मन की बात

मी श्रुती तेंडुलकर रोग्ये. मी एक गृहिणी आहे. माझा नवरा गेले १० वर्षे घरातून काम करतोय. मुलगा १० वी मध्ये आहे. खरं तर कोरोना विषाणूच्या येण्याने माझ्या आयुष्यात काही खास फरक पडला नव्हता. असे मला वाटत होते. आईबाबा वर्षाच्या सुरवातीलाच माझ्याकडे आले होते. त्यांच्या बरोबर वेळ खूप छान जात होता.  

फेब्रुवारीमध्ये आई आजारी झाली होती. हॉस्पिटलमध्ये होती. ती बरी होऊन घरी येते न येते तोपर्यंत कोरोनाच्या अस्तित्वाची जाणीव चहुबाजुंनी व्हायला लागली होती. कधी टीव्हीवर बातम्यांमधून तर कधी मित्रमंडळी व आप्तेष्टांच्या बोलण्यातून. सगळीकडे निरनिराळ्या शंका कुशंका व काळजीची छाया पसरायला लागली होती. 

आणि हा हा  म्हणता म्हणता मुलांच्या शाळा बंद झाल्या. दुकानांबाहेर जीवनाआवश्यक वस्तूंसाठी लांबच लांब रांगा लागू लागल्या. तासंतास रांग लावूनही पदरात काहीच पडत नव्हते. सगळी दुकाने पण रिकामी झाली होती. काय चाललंय आणि काय होणार आहे ते काही कळत नव्हते. सगळा गोंधळ उडाला होता. 

माझ्यावर माझ्या आईबाबांची पण जबाबदारी होती. त्यांना आम्ही कुठेही बाहेर पडू देत नव्हतो. हळूहळू गोष्टी स्प्ष्ट व्हायला लागल्या होत्या. बाहेर पडताना मास्क घालणे जरुरी आहे, घराबाहेर वावरताना ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे, विकत आणलेल्या सगळ्या वस्तू disinfect करून मग जागच्याजागी ठेवायच्या असे एक  ना अनेक नवीन बदल रोजच्या जीवनात व्हायला लागले. दिवसभर घरात बसून काय करायचे म्हणून बऱ्याच वर्षांनंतर मी आणि माझ्या आईने परसबागेत फळभाज्या लावल्या आहेत. आम्ही रोज झाडांना, गवताला पाणी घालतो. आईकडून मी नवीन नवीन पदार्थ करायला शिकते आहे. बाबांबरोबर रोज चालायला जाते. आता आमचं gym पण सुरु झालंय. सगळ्या होणाऱ्या बदलांना हसत हसत स्वीकारत आपण सगळेच  पुढे चाललोय. याच विश्वासाने एक दिवस आपण सगळे या विषाणूंवर मात नक्कीच करू. 

आज मी आईकडून शिकलेली एक पाककृती तुम्हां सगळ्यांबरोबर share करतेय. 

वाटाणा पॅटीस 

साहित्य: ४ बटाटे उकडून, १ मोठा कांदा बारीक चिरून, ४ वाट्या वाटणे, १ वाटी bread crumbs, १/२ वाटी तेल, १ चमचा राई, १/४ चमचा हिंग, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, २ चमचे गोडा मसाला, १ चमचा लिंबाचा रस, १ वाटी रवा, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा साखर, मीठ चवीनुसार 

कृती:

  1. उकडलेले बटाटे सोलून mash करून घ्यावेत. त्यात bread crumbs घालून सगळे छान मिसळून घेणे. 
  2. एका पातेल्यात २ चमचे तेल गरम करून त्यात हिंग, राईची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, थोडेसे मीठ घालून परतून घ्यावा. कांदा मऊ झाला की त्यात लाल तिखट, हळद, गोडा मसाला, साखर व लिंबाचा रस घालून परतून घ्यावे. 
  3. मग त्यात वाटणे घालून परत सगळे परतून घ्यावे. ते मंद आचेवर ८ ते १० मिनिटे झाकून ठेवावे. मग गॅस बंद करावा.
  4. बटाटा व bread crumbच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून, हातानेच पुरीच्या आकाराच्या लाट्या बनवायच्या. एक लाटी हातावर घेऊन त्यात वाटाण्याचे मिश्रण भरायचे व दुसरी तयार लाटी त्यावर ठेऊन सगळ्या बाजूने नीट दाबून बंद करायची. पूर्ण एकजीव गोळा झाल्यावर रव्यात घोळवून घ्यायचे. 
  5. तव्यावर थोडे थोडे तेल घेऊन त्यात हे पॅटिस खरपूस तळून घ्यायचे.
  6. गरम गरम पॅटिस चटणी बरोबर खावेत. 

सूचना: पॅटिस shallow fry करावेत. पॅटिस च्या दोन्ही बाजूंना तळल्यावर लालसर रंग आला पाहिजे.


श्रुती तेंडुलकर रोग्ये 
Plainfield, IL