झुळझुळ झरा तसं पळणारं बालपण
उठत, बसत, पडत, खेळत जाणारं
कधी अडलेलं तर कधी खळखळलेलं
कधी चिंब झालेलं तर कधी तहानलेलं
झाडांच्या मागून दगडांच्या पलीकडून
लपणारं, दिसणारं, क्षणात हसणारं
नदीच्या कुशीत शिरून लाजणारं
तर कधी मोठ्ठेपणाचा आव आणणारं
प्रवाहातल्या नावांना गुदगुल्या करत
तीरावरच्या मुलांना वेडावून दाखवत
बघता बघता संपणारं
आणि तारुण्याच्या भोवऱ्यात सापडणारं
जीवनाच्या ओझ्याने खोल खोल जाणारं
सागराच्या दिशेला झपाट्याने वाहणारं
जाता जाता कावरंबावरं होऊन गटांगळ्या खात धडपडणारं
सागर किनारा येताच थोडसं घाबरणारं
अन शेवटी त्यातच विलीन होणारं
प्रचंड लाटांशी सांभळून घेणारं
त्यांच्यातच मिळून मिसळून जाणारं
आता कसं सगळ शांत, अथांग, अविरत लाटांच्या पाळण्यात झुलत झुलत झुलत