स्वतः या नोंदीचा लेखक)
L. डॉ. फिंडले (इंग्रज वकिलातितला सर्जन)
M. मिस्टर ईमानुएल
N. कर्नल लेडी यांचा सर्वात मोठा मुलगा
O. कर्नल लेडी यांचा सर्वात लहान मुलगा
P. सेवक
Q. अनेक (गणेशवंदना) नाचणाऱ्या स्त्रिया
R. (गणेशवंदना) नाचणाऱ्या स्त्रियांचा एक गट
S. पेशवयांच्या शेजारी आणि समोर अनेक उच्च दर्जाचे सरदार

१७९२ साली शनिवारवाड्यातल्या गणपती उत्सवाचे जेम्स वेल्सचे प्रत्यक्षदर्शी वर्णन व नकाशाचित्र

(सौजन्य: जेम्स वेल्सचे चित्र व माहिती इतिहास अभ्यासक श्री. मनोज दाणी यांच्या फेसबुक पेजवरून साभार – संपादक)

१८६६ मध्ये लंडनमधे प्रकाशित झालेल्या सर एडवर्ड सलिव्हन लिखित The Conquerors, Warriors, and Statesmen of India या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या पुस्तकामध्ये तत्कालीन धार्मिक बाबींचा उल्लेख आलेला आहे. त्यांच्या नोंदीनुसार गणेश किंवा गणपती हा बुद्धीचा देव असून दख्खनवासियांचे ते विशेष लाडके दैवत आहे. सर एडवर्ड सलिव्हन यांनी भारत आणि सिलोनचा प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर आपले हे निरीक्षण नोंदविले आहे. 

विशेषतः भारतावर झालेल्या मुस्लिम आक्रमणानंतर दीर्घकालीन असा एक अतिशय जीवघेणा आणि विध्वंसक संघर्ष घडलेला आपणास पाहावयास मिळतो. औरंगजेबासारखा धर्मांध बादशाह येनकेनप्रकारेण मुस्लिम धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता. दुसऱ्या बाजूला त्याला प्रतिकार करणाऱ्या राजांनीही आपले अस्तित्त्व आणि राज्य सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न केले. यामध्ये दोन अतिशय विरुद्ध डावपेच राबवलेले दिसून येतात. हिंदू धर्माचे खच्चीकरण करण्यासाठी, त्याच्या अनुयायांवर अतोनात अत्याचार करण्यात आलेले दिसतात. आपल्या पाशवी बळाचा वापर हिंदू धर्माची सामर्थ्यस्थळे असलेल्या मंदिरांना, धार्मिक स्थळांना नेस्तनाबूत, बेचिराख करण्यासाठी आणि तेथील सर्व मूर्ती फोडून टाकण्यासाठी केलेला दिसून येतो. मुसलमान सरदार बुतशिकन (मूर्तीभंजक) हा एक मानाचा किताब मोठ्या अभिमानाने मिरवत असत. मुस्लिमेतर नागरिकांचे मानसिक सामर्थ्य मोडून काढण्यासाठी आणि त्यांना मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे सर्व हातखंडे वापरण्यात आले. या नीतीला तोडीस तोड म्हणून छत्रपती श्रीशिवाजी महाराजांसारख्या जाणत्या राज्यकर्त्यांनी आपल्या रयतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये या परकीय आक्रमणाविरुद्ध आत्मविश्वासाने उभे राहून आपले, आपल्या समाजाचे आणि आपल्या धर्माचे संरक्षण करणायची जिद्द आणि उर्मी जागृत करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांचा अत्यंत कौशल्याने वापर केलेला दिसून येतो. याच धोरणाचा वापर पुढील काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व इतर नेत्यांनी गणेश पूजेचे रूपांतर गणेशोत्सवासारख्या एका अप्रतिम अशा सर्वसमावेशक सामाजिक उपक्रमामध्ये करून तत्कालीन शत्रूशी म्हणजेच ब्रिटिश सत्तेशी दोन हात करण्यासाठी केला आहे.

या व अशा अनेक संदर्भांतून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविते की, गेल्या दोन हजार वर्षांमध्ये गणेशाच्या पूजेने आता गणेशोत्सवाच्या रूपात एक अतिशय विलोभनीय आणि सर्वसमावेशक रूप धारण केले आहे व ते दिवसेंदिवस अधिकच व्यापक होत आहे.

गणपती बाप्पा मोरया !

श्री. निलेश काजळे

www.missingthebus.co.in

(प्रस्तुत लेखक हे एक प्रथितयश लेखक, वक्ते आणि परफॉर्मन्स कोच आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘मिसिंग द बस’ या पुस्तक समूहाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास करून, त्याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी कसा वापर करता येईल या विषयावर व्याखाने दिलेली आहेत. – ‘रचना’ संपादक)