ऊर्जा

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ शिकागो ने हा जो COVID-19 मुळे आपल्या आयुष्यात जो काही बदल झालेला आहे, त्याबद्दलचा एक विशेषांक काढायचे ठरवले आहे, त्याबद्दल प्रथम त्यांचे कौतुक. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तिप्रमाणे, मागच्याला शहाणे होण्यासाठी पुढच्याने अडखळायलाच पाहिजे असं काही नाही, तर आता, एकाचा अनुभव दुसऱ्याशी share केला, तरी हा सकारात्मक परिणाम घडवण्याची ताकद या अशा सामाजिक माध्यमांमध्ये आहे. महाराष्ट्र मंडळाने हे ओळखून हा विशेषांक काढायचे ठरवलं, म्हणून त्यांचं विशेष कौतुक.

या लेखाच्या निमित्ताने मलाही सिहावलोकन करायची एक संधी लाभली. खरंच विचार करायला सुरुवात केली, तेव्हा जाणवलं की हो COVID-19 मुळे आयुष्यात कितीतरी फरक पडला. माझ्याबद्दल सांगायचं तर माझं स्वतःच करिअरसुद्धा वेगळ्या वळणावर पोहोचले. एडवोकेट हॉस्पिटल डेंटल क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस मॅनेजर म्हणून मी काम करत होते. वर्क फ्रॉम होम सुरू झालं झालं आणि Path Insights या आमच्या IT Consulting कंपनीत प्रेसिडेंट म्हणून ऑफिशियली काम चालू केलं. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचे ट्रैनिंग मॉड्युल्स तयार करून, आमच्या आमच्या कंपनीचा ट्रैनिंग व्यवसाय अगदी नावारूपाला आणला. आयुष्याला एक नवीन वळण मिळालं.

याचबरोबर ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्याचं आपण काही देणं लागतो, आमच्या “सहाय्य” या नॉन प्रॉफिट ऑरगॅनिझशनची स्थापना ह्याच भावनेतून झाली. अनेक गरजूना पैशाचे आणि धान्याचे अनुदान तसेच अनेकांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्यात साहाय्य नेहेमीच तत्पर असतं. याप्रमाणे, साहाय्य तर्फे दर सोमवारी शिकागोच्या लॉरेटो हॉस्पिटलच्या सुमारे १२० COVID योध्यांना आम्ही जेवण पुरवू शकलो, हाच आमच्यातर्फे COVID विरुद्धच्या युद्धात खारीचा वाटा. याचबरोबर सामाजिक विषमता निर्मूलनाचे ध्येय उराशी बाळगत शिकागोच्या उपेक्षित नगरांमध्ये कार्य करणाऱ्या PRIDE ROC या संस्थेला, सहाय्य तर्फे वेळोवेळी आर्थिक आणि खाद्यपदार्थाचे वितरण केलं जातं. तसेच सीनियर सिटीजन होम DuPagePads आणि Hessed House या शेल्टर होम्स मध्ये जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा तेव्हा “सहाय्य’ संस्थेतर्फे जेवणाची, धान्याची आणि आर्थिक मदत केली जाते. 

Lock Down च्या या निराशजनक काळात, सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी, Together We Can च्या Web Series च्या माध्यमातून, अनेकांना त्यांची कला आणि कौशल्य समाजासमोर सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला जातो. Together We Can ची संकल्पना हळूहळू विकसित झाली. एकाला एक माणसं जोडली गेली, कारवा बढता गया।

त्याचबरोबर Lock Down च्या सुरुवातीच्या काळात, समाजातील सर्व लोकांनां सहभागी करून घेण्यासाठी तीन प्रकारच्या गानप्रकारांचे video करायचे ठरवले. अगदी त्रिवेणी संगमचं म्हणा ना. एक लावणी, एक Rap, आणि एक शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी बसवताना, COVID-19 ची साथ आणि ती टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर भर दिला होता. लावणीच्या माध्यमातून COVID योध्यांना मानाचा मुजरा, तर शास्त्रीय संगीताच्या बंदिशींतून,  COVID रोखण्यासाठी योजल्या जाणाऱ्या सर्वच प्रयत्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. लोकांना एकत्र आणून, विधायक दृष्टिकोन दिला तर नक्कीच यातून सकारात्मक परिणाम घडू शकतात, हे आम्ही सर्वानी प्रत्यक्ष्य अनुभवलं.

त्याच बरोबर, घरात अडकून पडलेल्या गृहिणींना आणि काही उत्साही बल्लवाचार्याना आपल्या पाककृती समाजासमोर आणण्यासाठी ‘POTLUCK’ हे रेसिपी बुक प्रकाशित केले. त्यामध्ये जवळजवळ 180 पाककृती आहेत. Lock Down च्या काळात घरात असलेल्या साहित्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या, स्वादिष्ट आणि अभिनव अशा पाककृतीचा समावेश यात आहे.  त्याचे प्रकाशन दीपाताई देशमुख या प्रथितयश आहारतज्ञांच्या (Nutritional counselor) हस्ते झाले. या पुस्तिकेला प्रस्तावना आपल्या सर्वांचे लाडके खव्वयेफेम श्री. प्रशांत दामले यांनी दिली आहे. याच्या छापील प्रती लवकरच बाजारात उपलब्ध होतील.

Lock Down मध्ये आपण Work From Home करत असताना, आपल्या बांधवांचे चरितार्थ जे रोजच्या नाट्यप्रयोगावर चालंत, ते अचानक स्तब्ध झाले. भारतातील नाट्यक्षेत्रातले पडद्यामागचे कलाकार (Backstage Artists), यांच्या मदतीसाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या आणि त्याला संलग्न असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्यांनी १७ हजार डॉलर चा निधी उभारला आणि तो महाराष्ट्र फौंडेशन, नाम आणि दिलासा या संस्थांतर्फे गरजुंपर्यन्त पोहोचवण्याची व्यवस्था केली.

तसेच इथे अडकलेल्या अनेक अनिवासी भारतीयांसाठी, इंडियन Task Force बरोबर कार्य करताना, अनेकांना आर्थिक, सामाजिक आधाराची गरज होती, अनेक वेळेला या मदतीच्या वार्ता प्रसारणासाठी महाराष्ट्र मंडळ शिकागोने वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला  आणि अजूनही करत आहेत हे प्रकर्षाने जाणवलं. 

अजूनही ही  वेळ सरलेली नाही. अजूनही बऱ्याच गरजुंना आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. मानवजातीवर  आलेल्या या कालातीत अनिष्टचक्राला परावृत् करण्यासाठी, आपण खंबीरपणे उभे राहणं हीच आपल्या पिढीची कसोटी आहे.

आयुष्यामध्ये वेळ काळ काही सांगून येत नाही. पण त्या वेळेचा जर आपण सकारात्मक विचारातून सदुपयोग केला तर नक्कीच आपल्याला स्वतःमध्ये आणि समाजामध्ये चांगले बदल घडवता येतात, हीच COVID काळची शिकवण.


विद्या जोशी
Naperville, IL