Virtual क्रियाकलाप

२०२० मध्ये कोविद १९ ही महामारी आली आणि जीवनातले सगळे सूर अगदी बदलून गेले. सुरवातीचा काळ हे काय अकल्पित घडले आहे आणि आता पुढे काय होतंय हे समजण्यात गेला. नवीन जीवनशैलीत बस्तान बसवण्यात पण बराच वेळ गेला. आपले घरचे, नात्यातले, शेजारपाजारचे आणि आपले आप्तेष्ट व मित्रपरिवार बरे आहेत ना ह्याची काळजी आणि विचारपूस केली. कोणाला काही मदत लागल्यास ती करणे वगैरे पण चालू झाले. पण मनात असलेली धास्ती अनिश्चितीतेमुळे  आलेली भीती आणि शक्यता अशक्यता ह्यांचे डोक्यात चालेले वादळ ह्याला मोकळं करण्याचा मार्ग हवा होता. 

तेव्हाच एका मैत्रिणी कडून कळाले आमचा नादच खुळा म्हणून एक WA ग्रुप आहे मराठी बायकांचा, वेळ असेल त्याप्रमाणे TP गप्पा मारणे हा हेतू. नोकरी आणि आता आलेल्या सर्व कामांची जबाबदारी ह्याचा विचार करून ठरवले जॉईन होऊन बघू, नाही आवडले तर बंद. मग एका मैत्रिणीकरवी WA ग्रुप ला जॉईन केले आणि एक नवीन विश्वच तयार झाले. खूप नवीन मैत्रिणी केल्या, बरीच नवीन माहिती मिळाली,  बरेच नवीन पदार्थ केले, दररोज नवीन डोक्याला चालना मिळेल असे काम दिले जायचे ते करायला येणारी मजा अनुभवली. कधी भीती, उदास अथवा वेळ आहे असे झाले की एक सुंदर सकारात्मक मैत्रिणींचा ग्रुप होता  जो मनाला उभारी द्यायचा.

मला ह्या ग्रुपमुळे  आणि ग्रुपमध्ये नवीन संधी मिळाल्या. पूर्वी मनात आणि प्रत्यक्षात असलेले बरेच छंद, हौस पूर्ण झाले आणि नवीन काही छंदही सापडले. Quarantine विडिओ मध्ये काम केले आणि त्या फिती तयार करण्यास coordination केले , कविता केल्या, Karaoke मध्ये भाग घेतला, गाण्याच्या भेंड्या खेळल्या, मधेच एका पाककृती पुस्तकात १० पाककृत्या करून भाग घेतला, आता एका चित्रपटात काम करणार आहे  आणि  MMC च्या तर्फे नाचाच्या विडिओत पण भाग घेतलाय. एकूण सामाजिक जीवन एका नव्या अर्थाने चालू झाले.

सर्वात महत्वाचे खूप नवीन मैत्रिणी झाल्या, खूप जुन्या मैत्रिणींशी नव्याने ओळख झाली. माझ्या बरोबर कॉलेजमध्ये असलेल्या मैत्रिणीमुळे  ज्ञानेंश्वरी वाचायला घेतली आहे, एका आधीच्या मैत्रिणीने मास्क शिवायला शिकवले. काही जुन्या ओळख असलेल्याजणी एकत्र येऊन फोटो कसे काढायचे ह्या माहितीची देवाण घेवाण सुरु केली, एका  Zoom  ग्रुपने  तर दररोज एकत्र व्यायाम करायचा नियम केला. . एक ना दोन अश्या अनेक विषयीचे ग्रुप्स आणि त्यावर चर्चा सुरु झाल्या – नवीन तंत्रज्ञानामुळे  घरबसल्या एक सक्रिय सामाजिक जीवन शैली निर्माण  झाली.

आता मात्र सगळ्यांना प्रत्यक्ष भेटायला मन आतुर झालंय.  माणूस हा समाज, समूहात आनंद मिळवणारा आहे. एकटा तर राहत नाहीच पण परिस्तिथी विलग राहायची आली तर तंत्रज्ञान आणि विविध युक्त्या करून परत सामूहिक गोष्टी करायला लागतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. भविष्यात कोविड १९ चा काळ बरेच काही बदल घडवून आणि शिकवून जाईल पण इतिहासात माणसाला असलेली सामूहिक जीवनाची ओढ ठळक अक्षरात लिहून जाईल.


प्रिया पाटणकर 
Hoffman Estate, IL