१२ मार्चला रात्री ऑफिस मधून टेक्स्ट आला की उद्यापासून अनिश्चित काळापर्यंत घरुन काम करायचं. पोटात मोठ्ठा गोळा आला कारण मी जास्त कधी घरून कामच केलं नव्हतं. मग हळू हळू त्याची सवय झाली आणि घरून काम करणं आवडायला पण लागलं.
COVID-१९ चा माझ्यावर सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे माझ्या तन्वीला आज ४+ महिने भेटले नाही. कामामुळे तिला इथे घरी येता येणं शक्य नाही. पण ती सुखरूप आहे त्यातच समाधान आहे.
माझी मैत्रीण शुक्ला जोशीने जेव्हा मला सांगितलं की हॉस्पिटल्स, डॉक्टर्ससाठी मास्क करायचे आहेत, मी तिला लगेच सांगितलं की मला पण मास्क करायला आवडतील. आईला मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिला तर आश्चर्यच वाटलं. आई नेहमी माझ्या लहानपणी मागे लागायची शिवण शिकायला. घरी शिलाई मशीन असूनही मला कधीच शिवणाची आवड नव्हती.
अर्थात इथे माझ्याकडे शिलाई मशीन असण्याचा प्रश्नच नव्हता आणि मास्क तर करायचे होते. मग माझ्या मैत्रिणी मृणाल जोगळेकर, रश्मी गोगावले ह्यांच्या कडून शिलाई मशीन आणली आणि मास्क बनवले. बरं का, आता मी चक्कं शिलाई मशीन विकत घेतली आहे.
सगळ्यांसारखी मी पण सुरुवातीला ४-५ आठवड्याची grocery आणून ठेवायचे.. एकदा झुकिनी खूपच आणली गेली. मी विचार करत होते, काय करावं एवढ्या झुकिनीचं? तेवढ्यात मला माझ्या आईच्या आत्याचं कैरीचं तिखट गोड लोणचं आठवलं. आणि मी झुकिनीचं तिखट गोड लोणचं केलं. खूप छान लागलं ते लोणचं. त्याची रेसिपी तुमच्या बरोबर share करते, बघा आवडतं का तुम्हाला पण?
साहित्य:-
१ झुकिनी, २ टेबलस्पून लोणचं मसाला, १ टेबलस्पून गूळ, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, १/४ टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग
कृती :-
१. झुकिनीचे लहान तुकडे कापणे आणि त्याला लोणच्याचा मसाला लावून १/२ तास बाजूला ठेवणे.
२. तेल गरम करणे. त्यावर मोहरीची फोडणी देणे.
३. त्यावर झुकिनी घालून परतणे. झाकण ठेऊन जरा वाफ आणणे.
४. नंतर त्यात गूळ घालणे आणि ५ मिनिटं झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवणे.
५. परत एकदा परतणे. आणि गॅस बंद करणे.
६. थंड झाल्यावर शक्यतो काचेच्या बरणीत भरून ठेवणे.
हे लोणचं १५ दिवस फ्रिजमध्ये छान राहतं.
हर्षदा सावंत Naperville, IL |