प्रिय सखीस,
आज तुला मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाचे आमंत्रण देण्यास हे पत्र लिहीत आहे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आता सगळ्यांचे काळे ड्रेस, साड्या, झब्बे बाहेर पडणार. आपल्याला सगळ्यांना नटायला आणि मिरवायला ही एक सुवर्णसंधी!
लहानपणी मकर संक्रांतीला काळं परकर-पोलकं घालून व हातात चांदीचा नक्षीदार वाडगा घेऊन आमची स्वारी घरोघरी तिळगुळ देण्यासाठी निघत असे. त्यात कडक आणि मऊ असे दोन प्रकारचे लाडू असत. कुटलेल्या तिळाचे मऊ आणि स्वादिष्ट लाडू हे घरोघरीच्या (फक्त) आजी-आजोबांसाठी दिलेले असत. मला ते लाडू फारच आवडत. त्यांची मागणी केली की आई दटावून मोठ्या डोळ्यांनी म्हणे, “तुला दात आहेत ना? तुझे केस पांढरे झाले आणि दात पडले की मग …. मग तुला देणार हं मऊ मऊ लाडू!”
घरी ‘आई’ तर शाळेत ‘बाई’ होत्या. प्रतिवर्षी मकर संक्रांतीवर निबंध लिहून आणावा लागे. त्यातली ठराविक वाक्ये तर अजूनही माझ्या लक्षात आहेत.
मकर संक्रांतीचा सण पाच हजार वर्षांहूनही अधिक वर्षे भारतात साजरा केला जातो.
हा सण दरवर्षी 14 जानेवारीला येतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत संक्रमण करतो.
पंजाबात याला ‘लोहडी’, आसामात ‘बिहु’ तर दक्षिण भारतात मकरसंक्रांतीला ‘पोंगल’ असे म्हणतात.
हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान हे पवित्र व पुण्यकारक मानले जाते.
मकर संक्रांती नंतरचा काळ हा गृहप्रवेश लग्न आणि म्हणजे इ. मंगल कार्यांसाठी शुभ मानला जातो.
संक्रांतीच्या दिवशी शाळेला सुट्टी असायची. त्या दिवशी दिवसभर मुले गच्चीवर पतंग उडवण्यात दंग असत. “ढील दे! ढील दे!” किंवा “काय कोण पोचे” हे शब्द त्या दिवशी कानी पडत. एकदा समोरच्या विनायकची पतंग काटली गेली आणि सवयीप्रमाणे गुजराती / मारवाडी पोरे ओरडली,“काऽय कोऽण पोऽचे” तेव्हा विनायक भडकून त्यांना बोलला, “जास्त बोललात ना, तर तुमच्या सगळ्या अंगाला ‘पोचे’ पाडीन!” केवढे हसले सगळे मला अजूनही आठवतंय.
पुढे माझ्या विवाहानंतर मी अमेरिकेला आणि माझे कुटुंब पुण्याला शिफ्ट झाले. काही दिवसांत प्रत्येक महिन्याला “तू घरी कधी येणार?” असा प्रश्न घरचे विचारू लागले. अमेरिकेतल्या भारतीयांना भारतात जाण्यासाठी हवामानाच्या दृष्टीने जानेवारी महिना उत्तम म्हणून मीही नववर्षात पुण्यात जायचे ठरवले. माझ्या आगमनाने घरी सारे खुश झाले मलाही सगळ्यांच्या भेटीने आनंद झाला. घरच्यांनी माझे हळदी-कुंकू करायचे ठरवले. संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला “वाण” काय द्यायचे याच्या चर्चेला उधाण आले. कोणी म्हणाले, “केशर डबी द्या” कोणी सुचवले, “मसाले द्या”, कोणी बोलले की, “पाणी पिण्याचे ग्लास द्या”. सगळ्यात उच्चांक म्हणजे जोशी काकू म्हणाल्या, “वास्तविक पाहता तू सिलिकॉन व्हॅलीतून आलीस त्यामुळे तू प्रत्येकी एक-एक लॅपटॉप द्यावयास हवास.”
अश्या प्रदीर्घ चर्चेनंतर घरच्यांनी शेवटी तीन डब्यांचा सेट द्यायचं ठरवलं. कणिक, तांदूळ आणि साखर मावेल असे एकात एक बसणारे वेगवेगळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे दणकट (?) डबे. आता हे मोठे आणि दणकट (?) डबे कुठून आणायचे? चर्चेला सुरुवात झाली. रविवारात जाऊ आणि स्वस्त व मस्त डबे आणू. समस्त स्त्रीवर्गाचं “बोहरी आळी, रविवार पेठ, पुणे” या ठिकाणावर एक मत झालं. मला घेऊन ज्येष्ठ स्त्रीवर्ग रविवारात गेला. बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. सर्व दुकाने मालाने ओसंडून वाहत होती. एका दुकानात प्लॅस्टिकचे मोठे एकात एक बसणारे, वेगवेगळ्या रंगांचे डबे मिळाले. मारवाडी मालक म्हणाला, “खूप ऑर्डर्स आहेत. आत्ताच्याला होम डिलिवरी जमणार नाय. तुमीच तुमचे डबे न्या.” आता हे डबे घरी न्यायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. काकू म्हणाली, “तू अमेरिकेहून आलीस ना म्हणून तू रिक्षाने जा. आम्ही बसनी येतो.” मग एक रिक्षा ठरवण्यात आली. त्यात आधी मला बसण्यास सांगण्यात आलं आणि मग डबे ठेवायला सुरुवात झाली. काही क्षणांत मला पुढचे काही दिसेनासे झाले. रिक्षा भरली. रिक्षावाल्याच्या दोन्ही बाजूंना सुतळीने डबे बांधण्यात आले. रिक्षावाला ‘वायुवेगाने’ निघाला. आता ही ‘रिक्षा’ आपल्याला ‘अंतरिक्षात’ नेते की काय? असा विचार मनात येऊन गेला. थोड्याच वेळात मी सुटकेचा श्वास सोडला. आधी ‘डबे’ मग ‘मी’ असे घरात शिरलो.
हळदी-कुंकवाचा दिवस उजाडला. दिवाणखान्यातील एका भिंतीजवळ डब्यांची भिंत उभारण्यात आली. मधोमध मला स्थानापन्न होण्यासाठी एक खुर्ची देण्यात आली. आलेल्या प्रत्येक ‘सौ.’ला एक डब्यांचा सेट आणि तीळगुळ, गजरा, व हळदी-कुंकू लावून देणे, हे काम माझ्यावर सोपवण्यात आले. आलेल्या मंडळींपैकी फार थोड्या लोकांना मी ओळखत होते. आलेला स्त्रीवर्ग अल्पावधी गप्पांत रंगला. डोसे खाता-खाता प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. “हळदी-कुंकवाला डोसे वाला बोलवायची आयडीया कोणाची?”, “याचा पत्ता कोणी दिला?”, “डोशांचा रेट काय?”, “ही तुमची मुलगी किती दिवसांसाठी आली आहे?”, “कधी जाणार?”, “आत्ता तिकडे किती वाजलेले असतील?” वगैरे … एखादा टेनिस बॉल परतवावा तशी काकू पटापट उत्तरे देत होती.
मग अचानक सहा-सात कॉलेज तरुणींचा घोळका घरात शिरला. घरातल्या कोणीही त्यांना कधीही पाहिले नव्हते. चौकशीनंतर कळले की त्या बिल्डिंगमधल्या सौ. हगवणे यांच्या मुलीच्या मैत्रिणी होत्या. त्या अभ्यासाला आल्या होत्या. डोश्यांच्या वासामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं म्हणून सौ. हगवणे यांनी त्यांना आमच्या घरी धाडलं होतं.
हे ऐकून काकूंनी डोसे वाल्याला सांगितलं, “या मुलींना प्रत्येकी एक-एक डोसा दे. आमचा डोश्यांचा आकडा ठरला आहे. उगाच गोंधळ व्हायला नको.” मला हे काकूच बोलणं ऐकून जरा अवघडल्यासारखं वाटलं. पण बाकी कोणालाही त्यात काही वावगे वाटले असे दिसले नाही. मला जाताना या मुली “थँक्यू ऑंटी” असं म्हणाल्या. हा आघात मी मूकपणे झेलला. मनात आलं, बरं झालं काकूने ह्या आगाऊ कार्ट्यांना एकच डोसा दिला.
डोसे खाऊन झाल्यावर काही जणी घरी परतण्यासाठी निघाल्या. हळदी-कुंकू लावून, “तुम्हाला कुठल्या रंगाचा डबा आवडतो?” असा प्रश्न मी त्यांना विचारला. जिला जो रंग आवडला, तिला त्या रंगाचे डबे मी दिले. आनंदानी त्या ‘सौ.’ आणि ‘कु.’ घरी गेल्या. त्या गेल्यावर काकू तरातरा चालत मजजवळ आली, म्हणाली, “असा हवा तो डबा द्यायचा नाऽही. पिवळे डबे आधी संपव.” आज्ञेप्रमाणे मी पुढल्या सात-आठ सौभाग्यवतींची पिवळ्या रंगाच्या डब्यांनी बोळवण केली. पिवळे डबे संपवले! आता रानडे काकू घरी जायला निघाल्या. मी त्यांच्या हातात गुलाबी डब्यांचा सेट ठेवला. तश्या त्या म्हणाल्या, “मला पिवळे डबे हवे होते.” आता आली का पंचाईत! “काकू तुमच्या गुलाबी गालांना हे डबे मॅचिंग आहेत.” असे म्हणताच काकू खुश झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांचा नातू होता तो सतत नाचत व गात होता, “व्हॉट इज इट गुड फॉर? अब्सल्युटली नथिंग!” काकू म्हणाल्या, “हे तुम्हां अमेरिकन लोकांचं गाणं आहे. तुला ठाऊकच असेल.” मी हसत-हसत मानेनेच “हो” म्हटले.
आठवड्यानंतर मी अमेरिकेस परतले. माझ्या कामात व्यस्त झाले. खूप वर्षांत ठिकठिकाणाहून हळदी-कुंकवाची बोलावणी येऊनही काही ना काही अडचणींमुळे जाणं झालं नाही. मागच्या वर्षी मात्र शिकागोतल्या एका आलिशान घरी हळदी-कुंकवाचं आमंत्रण आलं. आणि सवड होती म्हणून मी ते स्वीकारलं. यावेळी माझ्याबरोबर माझी मुलगी होती. घर अगदी महालासारखं होतं. त्या ऐश्वर्यसंपन्न सौभाग्यवतीने सुहास्यवदनाने आमचं स्वागत केलं. तिच्याजवळ तिचा छोटा मुलगा उभा होता. त्याच्या काळ्या टी-शर्टवर “आय बिलीव्ह” अशी पांढऱ्या रंगांतील अक्षरे होती. माझ्या मुलीला आता वाचता येत असल्याने तिने ते पटकन वाचलं. सौ. ऐश्वर्यांनी माझ्या मुलीला विचारले, “व्हॉट डू यू बिलीव्ह इन?” तशी ती पटकन म्हणाली, “आय बिलीव्ह इन द पॉवर ऑफ अंडरपॅन्टस्!” मला बारा वर्षांपूर्वी भेटलेल्या रानडे काकूंच्या नातवाची आठवण झाली. हसत हसत त्या सौभाग्यवतीने हा किस्सा सांगितला सारे खळखळून हसले.
गप्पा-टप्पा, स्वादिष्ट जेवण यात वेळ छान गेला. निघताना मला अत्तर आणि फुले देण्यात आले. मग त्या सौभाग्यवतीने माझ्या हातात ‘पायरेक्सचा’ मोठा डब्यांचा सेट ठेवला. डबा पाहताच, खूण पटली चेहऱ्यावर हसू पसरलं. मी मनात म्हटलं, “डबे खूप आहेत गं! पण डबा देणारी बारा वर्षांनी भेटली.” तिला हर्षभराने आलिंगन देऊन डब्यासह मी घरी परतले.
एका तपानंतरसुद्धा सुख सुखद स्मृतींचा गोडवा मनाला मोहिनी घालतो. अश्याच गोड आठवणींची भविष्यातही साथ असावी म्हणूनच मी तुला आग्रहाने आमंत्रित करत आहे. तर तू नक्की माझ्याकडे हळदी-कुंकवाला ये. तिळगुळासारखी आपली जवळीक अशीच राहू दे! आणि आपल्या मैत्रीतली गोडीही तिळगुळासारखी अवीट असू दे! अशी सूर्यनारायणाकडे प्रार्थना!
तुझी मैत्रीण,
सौ. अर्चना भिडे
ता. क. – पत्रास उत्तर अपेक्षित आहे. पत्ता – archee456@yahoo.com
सौ. अर्चना भिडे