शतकोत्तरी कलावंत – गदिमा-बाबूजी

“… कुमार दोघें एक वयाचे सजीव पुतळें रघुरायाचें
पुत्र सांगतीं चरित पित्याचे, ज्योतीनें तेजाचीं आरती
कुश-लव रामायण गातीं …”

सजीव पुतळें रघुरायाचें … ज्योतीनें तेजाचीं आरती .. या शब्दांतली किमया ज्याला समजली तो गदिमा आणि बाबूजी यांचा आजन्म ऋणी राहील! मीही त्यातलीच एक!

आधुनिक वाल्मीकि, ग. दि. मा. म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर आणि बाबूजी म्हणजेच सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके, या दोहोंचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. नियतीने अगदी ठरवून एकाच वर्षी या दोघांना जन्माला घातले असावे. कारण या दोघांच्या हातून इतके भव्यदिव्य काम होणार आहे हे तिला आधीच समजले असावे.

तसं बघायला गेलं तर शेटफळ या सांगली जिल्ह्यातल्या एका गावी १ ऑक्टोबर १९१९ रोजी गदिमांचा जन्म झाला. जन्म झाला पण जन्मतः मृत घोषित केलेलं हे बाळ … भविष्यात प्रतीवाल्मीकि होईल याची कोणाला कल्पनाही नसेल. त्या छोट्या मृत जीवाला पुरण्यासाठी खड्डा सुद्धा खणला गेला होता .. मात्र त्या सुईणीला काय वाटलं कोण जाणे आणि तिने शेगडीतला निखारा त्या बाळाच्या बेंबीजवळ लावला आणि त्या धगीने चटका बसून बाळ एकदम रडू लागलं. मराठी रसिक त्या सुईणीच्या कायम ऋणांत राहतील. सगळंच अद्भुत!

कोल्हापूरात २५ जुलै १९१९ साली सुधीर फडके यांचा जन्म झाला. अतिशय गरीब परिस्थितीत बालपण घालवलेल्या बाबूजींना इंजिनियर व्हायचे होते. पण घरची हलाखीची परिस्थिती त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आलं नाही. पण एका अर्थाने जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला हवं! कारण इंजिनियर होऊन पैसा कदाचित खूप मिळवला असता पण जे भव्यदिव्य काम ते संगीतक्षेत्रात करू शकले ते कदाचित झालं नसतं आणि आपण मराठी रसिक एका उत्तुंग आनंदाला मुकलो असतो.

तत्कालीन औंध संस्थानचे राजे श्रीमंत भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांनी या दरम्यान गदिमांच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. गदिमांनी राजांना एकदा त्यांचीच उत्तम नक्कल करून दाखवली आणि राजे म्हणाले की “हा मुलगा औंध संस्थानचे नाव उज्ज्वल करील! बाळ तू टाकीत जा, शिकला नाहीस तरी चालेल” .. म्हणजेच त्यांना बोलक्या चित्रपटात (talky – movie) जा असा कौतुकाने सल्ला दिला. त्यांनी गदिमांना आचार्य अत्र्यांकडे पाठवले चिठ्ठी घेऊन की, “हा मुलगा उत्तम नकलाकार आहे.. तुझ्या सिनेमात याला एखादी भूमिका दे!” अत्र्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि त्यांना मास्टर विनायक यांच्याकडे पाठवले. मा. विनायकांकडे त्यांनी अशाप्रकारे नट म्हणून कारकीर्द सुरु केली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दरम्यान बाबूजींनी कोल्हापुरात वामनराव पाध्यांच्याकडे तोपर्यंत संगीत शिक्षण सुरु केले होते. दोन तारे असे दोन वेगेवगळ्या ठिकाणी आपलं नशीब आजमावत होते, हळुवार प्रकाशत होते!

बाबूजींची आणि गदिमांची ओळख साधारण १९३८-३९ च्या आसपास झाली तीही बाबूजींचा एच. एम. व्ही. मध्ये काम करणारा बालमित्र माधव पाटेकर यांच्यामुळे. गदिमांनी लिहिलेल्या “दर्यावरी नाच करी, होडी चाले कशी भिरभिरी” या गीताला बाबूजींनी चाल लावली आणि ती चाल एच. एम. व्ही. मध्ये सगळ्यांनाच भावली. त्या दरम्यान कोल्हापूरला साहित्य संमेलन भरले होते आणि आचार्य अत्रे अध्यक्ष होते. तिथे सर्वांच्या आग्रहाखातर हे गाणे बाबूजींनी गायले आणि त्या गाण्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून गदिमा आणि बाबूजी ही जोडगोळी जणू सरस्वतीचे उपासक म्हणून अवघ्या साहित्यविश्वाला आणि सिनेसृष्टीला ज्ञात झाली. या शतकोत्तर कलावंतांच्या कार्यावर वस्तुतः कळस चढवला तो गीतरामायणाने! १९४९-५० साली गदिमांचा ‘सीता स्वयंवर’ हा चित्रपट खूप गाजला. त्यावेळी औंधच्या राजांनी हा चित्रपट पाहण्याची गदिमांजवळ इच्छा व्यक्त केली. गदिमांनी त्यांना तो दाखवला मात्र ते इतके भारावून गेले की त्यांनी पुण्यातील टिळकरोडवरची आपली एक जागा गदिमांना भेट म्हणून देऊन टाकली. आणि गदिमांनी हीच जागा पुढे आपल्या प्रिय मित्राला म्हणजेच बाबूजींना, त्यांचे पुण्यात घर नाही म्हणून भेट म्हणून देऊन टाकली.

गदिमा आणि बाबूजी हे जणू एक विलक्षण समीकरण होतं. १९५४ साली पुणे आकाशवाणीवर गीतरामायण करण्याचे ठरले तेव्हा या प्रकल्पाचे प्रमुख होते सीताकांत लाड. गदिमा आणि बाबूजी तोपर्यंत आपापल्या कामात प्रचंड व्यस्त झाले होते. या कार्यक्रमाचे पहिले गीत जेव्हा ध्वनिमुद्रित होणार होते त्या आधी तासभर त्या गाण्याचा कागद हरवला. गदिमांनी ते गीत पाठवून दिले म्हणून ते निवांत होते आणि इकडे तो कागद सापडत नव्हता. अश्या वेळी गदिमांना बोलावणे धाडले गेले. गदिमा प्रचंड चिडले होते.. पण सीताकांत लाडांनी सांगितले की “उद्या प्रसारण आहे, दुसरे गीत लिहावेच लागेल.” गदिमांचा राग थोडा निवळला आणि त्यांनी जितके आठवेल तितके आणि काही नवीन शब्द घालून नवे गीत लिहिले आणि ते नवे शब्द होते.. “ज्योतीनें तेजाचीं आरती..” आणि हे गाणं म्हणजेच “स्वयें श्रीरामप्रभु ऐकतीं”. गीतरामायणाच्या ५६ गाण्यांपैकी पहिलं गाणं म्हणून ते ध्वनीमुद्रित झालं आणि १ एप्रिल १९५५ साली सकाळी १० वाजता प्रसारित झालं … आणि अजरामर झालं! पुढचं प्रत्येक गाणं रात्री रेकोर्ड करायचं आणि सकाळी प्रसारण. अश्याच पद्धतीने तयार होत गेलं. लोक गाणे लागण्यापूर्वी सगळी कामे संपवून आतुरतेने वाट पाहत असायची. रेडिओला हळदकुंकू, फुले वाहायची! हे एक भारतीय संगीत क्षेत्रातलं आश्चर्यच म्हणावं लागेल. 

गदिमा व बाबूजी या गीतरामायणामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले, पण तरीही ते कधीही असे म्हणाले नाहीत, की आम्ही गीतरामायण केले. ते नेहमी असंच म्हणत असंत की, “ते आमच्या हातून घडले!” आपल्या असामान्य प्रतिभेचे श्रेय स्वत:कडे न घेणारे असे कलावंत आजच्या काळात मिळणे कठीणच. गदिमांच्या मुलाच्या मुंजीच्या कार्यक्रमावेळी पहिला गीतरामायणाचा जाहीर कार्यक्रम झाला आणि मग त्यानंतर अनेक नव्या जुन्या गायकांनी गीतरामायण स्टेजवर सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमलेनाच्यावेळी गदिमा अध्यक्ष होते. तिथे त्यांचा मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रि. करकरे यांच्या बंगल्यावर होता. गीतरामायणाच्या अश्याप्रकारे जाहीर कार्यक्रम करण्यावरून चर्चा झाली आणि करकरे म्हणाले, “हे नवे गायक तुमचे गीतरामायण सादर करतात, पैसे मिळवतात, तुम्हांला काही ‘रॉयल्टी’ देतात का?” गदिमांनी वस्तुस्थिती सांगताच एक कोरा कागद समोर धरत ते म्हणाले, “सही करा यावर. मी तुमचं वकीलपत्र घेतो आहे. तुम्हांला रॉयल्टीचे सगळे पैसे मिळवून देतो.” त्यावर गदिमा नम्रपणे म्हणाले, ”मग गीतरामायण लिहिलं याला काही अर्थच उरणार नाही वकीलसाहेब. अहो रामनामाने दगड तरले, तर गीतरामायणाने काही गायक मित्र तरले, तर कुठं बिघडलं?” अशा दैवी प्रतिभेच्या माणसाने रॉयल्टीसाठी वकीलपत्र सही करून दिलं असतं तरच नवल!

‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटा दरम्यानची हकीकत अशी की, त्या चित्रपटाची सगळी गाणी लिहून तयार होती फक्त एकच बाकी होतं. गदिमा राजा परांजपे यांच्यासोबत बाबूजींकडे गेले आणि म्हणाले.. की “मागे एकदा चित्रपटासाठी लिहिलेलं गाणं आहे.. ते आपण वापरलंच नाही.. ते या सिच्युएशन साठी योग्य आहे. तेच घेऊ. त्याला चाल तूच लावली होतीस.” मात्र बाबूजी याला तयार झाले नाहीत. ते म्हणाले.. “मागेही आपण एका चित्रपटासाठी गाणं केलं आणि ते वापरलं नाही. मी म्हणालो नवीन चित्रपटासाठी वापरू तेव्हा तू म्हणालास, मी निर्मात्याकडून पैसे घेतले आहेत याचे.. एकच गाणं मी दोनदा विकू शकत नाही.. मग आताही मी या गाण्यासाठी पैसे घेतले आहे.. मला नवीनच गाणं हवं!” बाबूजींनी लगावलेला टोला गदिमांच्या जिव्हारी लागला आणि रागारागाने ते तिथून निघून दुसऱ्या खोलीत गेले. बरोब्बर दहा मिनिटांनी गदिमांनी आत येऊन एक कागद बाबूजींकडे फेकला आणि रागात म्हणाले.. “फडके!! घ्या नवीन गाणं!” बाबूजीनी फक्त एकदा त्यावर नजर फिरवली .. आणि गादिमांकडे पाहिले. गदिमा रागारागात निघून चालले होते, आणि बाबूजी म्हणाले.. “अण्णा … चाल ऐकूनच जा आता!” आणि ते गाणं होतं ..”ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत”. दोन जलधींच्या समागमात विद्युल्लता ही जशी चमकतेच तशीच, अत्यंत प्रतिभावान व्यक्ती एकत्र आल्या की खटके उडतातच, त्यातलच हा प्रकार होता. पण ते भांडण लुटुपुटूचे असायचे व ते दरवेळी नवीन गाण्याच्या निर्मितीसोबत मिटूनही जायचे. याचं चित्रपटातल्या “त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे” या गाण्याने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. अत्यंत तलम आवाज, स्पष्ट उच्चार व भावनाप्रधान गायकी ही बाबूजींच्या गाण्याची वैशिष्ट्ये! आणि “डे” सारखे कठोर व्यंजन वापरून लिहिलेले अत्यंत हृदयस्पर्शी गीत हा गदिमांच्या प्रतिभेचा पैलू म्हणावा!. यावरूनच आठवलं की, एकदा महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. लं. गदिमांना म्हणाले की, “ळ” हे अक्षर काव्यात फारसे आढळत नाही, ते वापरून गाणे लिहिणे फार अवघड आहे. आणि तेव्हाच तिथल्या तिथे गदिमांच्या तरल लेखणीतून उतरले होते .. “घननिळा, लडिवाळा झुलवू नको हिंदोळा”.

गदिमांना लेखनात वेगवेगळे प्रयोग करायला आवडायचे. किंबहुना तो त्यांच्या निर्विवाद प्रतिभेचा भाग होता. त्यांना एकदा उत्तर प्रदेशातून आलेल्या ब्रह्मभाट नावाच्या एका हिंदी शायराने एक कविता ऐकवली.. “रातभर रहियो, सबेरे चले जैय्यो रातभर रहियो सबेरे चाले जैय्यो, मिलनेवालों के साथ क्या काम जलनेवालों का?” आणि सांगितले की “या कवितेमध्ये जी नजाकत आहे, की ती गोष्ट न सांगताही रसिकांना समजते अशी नजाकत तुमच्या मराठीमध्ये कुठे आहे?” यावर तत्क्षणी गदिमांनी त्यांना ऐकवले, “रातभर ऱ्हावा, झुंजुरका तुम्हीं जावा, रातभर ऱ्हावा, झुंजुरका तुम्हीं जावा. शेजेशी समई मी लावू कशाला? जळत्या जीवांशी खेळू कशाला? इष्काचा मजा तुम्हीं घ्यावा.” गदिमा त्यांना म्हणाले, “हिंदी प्रियकर सकाळी निघून जातो … सगळ्यांदेखत, पण मराठी प्रियकर झुंजुरका म्हणजेच, रात्र संपता संपता गुपचूपपणे जातो. आता नजाकत कशात आहे सांगा? झुंजुरका सारखा नाजूक शब्द तुम्हांला हिंदीत सापडणार नाही.”

मराठी भाषेवर, तिच्या गोजिरवाण्या रुपड्यावर मनापासून प्रेम करणारे हे दोन कलावंत म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी आणि साहित्याक्षेत्राचे दोन दीपस्तंभ आहेत. गीतरामायणाची मोहिनी आजही रसिकांना भुरळ घालते आहे. आजही ते शब्द ऐकताना, साक्षात ‘कुश-लव’ आपल्यासमोर उभे राहून गीतरामायण ऐकवत आहेत असा भास होतो. आजही, नवोदित गायकांसाठी गीतरामायण पहिलं प्रेम आहे. आजही रामजन्माच्यावेळी गीतरामायणच वाजवलं जातं! आजही तितक्याच मनोभावे या दोन सरस्वतीपुत्रांना लोक धन्यवाद देतात. ज्यांच्या गाण्यांनी कित्येक सकाळी प्रसन्न केल्या, मराठीमनाला एका वेगळ्या भावविश्वात नेऊन ठेवलं, आणि खरोखर एक इतिहास घडवला!

गीतरामायणासारखे महाकाव्य शतकात होणे नाही .. आणि असे अद्वितीय कलावंतही!

सौ. प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com