न ठरवता लागले नवीन छंद

इंजिनीरिंगची आवड लहानपणा पासून, त्यामुळे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करण्याची आणि नाही दुरुस्त झाली तरी  ती का दुरुस्त करू शकलो नाही ह्याचा शोध लावण्याचा माझा छंद. एखादी क्रिया, आवड जेव्हा आपण जोपासतो त्याला जर छंद म्हणतात, तर न शिकलेल्या,  न जोपासलेल्या, गोष्टीत मन रुचलं तर  त्याला काय म्हणायचं? कोविड लॉक डाउन मध्ये  नेमकं असंच  काहीसं  झालं.

कोविड लॉक डाउन च्या पहिल्या काही दिवसात फ्रंट लाईन वर्कर्सला मदत म्हणून मास्क बनवण्यासाठी माझ्या सौ ने तिच्या मैत्रिणीचे शिवणयंत्र आणले होते. आणताना हे माहीत  होत की  ते शिवणयंत्र बरीच वर्ष वापरात नसल्याने ते चालण्याची शाश्वती फारशी नव्हती. हे शिवणयंत्र दुरुस्त करताना, मलाही मास्क शिवण्याची इच्छा झाली आणि मी पण मास्क शिवले. काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळाला.

ह्याच दरम्यान YouTube वर बरेच वेगवेगळे पाव बनवण्याचे विडिओ येऊ लागले, ते बघताच अस्सल मुंबईकराला इराण्याच्या बेकरीतला लादीपाव आठवला आणि तसा पाव घरी बनवायचं खूळ लागलं. सुरवातीचे काही प्रयोग चुकले, आणि त्या चुका नेमक्या कश्यामुळे  झाल्या, कोणते घटक बदलले की  त्याचा पाव कसा होईल हे करता करता बऱ्याच प्रकारचे पाव बनवायला शिकलो. घरचा लादी पाव अगदी त्या इराण्याच्या पावासारखा नसला तरीही “उंनीस – बिस ” च्या फरकात  समाधान मानायला हरकत नाही.

अश्या प्रकारे केवळ ह्या लॉक डाउनमुळे  न ठरवता लागले हे नवीन छंद !


समीर सावंत 
Naperville, IL