अध्यक्षीय

नमस्कार मंडळी!

“मायबोली My मराठी”

मराठी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यात कार्यकर्त्यांच्या अविरत मेहनतीची जोड असते. आपला मकरसंक्रांतीचा सोहळा अतिशय प्रतिकूल हवामानात देखील दिमाखदार पद्धतीने साजरा झाला याचे सर्व श्रेय मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या अथक परिश्रमांना देते. वर्षाची सुरवात मोठ्या दणक्यात झाली आहे, आणि आपल्याला माहिती असेलच की, २०१९ हे वर्ष महाराष्ट्र मंडळ शिकागोचे ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ आहे. या वर्षी आपण विविध कार्यक्रम सादर करणार आहोत. हे सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या सहयोगाची आणि उत्तम प्रतिसादाची अपेक्षा आहे. गुढी पाडव्याच्या कार्यक्रमासाठी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.

गुढी पाडवा या सणाला आपल्या मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. खास म्हणावे असे मराठमोळे सण मोजकेच, त्यात गुढी पाडव्याचा मान पहिला. म्हणूनच तो थाटामाटात साजरा होतो. मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक अश्या या पाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारली जाते. उंच काठीवर रेशमी वस्त्र लपेटून त्यावर कलश ठेवला जातो. सुवासिनी त्याचे पूजन करतात. या वेळी गुढीस खास नैवैद्य दाखवला जातो. महाराष्ट्रातल्या विविध शहरातून या निमित्ताने शोभा यात्रा काढली जाते, मराठमोळ्या वेशातील सुंदर तरुणी, ढोल ताशांचा गजर, चित्ररथात शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या वेशातली लहान मुलं, यांनी वातावरण भारून गेलेलं असतं.

माझ्याही या सणाच्या काही रम्य आठवणी आहेत. माझ्या लहानपणी गुढी पाडव्याच्या दिवशी आम्ही लवकर उठून गुढीच्या पूजेसाठी सज्ज रहात असू, हे आपले नवीन वर्ष असल्यामुळे दिवाळी सारखेच महत्व या सणाला असे. शाळेला सुट्टी असल्यामुळे नवीन कपड्यांची खरेदी, आईला पुरणपोळी करताना मदत करणे, या सारखे निखळ आनंद आम्ही अनुभवत असू. या निमित्ताने माझ्या काकांचे कुटुंब आणि आम्ही एकत्र येऊन हा सण साजरा करत असू. एक विशेष आठवण म्हणजे , पाडव्याच्या निमित्ताने आमची आज्जी आम्हाला खाऊ साठी पैसे देत असे. एकंदरीत उत्सवी असे वातावरण निर्माण होत असे.

अमेरिकेतही आपण मराठी माणसे एकत्र येऊन सण मोठ्या दिमाखात साजरा करतो, मला त्याचे अगदी मनापासून कौतुक वाटते. आपल्या पुढच्या पिढीला यातून आपल्या ओजस्वी संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील असतो. शेवटी आपले सण हे आपल्याला एकतेचा संदेश देत असतात. सर्वांनी एकत्र आल्यावरच खऱ्या अर्थाने ‘सण’ साजरा होतो. गुढी पाडव्याच्या या सणानिमित्त आपले या पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

धन्यवाद!

सौ. वैशाली राजे

अध्यक्षा, महाराष्ट्र मंडळ शिकागो, २०१९