स्वस्थ मी…. अस्वस्थ मी

मी अमित रोग्ये. सोल्युशन आर्किटेक्ट. गेली १० वर्षे मी पूर्णवेळ घरातुनच काम करतो. माझे ऑफिस म्हणजे माझे घर; माझ्या कामाच्या वेळा मीच ठरवतो. घरातून काम करत असल्यामुळे माझे सोशल लाईफ तसं नसल्यागत होते. हळूहळू महाराष्ट्र मंडळात माझ्या ओळखी झाल्या. मी मंडळाच्या कार्यकारणीत सामील झालो, स्थानिक आणि भारतातून येणाऱ्या नाटकांचे सेट उभारण्यात माझ्या कलागुणांना भरपूर वाव मिळाला. अगदी मनापासून हे काम मी एन्जॉय करतो. यामुळे आणि गेल्या तीन-चार वर्षांत जिवाभावाची मित्र-मंडळी सुद्धा जमली आहेत.

सगळे आलबेल सुरु होते आणि २०२० च्या पहिल्या काही महिन्यातच कॉरोना विषाणुच्या महामारीने संपूर्ण विश्वाला व्यापले. त्यात अमेरिकेची अवस्था अतिशय बिकट झाली. या काळात कधीही न बघितलेले आणि अनुभवलेले असे अनेक बदल झाले. सगळ्यांसाठी त्यात सर्वात मोठ्ठा बदल होता तो म्हणजे work from home, पण माझ्यासाठी हे काही नवीन नव्हते. मला फरक पडला तो सोशल लाईफ नसल्याचा. मित्रांना समोरासमोर भेटण बंद झाले. WhatsApp मुळे आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात तर होतोच. Zoom वरून आम्ही व्हिडिओ कॉल करून virtually भेटू  लागलो. त्यातपण गंमत वाटायला लागली. घरातून zoom वरून crossfit व्यायामपण सुरु होता. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून निलेश मालपेकरने दिलेला २० दिवसांचा facebook pushups challenge देखील पूर्ण केला.

कामाशिवाय बाहेर जाण्यावर निर्बंध तर होताच पण हळूहळू काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या होत्या की आपल्याला मास्क घातल्याशिवाय बाहेर जाणे अशक्य आहे.  पण मास्क मिळत कुठे होते? मग नवीन चंग  बांधला. “मास्क बनवण्याचा”. एकाही दुकानात सुती कापड किंवा एकही धागा शिल्लक नव्हता. शेवटी खूप वेळा दुकानात खेटा मारून आम्हाला मास्क  शिवायचे सामान मिळाले आणि मास्क बनवणे सुरु झाले. माझ्या सासूबाईंनी देखील मला खूप मदत केली. थोड्याच दिवसात आम्ही दोघे एवढे सरावलो की आमचा वेग प्रचंड वाढला. सगळ्या मित्र मैत्रिणींना, ओळखीच्यांना तसेच अनोळखी लोकांनाही आणि जवळपासच्या health care workers पर्यंतही ते मास्क पोहोचवले.

कॉरोनाचा प्रादुर्भाव सुरूच होता. पण मला मात्र इतक्यावरती शांत बसवत नव्हते. माझा तसा स्वभावच नाही. काही महिन्यांपुर्वी मी कल्लोळ या संस्थेचा सभासद झालो होतो. या संस्थेचा मूळ उद्देश्य आहे, जे काहीही छान ऐकण्याजोगं, बघण्याजोगं आहे त्याला व्यासपीठ आणि प्रेक्षक उपलब्ध करून द्यायचे. शिवाय आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रतिभेला (local talent) वाव देणे. पण सध्या करोना मुळे काही करणे शक्य वाटतं नव्हते. पण मग आम्ही काहीतरी नवीन करायचे ठरवले. आणि त्यातून ‘Online Program’ ही संकल्पना अस्तित्वात आली. आमच्यासाठी सुद्धा हे एक आव्हान होते. आम्ही आमची जिद्द आणि सर्वस्व पणाला लावायचे ठरवले व ते पेलण्याची पूर्ण तयारी केली. Streaming साठी लागणारे तंत्रज्ञान सांभाळण्याची जबाबदारी मी स्वीकारली. इतरांनी जमेल तसे इतर मंडळांशी संपर्क केले. आणि बघता बघता  ६-७  मंडळे एकत्र आली. या marketing effort मध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. छोटीशी मदतसुद्धा बरेचसे काम हलकं करत होती. खूप अडचणी येत होत्या पण वेळोवेळी त्याचे उपाय सुद्धा मिळत होते. सर्वांची सकारात्मक भावना काम करत होती. प्रत्येकाच्या मदतीने १-२ नाही तर ३ प्रोग्रॅम सेट झाले. बघता बघता पहिल्याच प्रोग्रामने अगदी धमाल केली आणि अपेक्षेपेक्षा मोठं घवघवित यश आणुन आमच्या पुढ्यात ठेवलं. सर्वांनी खूप कौतुक केले. आता पुढचे २ प्रोग्रॅम जुलै महिन्यात प्रसारित होणार आहेत आणि आता सगळ्यांच्या नजरा त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. 

माझी स्वप्न एका जागी थांबण्याची नाहीत तर उंच भरारी मारण्याची आहेत आणि तशी मित्र-मंडळी पण जोडली जात आहेत. ह्या कठीण वेळेत, मी स्वतःला कामात गुंतवुन ठेवत आहे आणि माझी मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे


अमित रोग्ये 
Plainfield, IL