कोविडचे दिवस, मराठी समाज आणि मी

सप्टेंबर २०१८ मध्ये मी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या साऊथ एशियन लॅंग्वेजेस ऍन्ड सिव्हिलायझेशन्स विभागात सहायक   प्राध्यापक म्हणून मराठी शिकवायला हजर झाले. थोडे दिवस शहर आणि देश समजून घेण्यातच गेले. मग येथील मराठी समाजाशी थोडी थोडी ओळख झाली.  सौ. विद्या जोशी यांनी शिकागो मराठी शाळेत महाराष्ट्र दिनाला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित केले, तेव्हा महाराष्ट्र दिनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम पहायला मिळाला, इथे मराठी मंडळी भरपूर काम करत आहेत आणि एकमेकांच्या संपर्कात आहेत, हे लक्षात आलं. परंतु नंतर भौगोलिक दृष्ट्या मी खूप दूर असल्यामुळे पुन्हा मराठी समाजाशी फारसा संबंध आला नाही. तिकडे कितीही चांगले कार्यक्रम होत असले, तरी मी जाऊ शकत नव्हते. एवढा मोठा मराठी समाज असूनही आपण कोणाला भेटू शकत नाही, आपल्याला मराठी बोलायला कोणी आसपास नाही हे सतत जाणवत राहिलं. 

मग कुणाला काही कळायच्या आतच कोविडने सगळ्या जगाला ग्रासलं. आता घरी बसून शिकवायचं होतं. आणखीनच समाजाशी संपर्क तुटला. आता काय होणार याची चिंता लागून राहिली. मग अचानक एक दिवस सौ. उल्का नगरकर यांचा फोन आला. ‘एक नवीन व्हॉट्स अप ग्रुप सुरू करतो आहोत, कारण सर्वांना या काळामध्ये एकमेकांशी जोडलेलं असण्याची गरज आहे. तर तुम्हाला या ग्रुपमध्ये यायचं आहे का?’ असं त्यांनी विचारलं. मी ‘हो’ म्हटलं. त्यांनी मला ग्रुपमध्ये दाखल करून घेतलं. ग्रूपचं नावच मजेदार होतं, आपल्या मराठीपणाला साजेसं. ‘आमचा नादच खुळा.’ पुढे त्याचं ‘अंक’ हे त्याच्या इंग्रजी स्पेलिंगचं लघुरूप झालं. प्रथम सर्वजणी ग्रुपवर नुसत्या गप्पा मारत होत्या आणि ग्रुपमधल्या सदस्यांची संख्या खूप असल्याने अनेक विषय एकाच वेळेस सुरू होते.  कोणीही कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलत होतं. ते फक्त बोलणं होतं एकमेकांशी जोडलेलं राहण्याचा तो एक प्रयत्न होता. थोडे दिवस गेल्यानंतर उल्का नगरकर यांनी ग्रुपला रोज एक उपक्रम द्यायला सुरुवात केली. हे उपक्रम खूप मजेदार होते. कधी स्वतःच्या बालपणाविषयी बोलायचं, कधी आपल्या बालमैत्रिणींविषयी. कधी आपल्या सासू-सासर्‍यांविषयी बोलायचं, कधी आपलं लग्न कसं झालं त्याविषयी बोलायचं या पर्सनल माहितीपासून नंतर इतरही अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर उपक्रम दिले गेले आणि बायका भरभरून बोलत राहिल्या. (हो, एक सांगायचं राहिलं, की हा ग्रुप फक्त स्त्रियांसाठी होता.) मनं मोकळी होत गेली, जुळत गेली, फुलत गेली. सतत अपडेट्स पाहणं शक्य नव्हतं, काही गोष्टी सुटून जायच्या. पण कुठूनही पहायला सुरुवात केली तरी काही न काही चांगलं सापडायचंच. मग हळूहळू त्या ग्रुपमध्ये एक टॅलेंट शो करण्याची कल्पना पुढे आली. मग ऑनलाईन टॅलेंट शो सुरू झाले. टॅलेंट शोमध्ये काही चांगल्या गायिका होत्या, काही चांगल्या सादरकर्त्या होत्या. प्रत्येकीने काही ना काही सादर केलं.  मी उत्साहाने या टॅलेंट शोमध्ये माझ्या कथा सादर करायला सुरुवात केली या कथांना खूप चांगला श्रोतृवर्ग मला मिळाला. कथा ऐकल्यानंतर काही बायकांनी मला वैयक्तिक मेसेज पाठवले, ओळख करून घेतली, कथा आवडल्याचं सांगितलं आणि बघता बघता मला भरपूर मैत्रिणी मिळाल्या. मराठी समाजाच्या संपर्कात राहण्याचं माझं स्वप्न असं अचानक पूर्ण झालं. आता मी असं अभिमानाने म्हणू शकते, की तीस-पस्तीस बायकांना तरी मी ओळखते आणि त्या मला ओळखतात. आणि आता मला खात्री आहे, की भौगोलिक दृष्ट्या मी खूप दूर असले तरी या माझ्या मैत्रिणींच्या मी आता कायम जवळ राहीन. या मैत्रिणींना मी फक्त ऑनलाईन पाहिलं आहे, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप उत्सुकता आहे. पण हे सगळं केवळ आणि केवळ या ग्रुपमुळे झालं. उल्का नगरकर यांना धन्यवाद द्यावेत तितके कमीच. 

कधी कधी या ग्रुपच्या वतीने कार्यशाळा घेतल्या गेल्या. मदर्स डे’च्या निमित्ताने, फादर्स डेच्या निमित्ताने. या कार्यशाळांमध्ये अल्झायमर, आपल्या आरोग्याची काळजी, वास्तुव्यवहार मार्गदर्शन, अर्थव्यवहार मार्गदर्शन, त्वचेची काळजी किंवा आरोग्यदायी आहार, चित्रकला, नृत्य अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. 

तसेच ग्रुपवर कधी कधी वेगवेगळ्या रेसिपीज बायका शेअर करत होत्याच यातूनच प्रत्येक आठवड्याला एक विशिष्ट अन्नघटक देऊन पाककृती स्पर्धा घेण्याची कल्पना पुढे आली आणि ही कल्पना अतिशय शिस्तशीरपणे राबवली गेली. पाककृती हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण त्या निमित्ताने आरोग्य आणि पाककृती, पाककृतीचे उत्तम सादरीकरण असे अनेक संबंधित विषयही चर्चिले गेले.

या ग्रुपमुळे आणखी काही चांगल्या उपक्रमांमध्ये मी भाग घेतला. त्यातला एक चांगला उपक्रम म्हणजे ज्ञानेश्वरी अभ्यास. ज्ञानेश्वरी पूर्वीच वाचली होती आणि तो माझ्या अभ्यासाचा भाग असल्यामुळे तिच्या सतत संपर्कात राहणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायक होतं. अशा काळात मला एक ज्ञानेश्वरीचा वाचन करणारा ग्रुप मिळाला. अर्चना नुकल यांनी हा ग्रूप सुरू केला. आठवड्यातून एकदा भेटायचं, ज्ञानेश्वरीचा एकेक अध्याय घेऊन प्रत्येक ओवी वाचायची आणि तिचा अर्थ वाचायचा अशी आम्ही सुरुवात केली. या निमित्ताने ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी या विषयी चर्चा सुरू झाली.

मला योगाभ्यास करायचा होता, इथे मला योगाभ्यास शिकवणारी अनुपमा बुझरुक यांच्यासारखी अनुभवी, उत्तम शिक्षिका मिळाली त्यांचे काही ध्यानाचे वर्ग पण मी केले. 

अशा अनेक उपक्रमांच्या निमित्ताने सर्व मराठी समाज एकमेकांच्या सतत संपर्कात राहिला, कोणी एकाकी पडलं नाही, कोणालाही या काळात आता काय, कसं करावं असं वाटलं नाही सर्व गोष्टींमध्ये सकारात्मकता पूर्णपणे भरून राहिलेली होती. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे महाआपत्तीच्या काळात समूहातील सर्व लोकांना एकत्र आणणं, त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणं, सर्व लोकांना विधायक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं हे सोपं नाही. ज्या काळामध्ये सर्वांनी एकमेकांपासून दूर राहावं अशी परिस्थिती निर्माण झाली त्या काळात सुद्धा लोकांची समाजसंपर्काची गरज अशी भागवली गेली. 

हा सर्व काळ माझ्यासाठी अत्यंत विधायक स्वरूपाचा गेला. एकीकडे मी मी ऑनलाईन शिकवत होते आणि या सर्व गोष्टी चालू होत्या. मला वाटतं, पूर्वीपेक्षा आता ऑनलाईन गोष्टी करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने आपण ज्या गोष्टी भौगोलिक अंतरामुळे शिकू शकत नव्हतो किंवा शिकू शकलो नसतो त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिकणे आता सहज शक्य झाले आहे. उदाहरणार्थ कानडी भाषा शिकण्याचं माझं बरेच दिवस स्वप्न होतं, त्याचा पाठपुरावा मी या काळात केला. मोडी लिपी एकदा शिकले होते पण शिकलेल्या गोष्टी पुन्हा ताज्या करण्याची माझी इच्छा होती, तेही आता सुरू होत आहे. पर्श्यन मी एकदा शिकले होते तेही या काळात मला रिफ्रेश करता आलं. 

या सगळ्याचा अर्थ असा नाही, की लोकांनी एकमेकांना भेटू नये आणि ऑनलाईन गोष्टीच करत राहाव्यात. एकमेकांना तर भेटायचंच आहे आणि आशा आहे की लवकरच कोविडकाळाची काळी रात्र संपून आपण आपल्या नेहमीच्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या जगात खऱ्याखुर्‍या माणसांना भेटू. त्या दिवसाची मी वाट पाहत आहे.


सुजाता महाजन 
Chicago, IL