2019 Makar Sankranti Vruttant

महाराष्ट्र मंडळ शिकागोचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. तब्बल 50 वर्षे सातत्याने या शिकागोस्थित मंडळाने अनेक उत्तमोत्तम दर्जेदार सोहळ्यांचे आयोजन केले आहे. 2019 हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. १९ जानेवारी २०१९ रोजी मंडळाचा मकरसंक्रांतीचा कार्यक्रम यलो बॉक्स नेपरविल येथे संपन्न झाला.

अति बर्फवृष्टीचा इशारा आणि शून्य च्या बराच खाली गेलेला पारा यावर मात करून अनेक कार्यकर्ते बर्फभरल्या रस्त्यावरून दहा च्या ठोक्याला सभागृहात हजर होते. संक्रांत असल्यामुळे सजावट अतिशय साजेशी करण्यात आली होती, हलव्याच्या दागिन्यांनी सजलेली सवाष्ण (देवीचा मुखवटा) , पारंपरिक ऊस, बोरे, धान्यांनी सजलेले सुगड तसेच हळदी कुंकू वाण यांचा अप्रतिम देखावा प्रवेशद्वारासमोर मांडण्यात आला होता. जागोजागी टांगलेले विविधरंगी पतंग सभागृहाच्या देखणेपणात भरच टाकत होते. साधारण अकरा वाजल्यापासून लोक येऊ लागले तेव्हा या विपरीत हवामानातही त्यांचा आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केलेला हा खटाटोप हेच मंडळाचे ५० वर्षाच्या कार्याचे फलित म्हणता येईल.त्यांचे स्वागत आपल्या पारंपरिक पद्धतीने तिळगुळ आणि वाण देऊन करण्यात आले. त्यासाठी सुवासिनी पारंपरिक काळ्या साड्या नेसून हळदी कुंकू, अत्तर, वाण देऊन अतिथी महिलांचे स्वागत करत होत्या.

मकरसंक्रांतीच्या निमित्त खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. गुळाची पोळी तर होतीच, शिवाय पात्रा तुरीया भाजी, चवळीची उसळ, कढी, कोशिंबीर, जिलेबी असा कलरफुल बेत होता. जेवण वाढण्यासाठी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मदत करत होते. लहान मुलांसाठी विशेष पदार्थ करण्यात आले होते. भोजनाचा आस्वाद घेऊन मंडळी मुख्य सभागृहात स्थानापन्न झाली. पालकांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी मंडळाने STEM अंतर्गत मुलांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

मकरसंक्रांत सोहळ्याचे सूत्रसंचालन कल्पना निमकर यांनी अनौपचारिकपणे प्रेक्षकांशी संवाद साधत केले. कार्यक्रमाची सुरुवात मातेच्या जागर नृत्याने झाली. मल्हार वारी, गोंधळ सारख्या ताल धरायला लावणाऱ्या व त्याचवेळी देवीच्या गजराने वातावरण भारून टाकणारा अनुभव शिकागोच्या काही हरहुन्नरी कलाकारांनी दिला. यानंतर शिकागो मराठी शाळेने शिवरायांच्या पोवाड्याचे पुढील पुष्प सादर केले. यात शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग आणि आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सादर करण्यात आले. मुलांचा उत्साह आणि त्यांनी व त्यांच्या पालकांनी घेतलेले अथक परिश्रम या नाट्यात दिसून आले. त्यातील प्रसंग सादर करताना मुलांना ते कळले आहेत हे त्यांच्या सादरीकरणातून अगदी ठळकपणे जाणवले. या नंतर मंडळाच्या अध्यक्ष वैशाली राजे यांनी त्यांच्या कार्यकारिणीची थोडक्यात ओळख करून दिली, मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. रवी जोशी यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

या वर्षी एक अभिनव कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. “मागोवा” या सदराखाली परदेशस्थ तसेच देशातील मराठी यशस्वी व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम असणार आहे. याच उपक्रमातील पहिली मुलाखत श्री नरेंद्र काळे (Kale consultancy चे संस्थापक chairman) यांची,  सुहास गोसावी आणि संगीता चव्हाण यांनी घेतली. मुलाखत अर्थातच रंगली, मराठी माणूस आणि उद्योजक हे सहसा न जमणारे गणित काळे यांनी केवळ भारतातच नाही तर ग्लोबली यशस्वी करून दाखवले, त्यांची शैक्षणिक कारकीर्द तर प्रभावी आहेच, परंतु उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरी हा निकष न ठेवता , नवनिर्मितीचा ध्यास त्यांनी घेतला, आणि काळे कन्सल्टन्सी ची स्थापना झाली, या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळालीच तसेच त्यांनी आवर्जून ताज ग्रुप च्या श्री अजित केरकरांचा उल्लेख केला, त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे काळे यांना मोठी झेप घेता आली. मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही हे विधान कसं चुकीचं आहे हे यासंदर्भात काळे यांनी उधृत केले. Airlines साठी त्यांनी काही प्रॉडक्ट्स तयार केली तसेच विविध बँकांमध्येही त्यांची सॉफ्टवेअर वापरली जातात. पुणे विद्यापीठात श्री ताकवले यांच्या मदतीने त्यांनी BSc Computer Science and Master of Computer Application हे कोर्स डिझाइन केले. त्यानंतर त्यांनी एका  महत्वाच्या संस्थेची स्थापना केली , भाऊ इन्स्टिट्यूट असे नाव असलेल्या ह्या संस्थेत त्यांनी नवीन उद्योजक घडविण्याचा वसा घेतला, त्याचे उदघाटन सर्वश्री अब्दुल कलाम यांनी केले तेव्हा त्यांनी यासारख्या संस्थेतून हजारो उद्योजक पुढे यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. या संदर्भात काळे यांनी एक सद्गदित करणारा अनुभव सांगितला, या इन्स्टिट्यूट मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपला अनुभव सांगताना आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलल्याची कबुली दिली, आपण इथे आलो होतो ते आपल्याला नोकरी मिळावी अशी अपेक्षा घेऊन, परंतु बाहेर पडताना आपण रोजगार निर्माण करू हा आत्मविश्वास या इन्स्टिट्यूट ने आपल्याला दिला, या तिच्या विधानातच सर्व काही आले. अतिशय प्रेरणादायी अशी ही मुलाखत शिकागोकरांच्या स्मरणात कायम राहील आणि पुढच्या पिढीला खूप काही शिकवून जाईल यात शंकाच नाही.

मृदुल स्वर हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण. डॉ मृदुला दाढे जोशी यांच्या विविध संगीतकारांच्या कलाकृतींचा आस्वाद घेणारी मैफिल. मृदुला ताईंनी या मैफिलीत विविध संगीतकारांची त्या त्या गाण्यामागची भूमिका उलगडून दाखवली. “ही वाट दूर जाते” या अवीट गोडीच्या गाण्याने मैफिलीची सुरवात झाली, त्या गाण्यातील “आभाळ वाकलेले” ची चाल, प्रत्यक्ष आभाळ वाकलेले ही अनुभूती देणारी, तसेच “केव्हा तरी पहाटे” मधील “निसटून” हा शब्द अशी पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या रचनेतील सौंदर्यस्थळं दाखवून दिली. “नीज माझ्या नंदलाला” चा अवघड ताल, “मालवून टाक दीप” चा खर्ज यांची रसिकांना सुंदर प्रचिती दिली, “कळीदार कपुरी” या सुरेख लावणीची नजाकत उलगडून दाखवली. “तुम्हावर केली मी मर्जी” मधील “लाडे लाडे” चा उच्चार, काही अविस्मरणीय हिंदी गीते यांनी मैफिलीत रंग भरले. त्यांना विकास फळणीकर (हार्मोनियम) विभव कुलकर्णी (गिटार), प्रसाद जोशी (तबला), प्रसन्न जोगळेकर (साइड रिदम) यांनी सुयोग्य साथ दिली. विकास फळणीकर यांनी काही गीते सादर केली. कल्पना निमकर यांनी सूत्रसंचालन केले.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफिलीचा शेवट अपरिहार्य असतो. उपस्थितांना सर्वार्थाने तृप्त करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.

जुईली वाळिंबे