मराठी संगीतातील रसग्रहण

शृङ्गारहास्य करुणरौद्रवीरभयानकाः।
बीभत्साद्भुतं संज्ञौ चेत्यष्टौ नाट्ये रसाः स्मृताः॥
आचार्य भरतमुनी कृत नाट्यशास्त्र (६.१५)

अर्थ: शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, आणि अद्भुत – हे आठ नाट्यरस आहेत.

निर्वेदस्थायिभावोऽस्ति शान्तोऽपि नवमो रसः।
आचार्य मम्मट कृत – काव्य प्रकाश (४.४७)

अर्थ: (भरतमुनींनी सांगितलेल्या शृंगारादी आठ नाट्यरसांच्या सहित काव्यांच्या बाबतीत) ज्याचा निर्वेद (हा) स्थायीभाव आहे (तो) शांत रस सुद्धा नववा रस आहे.

शृङ्गारहास्य करुणरौद्रवीरभयानकाः।
बीभत्साद्भुतं इत्यष्टौ रसाः शान्तस्तथा मत:॥
पण्डित विश्वनाथ कृत – साहित्य दर्पण (३.१८)

अर्थ: शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, आणि अद्भुत ह्या आठ (नाट्य) रसांच्या सहित शांत (हा नववा रस) आहे.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील उर्द्ध्रुत केलेला ६-१५ श्लोक – आचार्य मम्मट कृत – काव्य प्रकाश

(४-२९)

आचार्य मम्मट कृत – काव्य प्रकाश (४.४७)

आचार्य भरतमुनींनी त्यांच्या ‘नाट्यशास्त्र’ ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात नाटयांमधील म्हणजेच अभिनयात्मक काव्यांतील शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, आणि अद्भुत अश्या आठ रसांचा उल्लेख केला आहे. आचार्य मम्मट यांनी श्राव्य किंवा पाठ्य काव्यांच्या बाबतीत त्यांच्या ‘काव्यप्रकाश’ ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात भरतमुनींनी सांगितलेल्या नाट्यांप्रमाणेच शृंगारादी आठ रसांच्या सह शांत असे एकूण नऊ रस आहेत असा अभिप्राय दिलेला आहे. पंडित विश्वनाथ ह्यांनी त्यांच्या ‘साहित्य दर्पण’ ह्या ग्रंथांत मम्मटाचेंच ‘नवरस मत’ उचलून धरले आहे. रस हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.

शृंगार रस हा बहुश्रुत आणि सर्वाधिक प्रमाणात मराठी संगीतात वापरलेला दिसतो. ‘पाहिले न मी तुला’, ‘सांग कधी कळणार तुला’, किंवा ‘धुंदीत गाऊ वगैरे’ अशी कितीतरी गाणी नकळत शृंगार रसाची प्रचिती देऊन जातात.

हास्य रस हा प्रामुख्याने विनोदी नाटकांमुळे उत्पन्न होत असला तरी ‘टांग टिंग टिंगाक’, ‘गेला माझा सख्खा नवरा’ वगैरे सारखी अजरामर गाणी नकळत आपल्याला हसवून जातात.

करुण रस हा दुःखाची भावना व्यक्त करतांना उद्भवणारा भाव! नायक-नायिका यांचा विरह असो वा भक्ताने परमेश्वराला घातलेली आर्त साद असो, करुण रसाच्या वेगवेगळ्या छटा मराठी संगीतात दिसून येतात. ‘कशी नशिबाने थट्टा’, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ अशी गाणी असोत किंवा अगदी आताआताचे ‘देवा काळजाची हाक एक एकदा तरी’ असो, रसिकांच्या हृदयाचा नकळत ठाव घेतात.

वीर रस हा पराक्रम, शूरी, यशोगाथा वर्णनाने उत्पन्न होणार भाव! ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘बलसागर भारत होवों’, ‘उठा राष्ट्रवीर हों’, ‘जयोऽस्तुते’, ‘शूर आम्हीं सरदार’, वगैरे अशी कितीतरी गाणी अजूनही वीररसाने ओतप्रोत भरलेली आहेत. ही आणि अशी कितीतरी गाणी ऐकल्यावर आजही डोळ्यासमोर नकळत ते दृष्य उभे राहते आणि मराठी मन अभिमानाने आणि वीररसाने परिपूर्ण होते.

‘उष:काल होता होता’ हे गाणं ऐकलं की वीर, करुण आणि बीभत्स रसांची परिपूर्ती होते. खरंच बीभत्स रसात असणारी तिरस्काराची भावना किती अप्रतिम पद्धतीने सुरेश भटांनी गुंफली आहे!

शांत रस हा प्रामुख्याने वैराग्यातील आनंद दर्शवतो म्हणजेच तो भक्तीची भावना व्यक्त करणारा असतो. मराठी साहित्याला लाभलेल्या संतपरंपरेमुळे भक्तीरसाने युक्त अश्या कितीतरी रचनांनी महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकारामांनी महाराष्ट्राला भक्तीरसाने संपन्न केले आहे. अजूनही आपली सकाळ ‘ओंकार स्वरूपा’, ‘अमृताहुनी गोड’, ‘केशवा माधवा’ अश्या भक्तीरसाने होते.

खरोखर महाराष्ट्राला लाभलेल्या संतांनी आणि कवींनी मराठी संगीताला समृद्ध केले आहे. तितक्याच ताकदीने लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर व अजित कडकडे यांच्यासारख्या गायक-गायिकांनी या रचना अजरामर केल्या आहेत.

  • सौ. मधुरा खरे, शॉम्बर्ग