संतांचा सोहळा (अभंग)

झाले दरुषण संतांचा सोहळा ।

विठ्ठल सावळा मायबाप ॥

भागवत धर्म झालासे साकार ।

भक्तीचे मन्दिर उभारीले ॥

पंचप्राण संत सखे विठ्ठलाचे ।

ज्ञान कैवल्याचे भक्तिसंगे ॥

एकात्म दर्शन स्वये पांडुरंग ।

मस्तक ते चांग रामदास ॥

नामदेव वाचा, कण्ठ एकनाथ ।

हृदयसम्पुट तुकाराम ॥

शंकर म्हणे ज्ञानदेव आत्मा ।

पाहिला परमात्मा विटेवरी ॥

॥ श्रीविठ्ठलार्पणमस्तु ॥

विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर
(प्रस्तुत अभंग हे महाराष्ट्राचे आघाडीचे व्याख्याते, प्रवचनकार व भक्तीकोशकार विद्यावाचस्पती श्री. शंकर वासुदेव अभ्यंकर लिखित ‘वारकरी संप्रदाय’ या बृहद् ग्रंथातील आहेत. गुरुदेव अभ्यंकर हे ‘अखिल भारतीय संत विद्यापीठाचे संस्थापक व प्रवर्तक आहेत व विद्यावाचस्पती, पंडित, प्रवचनभास्कर, प्रवचनवाचस्पती अश्या विविध पदाव्यांसह असंख्य राज्यीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ‘रचना’च्या दृष्टीने महद्भाग्याची गोष्ट म्हणजे खास सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त ‘रचना’ करिता यांनी आशीर्वादरूपी अभंग पाठवले आहेत. त्यांच्या प्रख्यात व प्रेरणादायी कार्याला ‘रचना’ कडून ‘नमन’ – ‘रचना’ संपादक – चेतन रेगे)