सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ

सदाशिवराव चिमणाजी उर्फ भाऊसाहेब उपाख्य सदाशिवरावभाऊ! आपण लहानपणापासून पानिपतच्या तिसऱ्या युद्धाविषयी ऐकलेलं असतं, आणि ते युद्ध हरण्याचं मुख्य खापर कायमच फोडलं गेलेलं असतं ते म्हणजे सदाशिवरावभाऊ नावाच्या एका व्यक्तीवर. अर्थात, लहानपणी केवळ परीक्षेत ‘इतिहासात नापास नको व्हायला म्हणून कसंतरी पाठ केलेल्या त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमध्ये हा सदाशिवरावभाऊ नेमका कोण, कुठे राहायचा’ हे मात्र समजत नाही, आणि जेव्हा समजायला लागतं तेव्हा मात्र लहानपणीच मनावर कोरल गेलेलं ते त्याचं चित्रं कायमच घर करून राहतं.

खरंच कोण होता हा सदाशिवरावभाऊ? चला थोडी उजळणी करूया. स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या, छत्रपती शाहू महाराजांचा पेशवा असलेल्या महापराक्रमी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा पुतण्या. वसईसारखा प्रदेश पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवून उत्तर कोकणातील जनतेला सुटकेचा श्वास सोडायला लावणाऱ्या चिमाजीअप्पांचा हा मुलगा. मग हा असा कसा निपजला? मराठ्यांची एक पिढीच्या पिढी याने पानिपतात घालवली आणि आपल्या पुतण्यासह स्वतःही जीव गमावून आला? हा शुद्ध अव्यवहारीपणा नाही का? किंबहुना, ज्या आपल्या चुलतभावाला साधा लढाईचा अनुभव नाही अशाला पानिपतावर अब्दालीशी लढायला पाठवणारा नानासाहेब पेशवा किती अक्कलशून्य, नाही?

नाही! खरंच नाही. सदाशिवरावभाऊंचं लढाईचा अनुभव नसणारा, अहंकारी, तापट असं चित्रण बखरकारांनी आपल्यासमोर उभं केलं खरं, पण ही व्यक्ती अशी मुळातच नव्हती. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला दुय्यम आणि तिय्यम साधने बाजूला ठेऊन प्रथम दर्जाच्या साधनांचा विचार करावा लागतो. ही साधने कोणती? तर समकालीन पत्रव्यवहार.

सदाशिवरावभाऊंच्या संबंधी अनेक पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यातील शेकड्याने पत्रं रियासतकार सरदेसाईंनी ‘पेशवे दफ्तर’च्या अनेक खंडांमध्ये प्रसिद्ध केली आहेत. तितकीच पत्रं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय भाऊसाहेबांची कैफियत या नावाचंही एक बखरवजा चरित्र समकालीन आहे, ते भाऊसाहेबांच्याच अत्यंत जवळच्या असणाऱ्या नाना पुरंदरे यांनीं लिहिलेलं आहे. या लहानशा हकीकतीलाच पुढे कोणीतरी चढवून वाढवून भाऊसाहेबांची बखर बनवली आणि त्यांच्यासंबंधी अनेक गैरसमज पसरले गेले. या सगळ्या पलीकडे खरे भाऊसाहेब कसे होते हे आपण पाहूया.

दि. ४ ऑगस्ट १७३३ रोजी पुण्यात चिमाजीअप्पा आणि रखमाबाईंच्या या पुत्राचा जन्म झाला, आणि दहाव्या दिवशी म्हणजे दि. १४ ऑगस्ट रोजी बाळाचे बारसे करण्यात आले. श्रीहरिहरेश्वर हे भट-पेशवे घराण्याचे कुलदैवत. आणि म्हणूनच बाळाचे नाव ठेवण्यात आले तेच शंकराच्या नावावरून.. ‘सदाशिव’. पण दैव काहीसं विचित्र असतं. लहानग्या सदाशिवाच्या जन्मानंतर जेमतेम महिना व्हायच्या आतच, दि. ३१ ऑगस्ट रोजी रखमाबाईंचा बाळंतरोगाने मृत्यू झाला. या रखमाबाई म्हणजे पेशवाईच्या उत्तरकाळात गाजलेल्या, बारभाई कारस्थानात प्रसिद्ध त्र्यंबकरावमामा पेठे यांची सख्खी बहीण होय. आई गेली तरी आजी राधाबाई, काकू (बाजीरावांची पत्नी) काशीबाई आणि वहिनी (नानासाहेबांची पत्नी) गोपिकाबाई यांनी लहानग्या सदाशिवाला मायेची उणीव भासू दिली नाही. पुढे चिमाजीअप्पांनी सदाशिवाच्या संगोपनासाठी दुसरं लग्न केलं ते अन्नपूर्णाबाईंशी. अगदी स्वतः रणझुंजार बाजीराव पेशवे हे युद्धावर असतानाही आपल्या लहानग्या लाडक्या पुतण्याची चौकशी मातोश्री राधाबाईंकडे करताना आपल्याला दिसतात. आजीला तर नातवाचा भारीच लळा, क्षणभरही त्याला बाजूला ठेऊ असं राधाबाईंना वाटायचं. इ.स. १७३५ मध्ये त्या जेव्हा काशीयात्रेला जायला निघाल्या तेव्हा ५ वर्षांच्या सदाशिवाला घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती. पण अर्थात, काशी म्हणजे मुघलांच्या ताब्यातील मुलुख, त्यातच बाजीराव उत्तरेत मुघलांना सळो का पळो करून सोडत होते. अश्या वेळेस लहान मुलाला पाठवणं हे चिमाजीअप्पांनाही रुचलं नाही. ते स्वतः स्वारीवर होते, पण त्यांनी आपल्या आईला समजावलं की, “हे काही चिरंजिवांच्या यात्रेचे दिवस नाहीत”. राधाबाई काशीयात्रेहून आल्यानंतरही सदाशिवाची अगदी प्राणापलीकडे काळजी करत, त्याच्यासाठी नवनवीन कपडे आणि खेळणी मागवून घेत, तशी पत्रंच आहेत आज पेशवे दफ्तरच्या ९व्या खंडात उपलब्ध.

दि. ७ फेब्रुवारी १७४० या दिवशी सदाशिवरावभाऊंचे लग्न फडणीसांच्या घराण्यातील उमाबाई यांच्याशी झालं, पण दुर्दैव असं की याच वर्षीच्या २८ एप्रिल रोजी बाजीरावांचा मृत्यू झाला आणि लगेच १७ डिसेंबर रोजी चिमाजीअप्पाही मृत्यू पावले. चिमाजीअप्पांसोबत अन्नपूर्णाबाई सती गेल्या. पण असं असूनही नानासाहेब पेशव्यांनी आपल्या या चुलत भावाचा आपल्या सख्ख्या भावांपेक्षाही प्राणपणाने सांभाळ केला.

सदाशिवरावभाऊंना लहानपणापासून राजकारणाची समज होती, किंबहुना बाजीरावांनी आणि अप्पांनी लहानपणापासून त्यांना तसं शिक्षण द्यायला सुरवात केली होती. वयाच्या जेमतेम नवव्या वर्षी त्यांनी धावडशीच्या ब्रह्मेंद्रस्वामींना पाठवलेली पत्र वाचली असता या वयातही एखाद्या समंजस माणसाचा पोक्तपणा त्यांच्यात पुरेपूर भरला होता हे लक्षात येतं. ब्रह्मेंद्रस्वामींनी चिमाजीअप्पांकडे कल्याण-भिवंडीतील मिळकतीचा काही भाग ‘भिक्षा’ म्हणून मिळावा असं कळवलं होतं. अप्पा यावेळी वसईच्या मोहिमेत गुंतले होते आणि स्वामी इकडे पात्रांवर पत्रं पाठवून विचारणा करत होते. अखेरीस नऊ वर्षांच्या सदाशिवरावभाऊंनी ब्रह्मेंद्रस्वामींना पत्रं लिहिलं की,

“स्वामींच्या कृपेपुढे काय कमी आहे? पण कोकणातल्या प्रजेचे हाल सुरु आहेत, त्यात अलीकडे पाऊस नाही, तरीही आपलं म्हणणं मी नानासाहेबांना लिहून पाठवलं आहे, ते काय म्हणतात ते तुम्हाला कळवतो”.

नानासाहेब उत्तरेत मोहिमेला निघाले असता वयाच्या बाराव्या वर्षी लहानग्या सदाशिवाने नानासाहेबांना पुण्यापासून दूर जाऊन निरोप दिला. त्यावेळेसही पुन्हा ब्रह्मेंद्रस्वामींचा लकडा मागे होताच, की वसईच्या मोहिमेतील लाकडी पेट्या आणि घंटा पाठवून द्या. भाऊसाहेबांनी आत्ताही ब्रह्मेंद्रस्वामींना जेवढ्यास तेवढं उत्तर देऊन सगळं प्रकरण निस्तरलं. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांच्या चरित्रात छापलेली पत्रं वाचनीय आहेत.

इ.स. १७४४ मध्ये नानासाहेब जेव्हा भेलशाच्या स्वारीवर गेले तेव्हा इकडे पुण्यात सदाशिवरावभाऊंच्या व्यतिरिक्त कारभार सांभाळणारा असा एकही पेशवे घराण्यातील करता पुरुष नव्हता. यावेळी १४ वर्षाच्या भाऊसाहेबांनी पुण्याचा कारभार पुरंदरे मंडळींच्या मदतीने सांभाळला. या स्वारीच्या सुरुवातीच्या काळात भाऊसाहेब आणि जनार्दनपंत (बाजीरावांचा धाकटा मुलगा, नानासाहेबांचा सख्खा भाऊ) हे नाशिक आणि तिथून माहुलीला गेले. यावेळी कर्नाटकचा प्रांत शाहू महाराजांनी बाबूजी नाईक बारामतीकरांना दिला होता, पण नाईकांकडून हवी तशी कामगिरी न झाल्याने शाहू महाराजांना प्रश्न पडला आता पाठवावं तरी कोणाला? नानासाहेब तर उत्तरेत गुंतलेले. यावेळी नानासाहेबांच्याच सांगण्यावरून दि. ५ डिसेंबर इ.स. १७४६ रोजी कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले. या स्वारीत खरंतर पिलाजी जाधवरावांना भाऊंच्या सोबतीला पाठवावं असं नानासाहेबांना वाटत होतं, पण अचानक पिलाजींना आपल्यापाशी ठेऊन नानासाहेबांनी महादोबा पुरंदरे यांना भाऊसाहेबांसोबत कर्नाटकात पाठवलं.

भाऊसाहेब आणि महादोबा कर्नाटकात लहानसहान संस्थानांना जिंकून घेणार असं स्पष्ट दिसून आल्यामुळे निजामाने आपला पुत्र नासिरजंग याला कर्नाटकात पाठवून दिलं. भाऊसाहेबांनी इकडे कित्तूरचं महत्वाचं ठाणं जिंकून घेतलं, सावनूरकरांशी तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या आणि ते सोंध्याच्या रोखाने निघाले.

इकडे साताऱ्यात नानासाहेबांवर एक वेगळेच संकट कोसळले. बाबूजी नाईकनवरे नानासाहेबांनी कुरघोडी केल्याने त्यांनी शाहू महाराजांचा गैरसमज घालून देऊन इतर सरदारांच्या साथीने नानासाहेबांचं पेशवेपद महाराजांकरवी दूर करवलं. पण अखेर नानासाहेबांबद्दल मिळालेली माहिती खोटी असल्याचा विश्वास बसून तसेच त्यांच्याबद्दल ज्या काही शंका होत्या त्या दूर झाल्या असं स्पष्ट समजून पुन्हा मार्च १७४७ मध्ये शाहू महाराजांनी नानासाहेबांनांच पुन्हा सन्मानाने पेशवेपद बहाल केलं.


चित्र वर्णन: शिवछत्रपतींचे नातू, शंभू राजांचे पुत्र आणि मराठेशाहीचे पाचवे छत्रपती शाहू महाराज (थोरले), सातारा.
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Shahu_I
मूळ चित्र ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय’ येथे आहे.



चित्र वर्णन: श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे – “आम्हीं गनीमलोक शिवाजी महाराजांचें शिष्य आहों!” असं अभिमानाने सांगणारे, राष्ट्रीय बाण्याचे अत्यंत कर्तबगार पेशवे, यांनी सदाशिवरावभाऊ पानिपतावर पडल्यावर उद्गार काढले,
‘भाऊविना दौलत व्यर्थ आहे!”. चित्र स्रोत: कौस्तुभ कस्तुरे संकलित. मूळ चित्र ‘पेशवे संग्रहालय, पर्वती’ येथे आहे.

चित्र वर्णन: श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे – “आम्हीं गनीमलोक शिवाजी महाराजांचें शिष्य आहों!” असं अभिमानाने सांगणारे, राष्ट्रीय बाण्याचे अत्यंत कर्तबगार पेशवे, यांनी सदाशिवरावभाऊ पानिपतावर पडल्यावर उद्गार काढले,
‘भाऊविना दौलत व्यर्थ आहे!”. चित्र स्रोत: कौस्तुभ कस्तुरे संकलित. मूळ चित्र ‘पेशवे संग्रहालय, पर्वती’ येथे आहे.

इकडे हे सगळं सुरु असताना भाऊसाहेब कर्नाटकात विजयावर विजय मिळवत होते. दि. ५ डिसेंबर १७४० रोजी भाऊ मोहिमेवर निघाले होते. जाता जाता रतनगड जिंकला. नंतर आजरे, मायनहळ्ळी, बिदनापूर, बहादूरबिंडा, इत्यादी जिंकून दि. ११ मे १७४७ रोजी भाऊसाहेब पुन्हा महाराष्ट्रात आले, आणि जेजुरीजवळ इंदापूर इथे नानासाहेब-भाऊसाहेबांची भेट झाली. दुसऱ्या दिवशीच भाऊसाहेबांचा पराक्रम नानासाहेब पेशव्यांनी साताऱ्यातील आपल्या मुतालिकांना म्हणजेच नाना पुरंदऱ्यांना लिहून कळवला. नानासाहेब लिहितात,

“नबाबाचा शाह चिरंजीव राजश्री भाऊ यावर होता. यास्तव आम्हीं राजश्री स्वामींचा निरोप घेऊन मजल दरमजल पंढरपूरच्या रोखे आलेलो. चिरंजीव सावनूर प्रांती होते, त्यास सांप्रत नवाब वारणा संगमाकडे गेले. नसरजंग फौजसुद्धा सिरे प्रांती गेले. मजल दरमजल श्रीरंगपट्टणाकडे जाणार. चिरंजीवांकडे त्यांचा रोख होता तो टळला व अखेर सालचे दिवस आले. याजकरिता चिरंजीव मजल दरमजल त्या प्रांतीहून निघोन आजी छ ११ जमादिलोवली इंदुवारी नजीक इंदापूर येथे चिरंजीव आले. भेट जाहली. याउपरी इकडे काही गुंता आहे ऐसे नाही”.

दि. १० डिसेंबर १७४७ या दिवशी नानासाहेब पेशवे नेवाईच्या प्रसिद्ध मोहिमेवर जाण्यासाठी निघाले. खरंतर या वेळी भाऊसाहेबांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा मानस होता, किंबहुना भाऊसाहेब मोहिमेवर निघालेही होते. पण मध्येच तब्येत बिघडल्याने २४ जानेवारी १७४८ रोजी भाऊसाहेब अचानक मोहिमेतून पुण्याला यायला निघाले.

इ.स. १७४८ चं वर्ष उगवलं तेच जणू भट आणि पुरंदरे या आत्यंतिक घरोबा असलेल्या घराण्यांमध्ये वितुष्ट घेऊनच. नानासाहेब पेशवे स्वतः अंबाजीपंतांच्या मुलाच्या म्हणजेच महादोबा पुरंदऱ्यांच्या तालमीत तयार झाले होते. पण काही कारणावरून महादोबा आणि नानासाहेबांमध्ये वाद झाला. महादोबा हे पेशव्यांचे मुतालिक होते आणि सातारा दरबारातील खाचाखोचा त्यांना माहित होत्या, पण नानासाहेबही हिंदुस्थानात मोहिमा करत असल्याने उत्तर हिंदुस्थानची त्यांना खडानखडा बातमी होती. अशातच कारभारावरून खटके उडाले आणि अखेर महादोबांनी कारभारातून अंग काढून घ्यायचं ठरवलं. नानासाहेब म्हणाले, “बाबा (महादोबा) नसले तरी भाऊ आहे सगळं काम पाहायला, तो व्यवस्थित करेल”. झालं. हे नसतंच भाऊसाहेबांच्या मागे लागलं. महादोबाचं जरी नानासाहेबांशी वाकडं आलं असलं तरी त्यांनी लगेच पेशव्यांशी प्रतारणा केली नाही हेही तितकंच खरं. महादोबा सासवडला त्यांच्या घरी जाऊन बसले. त्यातच नानासाहेब पेशव्यांचा सरदार, कल्याणचा सुभेदार रामाजी महादेव बिवलकर याने मानाजी आंग्र्यांचा माणिकगड अचानक छापा घालून घेतला यामुळे भाऊसाहेब आणि महादोबांच्या विचारांमध्येही तफावत आली. भाऊसाहेबांचं म्हणणं होतं की अंतर्गत कुरबुरींमध्ये फारसं लक्ष न घालता महाराजांची आणि राणीसाहेबांची मर्जी प्रसन्न ठेवावी आणि आपली कामं सुरु राहू द्यावी. नानासाहेबांचा भाऊंना पाठिंबा असल्याने महादोबा-पेशव्यांमध्ये आणखी वाकडं आलं. अखेरीस इ.स. १७४८ च्या शेवटी सातारा दरबारात मुतालिक कोण असावा हे चित्र स्पष्ट होण्यासाठी महादोबांनी स्वतःहून भाऊसाहेबांचं नाव सुचवलं, पण नानासाहेबांना मात्र सातारा दरबारात भाऊंनी जाऊ नये असं वाटत होतं. याला कारणही तसंच होतं. भाऊंचा करारी स्वभाव पाहता ते तडकाफडकी कोणताही निर्णय घेतील, कोणालाही कसंही बोलतील याची भीती नानासाहेबांना होती. नुकतंच त्यांना पेशवाईवरून हटवण्याचं कारस्थान साताऱ्यात झालं होतं, आणि महाराजांना काहीबाही समजावून नानासाहेबांच्या बद्दल विष पेरण्यात आलं होतं. आता भाऊंचा रोखठोक कारभार याला कारणीभूत होऊन पुन्हा असं काही होऊ नये अशीच नानासाहेबांची इच्छा होती.

यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः भाऊसाहेबांनाही ही गोष्ट पटली असावी कारण ते स्वतः म्हणतात, “मी साताऱ्यात जाणार नाही”. दि. ३० जुलै १७४८ रोजी भाऊसाहेबांना पुत्र झाला, पण अर्थात तो पुढे फारसा जगला नाही. दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शाहू महाराजांचा साताऱ्यात मृत्यू झाला. शाहू महाराजांना औरस संतती नव्हती, म्हणून काही महिन्यांपासूनच वारसाचा शोध सुरु होता. अशातच राजाराम महाराज व महाराणी ताराबाईंचा नातू, दुसऱ्या शिवाजी महाराजांचा मुलगा रामराजा हा जिवंत असून त्याला गादीवर बसवावं असं सर्वानुमते ठरलं. खरंतर कोल्हापूरकर संभाजीराजांना साताऱ्याच्या गादीवर बसवून पूर्वी सातारा आणि कोल्हापूर अशा मराठा सिंहासनाच्या दोन गाद्या झाल्या होत्या त्या पुन्हा एकत्र करून ‘एक स्वराज्य एक छत्रपती’ असावा असं नानासाहेबांचं मत होतं. पण मृत्यूपूर्वी शाहू महाराजांनी ज्या दोन याद्या केल्या त्यात नानासाहेबांना वंशपरंपरागत पेशवाई देण्यासोबतच ‘कोल्हापूरच्या वंशाचा कोणीही माणूस साताऱ्याच्या गादीवर बसवू नये’ असं नमूद केल्याने संभाजीराजांना साताऱ्याच्या गादीवर आणण्याचा नानासाहेबांचा हेतू तडीस गेला नाही.

महाराणी ताराबाईंनी आपल्या नातवाला पुढे आणलं हे पाहून शाहू महाराजांची पत्नी महाराणी सकवारबाईंनी हा रामराजा खोटा आहे आणि ताराबाई राज्य हातात घेऊ पाहतात असा आरोप करून त्याला गादीवर बसवण्याचं नाकारलं. या सगळ्या प्रकरणात स्वतः नानासाहेब आणि भाऊसाहेब साताऱ्यात मुक्कामास होते. दरम्यान दि. २२ मार्च १७५० रोजी भाऊसाहेबांच्या पत्नीचा, उमाबाईंचा पुण्यात मृत्यू झाला, म्हणून तीन महिन्यात दुसरं लग्न करायचं अशा हेतूने नानासाहेबांनी पेणचे सावकार कोल्हटकर यांची कन्या पार्वतीबाई यांचा विवाह दि. २६ एप्रिल १७५० रोजी भाऊसाहेबांशी लावून दिला.

या दरम्यानच्या काळातच उत्तरेत असलेल्या जयाप्पा शिंद्यांचा व त्यांचे कारभारी रामचंद्रबाबा शेणवी यांचा वाद झाला आणि रामचंद्रबाबा पेशव्यांकडे दक्षिणेत परत आले. जयाप्पाचा असा ग्रह झाला की रामचंद्रबाबा होळकरांची बाजू पेशव्यांकडे उचलून धरतात. इकडे दक्षिणेत पुन्हा ताराबाईंनी नानासाहेब पेशव्यांशी फारकत घेऊन आपला पूर्वीचा उद्योग आरंभायला सुरुवात केली होती. ज्या रामराजांना त्या आपला नातू म्हणत होत्या तोच आता खोटा आहे असं सांगायला त्यांनी सुरुवात केली. या प्रकरणात प्रतिनिधी आणि त्यांचा मुतालिक यमाजी शिवदेव यांनी ताराबाईंच्या बाजूने बंड केले, पण अखेर २९ सप्टेंबर १७५० रोजी नानासाहेबांनी स्वतः छत्रपती महाराजांना सांगोल्यावर मोहीम करायला सांगून हे बंड मोडून काढले. या सांगोल्याच्या मुक्कामात स्वतः सदाशिवरावभाऊंनी छत्रपती रामराजांकरवी स्वराज्याची नवी व्यवस्था लावून दिली. हा करार सांगोल्याचा करार म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

या सगळ्या प्रकरणात कर्जाची मात्र चिंता सतावत होती. शिंदे-होळकरांकडून थोडाफार पैसे येत होता पण गुजरातेतून दाभाड्यांकडून कसलाही पैसे येत नसल्याने भाऊसाहेबांनी अखेरीस गुजरातेत स्वर पाठवून पैसे वसूल करायचा उद्योग आरंभला. हे सगळं का, तर महादोबांसारखा हुशार माणूस कारभारातून बाहेर गेल्याने आणि नानासाहेबांच्या मागे देशाची राजकारणं असल्याने इथल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला खमक्या माणूस नव्हता. आणि म्हणूनच, भाऊसाहेबांनी नानासाहेबांकडे पेशव्यांचं कारभारीपद आता स्वतःहून मागितलं. यावेळेस नानासाहेबांनी भाऊसाहेबांना ते दिलं नाही, कारण कितीही केलं तरी आजवर पुरंदरे घराण्याने कारभारीपद भूषवलं होतं. आता कितीही वाद झाले असले तरी पुरंदऱ्यांकडून ते काढून घ्यावं याकरिता नानासाहेबांचं मन धजावत नव्हतं. इतक्यात कोल्हापूरकर संभाजीराजांकडून आणि महाराणी जिजाबाईंकडून भाऊसाहेबांना कोल्हापूर गादीच्या पेशवेपदाकरिता विचारणा झाली. जिजाबाईंनी स्पष्ट लिहिलं होतं,

“शाहूंचे राज्यात पेशवे आहेत, आम्हांस पेशवे नाहीत. आम्ही आपले राज्याची पेशवाई तुम्हांस देतो. (त्या पत्रातच पुढे) … तीन किल्ले म्हणजे भीमगड व पारगड व वल्लभगड व पाच हजारांचा मुलुख देऊ”.

हे जेव्हा महादोबांना समजलं तेव्हा त्यांनी स्वतःहून नानासाहेबांची समजूत काढली आणि भाऊसाहेबांना कारभारीपद देववलं.

इ.स. १७५१ च्या जानेवारीत भाऊसाहेब कर्नाटकात नासरजंगाच्या मोहिमेवर निघाले. या मोहिमेच्या सुरुवातीचा वृत्तांत स्वतः भाऊसाहेब साताऱ्यात नाना पुरंदऱ्यांना लिहीतातं,

“आम्ही दरमजल कर्नाटकास चाललो. मोंगलासाठी महिनाभर वाट पहिली. लहान सहान महालाचे दोन चार लाख रुपये घेतले. शेवट कालबर्ग्यापर्यंत आलो. फिरंगी सर्व प्रकारे आमचे. नवाबाचे खान जांब उगेच तेथे राहिले. त्यामुळे गैरकामाचे म्हणून सारे मोगलांचे मते मजली करून तलबेचा हंगाम केला देखील असे झाले म्हणून माघारा गेले. खानाची भेटी जाहलियावर भागानगर आगर शहर इकडे जातील. बिघडावयाची गोष्ट नाही. आम्हीही मागे पेच नाही असे समजून पुढे चाललो.”

फेब्रुवारी १७५१ मध्ये भाऊसाहेबांनी कर्नाटकातून साताऱ्याला नाना पुरंदऱ्यांना तेथील बातमी सविस्तर लिहून पाठवली,

“इकडील वर्तमान तरी भागानगरहून लिहिले होते, पलीकडेही सविस्तर लिहिले होते त्यावरून कळलेच असेल. तेथून पाच सात माजली भागानगराचे रस्त्याने मोंगलास (निजामास) आडवे आलो. कृष्णे अलीकडे दो कोसांवर मोंगल (व) आम्ही जवळ आलो. फत्तेसिंह, राघोजी, सर्व सरदार सामील झाले. नबाबाचा पुत्र याचे साहित्याशी येऊन वाईट करणे. अपेशास पात्र म्हणून सतरा लाख रुपये पुढे कर्नाटकाचा चौथाई वाजवी अंमल त्रिचनापल्ली भागानगर वगैरे बाकी या निकालाप्रमाणे केले. सर्व सरदार बरोबर वागवून काम झाले. मागे गायकवाडांचा ओढा न पडता तर आणखी काम होऊन दोन महिने पोट भरावयास कर्नाटकाची संस्थाने होती. प्रस्तुत याप्रमाणे झाले”.

मध्यंतरी पुन्हा एकदा भाऊसाहेबांबद्दल कोल्हापूरकरांकडून पेशवाईबाबत नानासाहेबांकडे विचारणा झाली आणि अखेर नानासाहेबांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि भाऊसाहेबांसह नानासाहेब दि. ६ जून १७५१ रोजी पुण्यास परत आले.

इ.स. १७५२ च्या अखेरीस नानासाहेब पेशव्यांनी भाऊसाहेबांसह पुन्हा कर्नाटकाच्या मोहिमेला प्रारंभ केला. दि. २० मार्च १७५३ रोजी भाऊसाहेबांनी तुंगा आणि भद्रा नद्यांच्या संगमावर असलेला होन्नूरचा किल्ला जिंकून घेतला, दि. १३ मे रोजी धारवाड जिंकले. इथून नानासाहेब थेट कोल्हापुरात आले, संभाजीराजे छत्रपतींकडून त्यांनी भाऊसाहेबांना पेशवाईची वस्त्रे देवविली आणि दि. १९ जून रोजी दोघेही भाऊ पुण्याला परत आले. यानंतरही लगेच एक मोहीम काढून दि. २ जानेवारी १७५४ रोजी हे दोघेही पुन्हा कर्नाटकात जायला निघाले ते दि. ४ जून १७५४ रोजी स्वारी आटोपून पुण्याला परत आले.

१८ जुलै १७५४ रोजी भाऊसाहेब नाशिकला कुंभमेळ्याला जाऊन तिथून नाशिकजवळच्या त्रिंबकगडावर गेले. गडावर पूर्वी एक मंदिर पाडून मशीद उभारली गेली होती. तिचे पुन्हा मंदिर करावे अशी आज्ञा भाऊसाहेबांनी दिली. भाऊसाहेबांचा कारभार इतका नेटका होता की त्यांनी राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. ती त्यांच्या मृत्यूनंतर ११ वर्षे म्हणजे इ.स. १७७२ पर्यंत तरी अव्याहत सुरु होती असं ५ जानेवारी १७७२ च्या गोपिकाबाईंच्या पत्रावरून दिसतं.

दि. १४ ऑक्टोबर १७५४ रोजी खाशा दिल्लीच्या बादशहाचे फर्मान सदाशिवरावभाऊंना आले.

“वजीर इमाद-उल-मुल्क याच्या जाचातून मला वाचवावे आणि तुम्हीं व नानासाहेबांनी एखादा विश्वासू नोकर येथे नेमून जसे तुम्हीं साताऱ्याच्या राजांना, शाहूमहाराजांच्या वारसांना अतिशय इतमामाने ठेवले आहे तसेच मलाही ठेवावे”

असं दिल्लीचा बादशाह महम्मद आलमगीर दुसरा याने भाऊसाहेबांना लिहून कळवलं. एवढंच नाही तर बादशाह म्हणतो,

“तुम्हांला वाटेल त्या माणसाला दिल्लीच्या बादशहाची वजिरी आणि मीरबक्षीगिरी द्यावी”.

दि. २४ ऑक्टोबर १७५४ रोजी नानासाहेब आणि भाऊसाहेब बेदनूरच्या मोहिमेवर निघाले असता या मोहिमेतच महादोबा पुरंदऱ्यांचा तोफखान्यावरील अधिकारी मुझफ्फरखानाशी वाद झाला आणि खान हैदरअलीच्या आश्रयाला जाऊन राहिला. या प्रकरणामुळे नानासाहेबांनी तोफखान्यावर तितकाच एक जबरदस्त अधिकारी नेमला त्याचं नाव माधवराव पानसे. अखेर दि. १२ एप्रिल १७५५ रोजी बेदनूर प्रांतातून खंडण्या घेऊन नानासाहेब आणि भाऊसाहेब पुण्याला परत आले.

दि. २० ऑक्टोबर १७५५ रोजी भाऊसाहेब, विश्वासराव आणि स्वतः नानासाहेब पुन्हा सावनूरच्या मोहिमेवर निघाले. या मोहिमेत एकूण आठ लाख रुपयांचे ३३ महाल आणि आठ लाख रुपये नगद खंडणी घेण्याचं ठरलं, पण नख्त खंडणी न आल्याने पेशव्यांनी हुबळी, केरूर आणि बेळगाव हे तीनही किल्ले जिंकून घेतले आणि दि. १९ जुलै १७५६ रोजी हे सगळे पुण्याला परत आले. या दरम्यान मुझफ्फरखान गारदी हा पुन्हा पेशव्यांच्या चाकरीत येऊन राहिला. खान मुत्सद्दी असल्याने नानासाहेबांनी त्याला पुन्हा जवळ केलं पण त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र कोणालाही कळू शकलं नाही.

सावनूरचा गुंता उरकल्यानंतर श्रीरंगपट्टणमचे राजकारण सोडवणे गरजेचे होऊन बसले होते. दि. १ जानेवारी १७५७ रोजी, स्वतः नानासाहेब आणि भाऊसाहेब पेशवे पुन्हा कर्नाटकच्या दिशेने निघाले. मुझफ्फरखान गारदी पुन्हा पेशव्यांच्या चाकरीत आल्याने तो त्याच्या तोफखान्यासह यावेळी सामील झाला होता. भाऊसाहेबांच्या दिमतीला प्रथमच यावेळी नाना फडणीस सुद्धा होते. पेशव्यांनी नंदराजाशी छत्तीस लाखांवर करार केला. त्यातील पाच लाख रुपये रोख मिळाले आणि उरलेल्या वसुलीकरिता नंदराजाने १४ महाल पेशव्यांकडे गहाण ठेवले. विजापूर प्रांतातले शिऱ्याचे ठाणे यावेळी पेशव्यांच्या ताब्यात आले. बेळगावही मराठी साम्राज्यात दाखल झाले. नानासाहेब आणि भाऊसाहेब १५ जून १७५७ रोजी पुण्याला परत आले.

भाऊसाहेब एकीकडे साताऱ्याच्या पेशव्यांचे दिवाण असले तरी ते कोल्हापूरच्या गादीचे प्रधानही होते. असाच एक कजिया कोल्हापूरकर संभाजी महाराजांकडे आला असता त्यांनी तो कजिया सोडवण्याचा निर्णय भाऊसाहेबांवर सोपवला. दि. १३ ऑगस्ट १७५७ रोजी शंकराजी केशव फडक्यांचे एक पत्र भाऊसाहेबांना आले ते असे (पे.द.२२, ले.१०१) –

“श्रीमंत राजेश्री भाऊसाहेबांचे सेवेसी विनंती सेवक शंकराजी केशव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागायत छ २७ जिल्काद पावेतो ये प्रांतीचे व सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. राजश्री शंभूछत्रपती स्वामी यांनी आज्ञापत्र बरोबर बालीखान व नाईकजी निकम हुजरे यासंगमे पाठविले. तेथे नाहस्थानेच प्रांत बिदनूरचे दक्षिणेकडील तहद कालिकोट पावेतो घाटाखाली दर्याकिनार मुलुख आहे. तेथील संस्थानिक साबरी राजा कालिकोट व येळू राजा संस्थान पुबाबर हे दोघे सखे बंधू. याचेच दुसरे ठेवणीत चौघेजण याच्या राज्यात तेही राजे म्हणवितात. परंतु मातबर उभयतां बंधू लिहिले आहेत. हे चौघेजण आहेत. ते या उभयतांचे हुकुमतीत आहेत. त्यास याचा मुलुख बिदनूरकर राजा बुंदी बसापा नाईक याणी काही मुलुख घेतला आहे. सदरहू राज्यास मानीत नाही. याजकडे हे राजकारण स्वामींकडे यांणीच सांगोन पाठविले , त्यावरून करवीराहून हुजरे दोघेजण दाखल पाहावयास रवाना केले. यांणी जाऊन उभयतां बंधू राजे व दुसरे चौघे यांची भेट घेतली. त्यास त्यांनी सांगितले की आरमार व लष्कराची फौज आली तरी आपण सामील होऊन, हा मुलुख सोडवून, जे खावंद नेमून देतील ते घेऊन, लष्कराची फौज आली तरी बिदनूरचे राज्य सोडवून आरमारात भारी जमाव पाईचा आला तरी बंदरकिनारा आरमार येता सामील होऊन मातबर गाव आहेत तेथे पैदास्त करून देऊन यैसी त्याची बोली आहे. याप्रमाणे हे उभयता सांगता त्यास स्वामींचे आज्ञापत्र आले तेच या उभयतासमागमे देऊन सेवेसी पाठविले आहेत. स्वामींनी हे वृत्त मनास आणून राजश्री अण्णाप्पाही तिकडील माहित आहेत, त्यासही पुसावे व यांजबरोबर दाखल्यास शहाणे माणूस देऊन सर्व संस्थानिकांस सर्व पत्रे देऊन दाखला पाहावा. तेथील दाखल पाहून आलियावर राजकारण ठीक असल्यास स्वामींच्या चित्तात येणे ते येईल. त्यासारखा विचार कर्तव्य तो स्वामी करीतील. राजश्री स्वामींच्या पत्राचे उत्तर लिहून अलाहिदा पाठवले आहे. स्वामींच्या विचारास येईल तरी पाठवावे”.

थोडक्यात, बिदनूरच्या दक्षिणेस असलेल्या भागात दोन भाऊ राज्य करत असता बिदनूरचा संस्थानिक या दोघांना राजा मानीत नसून हा भाग आपल्या राज्यात आहे असं म्हणत होता. यामुळे या लोकांनीं करवीरकर छत्रपतींकडे तक्रार केल्याने संभाजी महाराजांनी आपले पेशवे सदाशिवरावभाऊंना लक्ष घालायला सांगितले. या बाबतीत भाऊसाहेबांनी लक्ष कितपत दिले ते समजत नाही, कारण ते स्वतःच सिंदखेडच्या मोहिमेवर होते असं दिसतं.

दि. २९ ऑक्टोबर १७५९ रोजी पुण्यात गारपिरवर (म्हणजे सध्याचं ससून हॉस्पिटल) भाऊसाहेबांचा डेरा पडला असता त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. भाऊसाहेब बेसावध होते. मागून वार पडत असतानाच भाऊसाहेब शाई घेण्यासाठी वाकले आणि वारकऱ्याचा वार चुकला. भाऊसाहेबांच्या जवळच उभ्या असलेल्या नागोजी गुजराचे लक्ष होतेच. त्याने पुन्हा वार होण्यापूर्वीच त्या माणसाचा हात गच्च पकडला. परंतु हत्याराचा निसटता वार भाऊसाहेबांच्या पाठीवर झालाच. हा हल्ला करणारा माणूस हैदरखान म्हणजेच मुझफ्फरचा जावई होता. हैद्राबादचा निजामअल्ली आणि मुझफ्फरखानाला भाऊंचा अडसर असल्याने त्यांनाच मारून बाजूला करावे असा हा कट होता जो उधळला गेला. दुसऱ्या दिवशी या सासरा-जावयाची डोकी मारण्यात आली.

भाऊसाहेबांचा कारभार हा अत्यंत हिशेबी होता. उत्तरेत सरदार पैसे खातात आणि सरकारात काही देत नाहीत हा आरोप अनेक वर्षांपासून होता, आणि त्यात भाऊसाहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं होतं. झाशीचे सुभेदार गोविंदपंत बुंदेले हे एक मोठं प्रस्थ असलं तरी भाऊसाहेबांनी त्यांनाही सोडलं नाही. आजच्या काळात सांगायचं तर भाऊसाहेबांनी एक कमिशन बसवून गोविंदपंतांच्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवली. गोविंदपंतांवर नऊ आरोप ठेवण्यात आले. पण हे होत असतानाच दक्षिणेकडे भाऊसाहेबांना पुन्हा निजामाच्या मोहिमेवर जावं लागलं, आणि फेब्रुवारी १७६० मध्ये उद्गिरवर भाऊसाहेबांनी निजामाला युद्धात हरवलं. खरंतर यावेळेस निजामाचा पूर्ण नायनाट करायचा होता पण नेमकं याच वेळेस उत्तरेत अब्दाली येऊन धडकला होता आणि दि. १० जानेवारी १७६० या दिवशी दिल्लीजवळ बुराडी घाटावर अब्दालीशी दोन हात करताना दत्ताजी शिंदे मारले गेले होते.


चित्र: भारतीय उपखंड १७६० – मराठा साम्राज्याचा उत्कर्षबिंदू. The Public Schools Historical Atlas by Charles Colbeck.
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Sadashivrao_Bhau

चित्र: भारतीय उपखंड १७६० – मराठा साम्राज्याचा उत्कर्षबिंदू. The Public Schools Historical Atlas by Charles Colbeck.
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Sadashivrao_Bhau

भाऊसाहेब उद्गिरहून परत येतानाच नानासाहेब आणि विश्वासराव वगैरे मंडळी पुढे गेली आणि दुधनेच्या काठावर परतूड इथे या दोन्ही सैन्यांची मार्चच्या पहिल्या आठवड्यात, ७ तारखेला भेट झाली. उत्तरेत रघुनाथराव जाणार होते हे निश्चित झालंही होतं, पण ऐनवेळेस रघुनाथरावांचा विचित्र कारभार पाहता भाऊसाहेबांनी उत्तरेत जावं असं ठरलं. दि. १३ मार्च रोजी भाऊसाहेब परतूडहून ससैन्य निघाले आणि सिंदखेडला आले. यावेळेस त्यांच्यासोबत जवळपास पाऊण लाखांची फौज जमा झाली होती. नानासाहेब स्वतः उत्तरेच्या मोहिमेवर निघणार होते पण त्यांच्या तब्येतीने ऐनवेळेस उचल खाल्ल्याने नानासाहेबांना मागे पुण्यातच राहावं लागलं. रघुनाथरावांना मात्र यावेळेस पुन्हा निजामाच्या तोंडावर ठेवण्यात आलं. भाऊसाहेबांविषयी एका पत्रात लिहिलं आहे की,

“अब्दालीचे परिपत्याबद्दल श्रीमंत (भाऊसाहेब) येत आहेत. यांची सलाबत, पुण्यप्रताप भारी आहे. त्याचे (अब्दालीचे) पारिपत्य होते, काही चिंता नाही”.

चित्र वर्णन: अहमदशाह अब्दाली, हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो. चित्र स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Ahmad_Shah_Durrani#/media/File:Ahmad-Shah-Durani.jpg


चित्र वर्णन: अहमदशाह अब्दाली, हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो. चित्र स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Ahmad_Shah_Durrani#/media/File:Ahmad-Shah-Durani.jpg

चित्र वर्णन: १८व्या शतकातील दख्खनी मराठा चित्रशैलीतील सदाशिवरावभाऊंचं चित्र (मध्यभागी), सोबत डावीकडे इब्राहिम खान गारदी. चित्र स्रोत: https://commons.wikimedia.org/wiki/File:Sadashivrao_Bhau_with_Ibrahim_Khan_Gardi.jpg
मूळ चित्र: राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे आहे.


चित्र वर्णन: १८व्या शतकातील दख्खनी मराठा चित्रशैलीतील सदाशिवरावभाऊंचं चित्र (मध्यभागी), सोबत डावीकडे इब्राहिम खान गारदी. चित्र स्रोत: https://commons.wikimedia.org/wiki/File:Sadashivrao_Bhau_with_Ibrahim_Khan_Gardi.jpg
मूळ चित्र: राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे आहे.

यावरून सुरुवातीपासूनच पानिपत आपण जिंकणार असा आत्मविश्वास मराठ्यांना होता हे उघड उघड दिसते.

दि. १८ मार्च १७६० रोजी भाऊसाहेबांनी सैन्यासह सिंदखेड सोडले, तिथून ४ एप्रिल रोजी बऱ्हाणपूर, १२ एप्रिल रोजी नर्मदेकाठी हंडिया, २४ एप्रिल रोजी मध्यप्रदेशात सिहोर, ६ मे रोजी सिरोंज, २१ मे रोजी नरवर, ३० मे ते २ जून पर्यंत ग्वाल्हेर मुक्काम, ४ जून रोजी कुवारी आणि लगेच ८ जून रोजी चंबळ नदी पार केली. १२ जुलै रोजी गंभीर नदी ओलांडली आणि १४ जुलै रोजी भाऊसाहेब सैन्यासह आग्र्याला येऊन पोहोचले. तिथून १६ जुलै रोजी मथुरा करून २९ जुलैला दिल्लीच्या वेशीवर येऊन धडकले. दि. २ ऑगस्ट रोजी मराठी फौजांनी दिल्लीत प्रवेश केला. भाऊसाहेबांची ही प्रचंड युद्धतयारी आणि आवेश बघून नेहमीसारखा अब्दाली प्रत्यक्ष युद्धाला उभा राहण्यापूर्वीच अफगाणिस्तानात पळून जायच्या तयारीत होता. पण नजीबखानाने त्याला काही ना काही कारणाने थांबवून ठेवलं होतं. एका पत्रात उल्लेख आहे,

“सर्वही श्रीमंतांचे प्रतापे उत्तमच होईल. शत्रूचे पारिपत्य स्वल्पच काले श्रीमंत करतील, गुंता पडतो असे नाही. अब्दाली आपल्या देशास (अफगाणिस्तानात) जाण्यास सिद्ध आहे, परंतु नजीबखान जाऊ देत नाही”.

भाऊसाहेबांनी सैन्याच्या खर्चासाठी दिल्लीच्या तख्तावरील चांदीचा पत्रा काढला आणि त्याची नाणी पडली. त्यांनी सिंहासन फोडलं ही शुद्ध दंतकथा आहे. दिल्लीत आल्यावर भाऊसाहेबांनी विश्वासरावांना प्रथम एक तख्त करून तेथे बसवले, दरबार भरवला व सर्वांकरवी मुजरे करवले. यानंतर भाऊसाहेबांनी दिल्लीचा बादशहा प्रथम बदलला.

दि. १७ ऑक्टोबर १७६० रोजी कुंजपुऱ्याचा किल्ला भाऊसाहेबांनी जिंकला. पठाणांची दहा हजार फौज फस्त झाली. मराठ्यांकडची दोनशे माणसं ठार झाली. कुंजपुऱ्यात तीन-चार लाख रुपये रोख सापडले, आणखीही सापडण्याची चिन्हं होती, म्हणून भाऊसाहेबांनी किल्ल्याला खणत्या लावायचा हुकूम सोडला. खणत्या म्हणजे कुदळी घेऊन चक्क किल्ला खणून काढायचा. दहा हजार खंडी गहू सापडला. पैशाची चणचण असल्याने भाऊसाहेबांनी हे धान्य रोजमरा म्हणून वाटण्याचा हुकूम सोडला. समनखान आणि कुतुबशहा या दोघांचा शिरच्छेद करून, त्यांची डोकी भाल्यावर लावून सैन्यात फिरवली. हे कशाकरता? तर दत्ताजी शिंद्यांचा मृत्यू झाल्यानंतर कुतुबशहाने दत्ताजीबाबांच्या देहाची अशीच विटंबना करून त्यांचे मस्तक भाल्यावर खोचून सैन्यात फिरवले होते म्हणून! एकूण, कुंजपुऱ्याला मोठा विजय मिळाला. कुंजपुरा जिंकल्यानंतर इकडे अब्दालीलाही एके दिवशी योगायोगाने यमुना नदीला उत्तर मिळाला. अब्दालीने यमुना ओलांडली आणि तो भाऊसाहेबांच्या रोखाने येऊ लागला. हे पाहताच भाऊसाहेब सैन्यासह पानिपत गावाच्या दक्षिणेला येऊन तळ देऊन राहिले.

यानंतर पुढच्या अडीच महिन्यांत मराठ्यांना परिस्थिती अनुकूल होती पण डिसेंबरच्या शेवटी शेवटी परिस्थिती पालटली व अब्दालीचं पारडं जड होऊ लागलं. भाऊसाहेबांचा दक्षिणेशी असलेला संपर्क तुटला आणि नानासाहेबांना दक्षिणेत येणारी पत्रं बंद झाली. पानिपतचा रणसंग्राम हा एक वेगळा आणि मोठा विषय आहे, तो या लेखात विस्तृत मांडणं शक्य नाही, त्याकरिता पानिपतावरील इतर ग्रंथ अवश्य वाचावेत. दि. १४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतात विश्वासराव पडले आणि सगळं पारडंच फिरलं. भाऊसाहेबही हत्तीवरून उतरल्याने फौजेचा धीर सुटला आणि फौज पळू लागली. होळकर-विंचूरकर वगैरे लोक निकाल लागण्या आधीच पळून गेले होते (याकरिता मी सदाशिवरावभाऊ या माझ्या पुस्तकात अनेक संदर्भ दिले आहेत, सगळे विस्तारभयास्तव इथे देता येणं शक्य नाही).

अखेर शेवटचं नाना फडणीसांनी भाऊसाहेबांना लढताना पाहिलं. त्यांच्याभवती पन्नासएक अफगाणांचा गराडा पडला होता. नाना म्हणतात,

“श्रीमंत अति बुद्धिवान, धैर्यवान, शूर ! कृतकर्मे, गर्वे मात्र विशिष्ट! परंतु तरतूद फारच सैन्याची वगैरे केली. शेवटी निशाणाजवळील तरतूद एकीकडे जाऊन शत्रूची मुख्य स्थानिक गाठ पडली. मी श्रीमंतांसन्निध ईश्वरस्मरण किंचित करून असे. तो विश्वासराव यांस गोळी लागली, पडले. ते हत्तीवर श्रीमंतांनी घालून उभेच राहिले. तो पठाण पाय उतारा (होऊन) आत येऊन मिसळले. तोडातोडी होऊ लागली आणि डावे बाजूचे मातबर सरदार, चौघड्याचे धनी देखील पूर्वीच पळाले. उजवे बाजूनेही होळकर-शिंदे निघोन निशाण निघाले. दोन तीन शत पायदळ होते. श्रीमंत दिसेनासे जाहले, तेव्हा ईश्वर बुद्धी दिली, माघारे फिरलो. पूर्वी बापूजीपंती बोध केला, माघारे फिरावे, त्यास उत्तर केले की अशा समयी श्रीमंतांस सोडणे ठीक नाही. परंतु पुढे या प्रमाणे जाहले”.

इ.स.१७७६ मध्ये शिवप्रसाद नावाच्या, पानिपतावर प्रत्यक्ष हजर असलेल्या माणसाने रोहीलखंडातल्या रोहिल्यांचा इतिहास लिहिला त्यात तो म्हणतो,

“शत्रूचे पाय टिकू शकले नाहीत, पण त्यांनी दाखवलेला त्वेष आणि वीरश्री ही पुराणकाळातील रुस्तुम आणि इस्फन्दार या वीरांची आठवण ताजी करून देत होती. त्यांनी जे शौर्य गाजवले ते त्याचे वर्णन करणे शक्तीच्या बाहेर आहे”.


चित्र वर्णन: १७७० साली फैजाबाद शैलीने एका ‘अब्दालीच्या बाजूच्या’ अज्ञात कलाकाराने काढलेले ‘१४ जानेवारी १७६१ रोजी घडलेल्या १८ व्या शतकातील सर्वात घनघोर अश्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे’ वर्णनचित्र. यात दोन्ही सैन्यांची व्यूहरचना, खंदक आणि शिरच्छेद झालेले सैनिक दिसत आहेत. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो आहे. उजव्या बाजूला तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. अब्दालीच्या डावीकडे पांढऱ्या घोडयांवर शुजा उद्दौला आणि नजीबखान रोहिल्याची कमान दर्शावली आहे आणि अब्दालीच्या उजवीकडे अहमदशहा बंगश आणि हाफिज रहमत खान आहेत. मध्यभागी शहा वलीखान त्याच्या घोडदळासहित उभा आहे. डाव्या बाजूला ‘गोलाची लढाई’ करणाऱ्या मराठ्यांच्या गोटात पांढऱ्या घोड्यावरून जखमी भाऊसाहेबांना खाली घेतलं जात आहे व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. आपल्याला माहित असलेल्या घटना हे चित्र सुसंगतपणे दाखवत नाही. तसेच डाव्या बाजूच्या खालच्या कोपर्‍यात पानिपत शहरांत घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Third_Battle_of_Panipat; https://blogs.bl.uk/asian-and-african/2015/09/battle-of-panipat-1761.html
वरील ऐतिहासिक अस्सल चित्राविषयी चर्चा: https://youtu.be/lMCXAMXb9ps
मूळ चित्र ‘British Library Board, London, Johnson Album 66,3’ येथे आहे.


सदाशिवरावभाऊ

अहमदशाह दुर्रानी अब्दाली

अवध नवाब शुजा उद्दौला
मूळ चित्र: Yale Center for British Art, Paul Mellon Collection

भाऊसाहेब पानिपतात मारले गेले ही गोष्ट अनुपगीर गोसाव्यानी आणि काशीराज शिवदेवानी नानासाहेबांना कळवली होती. नाना फडणिसांना आणि माधवरावांनाही ही गोष्ट माहित होती. पण ही गोष्ट पार्वतीबाईंपासून गुप्त ठेवायची असल्याने पुढे अनेकांना भाऊसाहेब जिवंत आहेत असंच वाटलं आणि याचा फायदा घेऊन त्यांचे तोतयेही निर्माण झाले. काशीराज शिवदेवाने स्वतः भाऊसाहेबांचे अंत्यसंस्कार केले होते. भाऊसाहेबांचं प्रेत मिळालं त्याबद्दल काशीराजाने सविस्तर लिहिलं आहे. तो म्हणतो,

“मैदानावर पावकोसाच्या अंतरावर पुष्कळ प्रेते पडली आहेत आणि ती सरदारांची दिसतात.”

शुजा उद्दौला तेथे पोहोचला, आणि एक प्रेत काढून त्याला धुण्यात आले. प्रेत काढताना त्यावरून मूल्यवान मोती खाली पडले. त्यावरून हा सरदार आहे याची खात्री पटली. शुजा उदौल्याने ते मोती, शशधर पंडित बरोबर होता त्याला दिले. त्याने प्रेत पाहून हे भाऊंचेच प्रेत आहे असे सांगितले. त्यात एक काळा तीळ लहान पैशाएवढा, पाठीवर मुझफ्फरखानाने केलेली कट्यारीचे जखम, पायावर मत्स्याची खूण, अशा खुणा शरीरावर दिसल्या. भाऊ पस्तीस वर्षाचा तरुण आणि मजबूत शरीराचा होता. तो रोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत असे. नमस्कारामुळे त्याचे दंड आणि मांड्या यांवर घट्ट पडलेले होते.


चित्र वर्णन: तिसऱ्या पानिपताची युद्धभूमी – काला अम्ब पार्क पानिपत हरियाणा  
चित्र स्रोत: http://rubeliba.blogspot.com/2017/10/battle-of-panipat.html

चित्र वर्णन: पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या मराठे वीरांचं स्मरणचित्र.
चित्र स्रोत: कौस्तुभ कस्तुरे

शुजाने काशीराजाला म्हटलं,

“तुम्ही त्यांच्या जातीचे (ब्राह्मण) आणि देशाचे आहात. तुमच्या पद्धतीप्रमाणे दहनविधी पार पाडा”.

राजा अनुपगीर आणि बादशहाचे वीस नसक्वी काशीराजाबरोबर देण्यात आले. बादशहा आणि शुजा उद्दौला यांच्या छावणीच्या मध्ये एका ठिकाणी ती शवे नेण्यात आली. गंगाजलाने त्यांना स्नान घालण्यात आले आणि चंदनाची चिता रचून त्यांचे दहन करण्यात आले. त्याचवेळी भाऊंच्या लष्करातून पळून आश्रयाला आलेली दोन हजार माणसे काशीराजाच्या बरोबर होती. सगळ्यांची खात्री झाली की हे शव भाऊंचेच होय.

पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात,

“दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही”,

असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.

एकंदरीत असे होते भाऊसाहेब. शूर, मुत्सद्दी, रणांगणातही कधी पाठ दाखवून न पाळणारे आणि फडावरही तसेच शब्दपंडित. नानासाहेब पेशव्यांचा स्वतःच्या सख्ख्या भावांवर, रघुनाथराव आणि जनार्दनावर जितकं प्रेम आणि विश्वास नव्हता तेवढा आपल्या या चुलत भावावर होता. पुढे २२ जून १७६१ रोजी नानासाहेबांचं पर्वतीवर निधन झालं तेव्हा त्यांच्या मृत्यूसमयी ओठात केवळ एकच नाव होतं, “भाऊ!”.


चित्र वर्णन: सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Sadashivrao_Bhau – मूळ चित्र ‘पेशवे संग्रहालय, पर्वती’ येथे आहे.

चित्र वर्णन: श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव बल्लाळ
स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Vishwasrao
मूळ चित्र ‘पेशवे संग्रहालय, पर्वती’ येथे आहे.

संदर्भ:

  1. मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १, २, ३, ६
  2. पेशवे दफ्तर (Selections From The Peshwa Daftar) – खंड १, २, ६, ९, १८, २१, २२, २५, २६, २७, २८, ४०
  3. पुरंदरे दफ्तर – खंड १ व ३
  4. पेशवे घराण्याचा इतिहास
  5. मराठी दफ्तर रुमाल – भाग २
  6. ब्रह्मेंद्रस्वामींचे चरित्र
  7. काव्येतिहास संग्रहातील पत्रे यादी इत्यादी – आवृत्ती दुसरी (सुधारित)
  8. मल्हार रामराव कृत शाहू बखर
  9. ऐतिहासिक लेखसंग्रह
  10. मराठी रियासत – खंड ४
  11. बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी – खंड १ ते ३
  12. महाराष्ट्रेतिहासाची साधने
  13. पानिपतचा रणसंग्राम
  14. भाऊसाहेबांची कैफियत
  15. सातारा ऐतिहासिक लेखमाला – भाग १ व २
  16. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य – खंड ५ व ६
  17. भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक क्र. १६

लेखक – कौस्तुभ कस्तुरे
www.kaustubhkasture.in

(प्रस्तुत लेखक हे इतिहासाचे गाढे अभ्यासक असून गेल्या काही वर्षांत त्यांनी महत्त्वाचे संशोधन करून महाराष्ट्राच्या सत्य आणि सप्रमाण इतिहासावरील साहित्य संपदेत मोलाची भर घातली आहे आणि पुढेही घालत राहणार आहेत. राफ्टर पब्लिकेशन्स द्वारे प्रकाशित झालेली त्यांची अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा: ‘पेशवाई’, ‘इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ व २’, ‘पुरंदरे’ आणि सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ’ – संपादक)

वरील लेखातील चित्रे ही विषयानुरूप विकिपीडिया व गुगल वरून साभार संकलित केली आहेत – संपादक

पानिपत हा प्रत्येक इतिहासप्रेमीच्या जिव्हाळ्याचा आणि वेदनेचा विषय! पानिपतच्या महासंग्रामाचे दोन नायक म्हणजे सदाशिवरावभाऊ व अब्दाली. नियतीने यशाचे निसटते का होईना पण दान शेवटी टाकले ते अब्दालीच्या पारड्यात आणि भाऊसाहेबांच्या नशिबी आला तो एखाद्या शोकांतिकेतल्या कर्तृत्ववान पण कमनशिबी नायकाप्रमाणे दुर्दैवी अंत. “आम्ही अब्दालीचा हिसाब बाळगत नाही” असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या भाऊसाहेबांनी हिंदुस्थानाच्या रक्षणार्थ “हिंदू पातशाहीचे मातबर वजीर सर्व राज्य भार आम्हांवर आहे” हेच वचन हृदयात धारण करून जीवाची पर्वा न करता अभिमन्यु प्रमाणे पराक्रमाची शर्थ केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिगरबाज लढा देऊन भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली झुंजार वृत्तीच्या मराठ्यांनी गिलच्यांना आपल्या तलवारीचे असे काही पाणी पानिपतावर पाजले की मराठ्यांचा पराभव होऊनही पानिपताच्या युद्धानंतर वायव्येकडून परकीयांचे एकही आक्रमण भारतावर झाले नाही. त्या दिवशी हजारो ज्ञात-अज्ञात वीरांची पराक्रमविद्युल्लता अशी काही लखलखली की तिच्या तेजाने गिलचे आणि गिलच्यांची सोबत करणारे एतद्देशीय देखील दिपून गेले. पानिपतानंतर अब्दालीने लिहिलेल्या एका पत्रांत तशी स्पष्ट कबुली देखील दिली आहे. मराठेशाहीच्या नव्हे जगाच्या इतिहासात पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला नेहमीच मानाचे स्थान असेल. पानिपत म्हणजे अश्वत्थाम्यासम भळभळता अन् कधीही न भरून येणारा घाव असला तरी समस्त मराठ्यांनी तो अभिमानाने लल्लाटीं भूषवावा असा ‘तिलक’ आहे ……!!
पानिपतावर राष्ट्ररक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या असंख्य मराठेवीरांना कोटी कोटी नमन!
चेतन रेगे, संपादक

सुप्रसिद्ध इतिहासकार श्री. निनाद बेडेकरांच्या एका ‘पानिपत सप्ताह’ व्याख्यानातून सादर केली गेलेली कविवर्य कुसुमाग्रजांची वीररसाने भरलेली एक सुप्रसिद्ध कविता:

समरभूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले !
तुटून पडतां मस्तक खाली धुंद धडाने लढलेले !
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !
बाप असे कलिकाळ अमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा !
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !
“हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !
“त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !!

जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हां भयभीत करी !


कविवर्य – कुसुमाग्रज उपाख्य श्री. विष्णु वामन शिरवाडकर
२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९.
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.


शिवभूषण श्री.  निनाद बेडेकर
१७ ऑगस्ट १९४९ – १० मे २०१५
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या अभ्यासकांच्या प्रभावळीतील थोर इतिहास संशोधक

संकलन – चेतन रेगे, संपादक