रचनाच्या मागील एका अंकात सौ. अलकाच्या वडिलांचा म्हणजेच कै. डॉ. मो. ग. दीक्षित यांचा स्वाक्षरी संग्रह प्रकाशित झाला होता. त्या संग्रहात एक स्वाक्षरी प्रामुख्याने दिसत नव्हती. ती म्हणजे महात्मा गांधीजींची. ही सत्य कथा त्या हरवलेल्या स्वाक्षरीची आहे.
कै. डॉ. मो. ग. दीक्षित
महात्मा गांधीजी एकदा पुण्यात आल्यावर विमानतळाजवळ असणाऱ्या आगा खान पॅलेसमध्ये राहायला आले होते. ही गोष्ट समजल्यावर लगेचच, डॉ. दीक्षित आणि त्यांचे एक मित्र श्री. पाटणकर, सायकलींवर स्वार होऊन गांधीजींची स्वाक्षरी मिळविण्यासाठी पुण्याहून गांधीजींच्या आश्रमांत गेले. गांधीजी त्यांची स्वाक्षरी देण्यासाठी प्रत्येकी दोन आणे हरिजनांची घरे स्वच्छ करण्याचा कार्यात मदत म्हणून घेत असत. त्याचबरोबर ते प्रत्येका कडून फक्त खादी कपडे घालण्याचे वचन पण घेत असत. दोघा मित्रांनी आनंदाने दोन आणे दिले आणि खादी घालण्याचे वचन देऊन महात्माजींची स्वाक्षरी मिळवली.
स्वाक्षरी मिळवून घरी परत आल्यावर मात्र डॉक्टर साहेबांना काही केल्या दिवसभर चैन पडत नव्हती. रात्रीदेखील ते शांतपणे झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा सायकलीवर स्वार होऊन ते गांधीजींच्या आश्रमात गेले. त्यांनी पुन्हा आलेलं पाहून गांधीजींनाही आश्चर्य वाटले. त्यांनी पुन्हा येण्याचे कारण विचारले. डॉ. दीक्षितांनी मग महात्माजींना प्रणाम करून सांगितले की, “मी तुमची स्वाक्षरी तुम्हांला परत करायला आलो आहे. मी काल तुम्हाला खोटं वचन देऊन तुमची स्वाक्षरी मिळवली. मी लवकरचं शिक्षणासाठी परदेशीं जाणार आहे. त्यामुळे तिकडे गेल्यावर मी खादी कपडे घालू शकणार नाही. आपण ही स्वाक्षरी परत घेऊन मला वचन मुक्त करावे.” गांधीजी मिश्किलपणे हसत म्हणाले की, “मी तुझे दोन आणे मात्र तुला परत करणार नाही. तू ही स्वाक्षरी तुझ्या मित्राजवळ ठेव. तू परदेशातून परत आल्यावर खादी वस्त्रं घातल्यावर तो ही स्वाक्षरी तुला परत करेल.”
त्या प्रसंगानंतर, बराच काळ लोटला. सौ. अलका आणि मी अमेरीकेत येऊन स्थायिक झालो होतो. एक दिवस अचानक श्री. पाटणकर काका आणि सौ. काकू आमच्या घरी आले. त्यांनी ही गोष्टं आम्हांला सांगितली. त्यांनी ही कथा मागे पुण्यात एका तत्कालीन मासिकात प्रकाशितही केली होती. त्याचे कात्रण त्यांनी आम्हांला दिले. त्यांनी सांगितले की, गांधीजींची ‘ती स्वाक्षरी’ त्यांच्या जवळ सुखरूप आहे. पुढच्या वेळी सौ. अलका पुण्याला आल्यावर ते स्वाक्षरी तिला देतील. दुर्भाग्याने आमचे लवकर भारतात जाणे जमले नाही आणि काळाने घात केला. श्री. पाटणकर काका आणि सौ. काकू लवकरच स्वर्गवासी झाले. त्यांना काही मूलबाळ नव्हते. त्यांचा स्वाक्षरी संग्रह कुठे आहे हे कोणाला पण माहित नाही. सौ. अलकाची मात्र पूर्ण खात्री आहे की ती स्वाक्षरी कोणाजवळ तरी निश्चितच सुरक्षित असेल आणि एक दिवस ती तिला परत मिळेल.
… तोपर्यंत मात्र डॉ. दीक्षितांचा स्वाक्षरी संग्रह अपूर्णच राहणार!
महात्मा गांधीजींच्या ‘त्या’ स्वाक्षरीच्या प्रतीक्षेतील अपूर्ण पान
सौ. अलका आणि डॉ. सुभाष वाईकर













