काही मनात नसताना संचारबंदी आमच्यावर लादण्यात आली, विशेषतः आमच्यासारख्या उतार वयाच्या लोकांवर. आमच्या सगळ्या हालचाली बंद करण्यात आल्या, लायब्ररी, सिनियर सेन्टर्स, सारेच एकदम बंद करण्यात आलं. नंतर मास्क घालून बाहेर जाण्यास परवानगी मिळाली पण तोपर्यंत दोन महिने संचारबंदी जारी होती. हा जगात सर्वांचा नवीन अनुभव होता आणि तक्रार कुणाजवळ करावी, हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता.
यातून मार्ग काढणं जरुरीचं होतं. तेव्हा मला मार्ग सापडला तो असा. लाइब्ररीतील व सिनियर सेन्टर मधील बुक clubs होते. त्यांना online लिस्ट पाठवायला सांगितली आणि ती पुस्तके ipad वर ओव्हरड्राइव्ह वर टाकली नि वाचायला सुरुवात केली. हे आधीच शिकून घेतलं होतं ते आता उपयोगी ठरलं. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हे कोडं उलगडलं, शिवाय घरातील वाढलेली कामं. कोरोनामुळे साफसुफीची कामं वाढली होती त्यात वेळ जात होता.
आम्हाला लोकं हवी असतात. ती मात्र सापडत नव्हती. तेव्हा फोनवर समाधान मानावं लागे. त्यातही वेळ जात होता. नंतर लेक कॉऊंटीच्या whatsapp ग्रुपने झूम वर भेटायचं ठरवलं, आता नोकरी करत नसल्याने झूम प्रकरण मला नवीनच. तेही शिकून घ्यावं लागलं. त्यावेळी पुष्कळ लोकांची मदत लागली आणि ती मला मिळाली हे माझं सौभाग्य. जशी दर रोजची ग्रोसरी करायलाही मदत मिळाली तसंच. मी त्याबाबत स्वतःला भाग्यवान समजते. केवळ मुलावर अवलंबून रहावं लागलं नाही, हे माझं नशीबच म्हटलं पाहिजे. नाही म्हणायला एक मनात होतं ते सुरु करता आलं नाही हे खरं! पण त्यातूनही मार्ग काढता येईल. अजून वेळ गेलेली नाही.
तेव्हा coronaमुळे लादली गेलेली संचारबंदी अशी फायदेशीर ठरली. निदान मलातरी काही नवीन शिकता आलं जे नाहीतर कधीच घडलं नसतं. प्रत्यक्ष गोष्टीला निमित्त लागतं हेच खरं! नाहीतर आता सुरु झालेले virtual करमणुकीचे कार्यक्रम कशाला कुणी फंदात पडलं असतं? अशा गोष्टी गरजेतूनच निपजतात.
जयश्री हुपरीकर Deerfield, IL |