२०२०: २० पुशअप्स २० दिवस

२० मार्चला सुनीलाचा फेसबुकवर संदेश आला की मी तुला #20pushups20days चॅलेंजसाठी टॅग केलंय, करणार ना? सुनीलाशी माझी ओळख ढोलताशामुळे; गेली दोन वर्ष आम्ही BMM ला भेटतोय. COVID-१९ मुळे ऑफिसचं   काम घरातूनच चालू होतं, LifeTime क्लबला जाणं पण बंद झालं होतं, त्यामुळे फिटनेसच्या नावाने तशी बोंबच होती. तिचा मेसेज बघितला आणि मनात नकारघंटा वाजू लागल्या. एक अडचण होती ती म्हणजे दररोज FB वर २० पुश-अप्स चा व्हिडीओ टाकायचा. एकतर मार्क झुकरबर्गला माझ्या आयुष्यात काय चाललंय हे सांगायची मला गरज वाटत नव्हती आणि मी स्वतः analytics क्षेत्रात असल्यानं मला तो डाटा कसा इतर गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो याची चांगलीच माहिती होती. पण म्हणतात ना चांगल्या कामासाठी एखादं चांगलं कारण मिळालं तरी हो म्हणून कामाला लागावं. पहिल्या दिवशी २० पुश-अप्स करताना चांगलीच दमछाक झाली तरी २१ मार्चला मी माझा पहिला व्हिडीओ FB वर टाकलासुद्धा. आता फक्त नियमितपणे पुश-अप्स मारणं आणि इतरांना या चॅलेंजमध्ये सामिल करून घेणं हेच बाकी होतं. 

आपल्या इथले अमित रोग्ये, श्रुती तेंडुलकर रोग्ये, चिन्मय ढवळे, समीर सावंत हे पटकन तयार झाले. अमित व श्रुती, त्यांच्या क्रॉस-फिट क्लास नंतर एक्स्ट्रा पुश-अप्स करायला लागले खास ह्या चॅलेंजसाठी. चिन्मय दादा तर वेगवेगळ्या प्रकारचे पुश-अप्सचे व्हिडीओ टाकून मला व इतरांना प्रेरित करू लागला. टीना कांदेच्या फक्त एका पुशअप्स पोस्टने खूप मुलींचा हुरूप वाढवला. समीर तसा लांब पल्ल्याचा धावपटू त्याने पण ह्या निमित्ताने पुश-अप्स घालायला सुरुवात केली. शाळा, कॉलेज च्या व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला की ‘है कोई माय का लाल फॉर #20pushups20days?’ त्यातुन सतीश शेट, स्वरूप गोखले, वंदना बाने हे तयार झाले. सतीशने तर त्याच्या बऱ्याच मित्रांना प्रेरणा देऊन चॅलेंजमध्ये सहभागी केले. काही जणांना FB वर आपले व्हिडीओ टाकायचे नव्हते पण ते रोज २० पुश-अप्स करायचा प्रामाणिक प्रयत्न करत होते व मला व्हिडीओ पाठवत होते. आमच्या कॉलेजच्या व्हाट्सअप ग्रुप वर तर काहीजण ४० ४० पुश-अप्स चे व्हिडीओ टाकत होते. काहींनी पुश-अप्स कसे घालायचे इथपासून सुरुवात केली तर काहींनी सूर्यनमस्कार घालत जा रे तर काहींनी रोज एक पुश-अप्स जास्त घाल असे सल्ले सुद्धा दिले. बघता बघता दहा एप्रिल उजाडला आणि माझं चॅलेंज संपलं सुद्धा. 

ह्या वीस दिवसात मी काय नवीन कमावलं? एक नवीन सवय, काही नवीन मित्र, काही जुन्या मित्रांची नव्यानं ओळख आणि निरोगी जीवनक्रम!         


निलेश मालपेकर
Lincolnshire, IL