मी, माझं चित्र आणि माझ्यातली कवियत्री!

तो आला अनाहूतपणे. मला ना त्याचं  नाव माहिती होतं , ना गाव ना आकार ना ठाव. पण 2020 चा मार्च उजाडला आणि एक एक करत हळूहळू पणे त्याने सगळ्या विश्वाला थोडं थांबायला लावलं, किंबहुना धकाधकीच्या जीवनात थोडं थांबायला शिकवलं. पण गतीची सवय झालेल्या शरीराला आणि मनाला एकदम लागलेला हा ब्रेक काहीसा जड गेला सुरुवातीला. चीड-चीड झाली, दैनंदिन रूटीन अपसेट झालं, वेळापत्रक बिघडलं. ऑफीस, कामच काय, पण शाळा सुद्धा घरूनच सुरू झाली. पण ना सुनामी आली होती ना झाला होता भूकंप, ना चालू होतं युद्ध, पण मग कशाने एवढे सगळे शांत झाले होते? 

सगळे शांत झाले होते ते एका न दिसणाऱ्या विषाणूमुळे, त्याच नाव करोना. 

ह्या करोनाने दिलेल्या वेळेचा वापर कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. 1996 साली शाळेत चित्रकला विषय संपल्यावर हातात कधीही ब्रश घेतला नव्हता जो ह्या करोना मध्ये हातात घेतला. ह्या quarantine मध्ये पूर्ण केलेलं हे चित्र. ऑफिसचं  काम झाल्यावर वेळही छान उपयोगी आणता आला आणि त्या रंगांनी  प्रसन्न सुद्धा वाटलं .

गेले चारहून अधिक महिने ह्या करोनाचं थैमान सुरू आहे. कुणी खूप त्रास सहन करतय तर कुणी यमराजाला  चुकवून परत येतंय. रोजच्या बातम्या मधून माणसांची वेगवेगळी रूप पुढे येतात. डॉक्टर आणि पोलिसांमध्ये दिसणारा पांडुरंग असू दे, किंवा धर्म आणि जात पात विसरून मदतीला सरसावणारे हात असू देत, एरव्ही भांडणारे सगळेच एकत्र आले ह्या करोनामुळे आणि शेवटी जिंकली ती माणुसकी.

अशाच एका बातम्यांमध्ये एका 93 वर्षाच्या आजींची बातमी वाचली, त्यांना करोना झालाय म्हणून त्यांना दुःख नव्हतं, उलट इतके वर्ष काहीच आजार होत नव्हता म्हणून वाईट वाटत होतं त्यांना, कारण त्या वृद्धाश्रमात राहायच्या-एकट्या. त्यांच्या बातमीने सुचलेल्या चार ओळी पुढे लिहिलेल्या आहेत

उगवत्या सूर्यास लोक वंदिती, मावळत्या भास्कराचा मित्र मी 

नदी वाहते उताराकडे, चढणाकडे जातोय मी II1 II

सगळे असले धूसर जरी, काजव्यांचे प्रमाण मानतोय मी 

ध्येयाच्या आशा बऱ्याच वर, शब्दहीन गीत गातोय मी II2II

वेदना असल्या खोलवर जरी, दुःखातून सुख वेचतोय मी,

हात जरी असले रिक्त, तरीही तुझ्याचसाठी दान मागतोय मी II3II

पौर्णिमेच्या चांदण्यात जन न्हाती, अवसेच्या अंधकारात लपलोय मी 

जगण्यासाठी किती मारतात हे लोक, मरण्यासाठीच अजून जगतोय मी II4II


आणि जाता जाता एक लग्नात घ्यायचा चार पदरी उखाणा….

आजीच्या माझ्या केवढा तो आग्रह म्हणाली घे की उखाणा,

सासूबाईंनी डोळे वटारले आणि केल्या खाणा-खुणा,

बाजूला होता उभा भाऊ मला चिडवायला शहाणा

इश्श, मला पण ह्याचं नाव घेण्यासाठी हवाच होता की बहाणा

मुहूर्त काढला, खरेदीला झाली सुरुवात 

स्वारीच्या विचारांनी रात्रच काय दिवस पण वाटे चांदरात 

मामा-मामी आले आणि आले काका-काकू 

घर सगळं सजल आणि लागले सारे आनंदाने नाचू

गडबडी मध्ये सुद्धा दिसलं आईच्या डोळ्यातलं पाणी

न सांगताच मला कळली तिच्या हृदयातली अबोल ती वाणी 

हळद झाली, मेहेंदीने सगळ्यांचे हात रंगले 

देवदेवक बसले आणि रुखवत सुद्धा सजले

व्याही भोजन पडले थाटात फार

इकडच्या स्वारींनी केल्या फस्त बासुंदीच्या वाट्या चार 

लग्नाचा दिवशी वाजले सनई-चौघडे, आणि  हातावर लावलं गेलं अत्तर,

कुणी काही प्रश्न विचारले तर  आमच्या मामंजींचं तयार असायच उत्तर 

एकच गुलाब आणि एकच पेढा दया असं बजावलं होत त्यांनी

मला मात्र दोन पेढे हळूच दिले इकडच्या स्वारींनीं 

पंगत बसली आणि आली माझ्यावर उखाण्याची वेळ  

काही केल्या मला सुचेना कशी निभावू हि वेळ 

मेथी आठवली, आठवला चंद्र, घातलं साकडं कृष्णाला 

सगळे नुसत नाव घे ग घे ग म्हणतात, येत नाही कुणीच मदतीला 

इकडच्या स्वारीचं नाव घ्यायला मला वाटत होती लाज 

माझ्या तोंडून  त्याचं नाव ऐकायची सगळ्यांना किती ती खाज 

नाव घ्यायला तयार झाले आणि थोडी मी मोहरले 

तसं तर रोजच मारते हाक,तरीही मी शहारले 

शेवटी एकदाचा भरवला मी इकडच्या स्वारींना घास, 

सौरभच नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी खास!


कल्पना नेकलीकर 
Hoffman Estate, IL