आत्मबल

हल्ली जेव्हापासून करोना आपल्या आयुष्यात आला आहे तेंव्हापासून आपल्या जीवनात खूपच उलथापालथ झाली आहे. पालक घरून काम करत आहेत, बालवर्गापासून ते विद्यालयामधील विद्यार्थी  online शिकत आहेत आणि infection च्या दाट शक्यतेमुळे आजी आजोबा घरातच दडी मारून बसले आहेत.

हे सर्व बदल प्रचंड गतीने होत असताना, मी स्वतःशीच विचार केला की माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मला बदलायला आवडेल? मी अनेक वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. मी सर्व प्रकारचे आहार आचरणात आणले, पण ते सर्व प्रयत्न विफल ठरले.

सध्या सर्वजण घरून काम करत असल्यामुळे,  ‘खाद्यच’ सगळ्यांचा केंद्रबिंदू  बनला होता. अशा परिस्थितीत चमचमीत खाणं आणि पेये या मोहांवर मात करणे अधिकच कठीण झालं होतं. मला दररोज योग्य आहाराची आणि व्यायामाची नितांत आवश्यकता होती. माझं वजन कमी करण्याच्या दिशेने प्रवास सुरु असताना मला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची आणि इच्छाशक्ती प्रबळ करण्याची अत्यंत गरज होती. ह्या द्रृष्टीने मला सक्षम करण्यामध्ये योग आणि चिंतनाचा सिंहाचा वाटा होता. माझे उद्दीष्ट गाठण्यासाठी मला माझ्या दोन्ही मुली आणि पतीकडून मोठा पाठिंबा व प्रोत्साहन मिळाले आणि मी शेवटी माझ्या मोहांवर विजय मिळविलाच!

एकदा निश्चय केल्यावर मी कमी कॅलरी खाद्य प्लॅन सुरु केला. खास MMC च्या वाचकांसाठी तो इथे देत आहे. सकाळी साखरविरहित चहा आणि घरी बनवलेली  नाचणीची बिस्किटे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी नाचणीचे खाकरे आणि stir fried भाज्या, अगदी कमी तेलातल्या, किंवा ओट डोसा आणि खोबरं किंवा शेंगदाणे नसलेली चटणी. रोज दोन ते तीन लिटर पाणी. संध्याकाळी अर्ध सफरचंद किंवा कमी गोड आणि कमी कॅलरी असलेलं फळ. रोज एक तास व्यायाम, योगासनं, धावणे अशी शारीरिक activity आणि मुख्य म्हणजे घरच्या जेवणाशिवाय दुसरे कोणतेही जेवण नाही. मित्रमैत्रिणींकडे पण जाताना मी माझा स्पेशल डबा घेऊन जाते.

माझा तुम्हा सर्वांना हाच संदेश आहे की, स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मबलाला आवाहन करा आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग नक्कीच सापडेल !!


वैशाली राजे 
Plainfield, IL