प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प दुसरे

गणपतीच्या दिवसांमध्ये घरीदारी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. कुबेराला उद्देशून ही मंत्रपुषपांजली आहे. ‘ॐ यज्ञेन यज्ञ मयजन्त …’ अशा या ऋग्वेदातील मंत्रानंतर ‘ऐतरेय ब्राह्मणा’तील पञ्चिका कांडामधले मंत्र पुढे येतात, ते असे:- ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं … पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति! गणेशोत्सवानिमित्त हा मंत्र आपण टिकवला गेला ही फार मोठी गोष्ट आहे. पण या मंत्रांमधून काय सांगितले आहे? आज या मंत्रांनी खरोखर आपली अस्मिता फुलते का? या मंत्रांचा अर्थ ध्यानात घेतला जातो का? या मंत्रांमधून प्राचीन भारतातील देदीप्यमान राजव्यवस्था समजावलेली आहे. राज्यं, भोज्यं, स्वाराज्यं… या वर्णनांतून राज्यांच्या सीमा निश्चित होत असत. किती तालुक्यांचे गाव, किती गावांचे नगर अशी या मंत्रात नावे आहेत. एवढेच नव्हे तर ‘समुद्रपर्यांता या एकराळिति’ असे सांगून ऋषींनी भारतवर्षाची अस्मिता फुलवली आहे. भारतवर्षातल्या बलशाली राजांची थोरवीच उद्धृत केली आहे. प्राचीन भारतीयांच्या या देदीप्यमान कालखंडाविषयीच्या जाणिवेने आपली छाती खरेतर अभिमानाने फुलून आली पाहिजे. प्राचीन ऋषींच्या मंत्रांचेही संस्कृत परिभाषा अवगत नसल्यामुळे आज चुकीचे अर्थ लावले जातात. उदा. हा श्लोक पहा:-

गोमांसं भक्षयेत् नित्यं पिबेत् अमरवारुणीम्।                                    कुलीनं तदहं मन्ये इतरे कुलघातका:।।

या श्लोकाचा संस्कृत परिभाषा अवगत नसलेल्या ‘पंडितांनी’ काढलेला अर्थ असा: ‘जो रोज गोमांस खातो, मद्यपान करतो तो कुलीन! तसे न करणारा कुलघातक! पुढचा श्लोक विचारात घेतल्याशिवाय पहिल्या श्लोकाचा खरा अर्थ कळत नाही. पुढे म्हटले आहे:-

गोशब्दे नोदिता जिह्वा तत्प्रवेशो हि तालुनि।                                       गोमांस भक्ष्यं तत्तु महापातकनाशनम् ।।

आता हे श्लोक हटयोगाचे आहेत. या दोन श्लोकांमधून जीभ उलटी करून टाळूपर्यंत नेण्याच्या हटयोग प्रक्रियेला गोमांस भक्षयेत् म्हंटले आहे! ही क्रिया कोणी करायची याचाही निर्देश हटयोगात आहे. हे अर्थ परस्पर विरोधी आहेत. पण संस्कृत परिभाषा येत नसल्यामुळे अर्धवट अभ्यासक या श्लोकांचा आधार घेऊन टीका करतात. यानंतर धनाविषयीचा प्राचीन विचार पाहू. धनाविषयी अर्थात ‘श्री:’ विषयीचे जाज्वल्य आणि आजही मान्यताप्राप्त सूक्त म्हणजे ऋग्वेदातील श्रीसूक्तम्. ऋषी कशा प्रकारच्या लक्ष्मीची अपेक्षा धरतात? तर अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । ‘माझ्या घरी जे धन येणार आहे ते लक्ष्मी बनून वाजतगाजत येऊ दे. अर्थात गजान्त लक्ष्मी माझ्याकडे येऊ दे आणि ती घराच्या समोरच्या दारातूनच येऊ दे. म्हणजेच ‘बॅक-डोअरने नको!’ हे सांगतानाच ऋषी मागणे मागतात, ‘अलक्ष्मी नाशयाम्यहम्। ‘अलक्ष्मी’ म्हणजे घरातील दीनता, क्षुद्रता, दुर्बलता, नकारात्मकता आदी. म्हणजे अलक्ष्मीच्या स्वरुपात जे जे त्याज्य आहे त्यांचा विनाश होवो, अशी ऋषी मागणी करतात. किती प्रगत विचारसरणी होती ही! घाणीने भरलेली बादली रिकामी झाल्याशिवाय स्वच्छ पाणी त्यात कसे भरता येणार? म्हणून ऋषी प्रथम ‘अलक्ष्मी’ विनाश मागतात आणि मग लक्ष्मीची मागणी करतात. ‘लक्ष्मी’ म्हणजे केवळ धन नव्हे; तर धनाबरोबर शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य, दीर्घायुष्य, उत्तम नातेसंबंध, गोधन अशा विविध संपत्तींचा अंतर्भाव ‘लक्ष्मी’ मध्ये होतो. आज ‘बॅक-डोअर’ने धन मिळवण्याची समाजात अहमहमिका लागलेली दिसते. अशी काळी संपत्ती कधी ‘लक्ष्मी’ होऊ शकत नाही. ती वाजतगाजतही येऊ शकत नाही. बॅक-डोअरने आलेली संपत्ती विघातकही असते. ती मनुष्याला सुखही प्रदान करू शकत नाही आणि घरातील अलक्ष्मीचा विनाशही करू शकत नाही. भगवद्गीतेत भगवान १८व्या अध्यायात सांगतात, ’तू तुझ्या कर्माचे खा… स्वकर्मणात् तमभ्यर्च्य…’ दुसऱ्याच्या कर्माचे फुकट खाऊ नकोस! अन्यथा तुला त्याची परतफेड करावीच लागेल.’ दुसऱ्याला ओरबाडून, दुसऱ्याच्या कष्टाचे फुकट मिळवून कदापि सुख लागू शकत नाही.

जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर भारतविजेताही न होता बाबिलोनमध्ये मरण पावला. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या सरदाराला जवळ बोलावले आणि सांगितले, ‘आपल्या रिवाजानुसार माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझी शहरातून मिरवणूक काढाल. त्यावेळी माझे दोन्ही हात उपडे आणि मोकळे ठेवा.’ सरदाराने कारण विचारले तेव्हा अलेक्झांडर म्हणाला, ’मी जग जिंकायला निघालो होतो, दुसऱ्यावर सत्ता गाजवायला निघालो होतो. पण आता मरताना बरोबर काहीच घेऊन जात नाही. त्यामुळे लोकांना कळू दे, अलेक्झांडर खाली हात आया और खाली हात चला गया!’ म्हणजे, जे बरोबर येणार नाही आणि मिळवण्यासाठी केवळ अविश्रांत धावण्यापेक्षा जे बरोबर येणार आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा मनुष्याने वेळ दिला पाहिजे, भारतीय तत्त्वज्ञान याच गोष्टींची सहस्रो वर्षांपासून जाणीव करून देत आहे. ‘मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मी कोठे जाणार आहे. त्याचप्रमाणे, मी का आलो, मी काय करणे अपेक्षित आहे आणि मी काय बरोबर घेऊन जाणार आहे‘ या दोन त्रिपुटींचा उद्भव मनात झाला की व्यक्तींची पावले आपोआप तत्वज्ञानाकडे वळू लागतात. त्यात अगतिकता नसते. आज तत्वज्ञानासंदर्भातही काहीशी भरकट झालेली दिसते. दैनंदिन ताणतणाव, धावाधाव यातून व्यक्ती पुष्कळदा ध्यानाकडे वळते. परंतु; ध्यानाच्या बाबतीतही बऱ्याचदा दुराग्रह दिसतो. प्राचिन विचारांमध्ये ध्यान साधण्यासाठी प्रथम वृत्ती तशी बनणे आवश्यक असे. चित्तशुद्धीशिवाय मन स्थिर होऊ शकत नाही. ध्यानाला बसणे ही गोष्ट चांगलीच आहे. परंतु; केवळ ध्यान करून बुद्धी स्थिर होत नाही. त्यासाठी बुद्धीवर सद्विविचारांचे सातत्याने संस्कार करावे लागतात. या मार्गात शॉर्ट-कट नाही. उभा जन्म त्यासाठी कारणी लावावा लागतो. कर्मात शुध्दी आणावी लागते. साधनशुचिता, कर्मशुचिता आणि विचारसशुचिता अंगिकारावी लागते. सततचा निदिध्यास आवश्यक असतो. ज्ञानी, नि:संग महात्म्यांच्या संपर्कात राहावे लागते. म्हणूनच कपिलमुनींनी सिद्ध केलेले आणि भगवान पतंजली मुनींनी सूत्रबद्ध केलेले ‘योगदर्शन’ प्रथम यम-नियमांचा आग्रह धरते.

ध्यानाचे सुद्धा एक तंत्र आहे. कॉम्प्युटरच्या ’हार्ड-डिस्क’ मध्ये अनावश्यक फाइल्सचा प्रचंड साठा साठून राहिला तर कम्प्युटर स्लो होतो. आत्मिक विकासासाठी अनावश्यक असा जन्मोजन्मीचा विचार-संस्कारांचा प्रचंड साठा आपल्या अर्धजाणीवयुक्त मनात (sub-conscious-mind) साठलेला असतो. बुद्धीतही चालू जन्माचा प्रचंड विचार-साठा साठलेला असतो. ध्यानातून हा साठा काढण्याच्या प्रक्रियेतून मेंदू पुन्हा सशक्त बनतो. सद्विचारांच्या संस्कारामुळे मेंदूची सारासार विवेक करण्याची क्षमताही वाढते. मेंदू अशा तऱ्हेने प्रबळ होताच तो इंद्रिये आणि मनाच्या गुलामीतून मुक्त होऊ लागतो. तो सदासर्वदा संतुष्ट राहतो. अशातऱ्हेने चित्ताचे आणि इंद्रियांचे नियमन करणे साधले तर व्यक्ती प्राप्त कर्तव्य करूनही कर्मबंधनातून मुक्त राहू शकते. तिचे चित्त स्थिर होते; आणि मग ते ध्यानासाठी तत्पर होते. यासाठी मन व चित्त यांमधला भेद मुळात जाणून घेतला पाहिजे. मन हे सैरभैर असते. ते जेव्हा स्थिर होते तेव्हा त्याला चित्त म्हणतात. अर्थात, स्थिर झालेले मन म्हणजे चित्त; आणि अस्थिर चित्त म्हणजे मन! या चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय ध्यान भक्ती संभवत नाही. गढूळ पाणी मलहीन झाल्याशिवाय सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचू शकत नाही. चित्तशुद्धी होण्यासाठी प्रथम निष्काम कर्मयोग साधावा लागतो. म्हणूनच प्राचीन ऋषीमुनी आणि नंतरच्या काळातले संतमहात्मे समाजामध्ये सद्विचार घेऊन निष्कामतेने फिरत असत. त्यामुळेच चित्तशुद्धी होऊन ते समाधी-अवस्था प्राप्त करून घेत होते. आज स्वाध्याय परिवारातले स्वाध्यायी याच हेतूने गावोगाव फिरून कृतिभक्ती करत असतात. कृतिभक्ती आणि भावभक्ती साधली तरच भक्ती खऱ्या अर्थाने फुलते. भाववृद्धी होते. व्यक्तीचा परस्परांप्रती प्रेमभाव फुलतो. तिची सृष्टीप्रती असलेली भोगदृष्टी क्षीण होते. ईश्वराप्रती अत्यंतिक प्रेमभाव जागृत होतो. स्व-अध्याय आणि निष्काम कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध रीतीने आचरण केले तर शरीरांतर्गत सर्व चक्रे आपोआप शुद्ध होऊन जीव ऊर्ध्वगामी बनतो. यम-नियमांच्या कडक व कठोर बंधनाखेरीज योगमार्ग साध्य होतो.

आज योगमार्गाचेही स्वरूप बदललेले दिसते. परदेशी लोक अजाणतेमुळे ‘योग’ला ‘योगा’ म्हणतात. दीड हजार वर्षांच्या पराभूत मानसिकतेमुळे कित्येक ‘देशी’ ही ‘योगा’ म्हणतात! खरा शब्द ‘योग’ हा आहे. त्यासाठी भगवान पतंजलीकृत ‘योगदर्शना’चा अभ्यास करायला हवा. गुरूकडून रीतसर त्याचे शिक्षण घ्यायला हवे. ‘योग’ म्हणजे योगासन नव्हेत! योग म्हणजे To Join! आत्मा-परमात्म्याचे मिलन होण्याच्या – जोडण्याच्या – अभ्यासाला योग म्हणतात. योगमार्ग भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. परंतु To Join हा या सर्वांचा मुख्य हेतू. रूढ योगमार्ग असे आहेत:- ध्यानयोग (ज्ञानयोग), सांख्ययोग, भक्तियोग आणि कर्मयोग. प्राचीन भारतीय विचारधारेने साऱ्या योगमार्गीयांचे विचार मान्य केले आहेत. उदा. भगवान कपिलमुनींनी सांख्य तत्त्वज्ञान रचले. या तत्त्वज्ञानानुसार, जवळजवळ पूर्णत्व पावलेला जीव प्रत्येक युगाच्या आरंभी युगशास्ता असतो. त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो अशी त्यांची विचारधारा आहे. (याचा अर्थ सांख्य ईश्वरवादी नव्हते असे नाही.)

देवांविषयी सुद्धा समज-गैरसमज आहेत. ’दिव’ या संस्कृत ‘धातू’ पासून देव हा शब्द आला. ‘दिव’ म्हणजे चमकणे. जे चमकतात ते देव! महाभारतात अर्जुन जेव्हा देवलोकात जातो तेव्हा देवलोकांचे वर्णन करताना व्यासांनी भरभरून लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, देव हे स्वयंप्रकाशित होते. देवांसंबंधी आणखी एक मान्यता अशी आहे की, देव हे तेहतीस कोटी होते. प्राचीन काळचा गुणात्मक भाग आज संख्यात्मक घेतला गेला! तेहतीस कोटी देव म्हणजे ‘उच्च कोटीं’ चे तेहतीस देव! कोटी म्हणजे गुणात्मक उच्चतेचे पुरुष. म्हणजेच उच्चकोटीचे! हे तेहतीस ‘कोटी’ देव म्हणजे: – धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरूण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा, वसू हे मिळून बारा आदित्य. धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास हे अष्टवसू. हर, बहुरूप, त्र्यम्बक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे अकरा रुद्र. याशिवाय दोन अश्विनीकुमार मिळून तेहतीस ‘कोटी’ देव! देव-देवता आणि परमात्मा हे दोन भिन्न तत्वे आहेत. आज परमात्म्यालाच ‘देव’ म्हणून संबोधले जाते. मनुष्यांपेक्षा अत्यंत प्रगतावस्थेत असणारे, स्वर्गात वास्तव्य करणारे – म्हणजेच दिव्य अशा भिन्न मितीत वास्तव्य करणारे ते देव. गीतेत भगवान सांगतात, ‘माणूसच नव्हे; तर देवही माझे स्वरूप जाणू शकत नाही.’ (क्रमशः)

श्री. राजेंद्र खेर
www.rajendrakher.net
(ज्येष्ठ साहित्यिक कै. श्री. भा. द. खेर यांचे प्रस्तुत लेखक श्री. राजेन्द्र खेर हे चिरंजीव. राजेंद्र खेरांनी चित्रपट क्षेत्रात प्रकाश मेहरा प्रॉडक्शन्स, सिनेमा व्हिजन्स, सिनेमेन इ. निर्मात्यांबरोबर सुमारे नऊ वर्षं लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात काम केलं आहे. त्यांना अनेक गौरव आणि पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांची पुस्तकं रसिकमान्य ठरली आहेत आणि अलीकडच्या यशस्वी साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. – संपादक)