शिवाजीमहाराजांच्या असामान्य शौर्याच्या, मुत्सद्दी राजकारणाच्या अनेक कथा आपण ऐकत असतो परंतु ह्याच बरोबर ते एक कल्याणकारी राजे होते. राज्याचा व्याप सांभाळताना विद्या आणि कला ह्या क्षेत्रांमध्येसुद्धा त्यांनी बरीच कामगिरी केली आहे. अनेक पंडित आणि कलावंत यांना महाराजांचा आश्रय लाभला होता. कवींद्र परमानंद, जयराम पिंड्ये, भूषण कवी, समर्थ, गागाभट्ट अशी अनेक नावे या संदर्भात आपण वाचतो. सतराव्या शतकामध्ये राज्याभिषेकानंतर राजव्यवहारामध्ये व पत्रव्यवहारामध्ये येणारे फारसी आणि दख्खनी उर्दू शब्दांऐवजी संस्कृत पर्याय वापरून राजव्यवहाराचे मराठीकरण करण्याची योजना महाराजांनी आखली. अश्या प्रकारचा कोश तयार करण्याचे काम त्यांनी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांच्यावर सोपवले. रघुनाथ पंडितांनी धुंडिराज व्यास ह्या विद्वान माणसाकडून राजव्यवहारकोश सिद्ध केला.
कृते म्लेंछोच्छेदे भुवि निरावशेषम्
रविकुलावतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम् ।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ।।
अर्थ: या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छेद केल्यानंतर सूर्यवंशाला ललामभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडितांची नियुक्ती केली.
वरील श्लोकावरून या कोशाची मर्यादा स्पष्ट होते. यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजकीय व्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी या कोशाची निर्मिती झाली होती. महाराष्ट्रातील ३०० वर्षे नांदलेल्या परकीय राजवटींमुळे फारसी आणि उर्दू ह्या भाषांना राजभाषेचा स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु विविध थरांमध्ये उदाहरणार्थ इनामे, दानपत्रे, नेमणूका, वृत्ती, वतने इत्यादी बाबतीत मराठीचा वापर अपरिहार्य होता. तत्कालीन पत्रव्यवहार बघता राज्यव्यवहार व लोकव्यवहारामध्ये अनेक फारसी शब्द वापरले जात होते. एवढेच काय सामान्य लोकांच्या तोंडी सुद्धा अजाणतेपणे फारसी आणि उर्दू शब्दच प्रचारामध्ये होते. आपण सर्वजण आताच्या प्रचलित मराठीमध्ये सुद्धा किमान दहा टक्के शब्द फारसी वापरतो आणि ते शब्द मराठी मध्ये – आपल्या बोली भाषेमध्ये इतके रुजले आहेत कि ते परकीय भाषेमधले आहेत हि जाणीव ही आपल्याला होत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास – मसाला, फजिती, इमारत, कारंजे, गुलाब, जिलबी, समई आणि असे किती तरी…!
दक्षिण दिग्विजयानंतर महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रामधले सहा जिल्हे, कर्नाटक मधले चार जिल्हे व तामिळनाडू मधले दोन जिल्हे एवढा भूप्रदेश होता. मराठीमध्ये रूढ असलेली परिभाषा सगळ्या राज्यात चटकन समाजेल व रुजेल हि परिस्थिती नसल्यामुळे राजकोशाची कल्पना आली असावी असे वाटते. कोशामध्ये एकूण १३८० शब्द आहेत. फारसी बरोबरच अनेक उर्दू शब्द ही समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ अडकित्ता, चोळी, ढाल, दौड इत्यादी. अश्या अनेक शब्दांमुळे या कोशाचे स्वरूप उर्दू-संस्कृत तसेच फारसी-संस्कृत म्हणता येईल. या कोशात योजलेल्या अनेक शब्दांपैकी काही शब्द पुढील काळात चालू राहिले उदाहरणार्थ अमात्य, मुजुमदार, सचिव, मंत्री, सुभेदार इत्यादी.
कोशाची रचना करताना आठवतील व सुचतील तसे शब्द ना जुळवता त्या शब्दांचे काळजीपूर्वक वर्गीकरण केले आहे. कोणते विषय कोणत्या वर्गात व कोणत्या क्रमाने यावेत ह्याचा आराखडा आखला होता व त्याला अनुसरून शब्द बसवले आहेत. व्यक्ती, वस्तू त्याचे महत्व व मूल्य यांचा उतरत्या क्रमाने उल्लेख आहे. कोशातील शब्दांची दहा वर्गात विभागणी केली आहे.
१. राजवर्ग – या वर्गात राजा, युवराज, राजपुत्र व अंत:पूर ह्या गोष्टींचा उल्लेख असून, नंतर प्रधान, अमात्य इत्यादी अधिकारी सांगितले आहेत. राजाने दर्शन घ्यायच्या वस्तू, राजाने दरबार व वैयक्तिक जीवनात वापरायच्या वस्तू यांचे उल्लेख आहेत.
२. कार्यस्थानवर्ग – राजसेवेशी संबंधित असलेल्या विविध कचेऱ्या या वर्गात सांगितल्या असून त्या कचेऱ्या कोणती कामे करत असत हे सांगितले आहे.
३. भोग्यवर्ग – ह्या वर्गात विविध वस्तू क्रमाने दिल्या आहेत. अन्न पदार्थ, पेये, मेवा इत्यादी तसेच वेगवेगळ्या पात्रांची नावेही आहेत.
४. शस्त्रवर्ग – शास्त्रागारावरील अधिकारवर्गाची नावे तसेच शास्त्रांची नावे ह्यात दिली आहेत. तलवार, कट्यार इत्यादी हातात धरायची शस्त्रे ते गदेसारखी बोथट शस्त्रे, भाले, बरची, धनुष्य इत्यादी फेकण्याची शस्त्रे इत्यादी येतात. ह्या शस्त्रांच्या वेगवेगळ्या भागांची सुद्धा नावे आहेत.
५. चतुरंगवर्ग – या वर्गात लढाईला उपयुक्त ठरणाऱ्या हत्ती, घोडे, रथ, गाड्या, उंट व रानवाद्ये यांचा उल्लेख आहे. या सर्वांशी संबंधित असलेल्या सेवकांचाही उल्लेख आहे. वेगवेगळे घोडे, हत्ती ह्यांची हि तपशील माहिती आहे.
६. सामंतवर्ग – हा वर्ग सैन्याच्या व सैन्याच्या हालचालींशी संबंधित असून राजनीतीमधील साम दाम आदी डावपेच या वर्गात उल्लेखले आहेत.
७. दुर्गवर्ग – या वर्गात किल्ल्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून किल्ल्यांची माहिती दिली आहे. त्यात तट, बुरुज, माची, खंदक इत्यादी किल्ल्यांच्या बाह्य रूपाची माहिती दिली आहे.
८. लेखनवर्ग – या कोशातील हा सर्वात मोठा वर्ग आहे. जमाखर्च, कर्जवसुली, पत्रलेखन, करार, तहनामे, निरोप आणि अन्य राजकीय कामांसाठी वापरण्यात येणारे शब्द ह्या वर्गात दिले आहेत.
९. जनपदवर्ग – राजव्यवहाराशी संबंधित व कर मिळवून देणाऱ्या जमीन व वाहतुकीशी संबंधित शब्दाचा हा वर्ग आहे. गावांचे, जमिनीचे, महसुलाचे व करांचे प्रकार नमूद केले असून ह्याची माहिती दिली आहे.
१०. पण्यवर्ग – या वर्गात विविध तर्हेने व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या लोकांची माहिती दिली आहे. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू पुरविणाऱ्या लोकांची ह्यात माहिती आहे.
शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकानंतर पत्रव्यवहाराच्या भाषेमध्ये हा फरक जाणवतो. परंतु अठराव्या शतकापर्यंत मराठी साम्राज्य भारतभर पसरले. मराठी राजकारणाला भारतीय स्वरूप प्राप्त झाले. भारतभर होणाऱ्या पत्रव्यवहारामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा फारसी शब्दांचा वापर वाढला. १८१८ नंतर मात्र मराठी शिक्षणाचा प्रसार सगळीकडे झाला आणि फारसी शब्दांचे प्रमाण कमी होत गेले. अठराव्या शतकामध्ये पत्रव्यवहारामध्ये ७५% शब्द उर्दू अथवा फारसी आढळून येतात. परंतु मराठीचा प्रचार झाल्यानंतर ते प्रमाण १०% वर येऊन थांबले आहे. अलीकडे मराठीमध्ये सर्रास वापरले जाणारे इंग्रजी राजव्यवहारातील शब्द काढून त्याच्या जागी देशी किंवा मूळ संस्कृत शब्द वापरण्याची चळवळ सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध झालेले पदनामकोष किंवा निरनिराळ्या विषयांवरील कोष ही ह्या चळवळीची फळे आहेत. अश्या वेळेस मराठीत रूढ करण्यात येत असलेले काही शब्द राजव्यवहारकोशात आढळतात. सचिव, मंत्री, सभासद, दुर्ग, कोषागार, न्यायाधीश, शस्त्रागार, सभा, लेखा, वेतन, ऋण, कारागृह, आयपत्र, सहकारी इत्यादी. तीनशे वर्षानंतर सुद्धा हा राजकोश उपयुक्त ठरतो हे लक्षणीय आहे.
ह्या कोशाची रचना १६७६ साली झाल्यामुळे उर्दू भाषेचा हा पहिला कोश म्हणता येईल. ह्या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतात, एवढेच नाही तर उर्दू-संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात. राजव्यवहारातील मराठीचे स्वरूप अधिक शुद्ध असावे असा जाणीवपूर्वक प्रयत्न शिवाजीमहाराजांनी केला ही त्या महापुरुषाच्या चतुरस्त्र प्रतिभेची साक्ष आहे. एखाद्या भाषेतून मूळ शब्द नाहीसे व्हावेत, त्याची जागा परकीय शब्दांनी घ्यावी आणि ते शब्द सवयीचे व्हावे अशी परिस्थिती होती. आजची परिस्थिती पाहता राष्ट्रपतिभवन, सचिवालय, प्रतिक्षालय, मुख्यमंत्री, मंत्रालय, वायुदल, भुसेना, रोहिणी, भास्कर, आर्यभट्ट हे उपग्रह, गंगा, गोदावरी, धवलगिरी ही नौकानावे, पद्मश्री, पद्मभूषण इत्यादी बिरुदे, वीरचक्र, परमवीरचक्र इत्यादी पारितोषिके ही अस्मितेची जागृती दाखवतात. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील हा एक टप्पा असतो. राजव्यवहारातील शब्दांचे मराठीकरण करावे ही कल्पनाच मुळी महाराजांचे स्वप्न किती भव्य होते हे दाखवून देण्यास समर्थ आहे.
संदर्भ: छत्रपतींच्या प्रेरणेनी झालेला राजकोश – अ. द. मराठे