प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प तिसरे

(प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली या लेखमालिकेच्या पुष्प पहिले व पुष्प दुसरे या लेखांच्या करिता पहा – ‘रचना -२०१९-०१ मकर संक्रांति विशेषांक व २०१९-०२ गुढीपाडवा विशेषांक)

शिक्षणासंदर्भातही प्राचीन विचार आणि आधुनिक शिक्षणव्यवस्था यामध्ये महदंतर पडलेले दिसते. या संदर्भात छांदोग्य उपनिषदात (४ था खंड, ४ था अध्याय) आलेली सत्यकाम जाबालची कथा त्या गोष्टीवर प्रकाश टाकते.

सत्यकाम आठ वर्षांचा होतो तेव्हा आईला म्हणतो, “ब्रह्मचर्य व्रताचं  पालन करून मी गुरुगृही राहून शिक्षण घेऊ इच्छितो. आचार्य माझं गोत्र विचारतील. तर मी कोणतं गोत्र सांगू?” आईच्या डोळ्यात पाणी तरळते. आई सांगते “मी एक दासी आहे. त्यामुळे मला तुझे वडील नेमके कोण हे ठाऊक नाही. तेव्हा तू आचार्यांना माझंच नाव गोत्र म्हणून सांग.” सत्यकाम पाठशाळेत जातो. आचार्य हरिद्रुमत यांची भेट घेऊन सांगतो, “आचार्य, मी सत्यवचनी आहे म्हणून माझे नाव सत्यकाम आहे. मी सद्ववर्तनी असून ब्रह्मचर्यव्रताचं पालन करून शिक्षण घेवू इच्छितो.” आचार्य त्याला गोत्र विचारतात. तेव्हा सत्यकाम सांगतो, “माझी आई एक दासी आहे, तिचं नाव जाबाली. हेच माझं गोत्र समजावं.” आचार्य त्याला अत्यानंदाने मिठी मारून म्हणतात, “तू सत्यवचनी आहेस, ब्रह्मचर्य व्रताचे पालन तू करू इच्छितोस! तेव्हा विद्याग्रहणासाठी तू योग्य विद्यार्थी आहेस.”

हळू हळू काळ उलटला. पाश्चात्य शिक्षणपद्धती भारतीयांनी उचलली. त्यांचे रीतीरीवाज उचलले. भर उन्हात टाय(!) लावून मुलगा इंग्रजी शाळेत जाऊ लागला. बौद्धिक गुलामीचे जोखड गौरवाने खांद्यावर वागवून वाढदिवसाला केक कापू लागला. मेणबत्त्या विझवू लागला! दिवे लावण्याची संस्कृती त्यागून दिवे विझवण्यात भूषण मानू लागला. त्या गोष्टीचे आई-वडीलही कौतुक करू लागले. मातृभाषा धड बोलता न येण्यात तो भूषण मानू लागला. अश्या शिक्षण-पद्धतीमध्ये शिकलेली मंडळी केवळ तंत्रज्ञानाचे गोडवे गाऊ लागली. जसे काही प्राचीन भारतीयांनी संस्कृती कधी बघितलीच नव्हती! उत्तम राज्यव्यवस्था त्यांनी केली नव्हती. पण अस्मिताशून्यता आली की राष्ट्रासाठी काळ फिरतो. या काळात रमलेली आजची आई मग आपल्या मैत्रिणीकडे  मन उघड करू लागते, “मला दोन मुलं आहेत. धाकटा पक्का बेरकी आहे. आपला स्वार्थ कसा साधायचा हे तो चांगलं जाणतो. आमचा मोठा म्हणजे धर्मराजाचा अवतार! सद्ववर्तनी, सत्यवचनी! मला माझ्या धाकट्याच्या भवितव्याची मुळीच काळजी वाटत नाही ग! मला काळजी आहे ती या माझ्या सद्वर्तनी थोरल्याची!” सद्वर्तनी, सत्शील मुलांची आजच्या आयांना काळजी वाटते हे आजचे कटु वास्तव आहे.


प्राचीन ऋषींनी शील जपण्याला अतिशय महत्व दिलेले आहे. केवळ शील गेल्यामुळेच तेज, शौर्य, कीर्ती, वृत्त, बल, लक्ष्मी अश्या अनेक गोष्टी प्रल्हादला सोडून गेल्या आणि प्रल्हाद पदभ्रष्ट झाला. अश्या गोष्टी किंवा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून शिक्षण घेणे या गोष्टी आता कविकल्पना वाटतात. परंतु; त्यात फार मोठा अर्थ होता. त्या गोष्टी सनातन किंवा रूढार्थाने मागासलेल्या वाटतात. खरेतर जे कधी पुरातन होत नाही; आणि जे नित्यनूतन असते त्याला ‘सनातन’ म्हणतात. आजच्या या मेकॉलेप्रणित शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेला तरुण Mother’s Day किंवा Father’s Day साजरा करतो! तो अवश्य करावा – केलाच पाहिजे. पण भारतीय संस्कृतीत प्रतिदिनी ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथीदेवो भव’ म्हटले जायचे व त्यानुसार वर्तन केले जायचे. व्याकरण-न्याय-मीमांसा-वेदांत या शास्त्रांबरोरच प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीत विध्यार्थ्याला प्रत्येक शास्त्राचे १००% ज्ञान येणे आवश्यक असे. पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत ३५-४०% मार्क्स मिळवूनही विद्यार्थी पास होऊ शकतो! याचा अर्थ ६०-६५% तो काय असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे या शिक्षण पद्धतीतून आत्मविकासाचे खऱ्या इतिहासाचे आणि परज्ञानाचे दरवाजेच बंद करून टाकले आहेत. त्यामुळे आज जगभर राजसी आणि तामसी वृत्तींनी हैदोस घातलेला दिसतो. कितीही भोग भोगले तरी तृप्ती येत नाही असे चित्र दिसते.

प्राचीन काळातल्या साऱ्याच गोष्टी आज अनुकरणीय वाटतील असे नाही. किंवा सर्वच चांगले होते असाही दावा नाही. फार प्राचीन काळात मृत पतीसमवेत सती जाण्याची प्रथा नव्हती. ती महाभारतकाळाआधी रूढ झाली असे दिसते. अस्पृश्यता अशीच एक रूढ होती. अश्या कालपरत्वे दुष्ट रूढी नष्ट करून धर्माची पुन:प्रस्थापना करण्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला होता. स्त्रीला वेदाध्यनाचा अधिकार नाही, असाही समज पुढील काळात रुजला होता. पण प्राचीन काळात गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या स्त्रिया श्रेष्ठ वैदिक आणि शास्त्रपारंगत होत्या. स्त्रीचे स्थान प्राचीन काळात फार उच्च मानले जायचे. ती मुळीच अबला नव्हती, हे दर्शवणारे अनेक संस्कृत श्लोक आहेत. स्त्री भोग्य नव्हती; तर पूज्य होती. आज स्त्री भोग्य झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सर्वत्र बघायला मिळतात. 

आज मुर्तीपूजेतले शास्त्र कितपत उरले आहे हाही एक अभ्यासाचा विषय आहे. सेमेटिक लोकांनी भारतीयांच्या मूर्तिपूजेची थट्टा उडवली होती. पण तुसाच्या सेंट निकोलसने म्हंटले आहे की, कोणतीही प्रतिमा डोळ्यांपुढे असल्याशिवाय ध्यान लागणे शक्यच नाही. सविकल्प समाधी अवस्थेपर्यंत मूर्ती साधकाला साहाय्य करते, ही गोष्ट प्राचीन भारतीयांना ठाऊक होती. ध्यानासाठी मूर्ती कशी हवी याचेही शास्त्र होते. पांडुरंगशास्त्रींच्या म्हणण्यानुसार ध्यानासाठी असणारी मूर्ती गुणसौंदर्य, भावसौंदर्य आणि विचारसौंदर्याने परिप्लुत असावी असा प्राचीन निर्देश होता. आज या शास्त्रावर धूळ चढलेली ठायीठायी जाणवते. देव हा मूर्तीत म्हणजे केवळ भौतिक पातळीवरच पाहिला जातो आणि उपासनाही भौतिक पातळीवर होते.

प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू मार्क बन याने ‘Ancient Wisdom for Modern Health’ या नावाचे एक अनुभवसिद्ध पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये सूर्याशी निगडित असलेल्या प्राचीन भारतीय जीवनशैलीविषयी अभ्यासपूर्ण ऊहापोह केला आहे.  प्राचीन भारतीय लोक कोणत्या कारणांमुळे निरोगी व दीर्घायुषी सुखी जीवन जगत होते याविषयी या ग्रंथांमध्ये पुराव्यांनिशी लिहिलेले आहे. विशेषतः भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांच्या व्यायामाच्या पद्धती यासंबंधीही पुष्कळ ऊहापोह आहे. मार्कने पाश्चिमात्यांना खाण्याच्या सवयी बदलण्याचा संदेशही दिला आहे. फास्ट-फूड किती घातक आहे, रात्रपाळ्या किती निसर्गाविरुद्ध आहेत, या विषयीसुद्धा त्याने कळकळीने लिहिले आहे. आधुनिक मेडिकल सायन्सच्या वापरापेक्षा दीर्घकालीन आजारांसाठी आयुर्वेदाला जवळ करण्याचा सल्ला त्याने पाश्चात्यांना दिला आहे. आपल्याकडे जे आहे त्यांना तिलांजली देऊन आज भारतातच फास्ट-फूड भरपूर खाल्ले जाते. 

सामवेदातून उगम पावलेले प्राचीन भारतीय संगीत हे देहभानाकडून आत्मभानाकडे मिळणारी होते. आजचा  तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर देहभान वाढवणाऱ्या संगीताची कास धरत आहे.हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला ‘कळत नाही’ या कारणास्तव तुच्छ मानण्याकडेही बऱ्याच जणांचा कल असतो. महेश योगींच्या अमेरिकेतील संस्थेत एक प्रयोग झाला.कॅन्सरच्या पेशी बाजूला काढून  दोन ठिकाणी लॅब मध्ये ठेवण्यात आल्या.एके ठिकाणी त्या पेशींवर 24 तास मायकल जॅक्सनच्चे किंवा तत्सम संगीत लावण्यात आले. दुसऱ्या लॅबमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत लावण्यात आले. ठराविक दिवसांनंतर दोन्ही लॅब्समधल्या परिक्षानळ्या  बाहेर काढण्यात आल्या, तेंव्हा थक्क करणारे परिणाम मिळाले. ज्या पेशींवर पॉप-रॅप सारखे संगीत(!) आदळत  होते, तिथल्या कॅन्सरच्या पेशींमध्ये कमालीची वाढ झालेली होती; आणि ज्या ठिकाणी भारतीय शास्त्रीय संगीत लावले होते तिथल्या कॅन्सरच्या पेशी पूर्णतः नामशेष झाल्या होत्या! पण, अश्या गोष्टींचा विचार करायलाही आज कोणाला वेळ नाही. आजचे धकाधकीचे जीवन जगताना अनेक जण मनाने थकून जातात. पण अपेक्षाभंगामुळे उद्ध्वस्त होतात, तणावग्रस्त होतात आणि नाईलाजाने अध्यात्माकडे वळतात. अशा लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेणारी अध्यात्मिक केंद्रही मग सेवा देण्यासाठी तत्पर असतात! सारेच वाईट आहे असे नाही; पण बहुतांशी केंद्रे आज चमत्कारांवर आधारित आहेत; विचारांवर आधारित नाहीत, असे दिसते. किंबहुना चमत्कार हे अध्यात्मिक व्यक्तीला ओळखण्याचे परिणाम बनले आहे. याउलट भगवद्गीतेसह प्राचीन तत्वज्ञानातील विचार सांगतात, चमत्कार हे मोक्षमार्गात अडथळे निर्माण करणारे असतात. परंतु; आज चमत्कार दिसला कि भारवलेला भक्त अविचाराने जीवन अर्पून देतो. सिद्धींना तर प्राचीन ऋषींनी वेश्या म्हटले आहे. त्यांच्या मागे जाऊ नये असे शास्त्र सांगते. खरे ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाच्या आड येणाऱ्या या सिद्धीमध्ये अडकून पडत नाही व भक्तांनाही त्यात गुंतवत नाहीत. सिद्धींचा वापर हा राजसी आणि तामसी भाव निर्माण करू शकतो. या संदर्भात गीतेने त्रिगुणात्मक प्रकृतीचे विवेचन केले आहे. ज्या काळात सात्विक जीवनाचा प्रभाव समाजमनावर होता, तेव्हा सौख्य-शांती नांदत होती. वस्तूंचा हव्यास कमी होता. आज आवश्यक्तेपेक्ष्या कितीतरी पटींनी मिळूनही स्वास्थ्य, सुखशांती लाभतांना दिसत नाही. राजसी आणि तामसी भाव व्यक्तीचे व समाजाचे अध:पतन करीत असतो. त्यामुळे सात्विकतेचा अवलंब करणे आज ही काळाची खरी गरज आहे. सात्विकतेचा उत्कर्ष होणे हाच आजच्या अध:पतनाला उपाय आहे. सहसा प्राचीन विचार जीवनात उतरवणे आज अवघड होऊन बसले आहे हे खरे. तथापि, काही प्रमाणात जरी त्या विचारांचा अवलंब केला तरी जीवन सुखावह होऊ शकेल.

कानगोष्टींमधील मूळची गोष्ट जर पुन्हा मूळ पदावर आणता आली तर कितेय्क भ्रष्ट् रूढी नष्ट होतील. अशा अनेक प्राचीन विचारांचे सिंचन झाल्यास परस्परांवर प्रेम करणारा मानवसंघ निर्माण होईल. निर्सार्गावरचे अतिक्रमण थांबेल. मानव ते मानव, मानव ते निसर्ग आणि निसर्ग ते परमेश्वर हा संतुलित जीवनाचा सुंदर गोफ गुंफला जाईल.त्यासाठी ‘गंगोत्री’ चे दर्शन मात्र घ्यावे लागेल ! (समाप्त)

श्री. राजेंद्र खेर

www.rajendrakher.net

(ज्येष्ठ साहित्यिक कै. श्री. भा. द. खेर यांचे प्रस्तुत लेखक श्री. राजेन्द्र खेर हे चिरंजीव. राजेंद्र खेरांनी चित्रपट क्षेत्रात प्रकाश मेहरा प्रॉडक्शन्स, सिनेमा व्हिजन्स, सिनेमेन इ. निर्मात्यांबरोबर सुमारे नऊ वर्षं लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात काम केलं आहे. त्यांना अनेक गौरव आणि पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांची पुस्तकं रसिकमान्य ठरली आहेत आणि अलीकडच्या यशस्वी साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. ‘रचना’करिता अत्यंत स्नेह्भावें पाठवलेली त्यांची लेखमालिका तीन भागांत – मकर संक्रांत, गुढी पाडवा आणि प्रस्तुत अंकांत प्रकाशित केली. त्यांच्या लेखांकरिता व एकूणच असामान्य कार्याकरिता आमचे अभिवादन! – ‘रचना’ संपादक – चेतन रेगे)