President’s Corner


प्रिय सहकारी बंधू भगिनींनो,
सस्नेह नमस्कार,

सन 2024 या वर्षाकरिता महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारताना मला अतीव आनंद होत आहे. त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !
सर्वप्रथम आपणा सर्वांना हे 2024 वर्ष, आनंददायी, समृद्धीचे, समाधानाचे शांततेचे आणि आरोग्यदायी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

महाराष्ट्र मंडळ शिकागो माझ्यासारख्या अनेक कुटुंबांना इथे परदेशातही स्वभागाची, आपुलकीची आणि मायेची ऊब देण्याचे अविरत कार्य करीत आहे. मी आणि माझे सहकारी हा आपलेपणा व मराठी बाणा जपण्यासाठी बांधील आहोत. आपला महाराष्ट्र म्हणजे एक सांस्कृतिक भूमी आहे. हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी आपले मंडळ प्रयत्नशील राहील. या वर्षी नेहमीप्रमाणे मकर संक्रांत, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतील. याबरोबरच रक्तदान शिबीर, यांसारख्या सामाजिक उपक्रमांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मंडळाचा कुंटुंबप्रमुख या नात्याने मी आपणांस कळकळीची विनंती करतो की मंडळ अजून प्रगल्भ, सुंदर, सक्षम, विस्तारित आणि विकसित होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूया. मंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रमांना प्रायोजक मिळवून देणे तसेच नवीन चेहऱ्यांना मंडळात घेऊन आपला परिवार मोठा करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिकागो महाराष्ट्र मंडळाची प्रगती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहील याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक सदिच्छा आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.
धन्यवाद !


श्री. समीर बोंगाळे
अध्यक्ष – महाराष्ट्र मंडळ शिकागो 2024