President Corner

President Corner

 

सर्वे सन्तु निरामया: ।

Ashishनमस्कार मंडळी,

 नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी तुमच्याशी येत्या वर्षातल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांबद्दल हितगुज करणार आहे. महाराष्ट्र मंडळाच्या नव्या कार्यकारिणीबद्दल आणि येणाऱ्या वर्षातल्या कार्यक्रमांबद्दल तुम्हाला कुतूहल असणं अगदी साहजिक आहे. अनेकोत्तम दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, सुग्रास भोजन, गप्पा-टप्पा याची रेलचेल येत्या वर्षीही असेलच. नव्या वर्षांमध्ये जुने चांगले उपक्रम तर चालू ठेवूच, पण इतरही अनेक मराठी माणसांच्या मनाला अन शरीरालादेखील आवडतील असे नवे उपक्रम आम्ही सुरु करणार आहोत. त्यामागचा मुख्य विचार “ सर्वे सन्तु निरामया:” म्हणजेच सर्वांचे आरोग्य चांगले राहो हा असेल. आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या दैनंदिन जीवनात आपल्या सर्वांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला, ताणाला सामोरे जावे लागते. याची परिणीती मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारात होते. भारतीय वंशाच्या आपल्यासारख्या लोकसंख्येमध्ये या विकारांचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असतं. बदललेली जीवन शैली, जेवणाची अवेळ, निरस भोजन, कार्यालयीन ताण-तणाव, व्यायामाची कमतरता या व आणखीन अनेक कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात आणि आधी उल्लेख केलेले विकार होण्याची शक्यता वाढतंच जाते. महाराष्ट्र मंडळ हे केवळ मराठी माणसांची मनोरंजनाची सांस्कृतिक आणि मानसिक गरज पुरवणारी संस्था म्हणून मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने मराठी माणसांच्या हिताची आणि आरोग्याचीसुद्धा, काळजी घेणारी संस्था व्हायला हवी. म्हणून “सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे” ह्या मंत्राने प्रेरित होऊन आम्ही आमचे २०१८ चे कार्यक्रम राबवणार आहोत.

 महाराष्ट्र मंडळाच्या माध्यममातून आरोग्य या विषयी जागरूकता निर्माण करावी असा आमचा प्रयत्न राहील. त्या मध्ये आरोग्य जत्रा, संमेलने, चर्चा-विनिमय, आरोग्यविषयक स्पर्धा यांचा समावेश असेल. त्याच बरोबर प्रत्येक कार्यक्रमादरम्यान काही आरोग्य विषयक उपक्रम ही राबवण्यात येतील. आपल्या सर्वांचे आवडते भोजन आणि इतर खाद्यपदार्थ सुद्धा अधिकाधिक रुचकर आणि आरोग्यवर्धक (चवीशी तडजोड न करता) कसे करता येईल याचाही आम्ही अभ्यास करत आहोत.

 गेल्या काही वर्षात मंडळाने अनेक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कार्यक्रम आणले आहेत ज्याला रसिकांची विक्रमी उपस्थिती लाभली. गेल्या काही वर्षातील मंडळाची चढती कमान आणि प्रगती पाहता, या पुढील आव्हान अवघड आहे. पण या वर्षीची समिती या आव्हानाचा सामना करण्यासाठी नव्या उमेदीने आणि नव्या उत्साहाने सज्ज आहे. हे आव्हान पेलण्यासाठी कार्यकारिणीमध्ये जशी जुनी अनुभवी मंडळी आहेत तशीच नव्या रक्ताची अतिशय उत्साही मंडळीसुद्धा आहेत.

 महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी ई-मेल, फेसबुक अशा जुन्या साधनांबरोबरच इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप अशा नव्या प्रसारमाध्यमांचा उपयोग नव्या आणि तरुण पिढीला महाराष्ट्र मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी केला आहे . त्यापैकी ट्विटर , इंस्टाग्राम आणि व्हाट्सऍप कट्टा यांचा वापर सुरु देखील झाला! बदलत्या काळानुसार, महाराष्ट्र मंडळाचे त्रैमासिक ‘रचना” यापुढे पूर्णपणे डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा बेत आहे.

 महाराष्ट्र मंडळातला मराठी जनांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे कारण शिकागो शहर आणि परिसर यामध्ये राहणाऱ्या मराठी लोकसंख्येचा एक छोटा हिस्साच महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. म्हणून यावर्षी महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यतेचे दरवर्षीपेक्षा जास्त पर्याय तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. त्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर पॅकेजचा पर्याय सर्वात आकर्षक आहे कारण या दोन्ही पर्यायांमध्ये चार मुख्य कार्यक्रमांमध्ये तुमच्यासाठी पुढच्या जागा राखीव असतील . महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळावर या विषयीची अधिक विस्तृत माहिती उपलब्ध आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा.

 महाराष्ट्र मंडळ स्थानिक मराठी लोकांसाठीची सांस्कृतिक संस्थादेखील आहे . या तत्वानुसार स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयास राहील आणि मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रमदेखील यावर्षी केले जातील.

 महाराष्ट्र मंडळ तुमचं आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय आणि सहभागाशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाहीत. म्हणूनच कार्यक्रमांना जरूर या असं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण संबंध वर्षासाठी आहे!

 महाराष्ट्र मंडळावरचा तुमचा लोभ असाच वृद्धिंगत होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना .

धन्यवाद

आशिष नगरकर

अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ शिकागो २०१८