गेल्या वर्षी आम्ही आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू केलं. आपण कुठे जायला हवं? हा खास दिवस आपण कसा साजरा करूया ? २०२० साठी आम्ही खूप योजना आखल्या होत्या. माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावाने आधीच ठरवलं होतं की, ते मे महिन्यात मुंबईहून आमच्या घरी येणार आहेत. ऑगस्टमध्ये आम्ही सर्व रूचीच्या चुलत भावांबरोबर अलास्काला जाणार होतो. आम्ही दोघंच आणखी एक ट्रिप करण्याचा विचार करू लागलो आणि आम्ही ठरवलं की, एका छानशा रोमँटिक डेस्टिनेशनला जाऊया. इटली, स्वित्झर्लंड, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, हवाई या पैकी एका ठिकाणी जाण्याचं ठरवले. शेवटी आम्ही स्वित्झर्लंडला जायचे ठरवले आणि त्यासाठी योजना आखू लागलो. पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की, कोविड-१९ मुळे २०२० हे वर्ष आगळे वेगळे ठरले. आमच्या सर्व योजना कोलमडायला लागल्या. एप्रिल महिन्यात आम्ही अलास्का क्रूझ रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने भारतातही परिस्थिती तशी सुधारत नव्हती. त्यामुळे मे महिन्यात माझा भाऊ आणि आई-वडील आम्हाला भेटायला येणार नव्हते. आम्ही स्वित्झर्लंडची तिकीटंही बुक केली नाहीत, कारण परिस्थिती सुधारेल की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. असे वाटत होते की, अमर्यादित दिवसाचा कसोटी सामना चालू आहे आणि एकमेव फलंदाज खेळत होता तो म्हणजे कोविड.
२५ मेला रात्री अनेरी आणि अनिश नेहमीपेक्षा लवकर झोपायला गेले, पण मी आणि रुची ने मध्यरात्री टकिला शॉट्स घेऊन लग्न दिवसाचा आनंद साजरा केला आणि झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर आम्हाला सरप्राइज मिळालं. आमच्या मुलांनी स्वयंपाकघराचा परिसर सुंदरपणे सजवला होता. त्यांनी रात्री २ वाजता उठून सकाळी ६.३० वाजेपर्यंत सजावट केली! सरप्राइजेस तिथेच थांबली नाहीत. त्यांनी आमच्या कुटुंबाबरोबर भारतात झूम कॉल ची योजना आखली होती आणि आम्हाला सगळ्या नातेवाईकांशी बोलायला खूप मजा आली. त्यांनी एक छोटासा स्लाईड शोही केला आणि आमच्या कुटुंबियांनी आम्हाला शुभेच्छा दिल्याचे व्हिडिओही दाखविले. अनेरी आणि अनिश यांनी आमच्यासाठी खास बार मेन्यू आणि एक फूड मेन्यू बनवला होता. आमच्या मुलांनी दिवसभर आम्हाला शाही वागणूक दिली.
दिवस मजेत चालला होता आणि संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही. आम्हाला आणखी एक आश्चर्याचा धक्का मिळाला. आमचे प्रिय मित्र-मैत्रिणी आमच्या घरा बाहेर आले आणि आम्हाला बाहेर येण्यासाठी हाक मारत होते. सगळे जण मास्क घालून आले होते आणि सोशल डिस्टंसिन्गचे पालन करत होते. त्यांनी आमच्यासाठी केक आणि शॅम्पेनच्या बॉटल्स सुद्धा आणल्या होत्या. मग मला गायला सांगण्यात आलं. मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर उभे राहून ‘फूलो के के रंग से’ हे गाणं गायलो. आम्ही केक कापला आणि आमच्या मित्रांबरोबर श्याम्पेनचे ग्लास टोस्ट केले!!
आम्हाला अपेक्षित नव्हतं, पण २६ मे २०२० हा दिवस नक्कीच संस्मरणीय होता. आमच्या सर्व मित्र-मैत्रिणीं आणि कुटुंबियांच्या शुभेच्छांबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. खास करून अनेरी आणि अनिश यांचे खूप आभार. आशा करू या की, रूची आणि मी नजिकच्या भविष्यात स्वित्झर्लंडला जाऊ. 🤣
रवी बामणेAurora, IL |