Caring through Learning and Sharing

गेल्या २-३ महिन्यात कोविड मुळे एक नक्की समजलं की काही चांगलं काम किंवा दुसऱ्यांना मदत करायची असेल तर ती आज किंवा आत्ताच केली पाहिजे कारण उद्याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मग काय करावं बरं असा विचार मनात आला. एखादी चांगली गोष्ट करताना, कोणालाही न वगळता सर्वांना सामावून घेता आलं, तर त्याची मजा काही वेगळीच असते. 

आणि मग एप्रिल महिन्यात मी दररोज १२ सूर्य नमस्कार करण्याचा निश्चय केला. फेसबुकच्या साहाय्याने सगळ्या मित्र मैत्रिणींना त्यात सामील व्हायची विनंती केली. आणि तब्बल चोपन्न जण या सूर्यनमस्काराच्या यज्ञात सामील झाले. हे सगळे मित्रमैत्रिणी होते, चार खंडातील (उत्तर अमेरिका, आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलिया) पाच देशातून (अमेरिका, भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि सिंगापूर). सगळ्यांची पार्श्वभूमी पण वेगवेगळी होती पण रोज नेमाने सूर्य नमस्कार करण्याचा निश्चय मात्र एकच होता. काहीजण तर सूर्य नमस्कार करायला या उपक्रमातून शिकले. काहींनी तर मला मे महिन्यातसुद्धा हा उपक्रम सुरु ठेवायचा सल्ला दिला. ज्यांना आताही सूर्यनमस्कार करायला शिकायचं असेल तर ही लिंक बघून तुम्ही शिकू शकाल. 

कोविड-१९ मध्ये स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचं महत्त्व अजूनच जाणवलं. आणि त्या विचारातूनच मग माझ्या YouTube चॅनेलचा पुनरुद्धार करायचं ठरवलं आणि सर्वांनाच त्याची मजा घेऊ द्यायचं ठरवलं. ‘दुसऱ्यांची काळजी, आपण जे शिकलोय ते त्यांच्यासाठी सहजगत्या उपलब्ध करून घ्यायची’ म्हणजेच ‘Caring through Learning and Sharing ‘ हे ब्रीदवाक्य ठरलं. आणि मग श्रीमती चंद्रकला मालपेकर यांच्याकडून शिकलेली ‘ऋषीची भाजी’, ‘वालाची उसळ’, सौ अनुराधा पोतदार (पूर्वाश्रमीची रत्नश्री) यांच्याकडून शिकलेलं  ‘माशाचं कालवण’, आई म्हणजे कै रत्नबाला नीलरत्न जव्हेरी हिच्याकडून शिकलेली ‘भाकरी’ यांचे विडिओ करून सगळ्यांसाठी YouTube चॅनेल वरून प्रकाशित केले. चार मैत्रिणींनी तर मस्त जमलेल्या भाकरीचे फोटो सुद्धा पाठवले. काहींनी text message तर काहींनी प्रत्यक्ष फोन करून अभिनंदन केले. या चॅनेलची लिंक आहे https://www.youtube.com/channel/UCxXrfirzGtlU2MB_bLcRkcA

काही मित्र मैत्रिणींनी विडिओ अजून चांगला कसा करता येईल याच्या टिप्स पण दिल्या.

आता कोविड-१९ लवकर संपू दे, पण त्याच्यामुळे सुरु झालेले काही चांगले उपक्रम असेच चालू राहोत हीच सदिच्छा! 


रत्नांगी निलेश मालपेकर 
Lincolnshire, IL