माझी अक्षरसाधना

आपल्यापैकी बहुतेकांच्या अक्षरप्रवासाची सुरुवात पाटीवरच्या ‘श्रीगणेशा’ने झाली असेल. पण आजच्या स्मार्टफोन-कंप्युटरच्या युगात हाताने लिहिण्याची गरज कमी झाली किंवा जवळजवळ संपलीच. असे असतानाही सुलेखन(Calligraphy) रुपाने ही कला आजही जिवंत  आहे. 

सुलेखन ही एक कला आहे हे मला २००८ साली कळले. त्याकाळी पेन हातात घेऊन काही मुद्दामून लिहीले तरच कागदावर उतरायचे. पण पहिल्यापासूनच पेनचे खूप आकर्षण. ज्या दुकानात पेन असतील अशा दुकानात गेल्यावर, पेन घ्यायचे नसतील तरीही, एकदा तरी stationary aisle मधून गेल्याशिवाय मला चैन पडत नाही. मी २००८ साली कॅलिग्राफी शिकायला सुरुवात केली ती पेनच्या आकर्षणामुळे. पण अक्षरांनी मला कधी छंदी बनवले कळलेच नाही. अर्थात लग्न, मुले, संसार या गाड्यात सातत्य राहिले नाही. तरी अधून मधून हे अक्षर प्रेम डोकावत राहिले. गेल्या दोन वर्षात काही स्थानिक workshops करून पाहीले. त्यातून ऑनलाइन माध्यम कळाले. त्यावर बरेच लहान-मोठे कोर्सेस केले. तरी लक्ष्य सराव करणेच राहिले, तेही काळी शाई नाहीतर रंगीबेरंगी ब्रश पेन वापरण्यापुरतेच. कॅलिग्राफी हा बऱ्यापैकी छंदच राहीला.

परंतु  क्वारंटीन काळात सर्व गणितेच बदलली. घरी राहून वाढलेल्या कामांबरोबर खूपच जास्त होणारा नकारात्मक बातम्यांचा भडीमार बेचैनी वाढवू लागला. मग मनाला उभारी देण्यासाठी अक्षरांकडे वळले. गेले वर्षभर एकाच प्रकारची कॅलिग्राफी करून तोचतोचपणा जाणवायला लागला होता. अर्थात त्याचा फायदा पाया भक्कम होण्यासाठी नक्कीच झाला. क्वारंटीन काळात ऑनलाईन माध्यमात सुलेखनाचे अजून बरेच कोर्सेस उपलब्ध झाले. तर त्यातील काही धडे शिकायचे, खरे म्हणजे गिरवायचे ठरवले. हे नवनवीन धडे गिरवताना या छंदाचे वेड कधी झाले आणि ते साधनेत कधी बदलले कळलेच नाही.

सुलेखन म्हणजे सुंदर आणि रेखीव लिहीणे. त्याबरोबरच अक्षरे रेखाटणे आणि ती सजवणे. या कलेतून मनःशांती मिळते असं मी म्हंटलं तर कदाचित तुम्हाला खोटं वाटेल. पण मी प्रयत्न करते समजावण्याचा. सामान्यतः तुमचा लिहिण्याचा वेग जर १ असेल तर तो कॅलिग्राफी करताना बराच कमी करावा लागतो. जवळजवळ १/५ ते १/ १० एवढा. कारण प्रत्येक अक्षर अनेक स्ट्रोकस् किंवा लहान रेघांत विभागलेले असते. ही प्रत्येक रेघ जशी त्या लिपीमधे आहे तशीच खूप हळूहळू कागदावर उतरवावी लागते. प्रत्येक वळण, प्रत्येक रेघ, हाताचा जोर, पेन मधून कागदावर उतरणाऱ्या शाईचे प्रमाण यावर नियंत्रण मिळवावे लागते. आणि जसे गाडीची असते; जेवढा जास्त वेग तेवढे नियंत्रण कमी; तसेच पेन अन् शाईचे होते. ते साध्य करताना श्वासांवरही आपोआप नियंत्रण येते. कारण ज्या प्रमाणात श्वासांचा वेग त्याच प्रमाणात हातांना वेग मिळतो. हे सगळे होत असताना लक्ष फक्त पेन आणि त्यातून बाहेर पडणारी शाई यावरच राहते. कधी मन इतर सर्व विचार सोडून फक्त पुढच्या अक्षराचा, रेघेचा, वळणाचा विचार करू लागते ते कळतच नाही. आणि मग सुरू होते अक्षरसाधना… 

साधना म्हणजे शेवटी काय? तर बाकी सर्व विचार सोडून एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. असं करताना हळूहळू श्वासांवर नियंत्रण येते आणि प्रत्येक श्वास शरीरात भिनताना जाणवू लागतो. मला कधी वाटलेही नव्हते की ही अक्षरे अशी अवस्था आणू शकतात. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत कॅलिग्राफी करताना मी ऑडिओ बुक्स सहज ऐकू शकायचे. गेल्या वर्षभरात मी अशी बरीच पुस्तके ऐकली. मला त्यातली गोष्ट नीट कळायची. पुस्तकातील स्थळविशेष नंतर सुद्धा चांगलेच आठवायचे. परंतु गेल्या दोन महिन्यांत मी जेव्हा जेव्हा ऑडिओ बुक ऐकायला चालू केले, तेव्हा अगदी काही मिनिटांतच मला ते पुस्तक कळणे बंद झाले. कारण माझे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अक्षरांवर केंद्रित होऊ लागले होते. काही काळानंतर तो प्रयत्न मी सोडून दिला. आता तर कॅलिग्राफी करताना मी संथ संगीत लावते. मग उरते फक्त मी आणि अक्षरे. 

या अक्षरसाधनेत तासंतास निघून जातात. हात दुखून येतो पण मन भरत नाही. सतत नवीन कागदावर काय लिहायचे, काय काढायचे याचेच विचार चालू असतात. थोडा जरी मोकळा वेळ मिळाला की मन कॅलिग्राफीकडे कधी वळते कळत नाही. बेचैन मन उत्साहित होऊन नवीन कल्पनेवर काम करू लागते. त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा घरच्यांनाही जाणवते आणि त्यांनाही प्रोत्साहीत करते. प्रत्येक रेखाटन, लेखन, अक्षरचित्र पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद; त्यावर Instagram, FaceBook वर मिळणारी दाद आणि उत्साहवर्धक प्रतिसाद, या सर्वांची मजा काही औरच.

या कलेचे सामर्थ्य अतोनात आहे. मी ते अनुभवते आहे याहून चांगले भाग्य कोणते. खरंच या अक्षरांनी माझा क्वारंटीन काळ खूप सुसह्य केला आहे. गेल्या तीन महिन्यांतील काही नवीन प्रयोग खाली डकवले आहेत. त्या प्रत्येकावर वेगळा लेख होऊ शकतो. हे अनुभव तुमच्या समोर मांडताना मला खूप छान वाटले. या लेखामुळे प्रेरित होऊन तुम्हालासुद्धा हे नवविश्व अनुभवायची इच्छा झाली असेल, तर मला नक्की कळवा.


वैशाली शिंदे 
Aurora, IL