दामले गौरव

दामले काकांचं बालपण तरुणपण तसं गिरगाव मुंबईचं. वाचनाची आवड, चौकस आणि जिज्ञासू वृत्ती यामुळे सामाजिक राजकीय घडामोडींवर लक्ष असायचं आणि नकळत अभ्यास घडायचा. तसा शाखेशी संघाशी संबंध आला तो दहाव्या  वर्षापासून. शाखेत जाण्याचा मूळ उद्देश खेळायला मिळतं, मित्र मिळतात असाच होता. वाड्यातला वयानं मोठा मुलगा त्यांच्या शाखा सदस्यत्वाला कारण झाला. तात्विक बैठक घट्ट असण्याचं ते वयही नव्हतं. पण एका बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरां विषयी असणाराअभिमान आणि  नाथ पै ह वी कामत या समाजवादी मंडळींच आकर्षण तर दुसऱ्या बाजूला संघाची त्यावेळेची प्रमुख मंडळी – म्हणजे श्री गोळवलकर गुरुजी, वसंतराव केळकर, बाबा भिडे, ना भा खरे, बाळासाहेब देवरस यांचा प्रभाव. असं संमिश्र वातावरण.  त्यातूनच अठराव्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट.  नंतर राज्यशास्त्र आणि संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात दोन मास्टर्स करण्यात पंचविशी आली असणार.  यावेळी संबंधित खात्यात सरकारी नोकरीही केली. 

तिथे वृत्तपत्रे प्रकाशने यांतील आवडतं काम करण्याची संधी मिळाली.  त्याचबरोबर समाजवाद साम्यवाद आणि संघाचे विचार यांचा अभ्यासही चालू होता.  त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कृष्ण मेनन यांच्या खासदार पदाच्या निवडणुकीत विरुद्ध प्रचार, असा प्रत्यक्ष सहभागही त्यांनी घेतला. 1966 मध्ये समाजवादी पक्षाची फाळणी झाली, पक्ष दुभंगला आणि तरुण दामले काकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाजूने आपला कौल दिला. संघाच्या कार्यकर्त्यांची सेवावृत्ती हिंदू, समाजाच्या बद्दलची आस्था आणि राष्ट्रप्रेम याचा प्रभाव त्यांच्यावर पडला.  याच वेळी दिल्लीतून एक अमेरिकन तरुणाला त्या वेळच्या जनसंघाचा अभ्यास करण्यासाठी भाषांतर आणि निवेदक म्हणून एका भारतीय तरुणाची मदत हवी होती.  दामलेंनी त्याला विनामूल्य ही मदत देण्याचं मान्य केलं.  मुद्दामच मोबदला घेण्याचं नाकारलं.  अशा रीतीने Walter Anderson आणि दामले काकांची दोस्ती तीन-चार वर्षात दृढ झाली.  भारतीय राजकारण, आर.एस.एस.ची राजकीय प्रणाली, प्रतिनिधित्व करणार जनसंघ यांचा अभ्यास सुरू होता.

त्यातूनच वॉल्टर च्या विनंतीवरून अमेरिकेत मास्टर्स करायचं ठरलं. आणि दामले काका आणि वॉल्टर अँडरसन यांची मैत्री घट्ट झाली. या अभ्यासू मैत्रीतूनच दोघांनी मिळून “Brotherhood in Saffron” हे पुस्तक 1983 साली आणि “RSS – A View From Inside” हे पुस्तक 2018 मध्ये प्रसिद्ध केलं. भारतातील राजकीय परिस्थिती बदलली. जनसंघापासून प्रेरणा घेऊन भाजप पक्षाकडे देशाची सत्ता आली आणि हे दुसरं पुस्तक बेस्टसेलर ठरलं. तीन महिन्यात दुसरी आवृत्ती निघाली.  विशेष म्हणजे या अभ्यासपूर्ण लिखाणाला सर्व प्रकारच्या पुराव्यांची साथ होती, पुस्ती होती. गौरवाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला टाटा साहित्य पुरस्कार या मानाचा तीन लाखांचा पुरस्कार मिळाला आणि आता चीन युरोप मध्ये सुद्धा भाषांतर होत आहेत. त्यासाठी या लेखक तयाचं अभिनंदन.

वहिनी ही प्रामाणिक आणि तशाच आपलेपणान वागणाऱ्या. बघता बघता आमच्या मुलांच्या काका-काकू झाल्या, ओळख वाढली जाणं-येणं सुरू झालं. व्हिडिओ रेकॉर्डर त्यांना मीडियामध्ये करिअर करायचं होतं म्हणून घेतलेला. काकांचं मराठी वाचन जबरदस्त. त्यांना मराठी साहित्य, भारताचा इतिहास, राजकारण, आणि समाजकारण याचा प्रचंड व्यासंग. आणि अत्यंत तीक्ष्ण स्मृति.

सुरुवातीला आमचे गप्पांचे विषय मराठी माणसाला कायम साथ देणारे होते.  राजकारण, जनता प्रश्न, त्यानंतर झालेली फूट एसएम गोरे, अत्रे हमीद दलवाई, आणि राष्ट्रीय पातळीवर इंदिराजी गांधी, नेहरू, लोहिया, नाथ पै दंडवते, पुलं, अत्रे, बेहरे, माजगावकर असे लेखक यांचे विषय. गप्पा रंगात येत त्याला मराठी हिंदी सिनेमांचा विषय.

नाटक इत्यादी विषयावर वरवर चर्चा बोलणं होत असे. काकांचं मराठी चांगलं असलं तरी त्यांना सुरुवातीला वेगवान बोलण्याची सवय, त्यामुळे बारकाईने ऐकावं लागायचं  हळूहळू आम्हालाही सवय झाली आणि प्रयत्नांनी त्यांनी पण चार-चौघांसारखं बोलायची सवय केली. त्यांच्या गप्पा चर्चा तुन त्यांचं भारतीय राजकारण, संस्कृती, इतिहास याबद्दलचा व्यासंग मला आवडायला लागला.

अमेरिकेत आमची पहिली काही वर्षे कष्टाची. भारताचा, आपल्या माणसांचा दुरावा जाणवणारा, तिथे नव्याने ओळख छाप पाडायला अवघड करणारं, भारताबद्दल प्रचंड ओढ वाटणारं, आई, वडील, बंधू, आणि मित्रांची उणीव भासणारं असा माहोल सर्वच मराठी मंडळी मध्ये कमी-जास्त प्रमाणात दिसायचा. दूर असल्यामुळे भारतात मिळालेला जिव्हाळा, तिथल्या संस्कृतीची ओढ, तिथली कौटुंबिक समृद्धी आणि त्याची ओढ यामुळे सुरुवातीची वर्षे अमेरिकेबद्दलची मत पूर्वग्रह तयार होत होते.

अशावेळी दामले काकांची भेट म्हणजे एक गावाकडच माणूस कुटुंब भेटल्यासारखं झालं.  या दोघांच्या बोलण्यातला आपलेपणा, दामलें काकांचा गप्पिष्ट पणा यामुळे दोघांच्या अनुभवाचे धागे जुळले. वहिनी प्रामाणिक, पारदर्शक आणि दोघेही खूप अगत्यशील, त्यामुळे संबंध वाढले, घरोबा वाढला आणि कौटुंबिक नाती शेयर व्हायला लागली.

त्यावेळी अभिजीत आमचा मोठा मुलगा चार-पाच वर्षांचा, अद्वैत दोन वर्षांचा, दोघांनाही दामले कुटुंबियांचं निखळ प्रेम आणि जिव्हाळ्याने लगेच आपलासं केलं. दोघेही अधून-मधून त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम घालवायला लागले. वहिनी त्यांचं खाणं-पिणं, देखभाल प्रेमान करीत. तर काका त्यांच्याबरोबर लहान होत. काकांना मुलांबरोबर जुळवून घेणे, विनोदाची परखण, खेळ, जादू, या खुब्या अगदी वया बरहुकूम जमतात. त्यामुळे ते हे कुठल्याही वयाच्या लहान मुलांना लगेच आपलंसं करतात. या दोघांनीही अभी आणि अद्वैतला फार उत्तम जिव्हाळा संस्कार दिले. अजूनही, 25 वर्षांनी सुद्धा मुलांच्या मनात खास असं उत्तरदायित्व या दोघांबद्दल आहे, प्रेम आहे.

दामले दाम्पत्यांची याबाबत तर आम्ही आणि मुलं खरोखरच उत्तरदायी आहोत, असं म्हणणं म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचं अतूट नात्याचा उपमर्द तर नाही होणार?

हळूहळू दामलेंचं समकालीन महाराष्ट्र, भारत, आपला इतिहास, आपले लेखक, नाटक, सिनेमे, तत्कालीन नेते आणि आदर्श यांच्या बाबतीत असणारं ज्ञान, सखोल अभ्यास लक्षात यायला लागला आणि याबाबतीत ते माझा विश्वकोष ठरले. स्वातंत्र्य चळवळ, गांधी, नेहरू, सावरकर, टिळक, शिवाजी महाराज ते पुलं, अत्रे हे आमचे नेहमीचे विषय असतात. त्यांच्याबद्दलच्या गप्पातून, सदरातून आमची भारताशी नाळ दूर राहूनही किंवा दूर असल्यामुळेच जास्त बळकट होत गेली.

दामले काका अन वहिनी हे जोडपं म्हणजे एक अजब रसायन. दामले काका तसे अघळपघळ बोलणं, विनोद करायची सवय. सर्वांना मदत करायचा दोघांचा पिंड. वहिनी पारदर्शी, प्रेमळ, पण स्पष्ट वक्त्या. पण पाहुणचार करण्यात मात्र दोघांची स्पर्धा असायची.

लेखक महत्त्वाच्या मराठी व्यक्ती शिकागोला आल्या की त्यांचा पाहुणचार ठरलेला. आणि याबाबतीत दोघेही पाहुण्यांची उत्तम सरबराई करत. अरुण लिमये, अरुण साधू, हमीद दलवाई ही डाव्या विचारांची मंडळी सुद्धा त्यांचा पाहुणचार घेऊन गेली. त्याबाबतीत दोघेही उत्साही असत. त्याबरोबरच संघाचे तत्कालीन कार्यकर्ते सुधीर फडके, दत्तोपंत ठेंगडी, विवेकानंद हॉस्पिटलचे लातूरचे डॉक्टर श्री, हितकारणीचे श्री पटवर्धन, द मा मिरासदार आणि या ओघात नवीन मंडळी आज पर्यंत त्यांचा पाहुणचार घेऊन गेली. या मंडळींच्या मोठेपणाचा, त्याच्या बरोबरच्या या जवळिकीचा, या दोघांनी कधीच बडेजाव दाखवला नाही. गैरफायदा तर केवळ अशक्य. एक गोष्ट तर मला खूपच विशेष वाटली ती म्हणजे आम्ही पहिल्या फळीतले पुढारी जवळीक असूनही उदाहरणार्थ नानाजी देशसुख, अटलजी, अडवाणी शिकागोला आले तर दामले त्यांची व्यवस्था दुसऱ्या कोणाकडे करीत. कारण या मोठ्या मंडळींचा पाहुणचार करायला सारेच तयार असत. मोठेपणा मिरवायला मिळे. या दोघांनी हे कधीच केलं नाही.

काकांनी आपल्या आईबद्दल कायमच एक खास नातं ठेवलं. त्या जेव्हा जेव्हा भारतातून येत तेव्हा त्यांच्या स्वभावामुळे सौ वहिनींना कायम कमीपणा घ्यायला लागे. प्रसंगी अपमानही होय. त्यावेळी आई कधीच सुनेचा मान राखताना दिसल्या नाहीत. पुढे मग हळूहळू आईचं वय वाढत गेलं आणि त्यांची पूर्ण जबाबदारी दामले आणि वहिनींनी घेतली. त्या कायमच्या अमेरिकेत दामलेकडे राहायला आल्या. प्रयत्न करूनही दोघींमधले संबंध यथातथाच राहिले. स्वतः दामले मात्र आईचं वागणं तसंच्या तसं सहन करत असतात. पण हा बोजा खरा वहिनींना वरच पडतोय असं मला वाटायचं आई मध्ये बदल होणे अवघड होतं. हळूहळू आईंना अपंगत्व आलं आणि विसराळूपणा सुरू झाला. मग नाईलाजाने त्यांना जवळच्या नर्सिंग होम मध्ये ठेवण्यात आले. त्या तिथे आठ-दहा वर्षे राहिल्या आणि तिथेच त्यांच देहवासन झालं. या काळात दामले काका दररोज दोन वेळा जाऊन आईबरोबर तासनतास बसत असत. शिवाय तिथल्या स्टाफ नर्सेस बरोबर दामले काकांनी उत्तम संधान ठेवलं. कधी विनोद शेअर करून तर कधी कौतुक करून तर कधी क्रिसमस गिफ्ट देऊन त्यांनी उत्तम संबंध ठेवले.

खरंतर दामलेंचं आईला न चुकता रोज दोनदा भेटण, रविवारी शनिवारी देवळात किंवा व्हीलचेअरवरून संगीताच्या कार्यक्रमाला नेण, मंडळाच्या पाडवा दिवाळीला घेऊन जाण हे सारं दहा वर्ष सुट्टी न घेता केलं. त्यामुळे त्यांचे मातृप्रेम पाहूनच या स्टाफवर छाप पडली. त्याबरोबरच जे दामले यांना ओळखायचे तेही या त्यांच्या आई वरील प्रेमाने चक्रावून जायचे. असा आधुनिक श्रावण बाळ माझ्यातरी पाहण्यात नाही. शेवटी दोन वर्षे आईचा आजार बळावला आणि त्या पूर्णपणे अंथरुणातच सारं करू लागल्या. त्यांनासुद्धा ओळखू शकत नव्हत्या. तेव्हा तर दामले जास्तच त्यांच्याबरोबर असत. चांगली निगराणी करत. गरम पाण्याने आईचा अंग धुणं, नेहमी त्यांचे आतले कपडे बदलण, स्वच्छता, जातीने लक्ष देत. शेवटी मात्र आई गेल्या, त्यानंतर दामले काकांनी तसं शोक प्रदर्शन न करता आईच्या इच्छेप्रमाणे सर्व सोपस्कार केले. त्यांचा या विधींवर मुळीच विश्वास नसतानाही त्यांनी सारं व्यवस्थित केलं.

दामले काकांच दैवत म्हणजे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर. मला वाटतं सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची पूर्ण छाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडली होती. त्यांच देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टी, अभ्यास, सावधपण हे सार दामलेंनी जमेल तेवढं आत्मसात केलं असावं. इतिहासाचा चांगला अभ्यास, प्रखर स्मरणशक्ती, प्रचंड सहनशीलता याचाही प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्व दिसून येईल. त्यांचं सावरकर प्रेम वयाच्या दहा-अकरा वर्षापासूनच. दादरच्या पश्चिम भागातला हा मुलगा एकदा तर कष्टानं त्यांना सावरकर सदनात भेटूनही आला होता. मला वाटतं यातूनच त्यांना देशप्रेमाची दीक्षा एकतर्फी का होईना मिळाली असणार. दिवसेंदिवस हा प्रभाव वाढतच गेला. हे सारं असूनही स्वतःचे व्यक्तिमत्व सुद्धा दामलेंनी वेगळं असं ठेवलं. आपली विनोदबुद्धी, जनसंपर्क वाढवण्याची खूबी, प्रसंगी सर्वांना लागेल ती मदत करण, प्रसंगी श्रम, वेळ आणि आर्थिक झीज सोसणं, सारं मुक्तपणे चालू असे.

त्यावेळी म्हणजे 1977 नंतर दामलेंची संघाबद्दलची जवळीक हळूहळू लक्षात यायला लागली. त्या दिवसात संघाबद्दल जनमत चांगलं नव्हतं आणि प्रचारकांचा गणवेश, परंपरा, शाखा यांच्याबद्दल मराठी माणसात एक दुरावा होता. प्रसंगी खिल्लीही उडवली जात असे. अशावेळी दामले काका ही फार छान सांभाळून घेत. रागावत तर नसतच पण विनोदात सहभागी होत. हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांमुळे मित्रपरिवार वाढत होता. अमराठी भारतीय, उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे, गुजराती, बंगाली, शिवाय शक्य तेथे मुस्लिम समाजातही त्यांचे संबंध वाढत गेले. अजाण शत्रू व्यक्तिमत्व, विनोदाची पखरण, निर्विवाद भारत प्रेम, पडेल ते काम, मदत करणार, आठवणीनं त्यांच्या आवडी जपणार, त्यामुळे मित्रपरिवार वाढला आणि सर्वच वयाच्या मंडळींशी त्यांची जवळीक होत असे. घरोघरची लहान मुलेही काकांवर खूष असत. संघाचे सदस्य, छोटे-मोठे नेते, कार्यकर्ते, तसेच तरुण प्रचारक यांच्यासाठी दामले अन वहिनी मनापासून पाहुणचार करत. त्यांना काही कमी पडू नये म्हणून काळजी घेत. काही मंडळी त्यांच्या छोट्यामोठ्या सामाजिक कार्यासाठी निधी सकालतार्थ येत.

दोघेही मग पूर्णवेळ त्यांच्या दिमतीला असत. अर्थात या मंडळींमध्ये पण एक जाणवणार साधेपण असे. त्यांच्या गरजा अगदी प्राथमिक असत हे पण नमूद करायला हवं. विवेकानंद हॉस्पिटल, लातूर, स्त्री हितकारणी ज्ञानप्रबोधिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साठीचा सुधीर फडके यांचा संगीत कार्यक्रम, सिनेमासाठी निधी संकलन, अशा अनेक संस्थांचे दामले कुटुंब आश्रयस्थान होते.

दामले वहिनी ह्या व्यवसायाने आहारतज्ञ. न्यूट्रिशन मध्ये त्यांनी मास्टर्स केले आणि पी एच डी चा अभ्यास सोडून त्यांनी जॉब घेतला. त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा संघाच्या कुशीतच घडलं. वडील स्वयंसेवक होते. निखळ प्रामाणिकपणा, पारदर्शी स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, प्रसंगी सडेतोडपणा आणि कामावर प्रचंड निष्ठा, त्याबरोबरच तेजस्वी बुद्धिमत्ता हे सार सहज दिसायचं. त्यांना बेगडीपण, खोटा आव आणणार पोशाखीपण, स्त्रीसुलभ नटण मुरडण, कधीच जमलं नाही आणि आवडलं पण नाही. शिवाय अनावश्यक खर्च सुद्धा त्यांना कधीच आवडला नाही. साधेपणात त्या कस्तुरबा होत्या.

दामले काकांची पदवी पत्रकारिता मेडिया मधली होती .आणि अमेरिकन मीडियामध्ये जॉब मिळण खूपच अवघड होत. त्यात बोलायची छब, एक्सेंट, इथल्या इंग्रजीचे बारकावे, त्यातील अनुभवाचा अभाव, वगैरे मुळे त्या व्यवसायात जम बसवणे दुरापास्त, जवळ जवळ अशक्य होतं. पहिल्या पिढीतल्या भारतीयांना अमेरिकेत या अडचणी तशा सर्वसाधारण सर्वांना जाणवत असत. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर सोडले तर त्यावेळी अगदी प्राथमिक फळीतले जॉबस घ्यावे लागत किंवा मिळेल ते जॉब करावे लागत. दामले काकांनी त्या बाबतीत खूप सहन केलं. पण ती निराशा मात्र त्यांनी कधीच दाखवली नाही. शिवाय इतर पडेल ती कामं करायची तयारी ठेवली. प्रसंगी ड्रायव्हिंग शिकवण, मुलांना शाळेत सोडणं, अन्य बँकेतल्या टेलर काम, मिळेल ते करत राहिले. यातही बुद्धी वापरली. उत्तम काम केलं. पण पैशाचा हिशोब मात्र कधीच ठेवला नाही. जनसंपर्क वाढवत राहिले. त्यांच्या बोलण्यात, वागण्यातून, विनोदातून त्यांची चांगली छाप पडत असे.

अर्थातच घर चालवण्याची 90% जबाबदारी वाहिनी वरच पडायची. त्यांना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये न्यूट्रिशनिस्ट इन नेफरोलॉजी चा चांगला जॉब होता. कायमस्वरूपी होता. अर्थात काम भरपूर असे आणि वहिनींना कामचुकारपणा कधीच सहन झाला नाही. स्वतःला तर नाहीच पण दुसऱ्याचा सुद्धा. अशावेळी स्पष्टवक्तेपणामुळे कामावरच्या सहकार्‍यांशी खटकेही होत. पण त्यांचा स्वभाव कायम तसाच राहिला. लोकांचा दुटप्पीपणा त्यांना कधीच भावला नाही. वहिनींनी अगदी इमानेइतबारे हा जॉब अगदी निवृत्ती मिळेपर्यंत केला आणि त्यामुळे कायम आर्थिक स्थैर्य लाभले. दोघांच्या आयुष्यात त्यांनी कित्येकांच्या मुलांना संस्कार बर्थडे गिफ्ट म्हणून दिल्या पण त्यांच्या संसारात संतती योग नव्हता.

दामले काका विनोदी स्वभावाचे. कधी उथळपणे कुणी काही शेरा केला तर तितकाच परखडपणे पण चपखल उत्तर देण्यास ते तयार असत. एकदा समाजवादी फळीतले माझे मित्र, अमेरिकेतले आर्थिक दृष्ट्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपत्तीचा स्कायफॉल झालेले पण तितकीच उंच शैक्षणिक कारकीर्द असलेले सुनील देशमुख, यांचा महाराष्ट्र मंडळातर्फे सत्कार होता आणि मी थोडा त्यामागे दुरून कारणीभूत होतो. मी दामले यांची ओळख करून देताना सहज डिवचायच म्हणून म्हणालो हे दामलेजी, संघाचे कार्यकर्ते असून तुझे चाहते आहेत. दामले पटकन म्हणाले आमच्यापेक्षा चाहते असणं बरं. मला माझा धडा मिळाला.

पुण्यात सुट्टीवर आले की जिथे जातील तिथे सर्वच क्षेत्रातल्या परिचितांना भेटणं हे दामले भान विसरून करत. एकदा ते असेच समाजवादी विचारसरणीचे यशस्वी लेखक अरुण साधुंना भेटायला गेले. तर अरुण साधू सहज म्हणाले की मी समाजवादी असूनही तुम्ही कसे आवर्जून मला भेटायला येता. दामलेंचे उत्तर – तुम्ही समाजवादी असलात तरी नावातला साधूपणा सुद्धा तुमच्यात पुरेपूर उतरलाय, तेव्हा संपर्क ठेवायलाच हवा.

वि दा सावरकर यांचे विचार हे तर दामले काकांचं फार मोठं संचित. एकदा ते चित्पावन ब्राम्हण सभेत वक्ते म्हणून बोलायला उभे राहिले. सुरुवात झाली आणि माइकन असहकार पुकारला. मिनिटभरात माईक ठीकठाक करण्यात आला, तर दामलेंनी सुरुवात केली, सावरकरांचा आवाज असाच कायम दबवण्यात आला होता, आताही माइकचं काही कारस्थान असावे.

एकदा असंच ते सावरकरांवर बोलत होते तर कोणीतरी सावरकरांच्या ब्रिटिश सरकारला सादर केलेल्या माफीनाम्या बद्दल प्रश्न केला, की ते खरं का? दामलेंनी वस्तुनिष्ठ विचार करून उत्तर दिलं. आपणास अशाप्रकारे एकांतवास आणि गोलू चालवण्याची शिक्षा मिळाली तर ते किती सहन करणार? तेव्हा सावरकरांनी काही वर्षे केलं तर कमीपणा कुठे येतो? उगाच खोटं गलोरिफिकेशन कशाला हवं. तेव्हा कुणीतरी म्हणालं तुम्ही सावरकर भक्तांच्या मेळाव्यात, संघाच्या मंडळीत अस स्पष्ट कसं बोलू शकता? दामलेंचे उत्तर – मी संघाच्या मेळाव्यात मोकळे बोलू शकतो पण आता मी आणखी मोकळेपणात आहे कारण माझी पत्नी पाच मिनिटापूर्वी मला इथे सोडून शॉपिंगला गेली, ते तुम्ही ही पाहिलंच!