President’s Corner

नमस्कार मंडळी

मायबोली Myमराठी

सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा, हे वर्ष आपणा  सर्वाना उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा देऊन मी वैशाली राजे आपले  मनोगत व्यक्त करणार आहे. २०१९ च्या नव्या कार्यकारणीतर्फे आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आपण सगळेच आपली मायभूमी सोडून या देशात स्थायिक झालो. प्रचंड मेहनत घेऊन आपले वेगळे  असे समाजात स्थान निर्माण केले , या देशाच्या संस्कृती ला आत्मसात केले, विविध सामाजिक कार्यात आपल्या परीने हातभार लावत आहोतच. आपल्या या वर्षीचे ब्रीदवाक्य हे आपल्या परदेशस्थ मराठी बांधवांसाठी अत्यंत समर्पक आहे . आपण आपला देश सोडूनही आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. आपले सण , आपल्या परंपरा, आपली खादयसंस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या साठी आपण प्रयत्नशील असतो. नव्या पिढी साठी मायबोली हि Myमराठी झाली आहे. आपलं मूळ नेमकं काय आहे हे आपल्या मुलांना शोधावे लागू नये तर ते आपोआपच त्यांच्यात सहजपणे उतरावे  या साठी या वर्षीची कार्यकारिणी विशेष प्रयत्न करणार आहे. या वर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहेच परंतु जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. या वर्षी संगीताचे कार्यक्रम असतील, गाजलेली नाटके, तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांनाही वाव देण्यात येईल.

मंडळी, हे वर्ष आणखी एका कारणासाठी विशेष असणार आहे. हे वर्ष आपण सगळे “सुवर्णमहोत्सवी वर्ष” म्हणून साजरे करणार आहोत. १९६९ साली शिकागो महाराष्ट्र मंडळाची स्थापना उत्तर महाराष्ट्रात झाली तेव्हा काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सभासद संख्या असलेल्या या मंडळाने आज साडे तीनशे सभासद संख्येचा चा टप्पा ओलांडला आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्ही अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्यासाठी सादर करणार आहोत. सुरवर्णमहोत्सवी वर्षांचा खास कार्यक्रमही वर्षाच्या अखेरीस संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांच्या भरगोस प्रतिसादाची अपेक्षा आणि खात्री आहेच.

मंडळी, या वर्षीच्या कार्यकारिणीने मंडळाच्या वेबसाइट चा कायापालट केला आहे. ही वेबसाईट जास्तीच जास्त सोपी आणि सोयीची (user friendly ) करण्यात आली आहे. नव्या वेबसाईट तर्फे सभासद नोंदणी, कार्यक्रमाची तिकिटे तसेच सम्पर्क अतिशय सुलभ झाला आहे. सोशल मीडिया चा उत्तम वापर करून आपल्याशी जास्तीच जास्त सम्पर्कात राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण या नव्या सुविधे चा नक्की लाभ घ्याल अशी आशा व्यक्त करते.

मंडळाचे या वर्षीचे ब्रीदवाक्य मायबोली My मराठी आहे, त्या अंतर्गत आपण “मागोवा” हा खास कार्यक्रम सादर करणार आहोत. आपल्या मराठी बांधवानी आज अनेक क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. तसेच अनेक महत्वाच्या पदावर मराठी माणसे कार्यरत आहेत. नवीन पिढीला या सर्वांच्या कष्टांची आणि त्यांनी प्राप्त केलेल्या उत्तुंग यशाची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्तींना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांचे अनुभव आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक उपक्रम घेऊन आम्ही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.

सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्हाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहेच, तसेच आपण भरभरून प्रतिसाद द्याल ही खात्री आहे. चला तर मग मंडळी, सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया..

धन्यवाद

वैशाली राजे

अध्यक्ष , महाराष्ट्र मंडळ शिकागो , २०१९ सुवर्णमहोत्सव

Posted in Uncategorized | Comments Off on President’s Corner