संपादकीय विज्ञापना, धोरण, मनोगत आणि ऋणनिर्देश

॥ श्री ॥

श्रीगणेशाय नम: । ॐ नमो जी आद्या ।

वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥

अमेरिकेतील माझ्या बंधु आणि भगिनींना माझा नमस्कार!

२०१९ मधील ‘मकर संक्रांतीच्या’ अंकाला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने अत्यंत कृतार्थ वाटते आहे. शिकागोच्या सततोत्साही महाराष्ट्र सारस्वतांनी जे साहित्यरूपी अप्रतिम अलंकार श्रीशारदेचरणीं अर्पण केले – “तयांसी तुळणा कैची”! खरं सांगायचं झालं तर मला विशेष आनंद तेंव्हा झाला जेंव्हा माझ्या काही मित्र मंडळींना आपणही ‘मराठीमध्ये’ काही लिहावे असे वाटले. कित्येक वर्षे त्यांच्या मराठी लेखनात खंड पडला असल्याने सुरुवातीला त्यांच्या चित्तांत थोडासा संकोच होता. अश्यावेळी त्यांना रचना वाचून मराठी लेखनाची प्रेरणा मिळावी व त्यांनी ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणावे हा संपादक म्हणून माझ्यासाठी अत्यंत सुखद क्षण होता… नव्हे नव्हे धक्काच होता! आपल्या सर्वांकडून मिळत असलेल्या ह्या अकृत्रिम स्नेहामुळेच गुढीपाडव्याच्या प्रस्तुत अंकावर काम करत असताना मी दशसहस्र कुंजरांचे बळ अनुभवतो आहे!

‘रचना’चे अंतरंग हे विविध कोटींचे विषय व साहित्यालंकारांनी नित्य नटलेले असतात. यात लेख, कथा, कविता, अनुभव, किस्से, मुलाखती, कलाकृती, पाककृती, परीक्षणे, वृत्तांत, प्रवास वर्णने, विनोद, चित्रे, हास्यचित्रे व बरेच काही समाविष्ट असते. प्रस्तुत अंकात ‘युवा उवाच’ असा खास विभाग केला आहे, यात आपल्या तडफदार तरुण मित्रांनी एखाद्या धबधब्यासारखे आपले मन ओतले आहे. तसेच माझ्या एका बालमित्राच्या सल्ल्याने एक गोड बालकथाही समाविष्ट केली आहे. ह्या वर्षीपासून आम्हीं फेसबुकवरील ‘रचना – Rachana – MMC Magazine’ ग्रुपवरून सतत कार्यरत होतो व पुढे देखील असणार आहोत. त्याचा सुद्धा रसिकांनी अवश्यमेव लाभ घ्यावा.

प्रकाशन (Publication) व अस्वीकृती (Disclaimer) धोरण: साधारण १५ दिवस अगोदर संपादकांच्या हाती आलेले निवडक साहित्य नजीकच्या अंकात प्रसिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक अथवा कार्यकारिणी सहमत असतातच असे नाही. साहित्य पुरवताना प्रताधिकार (Copyright ©) कायद्याचे उल्लंघन होऊ न देणे हे अत्यंत आवश्यक आहे, तसे उल्लंघन होत नाही आहे हे प्रत्येक वेळेला संपादकांना तपासणे अशक्य आहे, त्यामुळे पुरवलेले साहित्य जर ‘प्रताधिकारमुक्त (copyright free)’ नसेल व ते तुमची स्वनिर्मिती नसेल तर मूळ निर्मिती ज्यांची असेल त्यांची ‘रचना’ मध्ये प्रकाशन करण्यासाठी लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि ती तुम्ही तशी घेतली असेल हे संपादकांनी ‘तुमचे उत्तरदायित्त्व’ म्हणून गृहीत धरलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी. हाती आलेल्या प्रकाशन-योग्य साहित्यांत किरकोळ बदल आणि व्याकरणाच्या दृष्टीने शुद्धीकरणाचे अंतिम अधिकार संपादकांकडे राहतील. पाठवलेल्या साहित्याची पोच ई-मेल अथवा सोशल मीडिया वरून दिली जाईल.

‘रचना’ संपादकाचे मनोगत आणि ऋणनिर्देश:

‘रचना – प्रस्तुत अंकाच्या निर्मितीमध्ये अनेकांनी ‘स्वयंसेवा’ म्हणून मोठ्या उत्साहाने सहकार्य केलेले आहे. त्या प्रत्येकाचे नाव येथे लिहिणे विस्तारभयास्तव शक्य नाही. त्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार !

संपादन, प्रकाशन, अक्षर जुळणी, मांडणी आणि मुद्रण: चेतन रेगे

संपादन साहाय्य, शीर्षक लेखन, मांडणी आणि सजावट: सौ. शलाका पालकर-रेगे

टंकलेखन: चेतन रेगे, सौ. शलाका पालकर-रेगे, सुजीत कुळकर्णी

हास्यचित्रे: सौ. प्राजक्ता पालकर-ऑल्ब्रेक्ट, सौ. प्राची कुलकर्णी

मुखपृष्ठ: सौ. शलाका पालकर-रेगे

यंदा मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील ‘रचना’च्या गुढीपाडवा विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे शीर्षक – “चैत्रांगण” असे आहे. गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. स्वस्तिश्री शालिवाहन शकाचा म्हणजेच संवत्सराचा हा प्रथम दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आपल्या परंपरेत मानला गेला आहे. परंपरेनुसार एक आख्यायिका अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले होते. म्हणूनच गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही संबोधतात. भारतीय ऋतुमानाच्या दृष्टीने पाहता शुष्क झालेली सृष्टी, निष्पर्ण वृक्षांना नवपालवी फुलायला चैत्र महिना ऋतुराज वसंताची चाहूल घेऊन येतो. निसर्गातल्या परिवर्तनाचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा त्यामागील एक उद्देश आहे. यानंतर पुढे दोनच दिवसांत म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीयेपासून ‘चैत्रगौर’ बसविली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीये पर्यंत तिची पूजा केली जाते. चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे आणि या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात काढलेली वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी म्हणजेच ‘चैत्रांगण’! संस्कारक्षम अशी ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या अनेक प्रतीकांमध्ये काढली जाते. संगणकप्रणालीचा कौशल्याने वापर करून चैत्रांगणातील प्रत्येक प्रतीकाचे लघुचित्र काढून व त्या सर्व लघुचित्रांची कल्पकतेने मांडणी करून प्रस्तुत रांगोळी सौ. शलाका पालकर-रेगे यांनी निर्मिली आहे.

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नूतन वर्षात आपल्या सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य व ज्ञानसंपदा लाभो. आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो अशी मंगल प्रार्थना चैत्रगौरीला या चैत्रांगणातील विविध प्रतिकांद्वारे केलेली आहे!

साहित्य:

‘रचना’च्या संपादनाचे कार्य अत्यंत जोखमीचे असले तरी तेवढेच आनंददायी आहे. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्र मंडळाने दिली त्याबद्दल मंडळातील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे खूप आभार. ‘रचना’च्या यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या ‘गुढीपाडवा विशेषांकासाठी’ स्वयंप्रेरणेने व विनंती केल्यावर तत्परतेने मला अनेक लेख, कथा, कविता, पाककृती, अभिप्राय, शब्दकोडे, हास्यचित्रे असे सर्व सुंदर साहित्य पुरवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘रचना’ करिता जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांनी लेख पाठवले आहेत. आमचे महद्भाग्य म्हणून ‘रचना’च्या प्रस्तुत अंकाकरिता महाराष्ट्राचे आघाडीचे व्याख्याते, प्रवचनकार व भक्तीकोशकार विद्यावाचस्पती श्री. शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी अभंग आणि सुप्रसिद्ध साहित्यिक व दिग्दर्शक – श्री. राजेंद्र भालचंद्र खेर, व प्रख्यात इतिहास संशोधक – श्री. कौस्तुभ कस्तुरे यांच्या कडूनही साहित्य लाभले आहे, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. महाराष्ट्र शारदेला अलंकारार्थ साहित्य व साहाय्य पुरवणाऱ्यां इतर सर्वांचेही खूप आभार.

साहित्य / मजकूर / सूचना पाठविण्यासाठी संपर्क :

Editor: Chetan Rege

Email: rachana@mahamandalchicago.org and chetanrege@gmail.com

Facebook: “रचना – Rachana – MMC Magazine”

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ‍‌।

प्राप्ते विकारी नाम संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू ॥

नूतन वर्षाभिनंदन! आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो! ‘रचना’च्या प्रस्तुत अंकाची मांडणी सूत्रबद्ध व नीटनेटकी व्हावी यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले आहेत. तरीही, काही त्रुटी राहिल्या असतील तर गोड करून घ्याव्यांत. थोडक्यात जगत्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत –

फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥

बहुत काय लिहिणें? आमचे अगत्य असो द्यावें, ही विज्ञापना ! जाणिजे. लेखनालंकार. मर्यादेयं विराजते.

चेतन रेगे