मायेची बाग

माणूस हा परिस्तिथीशी   जुळवून घेणारा प्राणी आहे. खूप लवचिक आणि सहनशील प्राणी आहे. असे आपण सर्वांनी बऱ्याच वेळा  ऐकले असेल, पण भारतभेटीसाठी विमानतळावर बोर्डिंगसाठी रांगेत उभा असलेला किंवा  चितळ्यांच्या दुकानात सकाळी बाकरवडी घ्यायला आलेल्या माणसाला पाहून तो सहनशील वगैरे अजिबात वाटत नाही. दैनंदिन दिनक्रमात आपण पण परिस्तिथीशी जुळवून घेत असतो पण त्याची  नोंद सुद्धा न करता आपण दिनचर्या पार पडतो.  आठवड्यांन  मागून आठवडे आणि वर्ष आपण कामाचे दिवस येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांना डोळे लावून आणि सुट्टीचे दिवस काम आणि पळापळ करून पार पडतो.

२०२० मध्ये पण माणूस हा परिस्तिथीला जुळवून घेणारा प्राणी आहे आणि असेल त्या परिस्तिथीत आनंदाने राहणार प्राणी आहे असे प्रकर्षाने जाणवून देणारी घटना – कोविद १९ – महामारीमुळे  झाली.

पृथ्वीवर धावपळ करणाऱ्या माणूस ह्या प्राण्याला एका सूक्ष्म जंतू ने गतिरोधक बनून माणसाच्या जीवनाचा वेग आणि दिशा बदलून टाकली. माझ्यापण सुरळीत चाललंय असे वाटणाऱ्या दिनक्रमात अचानक ब्रेक लागला. सुरवातीला नवीन जीवनशैली बसवणे ह्या सोबत विषाणू आणि त्याचे परिणाम ह्याबद्दल अज्ञान, भीती अपरिचित वातावरण परिस्तिथी  यामुळे गोंधळ उडाला. मग नवीन जीवनशैली मध्ये हळूहळू बस्तान बसले आणि उमगले की  २४ तास हा किती मोठा वेळ असतो. मुळात दूरदर्शन ची फार आवड नसल्याने आणि भरपूर वेळ असल्याने आवड असलेल्या आणि पूर्वी वेळे अभावी न  केलेल्या गोष्टींची यादी तयार केली. हो, ते सर्व गोष्टींची यादी करणारे लोक असतात ना त्या जमातीतली आहे मी. 

बालपणीच्या आठवणीत आणि मनाला खूप आवडलेल्या  कामाची उजळणी झाली – त्यात होते बागकाम. आईला (श्रीमती मंजिरी पटवर्धन) बागेची हौस ह्यामुळे   मी लहानपणी आईला मदत म्हणून खूप बागकाम केले आहे. पण आता वेळेअभावी घरा बाहेरील हिरवी बाग हिरवीच  राहावी एवढीच अपेक्षा आणि आपल्याला तेवढेच जमेल असा समज करून घेतलेल्या मला माझीच बाग नव्याने दिसली. बराच  खंड आणि लहानपणी झाडाला  पाणी घालणे, तण काढणे, फूल वेचणे आणि फळ खाणे ह्या पलीकडे सर्व गोष्टींकडे काम ह्या दृष्टीने पाहिल्यामुळे बागकाम ह्या विषयाची  Google करून माहिती काढण्या पासून सुरुवात केली. थंड प्रदेशात बारामाही येणारी फुले शोधणे त्यांची निगा राखणे वगैरे माहिती शोधायला लागले. हो दर  वर्षी नवीन झाडे लावणे जमेल न जमेल याचा विचार केला.

आईशी दररोज होणाऱ्या गप्पांमध्ये  आता बाग आणि झाडे, फूल ह्यावर चर्चा होऊ लागली. गप्पा रंगू लागल्या. नवीन माहिती मिळाली आणि माझ्याच आईचे बाग आणि झाडे, फुलांचे ज्ञान किती खोल आहे हे नव्याने आढळून आले. लहानपणी काश्मीरला गेलो होतो त्या मुघल गार्डन्स मधल्या आठवणीचा उजाळा फुलांची माहिती देतांना होऊ लागला. कुठली फुले आणि झाडे एकत्र लावावीत, का लावावीत हे आई सांगू लागली. झूम वर बाग दाखवणे, नवीन बियाणे फुटू लागले की  त्याचे सेलिब्रेशन होऊ लागले. प्रत्येक पान, कळी, मोड ह्याची बातमी होऊ लागली आणि चुकून न फुटलेल्या बियाणांचे दुःख ही  एकत्र पचवले जाऊ लागले.  मी कशी आईच्या काही सवयी आणि छंद आपोआप अंगवळणी करतेयये ह्याबद्दल दादानी चेष्टा केली. वहिनी पण सांगू लागली की  आई कशी तिच्या बागेत आणि माझ्या बागेत ह्या काळात रमून  गेलीये  आणि माहेरी होणाऱ्या दूरध्वनीचा  एक वेगळाच माहोल तयार झाला. 

मला माझी जुनी मैत्रीण जणू नव्याने भेटली आणि नवीन धागे दोरे सात समुद्रापार अजून घट्ट जमले आणि प्रत्येक दिवशी एक छान प्रसंग विणला जाऊ लागला तो केवळ बागकाम आणि असलेल्या कोविड परिस्तिथीमुळे.


प्रिया पाटणकर 
Hoffman Estate, IL