Gudhi Padwa – Update

अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांमध्ये आद्य आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे जनक असणाऱ्या आपल्या शिकागोच्या महाराष्ट्र मंडळाने काल एक विक्रम केला ! मंडळाने आयोजित केलेल्या कालच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला तब्बल ९५० लोकांनी हजेरी लावून सिद्धच केले की ‘शिकागोकर’ खरोखर एक ‘महामंडळ’ आहेत.

कालच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी चित्रपटसृष्टीचे व रंगभूमीचे SUPERSTAR अभिनेते श्री. प्रशांत दामले आणि मराठी दूरचित्रवाणी व रंगभूमीवरील अत्यंत यशस्वी अभिनेत्री सौ. कविता मेढेकर यांचे अगदी हमखास हसवणूक करणारे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे अफलातून नाटक, हे नुसते गाजलेच नाही तर शिकागोकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नाटकातील प्रत्येक विनोदाला मिळालेले उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांतील अभिनेत्यांना खूपच भावले. नाटकाच्या ‘सांगता समारंभा’च्या दरम्यान प्रशांतजींनी त्याची पावतीही दिली – “आम्हांला normally जेवढा प्रतिसाद मिळतो, त्यापेक्षा खूप अधिक प्रतिसाद शिकागोमध्ये मिळाला!” शिकागोकर हे अत्यंत ‘दर्दी’ आहेत हेच यातून पाहायला मिळाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही त्याबद्दल अत्यंत कृतार्थ वाटले तर त्यात नवल ते काय! पण, खरे सांगायचे झाले तर हे यश अगदी अस्सेच मिळावे म्हणून मंडळाचे अनेक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत होते त्यांच्या कष्टाचे खूप कौतुक वाटते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थितांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाशिवाय हे सारे शक्यच नव्हते. कालच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तो कार्यक्रम सर्वच बाबतीत भव्य आणि यशस्वी केल्याबद्दल सर्वच मराठीजनांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.

आपला प्रतिसाद आणि प्रोत्साहन असेच निरंतर आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला लाभो हीच “श्रीं”चरणीं प्रार्थना!

खूप खूप धन्यवाद !

२०१९ महाराष्ट्र मंडळ शिकागो कार्यकारिणी !