कोविद-१९ काळी, बाप्पा आले घरी!

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणपती बाप्पाचे स्थान त्याच्या मनातून खचित कोणी घेऊ शकेल? बाप्पा म्हंटलं की मनात एक शांतता, एक विलक्षण ओढ़ आणि अगणित आठवणी दाटून येतात. कुठेही “गणपती बाप्पा” असे ऐकल्यावर, “मोरया” हे आपसूक मनातून, ओठातून येतं. नवीन घर,गाडी, व्यवसाय अगदी दिवस सुद्धा आपण बाप्पाच्या नावाने सुरु करतो.विघ्नहर्ता आपल्या मनाच्या एका कप्प्यात विराजमान आहे.

आम्ही जेव्हा नवीन घरात राहायला आलो, तेव्हा दारातून आत येताच एक मोकळी जागा आहे. पहिले पाऊल ठेवल्याबरोबर मंदार आणि मला “इथे बाप्पा असावा” असे वाटले. ही इच्छा आम्ही बरेचदा मित्र परिवारासमोर व्यक्तही केली.आमच्या इच्छेला खारीचा वाटा आणि प्रोत्साहन म्हणून एका मित्र परिवाराने आरसा, बैठकीवजा शेल्फ सुद्धा भेट केले.

पण बाप्पा अजून मनातच राहिला.

साल २०१८ रॉकेटच्या गतीने गेले. मंदारने बरेचदा “मला बाप्पा ची मूर्ती घडवायची आहे” असे बोलून झाले. ऑनलाइन स्टोअर्स वरती माझा शोध चालूच होता. पण मनातले बाप्पाचे रूप आढळले नाही कुठे. भारतातून मूर्ती आणावी असा एक विचारही झाला.

पण बाप्पा अजून मनातच राहिला.

साल २०१९ च्या मंदारच्या वाढदिवसाला मी त्याला माती, मूर्ती करायचे साहित्य भेट केले. पण महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीच्या कामात तो व्यापून गेला होता. त्या गडबडीत सुद्धा त्याने मंडळाची विसर्जित केलेल्या बाप्पाच्या मूर्तीची माती राखून ठेवली होती. ती माती आणि आपल्या घरच्या बाप्पाची माती एका मित्राने आमच्या घरी सुखरूप आणून पोहचवली.

पण बाप्पा अजून मनातच राहिला.

साल २०२० च्या सुरुवातीला मंदारने सगळी माती भिजत घातली. ह्या वर्षी बाप्पा घडवणार असा मानस त्याने धरला.

मग आला कोविद-१९. सगळेच घरी बसले. पहिले काही दिवस अगदी आनंद होता. इतका आराम करायचा गेले काही वर्ष योगच आला नव्हता. मुलींना आई बाबा डोळ्यासमोर रिलॅक्स दिसले. त्या खूष. मग आम्ही पण खूष. घरातील ऊर्जा एकदम सकारात्मक झाली. एक दिवस मंदार बराच वेळ बेसमेंट मध्ये गायब होता. मुली टीव्ही बघण्यात आणि मी ऑफिसच्या कामात व्यस्त होते. असे दोन दिवस झाले. आणि तिसऱ्या दिवशी मला अचानक व्हाट्सअँप वर फोटो आला. सुंदर सुबक बाप्पाची पहिली छबी पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले.

पुढचे ४-५ आठवडे बाप्पा घडत गेला आमच्या घरी. खारीचा असला तरी मुलींचा आणि माझा हातभार लागला आमच्या मूर्तीला. पाट, रंग, शेला, उंदीर सगळ्यामध्ये आठवणी साठत गेल्या.

शेवटी मे २४-२५ च्या रात्री २ वाजता आमच्या मनातले रूप लेवून बाप्पा साकार झाला. दोन दिवसांनी अंगारक विनायकीचा योग साधून बाप्पा आमच्या घरात स्थानापन्न झाले.

दोन वर्ष मनात घर करणाऱ्या बाप्पानी कोविद-१९ च्या निमित्तानी आमच्या घरी मूर्ती रूपात आगमन केले. पित्रे परिवाराला विघ्नहर्त्याचे छत्र मिळाले.

“गणपती बाप्पा मोरया!”



कोमल पित्रे 
Naperville, IL